वैशाख वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां !”
वैशाख व. ११ हा दिवस नारदजयंतीचा म्हणून प्रसिध्द आहे. देवर्षि नारद हे पूर्ण ब्रह्मचारी, मोठे तत्त्वज्ञानी, उत्तम गायक, नि:सीम हरीभक्त आणि दुसर्याची उन्नति करण्यासाठीं नि:स्वार्थबुध्दीनें सदैव झटणारे असे होते. नारदस्मृति व नारदपंचरात्र असे यांचे दोन ग्रंथ आहेत. यांचीं भक्तिसूत्रें फार प्रसिध्द असून नवविधा भक्तीपैकीं ‘कीर्तन’ भक्ति नारदांची होती. महाराष्ट्रास दीर्घकाळ परिचित असलेल्या कीर्तनसंस्थेचे आद्य प्रणेते नारदच होत. पारमार्थिक आणि सांस्कृतिक ज्ञान सर्वसामान्य जनतेला सुस्पष्ट करुन सांगणें व लोकांचीं मनें भक्तिप्रेमाकडे वळविणें हें कीर्तनसंस्थेचें ध्येय आहे. नारदांनीं हें कार्य अखंडपणें केलें. आजच्या वृत्तपत्रव्यवसायाचें जें प्रमुख अंग वार्ताहर वा बातमीदार यांचें मूळ थेट नारदापर्यंत पोंचतें. नारदांची अस्थिरता प्रसिध्द आहे. नारद हें ब्रह्मांडांतील यच्ययावत् व्यवहार जाणणारे, गुप्तवार्ता कळवून सुरासुर मनुष्यांना उद्योगप्रवण करणारे, त्रिलोकांत दुरभिमानी जीवांमध्यें कलह उत्पन्न करुन त्यांचा गर्व दूर’ करणारे आणि लोककल्याणार्थ सतत भ्रमण करणारे म्हणून प्रसिध्द आहेत. ‘महती’ नांवाची वीणा वाजवीत ज्ञानप्रसाद करुन नारदांनीं असंख्य लोकांना सुखी केलें आहे. “ Narad's constant mission is the good of Universe'' असें एका आंग्ल पंडितानें म्हटलें आहे.
नारदांचा संगीतशास्त्रावरहि एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. नारदांचें संगीतज्ञान, आणि त्यांविषयींच्या अनेक आख्यायिका, भागवत, ब्रह्मवैवर्त, इत्यादि ग्रंथांत सांपडतात. ‘नारदांची शरीरकांति दैदीप्य अग्रीप्रमाणें सतेज आहे. नेत्रांचें तेज बालार्कवत् आहे. मस्तकावर जटाभार बांधला असून शरीर सुवर्णभूषित आहे. त्यांनीं कक्षेंत एक वीणा बाळगली आहे....’ इत्यादि वर्णन ‘हरिबंश’ नांवाच्या ग्रंथांत सांपडतें.
श्रीधरानें शिवलीलामृतांत नारदांचा थोडक्यांत विशेष सांगितला आहे तो असा -
“( नारदा, ) तूं भक्तिप्रकाश दिवटा । कीं भक्तिमार्गाचा मार्गद्रष्टा ।
नारदा, तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥”
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP