(१) शारदादेवीचें स्वागत !
आश्विन शु. ७ हा दिवस सरस्वती-पूजनाचा म्हणून भारतीय लोक पाळतात. सरस्वती किंवा शारदा ही विद्येची देवता मानली आहे. आश्विन शु. ७ हा दिवस अत्यंत शुभ, सुभग आणि कल्याणकारी मानला गेला आहे. धरनीमातेला ‘सुजला सुफला’ असें स्वरुप देणारा वर्षाऋतु संपून सर्वत्र शांति, निर्मलता आणि प्रसन्नता नांदत असते. यांतच देवांना शारदेचें दर्शन झालें असावें. -"सज्जन हृदयासारख्या सरोवरांत विहार करणारीं प्रसन्न कमळें आणि आकाशांत अनंत काव्याचे फवारे सोडणारा रसस्वामी चंद्र हे दोन्ही जेव्हां परस्परांचे ध्यान धरीत होते, तेव्हां देवांनीं शारदेचें आवाहान केले. शारदा आली आणि पृथ्वीच्या वदनकमलावर सुहास्य पसरले. शारदा आली आणि वनश्रीचे वैभव विकसलें. शारदा आली आणि घरोघर समृद्धि वाढली. शारदा आली आणि वीणेचा झणत्कार सुरु झाला; संगीत आणि नृत्य सर्वत्र पसरलें " ज्या सरस्वतीचें पूजन आजपासून सुरु होत असतें, त्या देवीचे स्वरुप कसें आहे ? ती मंजुलहासिनी बाला नाहीं, मनोमोहिनी मुग्धा नाहीं, विलासचतुरा प्रौढा नाहीं, तर ती नित्ययौवना पण स्नन्यदायिनी माता आहे. ती विश्वमाउली आहे. वेदमाता, ब्रह्मसुता, मूलमाया, अशी श्रीशारदादेवी सकल चराचर सृष्टीची आदिजननी आहे. ती अतिसूक्ष्म, निर्विकल्प, शब्दातीत व स्फूर्तिरुप आहे. ब्रह्मनिष्ठ सत तिच्या स्वरुपीं समाधिसुख भोगतात. निर्गुण, निराकार परब्रह्माच्या ठिकाणीं ‘एकाकी न रमते एकोऽहं बहुस्याम् ।’ असें जे आदिस्फुरण झालें तेंच शारदेचे मूलस्वरुप आहे. या मूलस्फूर्तीच्या ठिकाणीं जाणीव व वायु अशीं दोन अतिसूक्ष्म रुपें झालीं. त्यांनाच पुरुष-प्रकृति, शिव शक्ति, गणेश-शारदा अशीं नांवें आहेत. एकत्व नष्ट न होतां हीं दोन रुपें झालीं. याच शारदेला वाग्देवता । महामाया - " या शब्दांत नमन केलें आहे. श्रीज्ञानदेवांनीहि हिचें स्वागत पुढीलप्रमाणें केलें आहे, "आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी । ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ।"
==
(२) रामचंद्र हरींचे निधन !
शके १६६१ च्या आश्विन शु. ७ रोजीं वसईच्या संग्रामांत रामचंद्र हरि पटवर्धन यास गोळी लागल्यामुळें मृत्यु आला. पेशव्यांच्या अमदानींत जीं घराणीं प्रसिद्धीस आलीं त्यांत हरभट पटवर्धनांचें घराणे प्रमुख आहे, यांचींच मुलें गोविंदपंत नाना, रामचंद्रपंत व भास्करपंत हीं पुण्यास येऊन बाजीरावाजवळ राहून पराक्रम गाजवूं लागलीं. पश्चिम किनार्यावर पोर्तुगीझांचा धार्मिक जुलूम वाढत चालला होता. त्याला आळा घालण्याचें काम चिमाजीअप्पानें केले. मराठ्यांच्या इतिहासांत राष्ट्रप्रेम, शौर्य, संघशक्ति, इत्यादि उदात्त गुणांचे दर्शन घडविणारे जे कांही थोडे प्रसंग आहेत त्यांत वसईच्या युद्धाची गणना प्रामुख्यानें होत असते. या संग्रामांतील मोहीम १७३७ च्या मार्च-जूनमध्यें होऊन ठाणें व साष्टी काबीज झाली. या लढाईंत रामचंद्र पटवर्धन प्रमुखांपैकी एक होता. आतां पोर्तुगीझांच्या लढ्यास चांगलें रुप येणार होतें. बाजीरावानें रामचंद्र हरीस लिहिलें, "साडेबत्तीसशें माणूस केळवे माहिमच्या कार्यभागास तुम्हांकडे निमिलें आहे. .... फिरंग्यांच्या लोकांनीं वारें घेतलें आहे. तुम्हांवरही तोंड टाकतील, त्यांस जपून एकवेळ कापून काढणें." यानंतर १७३८ मध्यें रामचंद्र हरि यानें माहिमास मोर्चे लावले, आणी केळव्याकडे सातआठशें माणूस घेऊन रामचंद्रपंत चालून गेला. "रामचंद्रपंतांनीं खुद्द दोघे ठार केले आणि गनिम फिरवला. ते समयीं रामचंद्रपंतांचे उजव्या हातास गोळी लागली. हातची तलवार सुटून गुढघ्यास लागली ऐसे होतांच मशारनिल्हे फिरले त्याबरोबर गनिमाने मोर्चे काबीज केले, आमचे लोकांचा धीर सुटोन निघाले, महादजी केशव व धोंडोपंत, वाघोजी खानविलकर, राजबाराव बुरुडकर, चिंतो शिवदेव, वगैरे लोक मोर्चात होते त्यांस निघावयास फुरसत न होऊन तेथेंच झुंजोन कामास आले. अजमासें दोनशें माणूस कामास आलें व जखमी शंभरापर्यंत. " या लढाईंत झालेल्या जखमेमुळेंच रामचंद्र हरीचें आश्विन शु. ७ रोजीं निधन झालें.
- २८ सप्टेंबर १७३९
-------------------------
आश्विन शु. ७
(३) इंग्रज-मराठे यांची असईची लढाई !
शके १७२५ च्या आश्विन शु. ७ या दिवशीं इंग्रज-मराठे यांची असई येथें तुंबळ लढाई झाली. एकोणिसाव्या शतकापासून इंग्रज आपला ‘पांढरा पाय’ मराठी राज्यांत रोवीत होते. धनी बाजीराव नालायक निघाल्यामुळें मराठे सरदारांत फुटिर वृत्ति माजून इंग्रजांना चांगलि संधि साधत होती. इंग्रज सेनानी स्टीव्हन्सन् आणि वस्ली हे दोघे नगर, औरंगाबा, पैठण, वगैरे ठिकाणें काबीज करुन पुण्याकडे येण्याच्या धोरणांत होते. सदर ठिकाणें शिंदे-भोसले यांच्या ताब्यात होतीं. गनिमी काव्यानें लढाई करावी हा भोसल्यांचा विचार; उलट समोरासमोर लढून इंग्रजांस नरम करावें असा शिंद्यांचा बेत होता. वस्लीसारखा धूर्त सेनानायक मराठ्यांकडे नव्हता. दि. २३ ला नवलनी येथें वस्लीच्या फौजेचा मुक्काम होता. तेथून सहा मैलांवर केळणा नदीच्या आश्रयास शिंदे-भोसल्यांचा तळ होता. आश्विन शु. ७ सप्टेंबरला तुंबळ युद्ध झालें. तीच ही असईची लढाई होय. " दीड प्रहरपर्यंत मारगीर बहु झाली. शिंद्याच्या पलटणींनी वस्लीचा काट चालो दिला नाहीं. .... लढाईंत टोपीकराचे हजारबाराशें माणूस ठार व जखमीं झालें. हिंदूंचे शेंपन्नास माणूस जाया व जखमीं झालें. वस्ली चित्तांत खिन्न आहेत. - " अशा प्रकारचें वर्णन मराठी कागदपत्रांत सांपडतें. इंग्रज लेखक या संग्रामाचा मोठा बडेजाव करीत असले तरी दोघांची बरोबरी झाली, असें फार झाल्यास म्हणतां येईल. असावध स्थितींत शिंदे असतांना वस्लीनें एकाएकी छापा घातल्यामुळें - शिंद्याकडील यादव भास्कर पडले. आणि शेंपन्नास माणूस जाग्यावर ठार झालें. नंतर लढाई बिघडली - मराठ्यांचें यश हिरावलें गेलें ! या काळांत फितुरीमुळें मराठ्यांचे फारच नुकसान झालेंलें दिसतें. ही फितुरी नसती तर शिस्त आणि शस्त्रास्त्रें यांच्या दृष्टीनें असईच्या रणांगणांवर शिंद्यांच्या शिपयांना विजय सहज मिळाला असता. पण नुसत्या तोफा आणि तितकींच खंबीर असावीं लागतात.
- २३ सप्टेंबर १८०३
------------------------
आश्विन शु. ७
(४)
विठ्ठलभाई पटेल यांचे निधन !
शके १८५५ च्या आश्विन शु. ७ रोजीं गुजराथमधील सुप्रसिद्ध राष्ट्रसभाकार्यकर्ते व वादविवादपटु, मुत्सद्दी विठ्ठलभाई जव्हेरभाई पटेल यांचे निधन झालें. यांचेच धाकटे बंधु म्हणजे भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई होत. विठ्ठलभाई यांनीं करमसद व नाडियाद येथें आपलें शालेय शिक्षण संपविल्यानंतर हे इंग्लंडला गेले व तेथून बँरिस्टर होऊण आल्यावर वकिली करण्यास यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसांत यांच्या सार्वजनिक कार्याला आरंभ झाला. मुंबई काँर्पोरेशन, मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व राष्ट्रसभा या अनेक ठिकाणीं त्यांनी कामगिरी केली असली, तरी स्पीकर म्हणून यांची प्रसिद्धि विशेष होती. २४ आँगस्ट १९२५ या दिवशीं यांना पहिल्यांदा मध्यवर्ती कायदे मंडळाचे पहिले लोकनियुक्त स्पीकर-अध्यक्ष-म्हणून निवडण्यांत आलें. ‘अति बडबड्या माणूस’ अशी पदवी माँटेग्यूच्या हस्तें मिळवणारा हा हिंदी गृहस्थ मूक बघून सार्या जगाचें राज्य तृणवत् मानणार्या अध्यक्षाचा यांनीं ठेवलेला आदर्श खरोखरच स्पृहणीय आहे." सन १९३० सालच्या लढ्यांत यांनीं आपलें कर्तव्य बरोबर ओळखून म्हटलें कीं, "स्वातंत्र्याच्या या लढ्यांत यांनी आपलें कर्तव्य बरोबर ओळखून म्हटलें कीं, " स्वातंत्र्याच्या या लढ्यांत माझें योग्य स्थान असेंब्लीच्या खुर्चीत नाहीं, लोकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यांत आहे." याप्रमाणें बेकायदा ठरलेल्या काँग्रेसमध्यें यांनी भाग घेतल्यामुळें यांना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षाहि झाली. पुढें यांनी केलेल्या अमेरिकेच्या दौर्यांतील अति श्रमामुळें यांची प्रकृति खालावली. व जिनेव्हा मधील एका रुग्नालयांत यांचे निधन झालें. साध्या शेतकर्यापासून असेंब्लीच्या अध्यक्षापर्यंत यांनीं चढलेल्या यशाच्या पायर्या यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या द्योतक आहेत. आवाजाच्या नुसत्या हुंकारानें असेंब्लींत वादळें शांत करण्याबद्दल यांची ख्याती असे. यांची त्यागवृत्तिहि मोठीच होती. आपल्या करण्याबद्दल यांची ख्याति असे. यांची त्यागवृत्तिहि मोठीच होती. आपल्या पगारापैकीं दरमहा १६५६ रुपये महात्मा गांधीच्या हवालीं हे करीत असत. ‘यांच्या मृत्युमुळें एक खंदा वीर गेला’, असे उद्गार म. गांधींनीं काढले.
- २२ आँक्टोबर १९३३