आश्विन वद्य ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘लोकहितवादी’ यांचे निधन !
शके १८१४ च्या आश्विन व. ४ रोजीं महाराष्ट्रांतील सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक, नव्या मूलग्राही विचारांचे प्रतिपादक, ज्ञानसंग्राहक लोकसेवक आणि कळकळीचे लेखक, सरदार गोपाळ हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचें निधन झालें. लोकहितवादींचे वडिल प्रसिद्ध बापु गोखले यांचे फडणीस होते. त्यांना एल्फिन्स्टन साहेबानें भेटीस बोलाविलें पण हे गेले नाहींत म्हणून यांची जहागीर जप्त झाली. गोपाळराव देशमुख यांनीं प्रथम पुण्याच्या न्यायाधीश कचेरींत उमेदवारी स्वीकारिली. पण इंग्रजी शिक्षण नसल्यामुळें नडलें म्हणून हे इंग्रजी शिकले. इंग्रजी व इतिहास या विषयांत प्रावीण्य मिळवून पुण्यास सरदारांच्या एजंटांच्या कचेरींत यांनी नोकरीहिम मिळविली. हे मोठे समाजसुधारक होते. ‘प्रभाकर’ पत्रांतून यांनीं लिहिलेलीं ‘शतपत्रे’, मराठी वाड्मयांतच नव्हे तर समाजसुधारणेच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाची आहेत. हिंदु समाज व त्याच्या चालीरीती यांतील दोष काढून त्यांनीं लोकांना सद्धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखविला. महाराष्ट्रांतील एक नमवंत द्रष्टे म्हणून यांचा लौकिक मोठा आहे. हिंदुस्थान देशांत पार्लमेंट स्थापन होऊन लोकशाहीचा कारभार सुरु व्हावा अशा प्रकारची पहिली घोषणा याच गृहस्थांनीं शंभर वर्षापूर्वी केली; आणि सुदैवानें आज तीच फलद्रूप होत आहे. ‘लोकहितवादी’ हें यांचे टोपण नांव होतें. पुढें सरकारी नोकरींत यांची बरीच प्रगति झाली. आणि यांचा मानसन्मानहि वाढला. यांनी अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. लेखनाचा हव्यास मोठा असून यांच्या लिखाणांत ज्ञानसंग्रह आणि कळकळ यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला असे. ब्राह्मणी संस्कृतीचे सदोष अंतरंग यांनी निर्भिडपणे स्पष्ट केलें. यांची वाड्मयसंपत्तिहि अफाट अशीच आहे. लक्ष्मीज्ञान, स्थानिक स्वराज्यव्यवस्था, भरतखंड पर्व, पानिपतची लढाई, ऐतिहासिक गोष्टी, गुजरात देशचा इतिहास, लंकेचा इतिहास, सुरष्ट्र देशचा इतिहास, उदेपूरचा इतिहास, स्वामी श्रीमदयानंद, इत्यादि विविध प्रकारचें साहित्य यांनीं निर्माण केलें आहे.
- ९ आँक्टोबर १८९२
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP