आश्विन शुद्ध ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वासुदेव बळवंतांचें " सीमोल्लंघन" !

शके १८०२ च्या आश्विन शु. ९ रोजी भारतांतील पहिल क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीं एडन तुरुंगातून सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला. अत्युच्च उराशीं बाळगणारा हा खंदा वीर एडनच्या तुरुंगांत काळ्या पाण्याची जन्मठेप भोगीत खितपत पडला होता. परंतु मुक्त असणारा आत्मा सारखी तडफड करी. हातांतील शृंखला तोडाव्यात, खोलीच्या भिंती पाडाव्यात, तुरंगाचे तट ओलांडावेत, असे विचार त्यांच्या मनांत वारंवार येत. आणि आश्विन शु. ९ या दिवशीं त्यांच्या या इच्छाशक्तीनें साकार रुप धारण केलें. दुर्धर रोगाकडे लक्ष न देतां वासुदेव बळवंतांनीं आपल्या अचाट शक्तिसामर्थ्यानें हातांतील शृंखला खळकन्‍ तोडिल्या. बंदिवान्‍ गरुड आतां मुक्त झाला होता. त्याच्या भरारीची झेप आतां अत्यंत मोठी अशीच असणार. कोठडीच्या दाराशीं मोठें थोरलें कुलूप आहे ! तें पाहून या मुक्त सिंहाला जास्तच चेव आला. त्यांचे बाहुं स्फुरण पावूं लागले. लागलीच त्यांनीं दोनहि हातांनीं तीं दारें उखडून काढिलीं; आणि तीं तशीच घेऊन ते तटापर्यंत आले. तटावरुन उतरण्यासाठी शिडी पाहिजे होती ना ! या उखडलेल्या दाराची शिडी झाली. वासुदेव बळवंतांनी ताडकन्‍ तटावरुन उडी झोंकली. रोगग्रस्त झालेल्या मुखावर स्वातंत्र्य धांवण्यास सुरुवात केली. अविरतपणें धांवता धांवता यांना दम लागला; आणि दुर्दैवानें पहारेकर्‍यांना ही गोष्ट समजली. सरकारी घोडेस्वार त्यांचा पाठलाग करुं लागले. त्यांची आणि फडके यांची लहानशी चकमक झाली. परंतु एकटे फडके कोठवर प्रतिकार करणार ? पुन: त्यांना पोलिसांच्या स्वाधीन व्हावें लागलें. त्यांचें दिव्य स्वप्न क्षणार्धात नाहींसें होऊन त्यांना कठोर अशा सरकारी यंत्रांत जखडून घ्यावें लागलें. आतां तर पहिल्यापेक्षां जास्त त्रास होणार होता. आणि फडके सर्व भोग भोगण्यास तयार होतेच.

- १२ आँक्टोबर १८८०

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP