आश्विन वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) दयानंद सरस्वतींचें निधन !

शके १८०५ च्या आश्विन व. ३० रोजीं आर्य समाजाचे सुप्रसिद्ध संस्थापक, आक्रमक नि निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक स्वामी दयानंद सरस्वती यांचें निधन झालें. काठेवाडमधील मोरवी संस्थानांतील अंबाशंकर नांवाच्या औदीच्य ब्राह्मणाचे हे पुत्र. यांच्या घराण्यांत शिवाची उपासना कडक अशी होती. एके दिवशीं शिवरात्रीस मध्यरात्रीं मंदिरांत शिवपूजा चालू होती. दयानंद एकनिष्ठपणें बसलेलें असतांना शेजारच्या बिळांतून एक उंदीर बाहेर आला आणि देवाच्या अंगावरील अक्षदा वगैरे खाऊं लागला. देवानें काहींहि प्रतिकार केला नाहीं ! या वेळपासून यांची मूर्तिपूजेवरील श्रद्धा नाहींशी झाली. घरांतून निघून जाऊन यांनीं ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली आणि योगाच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यानंतर पूर्णानंद नांवाच्या महाराष्ट्रीय संन्याशापासून यांनीं संन्यासदीक्षा घेतली. अभ्यास करतां करतां यांना आढळून आलें कीं, महाभारतापूर्वीच्या ऋशिमुनींच्या वाड्मयाचा, वेदांचा अभ्यास करणें आवश्यक आहे. तेव्हां वैदिक धर्माच्या प्रचारार्थ हे बाहेर पडले आणि यांनी आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचें यथार्थ ज्ञान व्हावें म्हणून यांनीं ‘सत्यार्थप्रकाश’  नांवाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषांतून लिहिला. त्यांतील आक्रमक पद्धतीमुळें सर्वांचे लक्ष या पुस्तकाकडे ओढलें गेलें. यांच्या आर्य समाजाच्या अनेक शाखा भारतांत निघून त्यांनीं पुष्कळच जागृतीचें कार्य केलें आहे. याचें शारीरिक, मानसिक व वाचिक सामर्थ्य अलौकिक होतें. ‘मूर्तिपूजा सिद्ध करा, नाहीं तर काशीविश्वेश्वर फोडून टाका’ या आव्हानावर हे वादविवाद करीत असत. वाद करतांना दयानंद हजरजबाबी असून शास्त्राचा आधार देण्यांत अत्यंत कुशल असे होते. यांच्या फटकळ व बोंचनार्‍या प्रचारामुळें यांना उघड उघड असे पुष्कळ शत्रु निर्माण झाले. शेवटीं आश्विन व. ३० रोजी जोधपूर येथें विषप्रयोग होऊन यांचा अंत झाला ! आपल्या कार्याच्या प्रचारासाठीं यांनीं ‘वेदभाष्य’, ‘संस्कारविधि’, ‘पंचमहायज्ञविधि’, ‘गोकरुणानिधि. इत्यादि ग्रंथ लिहिले.

- ३० आँक्टोबर १८८३
--------------------------

आश्विन व. ३०

(२) स्वामी रामतीर्थांची जलसमाधि !

शके १८२८ च्या आश्विन व. ३० रोजीं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हिंदी साक्षात्कारी पुरुष, विख्यात तत्त्वज्ञानी व कवि स्वामी रामतीर्थ यांनीं समाधि घेतली. पंजाब प्रांतांतील गुजराणवाला जिल्यांतील मुरलीवाला या गांवीं गोस्वामी हिरानंद यांच्या पोटीं शके १७९५ मध्यें यांचा जन्म झाला. संत तुलसीदासांच्या अव्वल वंशांतील म्हणून यांच्या घराण्याची ख्याति होती. गुजराणवाला हायस्कूल, संपवून रामतीर्थ गणिताचे एम.ए. झाले. त्यानंतर यांनीं कांही दिवस गणिताच्या प्राध्यापकाचें काम केलें. परंतु पहिल्यापासूनच असलेल्या आध्यात्मिक प्रवृत्तीला ही नोकरी न सोसल्यामुळें यांनी ती सोडून दिली. स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांचा परिणामहि यांच्या मनावर बराच झाला. सर्वसंगपरित्याग करुन रामतीर्थ हिमालयांत गेले व तेथें त्यांनीं संन्यास घेतला. टोकियोला जी आंतरराष्ट्रीय धर्मपरिषद भरणार होती तिला हजर राहण्यासाठीं स्वामीजी जपानला गेले. परंतु परिषदेची बातमी खोटी ठरली. तरी रामतीर्थांच्या आयुष्याला निराळेंच वळण लागलें. उर्दू-फारसी व इंग्रजी या भाषांचा व्यासंग आणि उच्च प्रकारचें कवित्व यांच्या जोरावर रामतीर्थांच्या वेदांतप्रतिपादनाला दिव्य तेज चढूं लागलें. या वेळीं यांची पुण्याचे वासुकाका जोशी यांच्याशी गांठ पडली. त्यांच्यासह स्वामी अमेरिकेला गेले. विवेकानंदांप्रमाणेंच त्यांचें स्वागत सर्व अमेरिकेंत झालें. हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनीं आपल्या उपदेशाला सुरवात केली. आश्विन व. ३० या दिवशी गंगेवर स्नानास हे गेले त्या वेळीं पाय घसरुन हे पाण्यांत बुडाले व तेथेंच त्यांनी समाधि घेतली. दुसर्‍याच दिवशीं यांचा तेहतिसावा वाढदिवस होता ! याच्याच अगोदर मृत्यूला यांनी निर्भयपणें आमंत्रण दिलेलें काव्य म्हणजे यांच्या कवित्वशक्तीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांत ते म्हणता, "माझे शरीर तूं खुशाल घेऊन जा. चंद्रकिरणांच्या रुपानें, पहाडी नदी-निर्झरांच्या वेषानें, समुद्रांच्या लाटांच्या मिषानें मी जगांत वावरुं शकेन - "

- १७ आक्टोबर १९०६
--------------------------

आश्विन व. ३०

(३) साहित्य-सम्राटांचें निधन !

शके १८६९ च्या आश्विन व. ३० रोजीं मराठीचें साहित्य-सम्राट नरसिंह चिंतामनण ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांचे निधन झालें. शिक्षण पूर्ण झाल्यावर तात्यासाहेबांनीं सातार्‍यास वकिलीला सुरवात केली. परंतु, थोड्याच दिवसांत तात्यासाहेबांनीं सातार्‍यास वकिलीला सुरुवात केली. परंतु थोड्याच दिवसांत लो. टिळक यांच्या सांगण्यावरुन ते त्यांचे साहाय्यक बनले. लाँ क्लासमध्ये शिकवणें व ‘मराठा’ पत्राची व्यवस्था पाहणें ही कामगिरी केळकरांच्याकडे आली. टिळकांच्या अनुपस्थितींत अनेक वर्षे केळकरांनीं ‘केसरी’ आणि ‘मराठा’ हीं पत्रें उत्कृष्टपणें चालविली. याशिवाय अनेक सार्वजनिक संस्थांशीं केळकरांचे नातें होतेंच. तात्यासाहेबांच्या राजकीय कामगिरीपेक्षा त्यांचे साहित्यवैभव फार मोठें आहे. काव्य, शास्त्र, विनोद, नाटक, कादंबरी, इतिहास - संशोधन, निबंध, लघुकथा, इत्यादि साहित्यप्रकारांतून त्यांची लेखणी अत्यंत कुशलतेनें संचार करीत असे. कोणताहि विषय साधकबाधक प्रमाणांनीं समतोलपणें मांडण्यांत केळकर कुशल होते. भावनेच्या आहारीं न जातां व्यावहारिक बुद्धीनें सुवर्णमध्य काढणें हें त्यांच्या जीविताचें सार होतें. "बिनीवर जाऊन चार हात करणार्‍या योद्धयांपेक्षा सौम्यपणानें मुद्दा न सोडतां कार्य साधणार्‍या मुत्सद्याची यांची प्रकृति." तात्यासाहेबांचा स्वभाव मनमिळाऊ असून सुहृदयता, कामाचा उरक, आणि जबाबदारीची जाणीव या गुणांमुळें हे अनेक सभासंमेलनांचे अध्यक्ष असत. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान यांना दोनदां मिळाला होता. यांची वाड्मयसंपत्ति अत्यंत विपुल असून ती विविध प्रकारच्या गुणांनीं नटलेली आहे. यांचे समग्र वाड्मय जें प्रसिद्ध आहे तेंच जवळजवळ पंधरा हजार पृष्ठांपर्यंत आहे. याशिवाय शेवटच्या दिवसापर्यंत यांचे लेखन चालू होतेंच. ‘हास्यविनोदमीमांसा’ ‘मराठे आणि इंग्रज’, ‘टिळकचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी-सर्वस्व’, इत्यादि यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तात्यासाहेबांनीं मरणाच्या आदल्याच दिवशीं मृत्यूस आव्हानासंबधीं कविता लिहिली होती. आश्विन व. ३० या दिवशीं यांच्या निधनाची बातमी लोकांना धक्का देणारी वाटली. यांची शवयात्रा अत्यंत मोठी निघालेली होती. सर्व प्रकारच्या लोकांनीं तींत भाग घेतला होता.

- १४ आक्टोबर १९४७

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP