ज्योतिपंत महाभागवत

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


इसवी सनाच्या अठराव्या शतकांत महाराष्ट्रात जे अनेक संतकवि होऊन गेले त्यांपैकी ज्योतिपंत महाभागवत हे एक प्रमुख संतकवि होत. यांची थोडीशी माहिती ’इतिहाससंग्रह’ मासिकांत व ’इंदुप्रकाश’ पत्राच्या १९०७ च्या ताअ. ३० आगष्टच्या अंकांत प्रसिध्द झालेली आहे. शिवाय त्यांच्या संप्रदायातील सखाराम नामक एका गृहस्थानी शके १८२३ त, "श्रीस्वयंज्योतिकथामृत" नामक १३ अध्यायांचा एक ओवीबध्द ग्रंथ लिहिला आहे, त्यांत ज्योतिपंतांचे विस्तृत चरित्र दिले आहे; व त्याच ग्रंथाच्या आधाराने प्रस्तुत चरित्रलेख मी लिहित आहे.
रघुनाथ या नांवाचा गोदातीरस्थ एक ब्राह्मण गंगेच्या कावडी नेऊन रामेश्वरास घालीत असे. अशा प्रकारे त्याने सहा वेळ कावडी घातल्या. सातव्या खेपेस रामेश्वरचा सेतु घेऊन तो कर्नाटकांतून चालला असतां, माध्यान्हकाली एक सरोवराच्या काठी, अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांतीस बसला. त्याजपाशी १०० मोहरा होत्या, त्या व आपली वस्त्रें वृक्षाखाली ठेवून तो ब्राह्मण स्नानार्थ सरोवरात उतरला. जवळच्या शेतांत एक चोर नांगर हांकीत होता, त्याच्या मनांत असा विचार आला की ब्राह्मणास लुटावे. मग तो धांवत आपल्या घरी गेला व ब्राह्मणापाशी असलेले द्रव्य लांबविण्याचा आपला विचार त्याने आपल्या आईस कळविला. तेव्हा तिने त्याचा धिक्कार करुन ह्मटले, " यांत मला काय विचारावयास आलास ? चोरी करणे हा आपला कुलधर्मच आहे, तरी त्या ब्राह्मणास मारुन त्याचे द्रव्य तूं घेऊन ये. " हे ऐकतांच तो चोर पळत तलावावर आला. ब्राह्मण स्वस्थपणे आपले नित्यकर्म करीत आहे असे पाहून त्याने एक मोठा पाषाण उचलून तो ब्राह्मणाच्या डोक्यावर टाकला. त्या आघाताने ब्राह्मण तत्क्षणी पंचत्व पावला. चोराने त्याचें द्रव्य व वस्त्रे नेऊन आपल्या आईपाशी दिली. इकडे तो ब्राम्हण समंध होऊन त्या अश्वत्थ वृक्षावर राहिला ! परंतु चोर जातीचा रामोशी असल्यामुळे त्या समंधास त्याला कांही उपद्रव करिता येईना. तेव्हा, जन्मातरी त्याचा सूड घेण्याचा त्याने निश्चय केला. इकडे त्या चोराच्या पत्नीस, ब्रह्महत्येचे पातक करुन आपल्या पतीने द्रव्य आणिले ही हकीकत समजतांच खेद वाटला व त्रिवार शिवनामोच्चार करुन तिने देहविसर्जन केले. "मृत्युकाली माझ्या नांवाचा त्रिवार उच्चार करुन तूं सोमवारी पंचत्व पावलीस तरी ह्या तुझ्या पुण्यकृत्यामुळे मी तीन वेळां तुझ्या उदरी जन्म घेईन," असे प्रवरदान शंकरानी तिला दिले. तो तस्करही काही दिवसांनी मरण पावला व एका अथर्ववेदी ब्राह्मणकुळांत जन्मास आला. कुलाचे गोत्र उपमन्यु होते. त्या तस्कराची पत्नीही ब्राह्मणकुलांत जन्म पावली होती, तिच्याशीच त्याचे लग्न झाले. तिला पुत्र होतांच, समंधाने तिच्या पतीस पछाडल्यामुळे त्याला भयंकर पोटशूळ उत्पन्न झाला :-
उभा राहोनी तो महापुरुष । पूर्वजन्मीच्या बोले वृत्तांतास ।
हरण केले माझिया वित्तास । प्राण घेतला तूंचि पै ॥
दांत खातसे क्रोधे करकरां । अरे पापिष्ठा तस्करा ।
पोसावया रांडा पोरां । मज पाषाणे हाणितले ॥
क्रोधे ऐसे बोलून । छळू लागला अतिघन ।
दारिद्रय सुदाम्याचे येऊन । प्राप्त झाले तेधवां ॥
याप्रमाणे त्या ब्राह्मणाने पुष्कळ दिवस दु:ख भोगले, परंतु अनेक उपाय केले तरी व्याधीचा उपशम होईना. हा ब्राह्मण बिटे येथील रहिवासी होता. गांवापासून दोन कोसांवर रामेश्वर नामक देवस्थान आहे, तेथे जाऊन नित्य देवदर्शन घेण्याचा त्या ब्राह्मणाने क्रम सुरु केला. त्याचे नांव नारायण होते. त्याने पुष्कळ दिवस शंकराची उपासना केली. त्याच्या पत्नीच्या पोटी अंशरुपाने शंकरानी जन्म धारण केला. ह्या पुत्राचे नांव गंगाधर. तो निस्सीम शिवोपासक असून नित्य रामेश्वराचे अनुष्ठान करीत असे. एकदा तो रामेश्वरास जात असता वाटेत चोरांनी त्याला गांठले. तेव्हा धांवत धांवत देवळात जाऊन त्याने शंकराची प्रार्थना केली की, "भगवंता, हे तस्कर माझा पाठलाग करीत आहेत, यांपासून माझे रक्षण कर." इतक्यात देवळांतील पिंडी दुभंग झाली. गंगाधराने पिंडींत प्रवेश केला. नंतर पिंडी पूर्ववत झाली. चोरांनी देवळांत येऊन पहिले तो ब्राह्मण कोठे दष्टीस पडेना. इतक्यात एका चोराची नजर पिंडीकडे जातांच ब्राह्मनाच्या धोतराचा पदर थोडासा बाहेर राहिला होता तो त्याच्या दृष्टीस पडला. हा चमत्कार पाहतांच चोरांस मोठे आश्चर्य वाटले व हा शंकराचा मोठा भक्त आहे असे समजून -
तस्करी सांडिला व्देष त्याचा । भक्त देखिला श्रीहरीचा ।
अभय देती निश्चय साचा । उपद्रव यासी न लावूं आह्मी ॥
शंकरस्तुति ते वेळां । करीत उभा तस्करमेळाम ।
संतोष झाला कंठनीळा । तंव तो निघाला ब्राह्मण ॥
शपथ करिती रामेश्वरासी । उचलून देती बिल्वपत्रीसी ।
उपद्रव न करितां समागमेसी । प्रतिदिवशी गृहा पोहोचऊं ॥
हे वचन त्या चोरांनी शेवटपर्यंत पाळिले. महान शिवभक्त ह्मणून गंगाधराची फ़ार प्रसिध्दी झाली. नित्य शंकराची उपासना करीत असता गंगाधराच्या मनांत एके दिवशी असे आले की चरितार्थाचे कांही तरी कायमचे साधन भगवंतापाशी मागावे. मग त्याने शंकराची प्रार्थना केली की :-
माझे मनींची वासना । तुवां पुरवावी त्रिनयना ।
अखंड अन्न आच्छादना । नव्हे तुटी तुझ्या कृपे ॥
तेव्हा, त्याच दिवशी शंकरांनी स्वप्नांत दृष्टांत दिला की :-
माझिया देऊळा शिखरी । नेत्र झांकोनि प्रदक्षिणा करी ।
फ़्रळ पावशील निर्धारी । मग दिशाअ अवलोकिजे ॥
अवलोकन करिसी जिकडे । वृत्तमान प्राप्त तुजपुढे ।
फ़िटेल जन्मींचे साकडे । वंशपरंपरा अक्षयी ॥
ही दृष्टांताची गोष्ट गंगाधराने अगदी गुप्त ठेविली; व प्रात:काळी पूजासामग्री घेऊन दृष्टांतांत सांगितल्याप्रमाणे, सर्व विधि पुरा केला देवळावर चढून शिखरासभोवती तीन प्रदक्षिणा केल्यावर डोळे उघडून पाहतो तो पूर्वदिशा समोर आली. नंतर तो घरी येण्यास निघाला तेव्हा वाटेंत त्यास अनेक शुभशकून झाले. तिकडे विजापूरच्या बादशहास भगवंताने स्वप्नात असा दृष्टांत दिला की, "माझा भक्त गंगाधर विटे येथे राहतो. त्याला आणवून आपले मंत्रिपद तूं त्यास दे." सकाळी बादशहाने वाजंत्री, पालखी वगैरे सरंजाम देऊन गंगाधरपंतांस आणण्यासाठी माणसे पा्ठविली. ती विटे येथे शोध करीत करीत गंगाधराच्या घरी आली; तेव्हा त्यास दृष्टांताची आठवण होऊन,
ह्दयी आनंद झाला पूर्ण । पाचारितसे तयांलागुन ।
कोठोनि आलां काय कारण । गुज तुमचे कथन करा ॥
ऐकोनि तयांचे वचन । दूत देती प्रतिवचन ।
आमुच्या राये तुम्हालागुन । पाचारिले मंत्रिपणें ॥
राज्य आहे मंत्रिहीन । प्रजा करिती यथेष्ट आचरण ।
आपण त्यांते करोनि शासन । राज्यभार चालवावा ॥
हे ऐकून गंगाधराने श्रीशंकराचे भक्तिपूर्वक स्मरण केले व आपल्या आईबापांसहवर्तमान तो विजापुरी जाण्यास निघाला. त्याच्या ओळखीने आपल्यासही कांही लाभ झाला तर पहावा या हेतूने कांही नागरिक जनही त्याजबरोबर जाण्यास निघाले. विजापुरी गेल्यावर बादशहाने गंगाधरास प्रधानकीची वस्त्रें देऊन शिक्कामोर्तब त्याच्या स्वाधीन केले. गंगाधरानेही यथान्याय प्रजापालन पुष्कळ वर्षे केले. एके दिवशी बादशहास पुन: दृष्टांत झाला की, गंगाधरास कायमचे मोठे उत्पन्न देऊन त्याचा व त्याच्या वंशजांचा योगक्षेम अखंड चालेल अशी व्यवस्था करावी. त्याप्रमाणे बादशहाने खटाव प्रांतातील एकशे पांच गांवांचा सरंजाम गंगाधरास तोडून दिला. पुढे गंगाधराच्या वृध्द आईबापास काशीयात्रेची इच्छा झाली. तेव्हा गंगाधराने त्यांजबरोबर काशीयत्रेस जाण्याची परवानगी बादशहाकडे मागितली. तेव्हा बादशहास वाईट वाटले. आतां पुढे आपल्या राज्याचा कारभार सुयंत्रपणे कसा चालेल, ही काळजी त्यास उत्पन्न झाली. तेव्हा गंगाधराने त्यास सांगितले :-
नाही भय तुम्हां आतां । व्दादश वर्षे जाण तत्वता ।
दृश्य होईल ईश्वर सत्ता । तदनुसार वर्तावे ॥
इतके सांगून , व बादशहाचा आणि नागरिकांचा निरोप घेऊन , गंगाधर पूर्वोल्लेखित रामेश्वर महादेवाच्या दर्शनास गेला. तेथे त्याने आपल्या आईबापांचा काशीयात्राहेतु देवास निवेदन केला व तो हेतू पूर्ण करण्याविषयी देवाची प्रार्थना केली. तेव्हा रामेश्वर हांसून ह्मणाले " अरे गंगास्नानार्थ इतके दूर जावयास नको. येथेच गंगास्नान करा. येथून २००० पावलांवर ईशान्य दिशेस एका जागी तीन पाषाण आहेत त्यांजवळ गंगा आहे." हे ऐकतांच गंगाधराने त्या ठिकाणी जाऊन पाहिले. तो पांढर्‍या शुभ्र उदकांचा झरा त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा गंगाधराने माणसे पाठवून आपल्या आईबापांस त्या ठिकाणी आणविले. गंगा आल्याची बातमी सर्वत्र पसरतांच
शेकडो लोकांनी येऊन स्नान केले; व गंगाधराच्या निस्सीम शिवभक्तीची सर्वानी फ़ार तारिफ़ केली. गंगाधराने मातापित्यास गंगोदकस्नान घालून , गोप्रदान दिले; व ब्राह्मणभोजन घालून मोठा समारंभ केला. अस्तमानी सर्व मंडळी घरी गेली. अद्याप श्रावणी सोमवारी या रामेश्वराची यात्रा भरते, व भागीरथी कुंडात लोक स्नान करतात.
एके दिवशी गंगाधर रामेश्वरास अभिषेक करीत असता त्याच्या हातांतले अभिषेकपात्र पिंडिकेवर पडून तिला टेंगूळ आले. तेव्हा गंगाधराने तेच पात्र घेऊन आपल्या मस्तकावर ताडन केले ! शंकर प्रसन्न होऊन त्यांनी त्यास आश्वासन दिले की, "तुझ्या वंशात जो. सातवा पुरुष होईल त्याच्या हातून हे टेंगूळ जिरेल. तुझ्या मातेच्या उदरी मला तीन वेळ जन्म घ्यावयाचा आहे. तुझे  आईबाप आतां पचत्व पावतील. मग तूंही लवकरच देहविसर्जन करुन मत्स्वरुपी लीन हो." नंतर गंगाधर घरी आला. काही दिवसांनी आईबाप मरण पावले. त्यांचा अंत्यविधी यथासांग रीतीने करुन व आपल्या मालकीच्या १०५ गावांपैकी ४० गांव आपल्या धाकट्या भावास व ६५ गांव आपल्या वंशजास देऊन गंगाधर मल्हार क्षेत्री गेला. व तेथे त्याने देह ठेविला. समाधी लावून ब्रह्मांडी प्राण चढविले तेव्हा
ब्रह्मरंध्र भेदुनिया । लीन झाले ब्रह्मी तया ।
पंचतत्वें गेली विलया । स्वस्वरुपी मिळाले ॥
मलवडी नामे विख्यात । प्रसिध्द असे विश्रांत ।
मल्हार म्हाळसा देव नांद्त । तयां चरणी देह अर्पिला ॥
गंगाधरापासून चरित्रनायक ज्योतिबुवा महाभागवतांपर्यंत सात पुरुष झाले त्यांची नावे येणेप्रमाणे :-
१. गंगाधर २.कोन्हेरपंत ३.तिमाजी ४.कोन्हेरपंत ५.राघोपंत ६.तिमाजी ७.गोपाळपंत ८.ज्योतिपंत. गंगाधरपंत शंकराची कृपा झाल्यापासून समंधाने त्याला उपद्रव केला नाही; परंतु प्रस्तुत चरित्रनायक ज्योतिपंत महाभागवत यांच्या वडिलांचा त्याने बराच छळ केला. गंगाधराच्या वंशातील सहावे पुरुष गोपाळपंत (ज्योतिपंतांचे वडील) हे निर्मळ अंत:करणाचे असून , फ़र्डे कारकून होते. परंतु समंधाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी देशत्याग केला. फ़िरता फ़िरता विटे येथे त्यांचे आप्त होते, त्यांच्या सन्निध त्यांनी वास्तव्य केले. ग्रामस्थ लोकांच्या मुलांस शिक्षण देऊन, त्यावर जे काय मिळे यांत ते आपला योगक्षेम चालवीत. अशा रीतीने विटे येथे त्यांची पुष्कळ वर्षे गेली. त्यांचे चिरंजीव ज्योतिपंत हे वीस वर्षांचे झाले तरी विद्याभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागेना; तेव्हा एके दिवशी गोपाळपंतांनी रागाने त्यांस मारुन घराबाहेर घालविले. ते त्यांस म्हणाले :-
माझिया उदरी पाषाण । केंवि जन्मलासि तूं जाण ।
वृध्दपणी आम्हां दूषण । देती सकल स्वजनही ॥
नको राहू जाईं परता । नको दाखवू वदन आतां ।
विद्याभास शिकोन येतां । घेईन आमल्या स्वगृही ॥
माझी विद्या लाधली । सर्व मुले फ़ळासि आली ।
आपल्याला गृहासि गेली । पूर्ण जाली संसारी ॥
"मौजीबंधनापासून सारखे सहा महिने याला मी गायत्री मंत्र शिकवला पण त्यांतले एक अक्षरदेखील याच्या ध्यानांत राहिले नाही ! असला मतिमंद पुत्र घरांत ठेवून काय उपयोग ?" इत्यादि शब्द बोलून गोपाळपंतांनी आपल्या मुलास घरांतून काढून लाविले तेव्हा त्यांच्या पत्नीस मोठा खेद झाला. ती ह्मणाली :-
एकचि पुत्र आपुले पोटी । बाहेर घातला विद्येसाठी ।
काय लिहिलेसे लल्लाटी । ईश्वरसत्ते घडेल ते ॥
इकडे ज्योतिपंत गांवांतली मुले बरोबर घेऊन गांवाबाहेर निघाले. तेथे श्रीगणेशाची मूर्ति होती तिजपाशी जाऊन सर्व मुलांस त्यांनी सांगितले की हा विद्यादाता गजानन येथे आहे, याजकडून आपण चौदा विद्या चौसष्ट कला मागून घेऊं. मात्र ही गोष्ट गांवांत कोणास कळवू नका. सर्व मुलांस ही गोष्ट पट्ली, परंतु इतक्या मुलांस बसण्यापुरती जागा तेथे नसल्यामुळे गणपतींचे देऊळ बांधण्याचे त्यांनी ठरविले. पाणी आणि माती आणून त्यांनी एक लहानसे देऊळ उभारले. नंतर ज्योतिपंत सर्व मुलांस म्हणाले, " आतां आपण या देवळांत बसून श्रीगणपतीची आराधना करुं म्हणजे आपणास सर्व सिध्दी प्राप्त होतील." तेव्हा मुले म्हणाली "तूंच येकटा येथे खुशाल बैस. आम्हांस घरी जाण्यास अगोदरच उशीर झाला आहे, त्यांत आणखी काही वेळ आम्ही येथे थांबलो, तर आम्हांस घरी मार मात्र खावा लागेल." पंतांनी त्या मुलांची पुष्कळ समजूत केली, पण ती ऐकेनात. तेव्हा पंत त्यांस म्हणाले "तुह्मी जाणार तर जा, पण जाण्यापूर्वी देवळाचे एवढे व्दार बुजवून टाका; व मी देवळांत बसलो आहे, ही गोष्ट गांवांत कोणास सांगू नका." इतके बोलून ज्योतिपंत देवळांत गणपतीजवळ जाऊन बसले व देवळाचे व्दार्द्फ़ मातीने बुजवून टाकून मुले आपापल्या घरी गेली. घडलेली हकीकत गांवात त्यांनी कोणासही सांगितली नाही. इकडे, ज्योतिपंत घरी आले नाहीत म्हणून त्यांची मातापितरे चिंताक्रांत झाली.
"हा हा देवा काय केले । रागे पुत्रासी दवडिले ।
हातीचे रत्न झोकूनी दिधले । आतां रडावे कासया ॥
एकचि पुत्र आमुचे वंशी । क्रोधे धाडिला देशांतरासी ।
गति नाही परलोकासी । प्रपंचही न जाहला ।"
अशा रितीने खेद करीत, अन्नपाण्यावांचून त्यांनी सहा दिवस काढले. सहाव्या दिवशी रात्रौ श्रीशंकरांनी विप्रवेषाने स्वप्नांत देऊन त्यांस सांगितले की, तुमचा पुत्र माझ्या प्रसादाने मोठा कीर्तिमान होईल.
इकडे ज्योतिपंत गजाननमूर्तीजवळ सहा दिवस बसून होते, तेवढ्या वेळांत त्यांस क्षुधा तृष्णा कांही लागली नाही. सातवे दिवशी चतुर्भुज गजाननमूर्ति प्रगट होऊन तिने त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला; व ’वर ब्रुहि’ असे म्ह्टले. तेव्हा पंत हात जोडून म्हणाले:-
मागणे हे हेचि ऐका । विद्यान्न द्यावे विनायका ।
ज्ञान आणि निष्कामिका । प्रेमसहित भक्तीते ॥
यावेगळे मागणे नाही । हेचि चतुर्विध पुरुषार्थ पाही ।
आवडती मजला याच देही । कृपासागरा गुणमूर्ति ॥
ही मागणी ऐकून गजानन फ़ार संतुष्ट झाले व आपली जिव्हा बाहेर काढण्यास त्यांनी पंतांस सांगितले. पंतांनी जिव्हा बाहेर काढताच गजाननानी तिजवर ओंकार चिन्ह काढले व म्हटले :-
आतां जालासि पूर्ण । विद्यान्न दिधले तुजलागुन ।
भक्ति आणि ज्ञानासी । शक्ति आहे मजपाशी ।
उपाय नाही प्रारब्धासी । योगायोग पुढें आहे ॥
जाणे आहे वाराणसीते । षण्मास करी अनुष्ठानाते ।
व्यासप्रसाद होईल तूते । गायत्रीमंत्र गंगोदकी ॥
हा योग पूर्वजन्मीचा । निश्चय ठेवी मव्द्चनाचा ।
वर लाधेल बरवा साचा । भक्तिज्ञानी होसील तूं ॥
जेव्हा संकट पडेल तुजसी । स्मरण करावे माझे मानसी ।
त्वरित भेट देईन तुजसी । जावें आतां स्वगृहा ॥
इतके बोलून गजानन अंतर्धान पावले. नंतर ज्योतिपंतानी घरी येऊन इत्थंभूत वर्तमान आपल्या आईबापास सांगितले. ते ऐकून त्यांच्या आईने त्यांस सांगितले की, तुझा मामा महिपती पुण्यास असतो, त्यास जाऊन भेट ह्मणजे तुझा पुढील कार्यक्रम सुलभ होईल पंतास गजाननदर्शन झाल्याचे वर्तमान गांवांतील लोकांस कळतांच ते पंतांचे घरी येऊन "तुह्मी आपल्या जन्माचे सार्थक केले" अशा शब्दांनी त्यांचे गौरव करुं लागले. परंतु जी मुले पंतांबरोबर गावाबाहेर गेली होती त्यांना मात्र ही गोष्ट ऐकून वाईट वाटले. जर आपण निर्धाराने गणपतीपाशीच बसून राहिलो असतो तर आपणासही त्याचे दर्शन झाले असते असे ह्मणून ती पश्चाताप करु लागली.
पुढे लवकरच ज्योतिपंत पुणे येथे आपला मामा महिपति यांजकडे गेले. महिपती मोठा पैसेवाला होता. ज्योतिपंताचे व आपले काय नाते आहे हेच पहिल्याने त्याच्या लक्ष्यांत येईना. पुढे पंतांनी सविस्तर हकीकत सांगितल्यावर मामास त्यांची ओळख पटली; व दारिद्र्यात दिवस कंठीत असलेल्या आपल्या बहिणीच्या मंडळीस घरी आणून ठेवावे असा विचार त्याच्या मनांत येऊन त्याने आपल्या पुत्रास बोलावले; परंतु पुत्र द्रव्यामदाने उन्मत्त झाला असल्यामुळे "हे कोठले कोण, त्यांच्याशी आपणास काय करावयास आहे ?" असे उडवाउडवीचे उत्तर देऊन त्याने त्या विषयाकडे दुर्लक्ष केले, व तो प्रश्न तसाच राहिला. पुढे एके दिवशी जेवणाचे वेळी मामाची गांठ पडतांच पंतांनी त्यांस विनविले की, मला कांही तरी काम सांगा. ते ऐकून सगळी मंडळी हंसूं लागली. हा बेअकली निरक्षर मनुष्य कसले काम करणार ? तुला कांही लिहिणे वाचणे येत का? " पंत ह्मणाले " श्रीगणपतीच्या प्रसादाने मला थोडीशी विद्या प्राप्त झाली आहे." ते ऐकून महिपतीने पेशव्यांच्या लकडखान्य़ांत दरमहा चार रुपय़े पगारावर पंतांची नेमणूक केली. कांही दिवस गेल्यावर, दप्तरखान्यातील बरेच हिशोब चुकलेले आहेत, असे श्रीमंतांस आढळून आले. मग त्यांनी सगळ्या कारकून मंड्ळीस कचेरीत बोलावून
बसावया एकांत स्थान । मशी कागद लेखणी जाण ।
दीप ठेवावा भरोन । स्नेहादिकी भरोनियां ॥
आणि द्यावे उपाहारासी । ताट भरोनि विस्तारेसी ।
शय्या असावी उत्तम ऐसी । लोडतक्या वोडगण ॥
उदक भरोनि द्यावी झारी । या बोलाचा अव्हेर कराल जरी ।
स्वस्थ बसाल आपुले घरी । हानी थोर होईल जाणा ॥
भाच्याची ही मागणी मामाने लागलीच पुरी करुन दिली. तेव्हा जवळ्चे सर्व लोक मामाची थट्टा करु लागले. "याच्या नादी लागून तुह्मी आपले नुकसान मात्र करुन घ्याल. हा वीस वर्षांचा पोर; आमच्यासारख्या जाणत्या माणसांस जी गोष्ट करतां येईना ती हा काय करणार ? अजून तरी विचार करा आणि दुसरा एखादा हुशार कारकून शोधून काढून त्याकडे हे काम सोपवा. नाही तर मागाहून पश्चाताप करण्याचा प्रसंग येईल," इत्यादी बोलून पंताविषयी महिपतीचे मन कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु महिपतिने तिकडे लक्ष्य दिले नाही. "गणपतीच्या कृपेने काय होईल ते पाहूं" असे ह्मणून, पंतांवर विश्वास ठेवून तो स्वस्थ वसला.
इकडे ज्योतिपंतांनी एकांती जाऊन गजाननाची प्रार्थना केली व गजानन प्रगट होऊन त्याने सर्व दप्तरे तपासून हिशोबाच्या नवीन वह्या लिहून तयार केल्या. इकडे मंडळी महिपतीस म्हणाली."तुमचा भाचा आज तीन दिवस खोलीचे दार बंद करुन आंत बसला आहे. तरी त्याची काय अवस्था आहे, याची कांही वास्तपुस्त कारावयास नको काय? काही कमीजास्त झाले तर फ़ुकट ब्रम्हहत्या तुमच्या माथी बसेल याचा विचार करा." ही बाहेर चाललेली मंड्ळीची भाषा ऐकून " माझे कार्य पुरे झाले , दार उघडा," असे आंतून पंतांनी त्यास सांगितले, तेव्हा:-
व्दार उगडले त्यांणी त्वरित । दप्तरे आणिली सभेत ।
येवोनी सर्व लोक पाहत । आश्चर्य करिती जन सर्व ॥
ह्मणती हे कैसे विपरीत जाले । लेखन हे याने कैसे केले ।
मातुलाते वर्तमान कळले । त्वरित आले धावोनिया ॥
येवोनी लेखन अवलोकिती । दृष्टि न फ़िरे मागुती ।
श्रीकृष्णकंठी वैजयंती । ओविली अक्षरे रेषासुत्रें ॥
हा आश्चर्यकारक देखावा पाहुन महिपतीने पंतांस विचारिले, "अरे, हे कोणी लिहिले, खरे सांग." तेव्हा पंतांनी सांगितले "गजावदन-करणी सत्य होय." हे ऐकून सर्व मंड्ळी आश्चर्यचकित झाली. लोक आपसांत बोलू लागले की हे कांही मानवी लेखन नव्हे. याने कांही तरी साधन केले असले पाहिजे." यावर एक गृहस्थ म्हणाला "अहो कुठला गजानन आला आहे ? ही कांही तरी जारणमारण विद्या असली पाहिजे." अशा प्रकारे जो तो त्या प्रकारची आपापल्या परी उपपत्ति लावण्याचा प्रयत्न करीत आहे, तो इकडे महिपतीने एक पालखी आणवून , तीत ती दफ़्तरें ठेविली व वाद्यघोषांत सर्व मंड्ळी राजसभेस निघाली :-
वाद्यांचा दणदणाट भारी । करीत गेले सभेभीतरी ।
श्रीमंत आले बाहेरी। सभेमाझारी तेधवा ॥
मामा करिती साष्टांग नमन । उभे राहिले कर जोडून ।
दफ़्तरे ठेविली आपण । पुढे तेव्हा तात्काळी ॥
लेखन श्रीमंत अवलोकितां । आश्चर्य वाटतसे चित्ता ।
नाही आमुच्या राष्ट्री लिहिता । कवणे केले कार्य हे ? ॥
श्रीमंत महिपतीस म्हणाले. "तुम्हाला मी तीन दिवसांची मुदत दिली होती; पण खरे पुसाल तर हे काम एका महिन्यात देखील पुरे होण्यासारखे नव्हते; व हे काम करण्यास समर्थ असा लेखकही क्वचित मिळाला असता." तेव्हा महिपतीने श्रीमंतास सांगितले, "हे लेखन माझ्या मुलाने केले ! " गांव इनाम मिळवण्यासाठी महिपतीने हे धडधडीत खोटे सांगितले. श्रीमंत ह्मणाले "तुमच्या मुलास इकडे बोलवा." इतक्यात महिपतीस आपल्या असत्य विधानाबद्दल लाज वाटून, त्याने आपल्या मंडळीस सांगितले की, "ज्योतीस चांगला नटवून सजवून पालखीत घालून घेऊन या." त्याप्रमाणे मंडळी पंतास आणावयास घरी गेली व बहूमोल वस्त्रे आणून ती परिधान करण्याविषयी त्यांनी ज्योतिपंतांस सांगितले. परंतु पंतांनी त्या वस्त्रांचा स्वीकार केला नाही. आपल्या साध्या वस्त्रांनिशी ते पालखीबरोबर पायीच निघाले. ते राजसभेत प्रविष्ट होतांच त्यांची तेजस्विता पाहून सर्व सभाजन तटस्थ झाले. पंतानी श्रीमंतांस नमस्कार केला व ते दूर उभे राहिले. श्रीमंतानी त्यांस जवळ बोलावून आपला सविस्तर वृतांत सांगण्याची आज्ञा केली. तेव्हा पंतांनी सांगितले :-
महिपतराव आमचे मामा । जेष्ठ भगिनीसुत ज्योतिनामा ।
चिरंजीवासम आलो कामा । आश्रय करोनि राहिलो ॥
मामाने सांगितले कामी । नित्य करीत आहे नेमी ।
चार मुद्रिका रौप्य घेऊनि समाधान मी । स्वस्थचित्ते राहिलो ॥
ऐकोनि स्वयंज्योतिची वाणी । श्रीमंत विचारिती तयालागुनी ।
"कागदी अक्षर लिहिले कोणी । ऐसे कधी न देखिले ॥
सत्य सांगावा वृतांत । मिथ्या न बोलावे यथार्थ ।
सागा खरी काय मात । नवल वाटते आम्हासी ॥"
तेव्हा ज्योतिपंतांनी नम्रपणे सांगितले की "हे लेखन श्रीगजाननाच्या हातचे आहे; माझ्या हातचे नव्हे." श्रीमंतानी तत्काळ पुरंदर किल्ल्याची फ़डणिशी ज्योतिपंतांस दिली व स्वहस्ताने वस्त्रें व शिक्का देऊन , त्यांची रवानगी केली. श्रीमंताची आज्ञा घेऊन पंत महीपतीसह घरी आले. त्या दिवशी महिपतीच्या घरी पंतांचा जो मानसन्मान झाला त्याचा थाट काय वर्णावा ?
"ते दिनी भोजनाचा काय वर्णू थाट । मातुलासन्निध विस्तीर्ण पाट ।
मांडिले सुवर्णाचे वाट्याताट । अन्न वाढिले षड्स ॥
भोजन झाल्यावर पंत पुण्याहून पुरंदरास गेले, व तेथे कांही दिवस घालविल्यावर त्यांनी आपल्या आईबापांस किल्यावर आणविले. त्यांच्या सेवेत पंत नेहमी द्क्ष असत.काही दिवसांनी पंतांचे वडील पंचत्व पावले.
पुढे उत्तर हिंदुस्थानांत गिलच्यांची स्वारी झाली, त्या वेळी गोविंदपंत बुंदेले व राघोराम पागे यांसहवर्तमान पंत लढाईवर गेले. तेथे एके दिवशी रात्री ज्योतिपंतास स्वप्नांत असा दृष्टांत झाला की, येथे क्षणभर देखील राहू नये. दुसरे दिवशी सकाळी पंतांनी श्रीमंतांस पत्र लिहिले की, "आजपासून शस्त्र आणि लेखणी यांचा मी न्यास केला आहे." नंतर एका ब्राह्मणास बरोबर घेऊन व जवळच्या सर्व द्रव्याची खैरात करुन ते काशी क्षेत्री गेले. तेथे त्यांनी सहा महिने वास्तव्य केले. मनकर्णिका तीर्थात कंबरभर पाण्यात उभे राहून बारा वाजेपर्यंत गायत्री मंत्राचा जप करावा व नंतर मधुकरी मागून व तिचा देवास नैवेद्य दाखवून ती भक्षण करावी असा त्यांचा नित्यक्रम असे. अशा रीतीने सहा महिने अनुष्ठान केल्यावर एके दिवशी श्रीवेदव्यासांनी गंगातीरी म्लेच्छरुपाने त्यांस दर्शन दिले. पंतांचा चरित्रकार लिहितो, एके दिवशी पंत मनकर्णिकेत उभे असतां व्यांस तेथे म्लेच्छरुपाने प्रगट झाले आणि त्यांनी पंतांच्या अंगावर पाणी उडविले. तेव्हा पंतांनी पुन: स्नान केले. परंतु व्यासांनी पुन: त्यांच्या अंगावर पाणी उडविले तेव्हा मात्र त्यांस राग आला.
"व्दितीय वेळी उदकसिंचन । तव रागे फ़िरविले नयन ।
बोलते जाले म्लेच्छालागुन  । हिंदुपद आहे अद्यापि ॥
तूं समजलासी काय मनीं । शिक्षा करवीन तुजलागुनी ।
ब्राह्मणाचा छल करुनी । कोण तरला दावी बा ? ॥
पंतांचा हा पुण्यप्रकोप पाहून व्यासांनी हास्य केले व प्रत्यक्ष व्यासरुपाने दर्शन देऊन पंतांस सांगितले,"आतां अनुष्ठान पुरे करुन व्यासमंडपी जाऊन निद्रा करा. तेथे रात्रौ मी तुह्मास श्रीमद्भागवत आणून देईन. त्याचे वाचन करितांच तुह्मास ज्ञानप्राप्ति होईल." इतके सांगून व व्दादशाक्षरी मंत्राचा उपदेश करुन व्यासमूर्ति अंतर्धान पावली.
आपल्या अभिवचनाप्रमाणे व्यासानी रात्रौ, श्रीमद्भागवताचे बारा घरचे बारा स्कंध आणून ते ज्योतिबुवांच्या उशाजवळ ठेविले. सकाळी उठतांच तो ग्रंथ बुवांच्या दृष्टीस पडला तेव्हा व्यांनी त्याजपुढें साष्टांग नमस्कार घातल. मग मनकर्णिकेवर स्नान करुन ज्ञानमंडपांत त्यांनी ग्रंथाचे पारायण सुरु केले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अठरा हजार ग्रंथसंहिता त्यांनी पूर्ण केली. त्याचप्रमाणे त्यांचा नित्यक्रम सुरु असतां, त्यांचे हे वाढते तपोबल व तज्जन्य तेजस्विता पाहून काशीच्या ब्रह्ममंडलास मोठी पराजयभीति उत्पन्न झाली; व त्यांनी श्रीविश्वेश्वराकडे गार्‍हाणे केले की;-
तुझिया नगरीचे यश । कोणी न मिळविले सायास ।
कलंक लागेल विद्यापीठास । दुर्यश होईल तुझे की ॥
हे ऐकतांच विश्वेश्वर वृध्द ब्राह्मणरुपाने ज्ञानमंडपांत गेले. व तेथे ज्योतिपंताचे भागवतपारायण श्रवण करीत तटस्थ उभे राहिले. तेव्हा पंतांची जिव्हा स्खलन पावूं लागली, स्पष्ट शब्दोच्चार होईना. ही त्यांची स्थिति पाहून विश्वेश्वर विनोदाने ह्मणाले," तुह्मी रोज असेच का वाचता ?" हा दुसरा तिसरा कोणी नसून श्रीविश्वेश्वरच आहे, हे पंतांनी तात्काल जाणले व उठून भगवंताच्या चरणी मस्तक ठेविले. तेव्हा भगवंत त्यांस ह्मणाले,
आतां पुरे अनुष्ठान । कार्य जाले तुझे संपूर्ण ।
प्राप्त जाले भक्तिज्ञान । आणखी साधन नको आता ॥
ऐसे दुजे नाही साधन । सर्व पुरुषार्था कारण ।
लावी भजनमार्गी जन । स्वरुपप्राप्ति येणेची ॥
इतके सांगून भगवान शंकर गुप्त झाले. ज्योतिपंतांस विश्वेश्वर दर्शन झाले हे ऐकतांच , जे ब्राह्मण पंतांचा पूर्वी व्देष करीत असत , ते
"बोलू लागले विचक्षण । हा साक्षात अवतारी ॥
मग भगवदाज्ञेप्रमाणे पंतानी भागवताची पोथी बांधून ठेविली. तेव्हा नगरातले सहस्त्रावधि लोक तेथे जमून पंतांचा जयजयकार करु लागले. त्यांनी भागवताची पोथी पालखीत ठेवली व तिची मोठ्या थाटाने मिरवणूक काढिली. ब्राह्मणांनी ज्योतिपंतांस "महाभागवत" ही पदवी दिली. पंतांच्या आश्रमांत नित्य भजनपूजन, नामसंकीर्तन, ब्राह्मणभोजन यांचा थाट होऊ लागला. काशीनजीक रामनगर येथे पंतांनी श्रीशुक आणि व्यासगुरु यांच्या मूर्तीची स्थापना केली हे स्थल वाराणशीच्या दक्षिणेस असून त्यास व्यासकाशी असे म्हणतात. पूर्वी मोगल बादशहांच्या कारकीर्दीत हिंदू लोकांच्या देवमूर्ति फ़ोडण्याचा जेव्हा सपाटा सुरु झाला, तेव्हा वाराणशीचा त्याग करुन व्यास, शुकादि देव रामनगरांत जाऊन गुप्त रुपाने राहिले होते. ज्योतिपंतांनी त्यांच्या मूर्तीची पुन: स्थापना केली तेव्हा रात्रौ पंतांस त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले, अशी कथा त्यांच्या चरित्रांत लिहिली आहे. ज्योतिपंत महाभागवताची कीर्ति ऐकून काशीच्या राजाने त्यांस सन्मानपूर्वक पाचारण करुन मोठ्या थाटामाटाने, वाद्यांच्या गजरांत, आपल्या राजवाड्यांत आणले. स्वारीबरोबर , वाद्यांच्या गजरांत, आपल्या राजवाड्यात आणले. स्वारीबरोबर बाळंभट शास्त्री, नारायण दीक्षित, केशवभट, रामाचार्य पुराणिक, वगैरे ब्रह्ममंडळ होते. राजाने पंतांचा मोठा बहुमान करुन त्यांचा चांगला परामर्ष घेतला. इतके झाल्यावर पंत दक्षिणेत आपल्या मातृभूमीस येण्यास निघाले. वाटेत त्यांचा शिष्यवर्ग वाढत चालला. काही दिवसांनी ज्योतिबुवा महाभागवत पंढरपुरी आले. तेथे चंद्र्भागेचे कांठी पंढरिनाथाने बुवांस विप्रवेषाने दर्शन दिले व सांगितले की, "मला नास्तिक लोक जैनाचा देव म्हणतात, तरी ठिकठिकाणी माझी देवालये बांधून भागवत धर्माच विस्तार करा." नंतर बुवांनी पंढरपुरी शास्त्रीपंडितांची सभा बोलाविली. तीत काही पंडितांनी असा आक्षेप घेतला की, "वेदशास्त्रांत विठ्ठल या नावांचा देव आढळत नाही." तेव्हा बुवा म्हणाले :-
"अश्विनीपासोनि चवथे भगणी । जन्म श्रीहरीचे तृतीय चरणी ।
बोवाविवेती रोहिणी । नाम ठरले ज्योतिषमते ॥
दुजा शास्त्राचा विचार । वेदानुसार बोलति साचार ।
व्याकरणशास्त्र धुरंधर । वेदांत शास्त्र तैसेची ॥
विद धातु ज्ञानाविषयी । ठ धातु शून्यमयी ।
लकार असे ग्रहणाठायी । भाविकाते ग्रहण करी जो ॥
ज्योतिबुवांनी सांगितलेली विठ्ठल नामाची ही उपपत्ति ऐकतांच सर्व वैष्णवांनी विठठलनामाचा मोठा गजर केला. पंढरीत चार महिने राहिल्यावर , पांडुरंगाचा निरोप घेऊन ज्योतिबुवा आपल्या शिष्यसमुदायासह प्रवासास निघाले. पहिल्याने निरसिंगपूर येथे मुक्काम करुन , नंतर स्वारी फ़लटणास आली. तेथे सगुणाबाई निंबाळकर यांच्या आग्रहावरुन बुवा तेथे एक मास राहिले. नंतर स्वारी पुण्याकडे निघाली. पुण्याजवळ जातांच नानाफ़डणविसादि मुत्सद्दी मंडळीसह श्रीमंत बुवास सामोरे गेले. राजवाड्यांत गेल्यावर, शिष्यवृंदाने, वाराणशीत घडलेला समग्र वृत्तांत सर्व मंडळीस सांगितला व पंढरपुरी बुवांनी "मी पंधराशे विठ्ठलमूर्ति स्थापन करीन " अशी प्रतिज्ञा केली असल्याचेही श्रीमंतांस कळविले. पुढे,
श्रीमंतानी जोडोनि पाणी । आतां वास्तव्य व्हावे स्वस्थपणी ।
कोठे न जावे येथोनी । कृपा असावी राष्ट्रावरी ॥
हे राज्य अवघे आपुले । आम्ही तो सर्व आपुली मुले ।
आज्ञेप्रमाणे वर्तू भले । संशय न धरावा मानसी ॥
अशी विनंती केली तेव्हा, श्रीविठ्ठलाची १५०० देवळे बांधण्याचा माझा संकल्प मला शेवटास न्यावयाचा आहे, असे बुवांनी श्रीमंतांस सांगितले. श्रीमंत ह्मणाले " या आपल्या संकल्पित कार्यास आपण येथेच प्रारंभ करावा. आपण देवळाचे काम सुरु करुन अन्य स्थली जावे व देवालय पुरे झाल्यावर, परत येऊन मूर्तीची स्थापना करावी." हा विचार बुवांस पसंत पडून , पुणे येथे लकडी पुलाजवळ देवालयाच्या कामास त्यांनी सुरुवात केली. नंतर ते सातार्‍यास गेले व तेथे त्यांनी विठ्ठ्लमंदिर उभारले. इकडे श्रीमंतांनी ठिकठिकाणच्या सुभ्यांस, गांवोगांवी देवळे बांधण्याचा हुकूम सोडला.त्याप्रमाणे देवळे बांधून तयार होताच, त्या त्या ठिकाणी जाऊन बुवांनी मूर्तीची स्थापना स्वहस्ते केली. ह्या प्रवासांत त्यांनी भागवताच्या अठरा सहस्त्र संहितेवर अठरा सहस्त्र अभंगांची समश्लोकी टीका केली. हे अभंग लिहून काढण्याचे काम खंडोपंत नामक गृहस्थानी केले. शिवाय श्रीमद्गागवतावर बुवांनी दुसरी ओवीबध्द टीका लिहिली. परंतु तिचा बराच भाग ठिकठिकाणी शिष्यांकडे राहिला; बुवांच्या मठांत सदर ग्रंथाचे फ़क्त दोनच अध्याय शिल्लक आहेत. असो. एकदा ज्योतिबुवा वाई येथे असता, त्यांचे कीर्तन सुरु होते व ते परब्रह्मस्वरुपाचे वर्णन करीत होते. इतक्यात हरिपंडित या नावांचा एक गर्विष्ट पंडित कीर्तनास येऊन बसला त्याने
"प्रश्न केला तये वेळे । वास्तु कैसे पिवळे निळे काळे ।
आम्हां दाखवा याच वेळे । पाहूं आम्ही कैसे ब्रह्मा ॥
सवे आणिले शिष्यमांदी । सर्व जन लाविले नादी ।
वृथा कासया जमविली उपाधी । दावावया सर्व जना ॥"
पंडिताने बुवांचा केलेला हा उपहास ऐकून सर्व श्रोते आश्चर्यचकित झाले. हरिनामाचा गजर चालू होता. इतक्यात ज्योतिबुवांनी पंडिताजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर आपला हात ठेविला. तेव्हा तत्क्षणी त्यास समाधी लागली ! या समाधिस्थितीत तो तीन दिवस होता. तो तीन दिवस होता. तो प्रकार पाहून कांही लोक असे बोलू लागले की, बुवाने कांही तरी जादू करुन या ब्राह्मणाचा जीव घेतला ! तिकडे त्या पंडिताची बायकोमुलेही खेद करु लागली. लोकवार्ता कानी पडतांच बुवांनी पंडिताची समाधि उतरली व तो जागॄत होताच त्यास प्रश्न केला की "तुमचे पांडित्य आतां कोठे गेले ? गेल्या तीन दिवसांत कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहिल्या?" पंडिताने बुवांच्या चरणी मस्तक ठेवून सांगितले की "मी अत्यांनंदात होतो. मला आपण का जागृत केले ?" तेव्हा ज्योतिबुवा त्यास म्हणाले, "समाधिसुखाची थोडीशी गोडी आम्ही तुम्हास दाखविली. आतां तुम्ही योग्याभ्यास चालू ठेवा म्हणजे या सुखाचा पूर्ण अनुभव तुम्हास घेता येईल." इतके सांगून बुवांनी पंडितास घरी पाठविले. वाई येथे सोनेश्वर नामक देव आहे, त्याच्या सन्निध बुवांनी श्रीविठ्ठलाचे मंदिर बांधले व मूर्तिस्थापना केली. पुढे कृष्णावेणीसंगमी माहुलीस प्रतिनिधींनी स्थापलेला विश्वेश्वर देव आहे, त्याच्या देवळाजवळ बुवांनी विठ्ठलमंदिर बांधविले. यानंतर चरेगांव, पाटण, मसूर, उंब्रज, कर्‍हाड वगैरे अनेक ठिकाणी बुवांनी देवालये बांधविली. ही ज्योतिबुवांनी बांधलेली देवळे ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे प्रत्येक देवळापुढे असलेला अश्वत्थ वृक्ष होय.
पुढे ज्योतिबुवा कोल्हापूर येथे गेले असतां, एके दिवशी त्यांनी आपल्या कांही शिष्यांस जवळ बोलावून सांगितले की तुम्ही वेंगुर्ले बंदरास जाऊन समुद्रास आमचा निरोप कळवा की, ज्योतिबुवाने तुजपाशी पांच हजार रुपये मागितले आहेत. त्यावर शिष्य म्हणाले "महाराज, समुद्राबरोबर आम्हांस भाषण कसे करिता येईल ?
"समुद्र आहे खारे पाणी । तेथे काय करावे आम्ही जाउनी ।
द्रव्य कैचे देईल आम्हालागुनी । कैसे घडे स्वामिया ॥
लोक करितील विटंबणा । म्हणतील काय हा शहाणपणा ।
जळी काष्ठी पाषाणा । द्रव्य कैचे मिळेल तुम्हासी ॥"
जेव्हा ज्योतिबुवा शिष्यास म्हणाले " तुम्ही सगळे आपणास शहाणे म्हणवितां आणि या नारायणास ’ वेडा नारायण ’ म्हणून त्याची थट्टा करितां. तरी मी आतां त्यालाच ह्या कामगिरीवर पाठवितो." वेडा नारायण या नांवाचा बुवांचा एक शिष्य होता, तो मोठा गुरुभक्त असून, बुवांचीही त्याजवर पूर्ण कृपा असे. त्याजपाशी बुवांनी समुद्रास पत्र लिहून दिले. ते पत्र घेऊन वेडा नारायण वेंगुर्ले येथे जाऊन व पत्र समुद्रांत टाकून रुपयांची वाट पहात बसला. त्याने समुद्रास सांगितले की " पांच हजार रुपये लवकर आणून दे, नाही तर तुला ब्रह्महत्येचें पातक लागेल. " अन्नपाण्याला स्पर्श न करिता वेडा नारायण तेथे तीन दिवस बसून राहिला. तिसरे दिवशी सायंकाळी समुद्र बटुवेषानें त्याजपाशी आला व ह्मणाला " तुह्मी सावंतवाडीस जा. तेथे तुह्मास मुद्रिका मिळतील अशी व्यवस्था मी करितो; व त्याप्रमाणे तेथे तुह्मास मुद्रिका मिळतील अशी व्यवस्था मी करितो; व त्याप्रमाणे तेथे तुह्मास रुपये मिळाले नाहींत तर परत मजकडे या, ह्मणजे मी तुह्मास दुप्पट रुपये देईन." परंतु त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन वेडा नारायण तेथेच बसला व " येथल्या येथे रुपये मिळाले पाहिजेत " असे त्याने सावंतवाडी येथील एका सावकाराच्या स्वप्नांत जाऊन त्यस कळविले की " तुझा मुलगा नाहींसा झाला आहे. तो तुला परत आणून देतो. तरी तुजपाशी जो ब्राह्मण येईल त्याला पांच हजार रुपये दे. "

असा दृष्टांन्त होतांच , इतका तेजस्वी ब्राह्मण कोण आहे हे समक्ष जाऊन पहावे, या हेतूने तो सावकार वेंगुर्ल्यास गेला. तेथे समुद्रकाठी बसलेल्या वेड्या नारायणास पाहून त्याच्या विषयी त्याचा चांगला ग्रह झाला नाही. मग त्याने वेड्या नारायणाकडून एकंदर हकीगत विचारुन घेतली व तुम्ही सावंतवाडीस मजबरोबर या, तेथे तुम्हास पैसे देतो असे त्यास सांगितले. नंतर ते दोघे सावंतवाडीस गेले. तेथे सावकाराने पांच हजार रुपयांची हुंडी लिहून त्याच्या स्वाधीन केली. परंतु वेड्या नारायणाने असा ह्ट्ट धरला की " हा कागद काही कामाचा नाही. रोख रुपये पाहिजेत." मग सावकाराने ती हुंडी ज्योतिबुवांकडे रवाना करुन त्यांचे उत्तर आणवून वेड्या नारायणास दाखविले तेव्हां त्याची समजूत पडली. मग सावकाराकडून आठ दिवासांची पोटगी घेऊन तो कोल्हापुरी बुवांकडे जाण्यास निघाला. तेथे गेल्यावर त्याच्या कर्तबगारीची तारिफ़ करुन, बुवांनी आपल्या इतर शिष्यांस म्ह्टले "तुम्ही याला वेडा नारायण म्हणतां, पण जे कार्य तुमच्या हातून झाले नाही ते त्यानें कसे करुन दाखविले पहा! " हे ऐकून ते शिष्य लज्जित झाले. समुद्राकडून आणविलेल्या द्रव्याने बुवांनी करवीर क्षेत्री पद्माळे या नांवाचा मोठा तलाव व त्याच्या कांठी पांडुरंगाचे मोठे देऊळ बांधविले. हल्ली कोल्हापूर येथे पद्माळ्याच्या कांठी जे विठ्ठलमंदिर आहे व ज्याच्या सभामंडपाच्या एका तुळईत तोफ़ेचा लोखंडी गोळा शिरलेला दिसतो ते हेच मंदिर होय. पुढे करवीर प्रांती निरनिराळ्या गांवी बुवांनी अनेक देवालये बांधविली. नंतर निपाणीवरुन पटवर्धन घराण्याच्या जहागिरीत त्यांनी प्रवास केला.
ज्योतिबुवांचा, पुष्कळ दिवसांपासून, सावंतवाडीकडे जाण्याचा विचार होता. सांगली मिरज वगैरे प्रांती देवालये बांधण्याचे काम पुरे होतांच गे बेळगांवास गेले व तेथे देवालय बांधून, सांवतवाडीस गेले. तेथे भटवाडीत त्यांनी विठ्ठलमंदिर बांधून, पूजेअर्चेचे काम आपल्या एका कर्‍हाडा ब्राह्मण शिष्याकडे सोपविले. पुढे रत्नागिरी, उरण वगैरे ठिकाणी देवळे बांधून बुवा मुंबईस गेले. तेथे विठ्ठल वाडीत विठ्ठलमंदिर उभारले. नंतर ठाणे, वसई, कल्याण, वगैरे गांवी देवळे बाधली. पुढें, देशावर, तळेगांवचे दाभाडे बुवांचे स्नेही होते, त्यांच्या भेटीस बुवा तळेगांवी गेले. बुवांच्या आगमनाची वार्ता ऐकतांच दाभाड्यांनी त्यास मोठ्या थाटामाटाने आपल्या वाड्यांत नेले. या प्रसंगाचे वर्णन वाचण्यासारखे आहे :-
ऐकतां गडबडीने उठिला । सर्वा सांगे दर्शनासी चला ।
ज्योतिपंत साधु होऊन आला । पूर्वी होता आम्हासवे ॥
कामदार लई झोकनोकी । चौमुलखी डंका वाजला की ।
लिवणार लई अलौकिकी । पेशवाईत नाही दुजा ऐसा ॥
आतां जाला देवभगत । सोडिले काम नोकरी नाही करित ।
देवळे बांधीत हिंडत । व्यसन लागले देवाचे ॥
ऐसे बोलत बोलत निघाले । सामोरे येवोनि भेट्ले ।
स्मरण असे तुह्मा पाहिले । आम्ही तवं लागलो देश हिंडू ॥
आतां उभयतां कशाकरिता भांडूं । पहिल्या गोष्टी राव असू द्या ॥
अशा प्रकारे विनोद करण्यांत व आनंदात बुवांनी दाभाड्यांकडे चार दिवस मुक्काम केला. दाभाडे फ़ार विनोदी व प्रेमळ होते. बुवांच्या चरणी नमन करितांना त्यांच्या तोंडाकडे पाहून हांसत हांसत ते ह्मणाले :-
नोकरी बि लई दिवस नाही केली ।
श्रीमंतानी झागीर बि नाही दिली ।
पैक्याची कुट पेवं होती भरली ।
त्याचा हिशेब आम्हां न कळे बा ॥
असो. दाभाड्यांचा निरोप घेऊन ज्योतीबुवा पुण्यास आले. तेथे श्रीमंतांनी त्यांस सांगितले की " आज्ञेप्रमाणे विठ्ठलमंदिर बांधून तयार आहे. आतां आपण प्रतिमा स्थापन कराव्या." मग मोठ्या समारंभाने मूर्ति स्थापन करण्यांत आल्या. कांही दिवस पुण्यांत राहून बुवांनी मूर्तिस्थापनार्थ उत्तरेकडे जाण्याचा आपला विचार श्रीमंतांस कळविला. तेव्हा श्रीमंतानी आपल्या वाड्यांत बुवांस नेऊन मोठा भोजनसमारंभ केला. रात्रौ बुवांचे कीर्तन झाले. त्या वेळी एक चमत्कार घडला तो असा :- चारदोन घटका कीर्तन केल्यावर बुवांनी एकदम नेत्र मिटले व आपले हात चोळले. तेव्हा नाना फ़डणविसांनी असे करण्याचे कारण बुवांस विचारले. बुवा म्हणाले, आमच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु मंडळींचा फ़ारच आग्रह पडला तेव्हा बुवांनी सांगितले की, रात्री पंढरपुरास विठ्ठलमंदिरात काय प्रकार घडला याची ह्कीकत पत्रव्दारे आणवावी. मग श्रीमंतानी लागलीच पत्र देऊन सांडणीस्वार पंढरपूरास पाठविला. दुसरे दिवशी बडव्याकडून उत्तर आले की," गेल्या रात्री पांडूरंगाच्या नेसत्या वस्त्राने अकस्मात पेट घेतला. तेव्हा वस्त्र चोळून तो अग्नि कोणी तरी विझविला." हे वर्तमान ऐकतांच बुवांच्या साक्षात्कारीपणाबद्दल सर्व लोकांची खात्री झाली. पुढे बुवा उत्तर देशी जावयास निघाले. तेव्हा त्यांच्या दर्शनास लोकांची मोठी गर्दी उसळली. पैशाच्या राशी पडल्या. कित्येक लोक तर घरदार सोडून बुवांवरोबर जाण्यास तयार झाले. श्रीमंतही बुवांच्या पालखीबरोबर कांही योजने गेले होते, त्यांस दोन उपदेशाच्या गोष्टी सांगून परत पुण्यास पाठविले. पुढे बुवा नासिक, त्र्यंबकावरुन खानदेशात गेले. ठिकठिकाणी देवळे बांधण्याचा उद्योग सुरुच होता. त्र्यंबकेश्वरी भगवंताने त्यांस आशिर्वाद दिला की -
अखंड चालेल तुझी वाणी । पराभव न होय कोणा हातुनी ।
ऋध्दी सिध्दि राबतील सदनी । संशय न धरी मानसी ॥
पुढे येवले, बाळापूर, अकोले वगैरे ठिकाणी प्रवास करुन व देवळे बांधून बुवा नागपूरास गेले. तेथे धोंडभट कटके नामक शिष्याने आपल्या विव्दत्तेच्या जोरावर आपले मोठे प्रस्थ वाढविले होते. त्यांचे दोन शास्त्रांचे अध्ययन असून श्रीमद्भागवत त्यांना मुखोद्गत होते. नागपूरकर भोसले त्यांचे शिष्य होते व त्यांच्या वाड्यांत त्यांचे नित्य कीर्तन होत असे. धोंडभटांची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने, आपल्या आगमनाची बातमी गुप्त ठेवून, ज्योतिबुवा एके दिवशी भिक्षेस निघाले. पालखींत बसून, मुखाने हरिनामाचा गजर करीत ते दारोदार भिक्षा मागत चालले. बरोबर शिष्यसमुदायही मोठा होता. ते पाहून गांवातले लोक आपसांत बोलू लागले की "पूर्वी एक धेंड गांवांत येऊन बसलेच आहे, पण त्याहून हे नवीन धेंड बडे दिसते." ज्योतिबुवांची स्वारी धोंडभटांच्या घरानजीक येतांच, स्वारीच्या भजनाचा शब्द ऐकून , आपले गुरुजी आले की काय, अशी शंका त्याच्या मनात उत्पन्न झाली.
तो ह्मणाला "गुरुजी स्वदेशी होते ह्मणून मी इकडे येऊन राहिलो, पण आतां ते इकडे येऊन दाखल झाल्यावर, लोक माझी मानहानि करतील व सद्गुरुंच्या भजनी लागतील." धोंडभटांचा हा विचार ज्योतिबुवांनी अंतर्ज्ञानाने जाणला. नंतर ते भिक्षेहून शहराबाहेर आपल्या मुक्कामी गेले; व भिक्षेच्या द्रव्याने सुग्रास अन्न तयार करवून गांवांतील ब्राह्मणास भोजन दिले. याप्रमाणे त्यांच्या मुक्कामाच्या जागी नित्य समाराधना चालू असे. एक महिना मुक्काम झाल्यावर भोसल्यांस कळले की गांवाबाहेर कोणी महंत येऊन राहिला आहे. हा महंत नित्य ब्राह्मणभोजन घालतो व ब्राह्मणास वस्त्रालंकार देतो, त्या अर्थी त्यास कांही तरी सिध्दि साध्य झालेली असावी, अशीही लोकवार्ता त्यांनी ऐकली. तेव्हा, आपले गुरु धोंडभट यांस पालखीत बसवून, त्यांच्या समवेत ज्योतिबुवांच्या दर्शनास ते निघाले. हत्ती, घोडे, पायदळ, स्वार, वाद्ये वगैरे थाटांत भोसल्यांची स्वारी गांवाबाहेर येतांच बुवांचे वसतिस्थान त्यांच्या दृष्टीस पडले. तेथे हरिनामाची गर्जना चालली होती, ती त्यांनी ऐकली व गळ्यांत तुळशीच्या माळा घातलेले, बुवांचे शिष्यही त्यांनी पाहिले. मग वाहनांतून खाली उतरुन आपल्या गुरुजींसह भोसलें ज्योतिबुवांपाशी आले. त्यांची तेजस्विता अवलोकन करितांच भोसले चकित होऊन धोंडभटांकडे पाहूं लागले, तो त्यांची चर्या लज्जेने काळीठिक्कर पडली आहे असे त्यांस दिसले. धोंडभटांनी एकदम पुढे होऊन ज्योतिबुवांच्या पाय धरले व " स्वामी, आपण केव्हा आला ?" असे त्यांस विचारले. बुवानी सांगितले, आम्ही गांवांत असल्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होईल, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनांत घोळत होते, त्यावेळी आम्हां भिक्षेसाठी गांवांत फ़िरत होतो." हे ऐकताच धोंडभटजीस आपल्या डोक्यावर धोंडा पडल्यासारखे वाटले. पुढे तेथे नवीनच बांधलेल्या विठ्ठलमंदिरांत मूर्तीची स्थापना करण्याचा प्रश्न निघाला. सदर स्थापना आपल्या हातून व्हावी अशी भटजींची फ़ार इच्छा होती म्हणून बुवांपाशी त्यांनी हळूच गोष्ट काढली; व आपल्या हातून प्रतिमा स्थापन होण्यास हरकत नाही, अशा अर्थाचे शास्त्राधार बुवांस त्यांनी काढून दाखविले. बुबांनी स्पष्ट सांगितले, " तुमची इच्छा आम्हांस पूर्ण करितां येत नाही, कारण देवालयें बांधून प्रतिमा स्थापना करण्याचा संकल्प आम्ही सोडून चुकलों आहो. तरी तुम्ही आग्रह धरुं नये." परंतु धोंडभटजी अगदी हट्ट घेऊन बसले. पुढे लवकरच देवालयाचें काम पुरें झाले. मुधोजी भोसले यांनी स्वत: येऊन विनंती केली की, आज्ञेप्रमाणे देवालय बांधून तयार आहे, व प्रतिमास्थापनेचाही तयारी झाली आहे, तरी स्थापनेचा मुहूर्त मुक्रर करावा. त्याप्रमाणे बुवांनी दिवस ठरविला व अगोदरच्या दिवशी प्रतिमा नेऊन पाण्यांत ठेविल्या. दुसरे दिवशी होमहवनादि सर्व क्रिया झाल्यावर प्रतिमा आणण्यास मंडळी पाठवली. तो प्रतिमा पाण्यांत विरुन गेल्या, असे त्यांच्या दृष्टीस पडले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. धोंडभटजींच्या हातून आपल्या मूर्तीची स्थापना व्हावी हे देवास इष्ट वाटत नाही, असा निष्कर्ष निघाला. आतां मूर्तीची स्थापना न होता मुहूर्त निघून जाणार अशीही कित्येकांस भीति पडली. तेव्हा ज्योतिबुवांनी राजे भोसले यांस सांगितले की तुमच्या जामदारखान्यांत पांढर्‍या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत त्या आणाव्या. आपल्या जामदारखान्यांत मूर्ति आहेत हे भोसल्यांस तावत्कालपर्यंत ठाऊक नव्हते. त्यांनी मूर्ति शोधून आणण्यास ताबडतोब माणसे पाठवली. ती जामदारखान्य़ांत जाऊन पाहतात तो वस्त्रांत गुंडाळलेल्या मूर्ती एका जागी त्यांच्या दृष्टीस पडल्या. त्या पालखींत घालून त्यांनी बुवांपाशी आणल्या. वाद्यांचा व हरिनामाचा मोठा गजर झाला. चरित्रकार म्हणतो:-
आश्चर्य जाले सर्व जनी । जामदारखानी आल्या प्रतिमा कोठोनी ।
ही असे ईश्वराची करणी । भंगला मनोरथ धोंडाभटाचा ॥
असो. मुहूर्त संपण्यापूर्वी बुवांनी यथाविधि मूर्तीची स्थापना केली. सहस्त्रावधि ब्राम्हणास भोजन घातले. आंधळ्या पांगळ्यांस गोरगरीबांस यथेच्छ जेवण दिले. पुढे बुवांनी भागवताचा सप्ताह केला. द्रव्याच्या राशी पडल्या :-
द्रव्यालागी नाही गणति । तीन याम पूजा होत होती ।
धन उचलितां बहु जाली यातायाती । भरलीं पोतीं धान्यासारखी ॥
वस्त्रांचे पडले ढिगारे । कवळितां शिष्य थकले सारे ।
वाद्यघोष होतसे मंदिरव्दारीं । शब्द कोणाचा न पडे श्रवणी ॥
नाना प्रकारच्या अगरबत्या । दक्षणा तांबूल मंगल आरत्या ।
बहूविध पुष्पें जाती मालत्या । स्वयंज्योतितें अर्पण करिती ॥
षड्र्सादि पक्वान्न । कितीएक दिली गोदानें ।
संहितेसहित पुस्तक देऊन । जाती आपुले स्वस्थळासी ॥
नववे दिवशी गोपाळकाला । वर्तमान कळविले सर्वत्रांला ।
दधि लाजा घेउनी पताकीला । त्वरित यावें हरिभजनी ॥
स्वयंज्योति करिती कीर्तन । लक्षावधि भोवती निशाण ।
आपण भासती विठ्ठलस्वरुपाने । मोहित जाले जन सर्व ॥
असो ऐसा जाला काला । प्रसाद वाटिती एकमेकांला ।
यातीयाती धर्म नाहीसा झाला । प्रसादा झोंबती परस्परें ॥
स्त्रीपुरुषभेद उरला नाही । आलिंगिती कोणाही ।
कृष्णमय सर्व देखती पाही । न उरे तयां अष्टही भाव ॥
परस्परें घालिती लोटांगण । सद्भावें धरिती हातीं चरण ।
कृष्णरुप जालें मन । हरि सर्वत्र देखती ॥
मग करुनी मंगल आरती । कृष्णनामें ध्वनि गर्जती ।
वृक्षपाषाणादि नाचती । भासूं लागले तेधवां ॥
टाळनादें कोंदलें अंबर । अंगी लोटिला प्रेमाचा पूर ।
नेत्रीं वाहतसे नीर । निर्लज्ज होऊनी नाचती ॥
मुखीं राधाकृष्ण म्हणती । नाही उरली देहस्थिती ।
तन्मय जाल्या सकल वृत्ति । सच्चित्सुकाते पावले ॥
स्वयंज्योतीनी गाढ गर्जना केली । अविद्या शक्ती चालविली ।
वृत्ति देही जागृत केली । मग बैसले सभेसी ॥
राजा येऊनि चरण धरी । म्हणे येथेचि आली पंढरी ।
या रंगणीं नाचला मुरारी । संशय नाही सर्वथा ॥
कितीएक विरक्त होऊनि गेले । कित्येक भजनमार्गी लागले ।
किती ज्ञानसंपन्न जाले । अधिकारानुरुप वर्तती ॥
एकंदरीत, ज्योतिबुवांनी नगपूरच्या लोकांस भक्तिरसामृतांत अगदी बुडवून टाकले ! अधिकारी पुरुषाच्या वाणीवर जनता कशी लुब्ध होते आणि अशा अधिकारी पुरुषास आपल्या विलक्षण लोकप्रियतेच्या जोरावर केवढी महत्वाची कामगिरी किती सुलभतेने करुन दाखवितां येते, ज्योतिबुवा महाभागवत, हे एक ढळढळीत उदाहरण होय. असो. नागपूर येथील देवालयांत एका पूजकाची योजना करुन बुवा पुढे उज्जनीस गेले. तेथे महाकालेश्वराच्या मंदिरासमोर त्यांचा मुक्काम होता. भजनपूजन, कथाकीर्तन, ब्राह्मणभोजन वगैरे प्रकार चालू होते.
एके दिवशी, उज्जनींतील एका जैन गृहस्थाच्या पत्नीस, ज्योतिबुवांचे कीर्तन ऐकण्याची इच्छा उत्पन्न झाली, म्हणून तिने आपल्या पतीपाशी कीर्तनास जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा तो रागावून बोलला की " जैनधर्मीय लोकांनी हिंदू लोकांच्या कीर्तनास जाऊं नये :-
तेथे लोक येती खोटेनाटे । आपण जाऊं नये तसल्या वाटे ।
ऐसे किती येती बावा फ़टे । लोकां भुली घालिति ॥
माझे आज्ञेवीण जासी जरी । न घे तुला घराभीतरी ।
भ्रष्ट करीन संसारी । मग जावे त्यासमागमे ॥
पतीने इतका निषेध केला असतांही, तिचे मन परावृत्त झाले नाही. तिने नाना प्रकारी आपल्या पतीची विनवणी केली, परंतु त्याने कठोर शब्द बोलून लाथेने तिचें ताडन केले. पुढे एके दिवशी चार दिवसांच्या मुदतींने तो जैन व्यापारासाठी दुसर्‍या गांवी गेला. जातांना, घरातून बाहेर न पडण्याची आपल्या बायकोस त्याने सक्त ताकीद दिली होती. परंतु तिकडे लक्ष्य न देतां ती स्त्री ज्योतिबुवांच्या कीर्तनास गेली. तो इकडे तिचा पति अकस्मात घरी आला घरांत बायको नाही असे पाहतांच -
क्रोधे दांत खातसे कराकरा । बोले व्यापार फ़ळला आम्हा बरा ।
स्त्री गेली दुसरियाचे घरा । आतां वांचावे काय काज ॥
असा विचार करुन व हाती दंड घेऊन पत्नीस शिक्षा करावी या उद्देशाने तो किर्तनस्थली गेला. तेथे जमलेल्या स्त्रियांत त्याची स्त्री बसली होती ती त्याच्या दृष्टीस पडली नाही, परंतु तिने मात्र याला पाहिले. आतां कांही हा आपणास जीवंत ठेवीत नाही, या भीतीने, "गुरुराया, तुह्मीच आता माझे रक्षण करा" अशी ज्योतिबुवांची मनातल्या मनांत तिने प्रार्थना केली. अंतर्दुष्टीने हा प्रकार बुवांस ज्ञात होतांच :-
स्वामी बोलू लागले कीर्तनी । ज्याचा निश्चय जैसा असे मनी ।
तो पुरवीतसे चक्रपाणी । दृढविश्वास असावा ॥
हरि काय करणार नाही । इच्छिले फ़ळ देतो पाही ।
म्हणोनि त्वरित लागा पायी । कल्पद्रुम म्हणवितो ॥
हे बुवांचे भाषण ऐकून जैन मनांत ह्मणतो "याचा देव स्वत: कल्पद्रुम म्हणवितो, तर याची सत्यता आतांच पाहूं. मी दोन बैलांच्या पाठीवरुन कांच आणली आहे, तिची जर याच्या देवाने चांदी केली तर ती गुरुदक्षिणा म्हणून या बुवांस मी अर्पण करीन ." असा संकल्प करुन बुवांच्या नांवाने चडफ़डत तो तेथे उभा असतां, बुवांची रसाळ वाणी ऐकून त्याचा क्रोध हळूहळू शांत होत चालला. कांही वेळानें कीर्तन आटोपल्यावर तो आपल्या घरी गेला व बायकोस कांही न बोलतां स्वस्थ निजला. सकाळी जाऊन कांचेच्या गोण्यांत पाहतो तो तेथे कांच नसून चांदी भरली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले ! तो अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपल्याशींच बोलला -
" रात्रौ बोलिलो मी थट्टे । कांच आणिली गेली कोठे ।
स्वामीप्रतापाचे बळ मोठे । आतां न राहें मी संसारी ॥ "
मग ती सगळी चांदी घेऊन तो ज्योतिबुवांकडे गेला परंतु बुवांनी चांदीचा स्वीकार केला नाही; तेव्हा जैन हात जोडून त्यांस म्हणाला " महाराज , मी आतां घरी जाऊं इच्छित नाही. " इतके बोलून तो आपल्या इष्टमित्रांकडे गेला व त्यांस त्याने सांगितले की, "माझा व्यापार सफ़ल झाला. मी आतां सद्गुरुस शरण गेलो आहे व त्यांना आपले तन मन धन वाहिले आहे." नंतर आपल्या स्त्रीसह तो स्वामिसन्निध येऊन राहिला व त्यांच्या सेवेत काळ घालवू लागला. नित्य नामस्मरण करितां करितां तन्मय होऊन अवस्थात्रयाचा त्याने त्याग केला व गुरुकृपेने योगी होऊन समाधिसुखानुभव घेऊ लागला. त्याच्या कांचेची चांदी झाली होती, ती विकून त्या पैशाने बुवांनी विठ्ठलमंदिर बांधविले. नंतर उज्जनीतील लोकांचा व श्रीमहाकालेश्वराचा निरोप घेऊन बुवा दक्षिण हैदराबादेस गेले. तेथे नगराबाहेर तंबू देऊन बुवा राहिले. नित्य हरिनामाचा गजर होऊं लागला; त्यामुळे मुसलमान लोकांचे कपाळ उठूं लागले. ते येऊन बुवांच्या शिष्यवर्गास धमक्या देऊं लागले. शिष्यांनी ही हकीकत ज्योतिबुवांस कळविली. बुवांनी निजामसाहेबांस पत्र लिहिले कि " भजन करणे हा आमचा स्वधर्म आहे. तरी त्यास आड न येण्याविषय़ी आपण आपल्या प्रजाजनास ताकीद द्यावी." पत्र वाचतांच निजामसाहेबांस आश्चर्य वाटले. इतकी स्पष्ट भाषा उपयोजिणारा हा कोण आहे याची चौकशी करण्यासाठी त्यांनी आपले नोकर पाठविले. त्यांनी बुवांपाशी येऊन सामोपचाराने विचारले की " आपण कोण? कोठून आलात?" शिष्यानी सांगितले की, "हे आह्मा हिंदू लोकांचे काजी आहेत. संचार करीत करीत तुमचे राज्य पाहण्यासाठी हे येथे आले आहेत. भजनपूजन करणे हा आमचा स्वधर्म आहे व त्याला जर कोणी प्रतिबंध केला तर आह्मी त्यास शिक्षा करुं. हे गुरुजी पुण्याचे रहिवासी असून, श्रीमंत पेशवेदेखील त्यांजपुढे हात जोडून उभे राहतात आमच्या गुरुजींच्याअ सामर्थ्याची प्रचीति तुह्मास लवकरच येईल." ही हकीकत नोकरांनी निजामसाहेबांस जाऊन सांगितली तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन ह्मणाले " ये तो बात बडी जादा है. "
हैदराबाद येथील माणिकचौकात बुवांचे नित्य कीर्तन होत असे. याप्रमाणे एक महिनाभर त्यांची कीर्तने तेथे चालू होती. एके दिवशी रात्रौ शहरांतल्या कांही मुसलमान काजींनी कीर्तनाचे वेळी बुवांस मुसलमानी धर्मांविषयी कांही प्रश्न विचारले, तेव्हा त्यांची समर्पक उत्तरे देऊन बुवांनी त्यांस गप्प बसविले. दुसरे दिवशी पुन: वादविवाद झाला. त्यांतही काजींस बुवांनी निरुत्तर केले. मग ’ शेषं कोपेन पुरयेत् ’ या न्यायाने काजी म्हणाले "तुमचा देव मारुती हा महार आहे, म्हणूनच त्याचे देऊळ गांवाबाहेर असते.
" कोठे नाही गांवांत वस्ती । वेशीबाहेर राहतो मारुती ।
दूर असती धेडवस्ती । तैसे आम्हा दिसतसे ॥ "
हे ऐकून बुवा क्रोधायमान झाले. ते यवनास म्हणाले " ह्या तुमच्या मोगलाईच्या जागी पूर्वी दंडकारण्य होते. तेथे पहिल्याने श्रीरामचंद्राने मनुष्यांची वसाहत करविली व ग्रामरक्षणार्थ मोकाशी म्हणून, गांवाबाहेर मारुतीची स्थापना केली. तुमची मशीद गांवांत असते आणि निमजगा गांवाबाहेर डोंगरात असतो, त्याचें कारण काय? " हे ऐकून काजीची वाचा बसली, हे सांगावयास नकोच. तितक्यांत हिंदु लोकांनी हरिनामाचा गजर केला त्यामुळे काजी अधिकच चिडले. त्यांनी दुसरे दिवशी रात्रौ बुवांच्या कीर्तनांत हत्ती आणून सोडला. त्यामुळे श्रोतेमंडळी पळून गेली. कांही शिष्यही पळून गेले. परंतु तिघा शिष्यानी स्वामीभोवती कडें करुन, तेथून न हालण्याचा निश्चय केला. इतक्यांत हत्ती त्यांच्या अंगावर चालून आला. तेव्हा बुवांनी त्यास म्हटले " उभा रहा; पुढे येऊं नकोस. " बुवांच्या शब्दास मान देऊन हत्ती जागच्याजागी तटस्थ उभा राहिला. बुवांनी गजेंद्रमोक्ष पठन करुन हत्तीस उपदेश केला. तो ऐकून हत्ती शांत झाला आणि त्याने बुवांच्या चरणकमली मस्तक टेकून तेथेच देह विसर्जन केला. बुवाने जादू करुन हत्ती मारला अशी बातमी नबाबांच्या कानी गेली तेव्हां त्यांनी स्वत: येऊन बुवांस विचारले की " ही गोष्ट कशी घडली ? " तेव्हां
" गुरु बोलती तयासी । नाही जादू आम्हापाशी ।
मुक्त जाला पायापाशी । पशुयोनी टाकिली तेणे ॥
तरी आतां याच्या समाधीचे काम सुरु करा. " यावर नबाबानीं सांगितले " पुन: एक वेळ या हत्तीस तुम्ही जिवंत करा; व त्याजकडून मौजरा करवा. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करुं " बुवांनी लागलीच हत्तीच्या अंगावरुन हात फ़िरविला, तोच हत्ती जीवंत होऊन त्याने आसपासच्या एकदोन घरांची नासाडी टाकली ! परंतु बुवांनी " हां हां " असे म्हणतांच हत्ती ताबडतोब शांत झाला व बुवांपुढे डोके नमवून सर्वांस मुजरा करुन त्याने पुन:देह ठेविला. नबाबासुध्दां सर्व मुसलमानाची बुवांच्या अलौकिकपणाबद्दल खात्री होऊन चुकली. बुवांचा गौरव करुन यवन निघून गेले. बुवांजवळ पांचशे शिष्य होते, परंतु या प्रसंगी त्यांतले फ़क्त तीन असामीच काय ते कसोटीस उतरले, बाकी सगळे भोजनभाऊ निघाले. ढोंगी गुरुशिष्यांसंबंधाने चरित्रकार  म्हणतो :--
सांप्रत गुरुशिष्य जाले फ़ार । न करिती परलोकाचा विचार ।
मनीं मानिला हा एक व्यापार । मार्ग चुकोनि जाताती ॥
शिष्य इच्छितो गुरुघरची पोळी । आग्रहें वाढावी वेळोवेळी ।
उपेक्षा केलिया तळ्मळी । तुच्छ मानी गुरुतें ॥
गुरुही मनी विचार करिती । नित्य शिष्य येती जाती ।
भोजना जागा न पुरती । लाभ नाही कवडीचा ॥
यासी परमार्थ कैसाजे । व्यर्थ दाविती गुरुशिष्यांचे ओझे ।
उभयतां स्वहित न समजे । बुडोनि जाती संसारी ॥
असो. पुढे संचार करीत करीत बुवा पुण्यास आले. श्रीमंत समारंभाने त्यांस सामोरे गेले होते. दर्शनार्थ नागरिक स्त्रीपुरुषांचा तोबा उडाला होता. मिरवणूक विठ्ठ्लमंदिरानजीक गेल्यावर सभामंडपांत बुवा बसले. श्रीमंतही त्यांच्या शेजारी बसले. तेव्हा बुवांनी हळूच श्रीमंतांस सांगितले की " आम्ही आतां लवकरच कृष्णातटी जाणार आहो." श्रीमंत म्हणाले, "येथे आपणास काय कमी आहे ? आपला काय मनोरथ असेल तो कळवावा." बुवांनी सांगितले " जेष्ठ पुत्राचे कुटुंब वारले. त्याचा व्दितीय विवाह करावयाचा आहे. आमचे सगळे आप्त कृष्णातीरी आहेत, तेव्हा तिकडेच जाण्याचा आमचा विचार आहे. " तेव्हा श्रीमंत म्हणाले " मुलाचे लग्न येथेंच करावे. आम्ही आपल्या सगळ्या आप्तांस इकडे आणण्याची तजवीज करितो. " परंतु बुबांनी ही गोष्ट मान्य केली नाही. ते म्हणाले " कृष्णातीरी जाण्याचे दुसरे एक कारण आहे. हा देह आतां जीर्ण झाला आहे, त्याचें विसर्जन कृष्णातीरी व्हावयाचें आहे. " हे ऐकून सर्व मंडळीस फ़ार वाईट वाटले.
पुण्यास असतांना, एके दिवशी एक स्त्री बुवांपशी येऊन ह्मणाली " महाराज, मी सहस्त्रभोजनाचा संकल्प केला आहे, परंतु मी इतकी दारिद्री आहे की, चरितार्थासाठी मला भिक मागावी लागते. तर हा माझा संकल्प आतां कसा सिध्दीस जाणार? "  बाईचे निष्कपटी भाषण ऐकून बुवांनी तिला सांगितले, " तुम्ही उद्या कोरान्न भिक्षा मागून आणा आणि त्याची पक्वान्ने करुन आह्मांस आपल्या घरी भोजन द्या. मग सहस्त्रभोजनाचा तुमचा संकल्प पूर्ण होण्याची युक्ति मी तुह्मास सांगेन. " बुवांस वंदन करुन ती बाई आपल्या घरी गेली. दुसरे दिवशी तिने कोरान्न भिक्षा मागून आपली व सडासंमार्जन करुन शुचिर्भूतपणाने सुंदर पाकनिष्पत्ति केली. इकडे बुवांनी आपल्या मंडळीस सांगितले की " आज आह्मास भोजनाचें निमंत्रण आहे. आह्मी तिकडे एकटेच जाणार. " इतके सांगून बुवा पालखीत बसून निघाले, तेव्हा त्यांचा कनिष्ठ पुत्र लक्ष्मण याने, आपणास बरोबर नेण्याची बुवांस विनंती केली. तेव्हा त्यालाही बरोबर घेऊन बुवा त्या विधवा स्त्रीच्या घरी गेले. जेवणाची तयारी झाली होती, पण नेसावयास सोंवळें नव्हतें. बाईने एक जीर्ण धाबळी दिली, ती नेसून बुवा पाटावर बसले; व त्या विधवेच्या हातून त्यांनी उदक सोडविले :-
अनेन सद्गुरुभोजनेन । सिध्दि होवो सहस्त्र ब्राह्मण ।
उदक टाकिलें करांतुन । मग घेतल्या प्राणाहुति ॥
जेवण झाल्यावर बुवांनी सांगितले की, आमचे खरकटे ताट आधी उचला व मग घरांतील शेषान्न तुह्मी ग्रहण करा. " याप्रमाणे बाईने बुवांची पत्रावळ उचलून बाहेर नेऊन टाकली व शेण घेऊन घरांत आली. तो त्याच जागीं दुसरी पत्रावळ तिच्या दृष्टीस पडली ! - " आश्चर्य वाटते मानसीं । दुजे काढिले उच्छिष्टासी ।
निक्षेप केला बाह्य देशी । पुन: वाहतां तैशीच तिसरी ॥
तिसरी काढिली चवथी असे । तीही काढितां पांचवी दिसे ।
एक एक पात्र काढीतसे । गणती जाली सहस्त्राची ॥
हां हां म्हणतां सर्व शहरभर या चमत्काराची प्रसिध्दि झाली. श्रीमंत पेशव्यांस हे वर्तमान कळतांच तेही बुवांच्या दर्शनास आले; व त्यांनी नम्रपणे बुवांस विचारले की " एका वाढितां भोजनासी । सहस्त्र कैसे तृप्त झाले ? "
स्वयंज्योति बोलिले हांसून । द्रौपदीने दिधले भाजीपान ।
जाले त्रैलोक्य समाधान । तैसे रीती सहस्त्र जेविले ।
एक्या भाजीपाने विश्व जेविलें । सहस्त्रांस अन्न एक जेवितां कां न पोचले ।
तिच्या भावासारिखे घडले । जाली समाधान विप्रवनिता ॥
सभाविसर्जनसमयी नाना फ़डणिसांनी बुवांसस विनोदाने प्रश्न विचारला, " महाराज, आपण आजवर जे काय संपादन केले , ते कोठे ठेवलें आहे ?" हे कोणी कोणास सांगत नाही. आमचें द्रव्य आह्मी अमूक ठिकाणी ठेवले आहे असे जर आह्मी तुह्मास सांगितले, तर तुह्मी पडलां अधिकारी पुरुष. अधिकाराच्या जोरावर तुह्मी जर त्या द्रव्याचा अपहार केला तर माझ्या मुलांचे पुढे कसे होईल ? परंतु जे द्रव्य राजपुरुषांस हरण करितां येईल असे द्रव्य आह्मी मिळविलेंच नाही. आमचें द्रव्य ह्मणजे-
एकनिष्ठ भजन करिती । हाता येतील चारी मुक्ति ।
भिक्षे करुनी उदरपूर्ती । वश करितील श्रीहरीतें ॥
भय नाहीं यासी कदा । ही तंव वैष्णवांची अद्भुत संपदा ।
अखंड कृष्णकथेचा धंदा । भक्ता उणे मग कोणते ? ॥
बुवांच्या गुप्तधनाची ही माहिती ऐकून सर्व सभाजानांनी माना डोलविल्या. दुसरे दिवशी बुवा कृष्णातटी जाण्यास निघाले. श्रीमंतांसह हजारों स्त्रीपुरुष पुण्याबाहेर दोन कोस त्यांना पोचविण्यास गेले होते. नंतर त्यांना निरोप घेतांना बुवांनी त्यास सांगितले की,
" आम्ही जातो स्वदेशा । सोडावी आतां आमुची आशा ।
सर्वानी वर्णावें श्रीकृष्णयशा । सुख पावाल अक्षयी ॥
बुवांचा हा शेवटचा निरोप ऐकून सर्व पुणेकरांस मोठें दु:ख झाले. आतां यापु्ढे कांही बुवांचे दर्शन पुन: आपणास होत नाही असे त्यांस वाटलें. असा थोर पुरुष आपणास आतां कायमचा अंतरला असे उद्गार काढीत श्रीमंतांसुध्दा सर्व लोक मोठ्या दु:खाने मागे परतले :-
चालतां वर्णिताती गुण । मनुष्य नोहे अवतार पूर्ण ।
विश्वोध्दाराकारण । शंकर आला भूमंडला ॥
कर्तु अकर्तु शक्ति अंगी । प्रसिध्द करुनी दाविली जगी ।
ऐसे बळ मनुष्या अंगी । ईशावांचोनि घडे केवी ॥
हत्ती केसा उध्दरिला । साडेसातशे ते विठ्ठलमूर्तिला ।
केंवि केले स्थापनेला । मानव कैसे म्हणावे तया ॥
एकटे जेवोनि झाले सहस्त्राभोजन । हे का घड मनुष्याहातून ।
कृष्णास्वरुप भासले आपण । गोपाळ काल्या माझारी ॥
ऐशा बहुत ऐकिल्या गोष्टी । किती देखिल्या आम्ही दृष्टी ।
तारावया चराचर सृष्टी । अवतार सत्य श्रीहरीचा ॥
तीन दिवसांत लिहिली कैसी दप्तरे । मृत्युलोकी नाही तैसी अक्षरे ।
प्रत्यक्ष ईश्वराने लिहिले खरें । सामर्थ्य नाही जीवांना ॥
चार यामांत श्रीभागवतसंहिता । कोण असे भूमंडळी वाचिता ।
जन्म घेतला प्रत्यक्ष शुकताता । संशय यांत नाही कांही ॥
असो. याप्रमाणे पुणेकरांचा निरोप घेऊन बुवा निघाले ते जेजुरीस आले. तेथें त्यांस मल्लारी मार्तंडाने दर्शन दिले. पुढें नीराकांठाने स्वारी चिंचणेरकडे निघाली. चिंचणेरला जाण्यापूर्वी तेथील लोकांस जासुदाबरोबर पत्र पाठवून  " आमच्याबरोबर हजारों माणसे आहेत, त्यांच्यासह आम्ही अमुक दिवशी येतो " असे बुवांनी कळविले. बुवांचे व्याही चिंचणेरास होते त्यांनी गांवाबाहेर डेरे देऊन मंडळीच्या उतरण्याची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे बुवांच्या पुत्राचे लग्न मोठ्या थाटाने झाले. समारंभ आटोपल्यावर " आतां आम्ही आमच्या गांवी जातो " असे बुवांनी सर्वास सांगितले. ते ऐकून , हे जाणार तरी कोठे, या विचारांत लोक आहेत, तोच बुवांनी समाधि लावून तात्काळ देह ठेविला. शके सतराशे दहा, कीलक नाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, या दिवशी बुवांचे निर्याण झाले. इकडे बुवांनी देह ठेवला त्याच वेळी तिकडे पंढरपुरास पांडुरंगाच्या देवालयाचे दरवाजे आपोआप बंद झाले. देवाचे दर्शन होईना म्हणून हजारों लोक महाव्दारापुढे जमून, पुढे काय करावे याचा विचार करु लागले. इतक्यांत, वैकुंठस्वामी नामक सत्पुरुष तेथे होते त्यांस  साक्षात्कार होऊन त्यांनी सांगितले की " पांडुरंग येथे नाही. येथून तीस कोसांवर, स्वयंज्योतिबुवांनी देह ठेवला, म्हणून देव तिकडे गेला आहे. तुम्ही जाऊन देवास घेऊन या, मग दरवाजे उघडतील. " हे ऐकून बडवे  ताबडतोब चिंचणेरास जाण्यास निघाले. स्मशानांत
बुवांची रक्षा भरली जात असतां तेथे येऊन बडव्यांनी लोकांस सांगितले की " आम्ही उपाशी आहो. तरी आमचा देव आमच्या स्वाधीन करा. नाहीतर आम्ही प्राणत्याग करुं " मंडळी बुवांची रक्षा भरीत होती, तीत त्यांस एकहि अस्थि आढळला नाही ! त्या मंडळीत कोणी विठ्ठलभट होता, तो बडव्यांचे भाषण ऐकतांच गुप्त झाला. तो चमत्कार पाहून सर्व मंडळीस वाटले की श्रीविठ्ठलच विठ्ठलभटाच्या रुपाने येथे आला असावा. विठ्ठलभट गुप्त होतांच, देव पंढरीस गेला असे समजून बडवेही पंढरीस जाण्यास निघाले. साक्षात पांडुरंग येथे आला असतां, त्यास आपण ओळखिले नाही, या विचाराने ज्योतिबुवांचे जेष्ठ पुत्र रामचंद्रबुवा यांस फ़ार वाईट वाटले व उपरति झाली :-
तेणे वैराग्य संपादिले । विषयी असोनी विषयातीत राहिले ।
वेदव्यासचरणी लक्ष ठेविलें । भागवतचर्चा सर्व काळ ॥
वाळुवंटी बांधिली समाधी । कृष्णावेणीउदक्सन्निधी ।
जे जन तेथे भजती त्रिशुध्दि । आधिव्याधि तयां बाधेना ॥
नदीतटाकी लक्ष्मीनारायणाचे देऊळ बांधून रामचंद्र बुवांनी तेथे आजन्म वास्तव्य केले. त्यांचे पुत्र पांडुरंग हेही मोठे हरिभक्त होते. ज्योतिबुवांचे कनिष्ठ चिरंजीव लक्ष्मण यानी पुत्रकलत्रत्याग करुन ब्रह्मावर्ती गंगातीरी वास्तव्य केले. पंचाऐशी वर्षांचे वय झाल्यावर, आपला अंतकाल समीप आला आहे हे जाणून, कृष्णातीरी देहविसर्जन करावे या उद्देशाने लक्ष्मणबुवा दक्षिणेत चिंचणेर मुक्कामी ज्योतिबुवांच्या समाधीस्थली आले. अंतसमय प्राप्त होतांच, जवळच्या मंडळीस परमार्थोपदेश करुन, हरिनामाची गर्जना करीत, बुवांनी देह ठेविला. लक्ष्मणबुवांचे पुत्र नारायण हे अल्पवयी मृत्यु पावले. ते भजनकीर्तनादिकांत आपला काल घालवीत असत. त्यांस रघुनाथ  आणि गोविंद असे दोन पुत्र होते. ह्ल्ली ज्योतिबुवांची पाचवी पिढी सुरु आहे; चरित्रकार म्हणतो :-
स्वयंज्योतीचा वंश ऐसा । कोणी न करिती शास्त्रअभ्यासा ।
निरंतर भजती वेदव्यासा । होतसे ज्ञान तया ग्रंथाचे ॥
अभ्यासाविना बोलती ज्ञान । मोहित होती सकल जन ।
ही सद्‍गुरुकृपा वरदान । दिधला ग्रंथ ते वेळी ।
पूर्वापर जो महापुरुष असे । निरंतर वंशा रक्षितसे ।
तो आज्ञापील जैसे । वर्तताती सन्मार्गी ॥
ज्या ओवीबध्द चरित्राच्या आधाराने प्रस्तुत लेख लिहिला आहे, त्या चरित्राचे कर्ते सखाराम हे, उपरिनिर्दिष्ट रघुनाथबुवांचे शिष्य होत. ज्योतिपंत हे अथर्व वेदी देशस्थ ब्राह्मण; या ब्राह्मणांची कांही घरे सातारा जिल्ह्यांत व नगर जिल्ह्यात आहेत; ती सुमारे २५० होतील. सांप्रत हे लोक आपली नित्यकर्मे ऋग्वेदमंत्रांनी करतात. ज्योतिबुवांचे समकालीन संतकवि म्हटले म्हणजे, मोरोपंत, रामजोशी, तुका विप्र हे होत. यांपैकी तुका विप्रांचा व बुवांचा विशेष स्नेह असून, बुवांच्या निर्याणकाली तुका विप्र त्यांच्या सन्निध होते, असे विप्रांच्या पुढील अभंगावरुन वाटते :-
लग्नाचे तांतडी ज्योतिपंत आला । ठाव मागितला कृष्णेपाशी ॥१॥
कीलक वत्सर मार्गशिर्ष मासी । कृष्णत्रयोदशी गुरुवारी ॥२॥
वैष्णव गर्जती वाजविती टाळ । तवं प्रदोष काळ प्राप्त जाला ॥३६॥
ज्योतिमाजी ज्योती मिळाला देखोन । करीत गायन तुकाविप्र ॥४॥
असो. येथे ज्योतिपंत महाभागवतांचे चरित्र संपले. अलौकिक चमत्कारांनी भरलेले हे चरित्र अर्वाचीन चिकित्सकांस कसें काय पसंत पडेल हा एक मोठा प्रश्नच आहे, परंतु लेखकाचा त्याला कांही उपाय नाही. संतांच्या अंगी ही अलौकिक शक्ती कशाने येते हे स्वत: संत झाल्याशिवाय, समजणे कठीण आहे. ज्योतिबुवांची महाराष्ट्रीयांवर केवढी छाप होती हे,  त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी बांधलेल्या शेकडो विठ्ठलमंदिरांवरुन, स्पष्ट दिसत आहे. लक्षावधि रुपये मिळवून त्यांचा व्यय अशा सत्कर्माकडे बुवांनी केला व लक्षावधि लोकांस उपासनामार्ग सुलभ करुन दिला ही एकच गोष्ट त्यांची निरपेक्षता सिध्द करण्यास पुरेशी नाही काय ? पुणे येथे लकडीपुलाजवळ जे विठ्ठलमंदिर आहे, त्यांत हल्ली श्रीशिवाजी उत्सव साजरा करण्यांत येतो. बुवांनी आपल्या भागवत संप्रदायाचे पुढील अभंगांत वर्णन केले आहे :-
वेदव्यास आमुचे गुरु । जे कां भवाब्धीचे तारुं ॥१॥
जाणा शुध्द भागवत । आमुचा संप्रदाय होत ॥२॥
सवरुपी नारायण । हेचि मनापाई ध्यान ॥४॥
हरिस्मृतीचे आसन । तदाकार मुद्रा पूर्ण ॥५॥
एकादशी व्रत । पांडूरंग कुळदैवत ॥६॥
आत्मा  अभेद पाहणें । भूतदया आचरणें ॥७॥
व्दादश तिलक । कंठी तुलसीमाला देख ॥८॥
श्रीमद्भागवत कानी । मनी वाणी सदा ध्यानी ॥९॥
नवविध भजन । मुखी नारायण कीर्तन ॥१०॥
कलियुगी ज्योती म्हणे । याचि मार्गी सर्वा येणे ॥११॥
यासंबंधाने, रा. पांडुरंग महादेव बाक्रे यांनी एके ठिकाणी लिहिले आहे " रामदासानी स्थापन केलेल्या रामदासी संप्रदायांत व ह्या भागवत संप्रदायांत अर्थातच फ़ार अंतर आहे व त्याचें कारणही उघडच आहे. रामदासांच्या वेळी परराज्याचा वरवंटा सर्वांच्या डोक्यावरुन फ़िरत होता. ज्योतिपंतांच्या वेळी महाराष्ट्र भाग्यशाली सवाई माधवरावांच्या छत्राखाली शीतल छायेंतील सुखाचा उपभोग घेत होते. राजकीय परिस्थितींत हा असा भेद् असल्यामुळे दासांच्या संप्रदायांत राजकारणाचा अंतर्भाव झाला व ज्योतिपंतांचा संप्रदाय निवळ भक्तिप्रधान असाच राहिला. ह्या भेदामुळेंच रामदासी संप्रदायाकडून अंत्यंत महत्वाचे असे जे कार्य घडून आले- म्हणजे महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त झाले- तशा प्रकारचें कार्य भागवत संप्रदायाने घडून येणे शक्यच नव्हतें. तरी त्यामुळे त्याची योग्यता कांही कमी होत नाही. " आत्मा अभेद पाहणे । भूतदया आचरणे " हे ज्या संप्रदायाचे मूलतत्व त्याचा हातून कांही महत्वाची कामगिरी घडली नाही, असे म्हणतां यावयाचे नाही. " रा. बाक्रे यांचे हे विवेचन पुष्कळ अंशी यथार्थ आहे. शिवाय, महाराष्ट्राची गुलामगिरीतून सुटका करण्यांचे बरेच श्रेय रामदासी संप्रदायास देण्यास इतिहासाचा आधार फ़ार थोडा आहे, हे लक्ष्यांत ठेवलें पाहिजे. यवनाच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राची सुटका करण्याचा विचार शिवाजी महाराजांच्या मनांत त्यांच्या बालपणापासूनच घोळू लागला होता व ती प्रेरणा आरंभी त्यांना रामदासांकडून झाली असे ह्मणणे ह्मणजे ऐतिहासिक कालक्रमाचा विपर्यास करणे होय. शिवाजी महाराजांनी स्वयंप्रेरणेने सुरु केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यास रामदास संप्रदायाकडून नैतिक व धार्मिक पाठबळ मिळाले नसेल असे माझें ह्मणणे नाहीं, परंतु " महाराष्ट्राची गुलामगिरीतून सुटका " करण्याचे श्रेय रामदासी संप्रदायास देणे ह्मणजे
शिवाजी महाराजांच्या कामगिरीचे महत्व कमी करणे होय, ही गोष्ट डोळ्याआड करण्यांत ऐतिहासिक सत्यप्रियतेचा जो उघड उघड अभाव दिसतो, तो दिसू नये इतकेच माझें ह्मणने आहे. असो.
ज्योतिबुवांनी समग्र श्रीमद्भागवतावर एक ओवीबध्द व एक अभंगबध्द अशा सोन विस्तृत टीका लिहिल्या आहेत, परंतु त्यांतला एकही ग्रंथ आज सामान्यकरुन उपलब्ध नाही, ही खेदाची गोष्ट होय. श्रीमद्भागवतावर मोरोपंतांशिवाय अन्य मराठी कवीचा समग्र ग्रंथ आज उपलब्ध नाही. मुक्तेश्वरानी श्रीमद्भागवतावर एक मोठा ओवीबध्द ग्रंथ लिहिला असल्याचा उल्लेख कांही ठिकाणी आढळतो, पण तो ग्रंथ अद्याप कोठे सांपडत नाही व यापुढे सांपडेल अशी फ़ारशी आशाही नाही. अशा स्थितींत ज्योतीबुवांचे भागवत त्यांच्या सांप्रदायिक लोकांनी किंवा ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करण्यासाठी गांवोगांव फ़िरणार्‍या रा. राजवाडयांसारख्या गृहस्थांनी शोधून काढण्याचा प्रयत्न अवश्य करावा अशी त्यांस माझी सविनय विनंती आहे. ज्योतिबुवांची भागवतावरील टीका         ’ खंडोपंत ’ नामक गृहस्थानी लिहून काढल्याचा उल्लेख पूर्वी आला आहे. ज्योतिपंतांस श्रीव्यासांनी काशी येथे जी भागवताची पोथी दिली ती हल्ली चिंचणेर येथे त्यांच्या वंशजांपाशी आहे असे समजते. वरील दोन ग्रंथांच्या शिवाय, ज्योतिबुवांची भागवतावर एक गद्यरुप मराठी टीका आहे, असे इतिहाससंग्रह मासिकाच्या दुसर्‍या वर्षाच्या ६ व्या अंकात लिहिले आहे. ’प्रवृत्तिनिवृत्तिऐक्यता रत्नावलि ’ या नांवाचा यांचा आणखी एक गद्यग्रंथ असल्याचा उल्लेख त्याच मासिकांत आढळतो. ज्योतिपंतांच्या ओवीवध्द भागवताचा कांही भाग, पुणे येथे मोडक्या बाजारांत रद्दी विकणार्‍या एका बोहर्‍यापाशी मला मिळाला, त्यांत भागवताचा एक संपूर्ण अध्याय असून त्याच्या ओव्या १४५६ आहेत. मूळांतील ५० संस्कृत श्लोकांवर ज्योतिबुवांनी १४५६ ओव्या लिहिल्या आहेत, यावरुन समग्र भागवतांतील १८००० श्लोकांवरील त्यांचा टीकाग्रंथ फ़ारच मोठा असला पाहिजे हे उघड दिसते. या अध्यायाच्या शेवटी पुढील ओव्या आहेत :-
भागवंत भक्त भागवत । भक्तिही चतुर्विध दुर्लभ बहूत ।
त्यांस करी प्रणिपात । श्रवणे सर्व मंगळ जोडे जे ॥
गुरुत्वें कीर्तनाधिकार ब्राह्मणाचा । इतर वर्णा स्त्रियांदिकां श्रवणीं साचा ।
हा नेम असे भगवदाज्ञेचा । हरिदास सुज्ञी तो पाळावा ॥
केवळ हरिपदीं जे रंगले । सर्वथा देहाभिमान जिहीं सांडिले ।
ते ब्रम्हादिकां पूज्य जाले । त्यांसी स्त्रीशूद्रादि नीच कोण म्हणे तो ॥
एवं हरिगुणकीर्तनाधिकार । कलियुगी सर्वा येकपर ।
गंगाजीवन जेवी न विटाळे निर्धार । भागवत धर्मी नरमात्र तेवी अधिकारी ॥
जयजया अच्युता अनंता । जयजय श्रीनारायण कृष्णनाथा ।
जयजया हरिवासुदेवा अनंता । तुज नमस्कारी सर्वापराध सहावे ते ।
शुध्द शब्द पदवाक्यार्था नेणे । तुवां ते पूर्ण करावे असे जे उणे ।
सर्व जीवकल्याण करणे हे विनवणे । मी दासानुदास नमने करी अनंत ॥
स्वयंज्योतिवाणी हे सुवर्णी । सज्जना भूषवी सर्वांगा जाऊनि कर्णी ॥
विश्वव्यापक साम्राज्य घणी । करील हे प्रतिज्ञा व्यासगुरुकृपेची ॥
शके १७०९ प्लवंग संवत्सरी । दक्षिणायन शरदृतु कार्तिकांतरी ॥
यापुढील ओव्या गहाळ झाल्या आहेत. बुवांची वाणी फ़ार प्रौढ, परमार्थिक अधिकार मोठा, व विव्दताही दांडगी दिसते. वालपणी ज्याचे फ़ारसे अध्ययन झाले नाही, त्याने भागवतासारख्या अध्यात्मप्रचुर ग्रथावर एवढी विस्तृत टीका लिहावी, हा तरी एक चमत्कारच नव्हे काय ? आतां बुवांच्या कवितेतले कांही उतारे देऊन हा चरित्रलेख पुरा करुं.
परीक्षुदुवाच । ब्रह्मन् ब्रम्हण्य निर्द्देश्ये निर्गुणे गुणवृत्तय: ।
कथंचरंति श्रुतय: साक्षात्सदसत: परे ॥
ब्रम्हन् । ब्रम्हवित् ब्रम्हा भिन्न । म्हणून शुका तूं ब्रम्ह पूर्ण ।
व्दैताव्दैत वेदार्थ गहन । ज्याचात्यास विदित तो ॥१२॥
शब्द नि:शब्द गात । याचा जाणसी तूं सिध्दांत ।
तुजसि पुसणे हे उचित । परम गुह्य सर्वा जे ॥१३॥
जीव पांथिकाचा मार्ग । वेदचि नानाविध सांग ।
तत्त्दाज्ञापाळण सत्व्ग । ब्रम्हलोका पाठवी ॥१४॥
विधी निषेध मिश्रपणे । रज मार्ग धरितां जाणे ।
मृत्युलोकी जीवा फ़िरणे । नराकृति धरुनिया ॥१५॥
अकर्म विकर्म तमपथ । धरितां जीवां अध:पात ।
नरक तमयोनी समस्त । फ़िरणे एवं गुणयोगे ॥१६॥
हा एक कर्ममार्ग वेदांचा । दुसरा उपासनारुप साचा ।
सेव्यसेवक भेदाचा । प्रत्यक्ष लोकप्राप्ति त्या ॥१७॥
आतां उपनिषद् ज्ञानपथ । कर्मा अंत:करणशुध्दि दावित ।
उपासनसाह्ये ज्ञान दृढावत । ईश्वरप्रसादेकरोनी ॥१८॥
मग ज्ञानें दृश्य भेद बाधित । जीव अव्दय ब्रह्म होत ।
ऐसी एकवाक्यता भासत । अव्दैत पथ वेदाचा ॥१९॥
जीव ब्रम्ह होत । त्याचे स्वरुप न बोलवत ।
कांही नुरे शून्य राहत । विषय नव्हे शब्दासी ॥२०॥
कां शब्दा विषय न होत । तेही मी हे बोलत ।
त्रिविधा शब्द प्रवृत्ति नसत । निर्धर्मिक ब्रम्हीं यापरी ॥२१॥
ब्रम्हणि शब्द ब्रम्हणि त्रिप्रकारक । त्यांतुनी ब्रह्मी न संभवे एक ।
त्याच्या निरासार्थ सम्यक । विशेषणत्रय देताती ॥२२॥
प्रथम मुख्या नामें प्रवृत्ति । दुसरी लक्षणा बोलति ।
तिसरी गौणी निश्चिती । शब्दज्ञ जाणती या सर्वा ॥२३॥
मुख्या ही व्दिप्रकारका । रुढी आणि यौगिका ।
त्यांत रुढी त्रिप्रकारका । स्वरुपज्योति गुणेंही ॥२४॥
निर्देश्य योग्य वस्तुमात्री । संज्ञा संज्ञी संकेतसूत्री ।
रुढी प्रवर्तते पवित्री । उदाहरण जाणावे ॥२५॥
लेखकाच्या अशुध्द लेखनसरणीमुळे मूळ ओव्यांतील कांही शब्दांचे स्वरुप इतके पालटून गेलेले दिसते की त्यामुळे अर्थबोध होण्यास मोठी अडचण पडते. तरी पण ज्योतिपंतांच्या भागवतांतल्या आणखी कांही ओव्या वाचल्याशिवाय त्या ग्रंथांच्या स्वरुपाची यथार्थ कल्पना वाचकांस बरोबर होणार नाही. म्हणून, दुसर्‍या एका श्लोकावरील साग्र टीका येथे उतरुन घेतो :-
श्लोक । तस्मैह्मवोचद्भ्गवान् ऋषीणां शृण्वतामिदं ।
ऋषीणां शृण्वतां । भगवान् । तस्मै । इदं । हि । अवोचत ॥
ते कलापग्रामवासी ऋषी । श्रवण करित असतां शुध्द मानसी ।
नारायण ऐश्वर्यराशी । त्या नारदाकारणेच हे बोलता जाला ॥
पूर्बेषां । जनलोकवासिनां । य: । ब्रह्मवाद : ॥
हे ते कोणते दावित । अनादि शिष्टाचार प्रमाणभूत ।
इतिहास परमामृत । आरंभिती हा ऐसा ॥
त्रिलोक मस्तक । भृग्वादि ऋषींचा महर्लोक ।
त्याहीवरी निष्कलंक । जनलोक नामें जो ॥
त्या जनलोकाच स्वामी । ब्रह्मपुत्र ब्रह्मचारी नेमी ।
सर्वा पूर्व सनंदनादि नामी । त्याचा जो वेदवाद परस्परें ॥
श्रीभगवानुवाच । श्लोक । स्वायंभुव ब्रह्मसत्रं जनलोके भवत्पुरा ।
तत्रस्थानां मानवानां मुनीनामूधरेतसां ॥
स्वयंभूव । हे मज्जनकबंधो । ब्रह्मपुत्रा कृपासिंधो ।
परम भागवता  साधो । सर्वज्ञशिरोमणी उदारा ॥
किंवा स्वशब्दें आत्मा नारायण । स्वये होय जाणे आपण ।
म्हणोनी हे स्वयंभुनंदन । मत्पुत्र पुत्रार्था द्योतवी ॥
अथवा ब्रम्हयाचे धन । शब्दब्रह्म होय पूर्ण ।
त्याचा तूं विभागी सनकादिका जाण । पांक्तिक योग्य त्या लाभा ।
जनलोके । ब्रह्मसत्रं । पुरा । अभवत् ॥
सत्य तप लोकातळी । उक्त जो महर्लोकाचे मौळी ।
त्या जनलोक निर्मळी । ब्रम्हसत्र पूर्वी होते जाले ते ॥
सर्व यजमान समान । तेचि ऋत्विजरुपेकरुन ।
जेथे कर्म करिती प्रमाण । कर्मसत्र प्रसिध्द जैसे ते ॥
तैसेचि हे ब्रम्हसत्र । श्रोतेवक्ते समान जेथे पवित्र ।
करीत बैसती ब्रम्हविचारमंत्र । ते ब्रम्हसत्र संज्ञे जाणावे ॥
तत्रस्थानां । मानसानां । मुनीनां । ऊर्ध्वरेतसां
ते सत्र म्हणसी कोणाचे । तरी ऐक मम वाचे ।
त्या लोकनिवासी सनकादिकांचे । स्वानंदजनक रम्य जे ॥
जे तुझे श्रेष्ठ भ्राते । सर्व विदित असे तूते ।
ब्रह्मदेवे कल्पिले जे ते । पुत्र ब्रम्हविचार कराया ॥
नव्हेत जे योनिसंभव । त्यांस कैचा जडदेहभाव ।
आत्ममननशील वैभव । साजे की त्या मुनिवरां ॥
स्त्रीपुरुषभेदा नेणती । तयां कोठूनी कामोत्पत्ति ।
कौमार बालवद्दशा अनुष्ठिती । रेतपातरहित वृत्ती जे ॥
या लोकी स्त्रीव्यक्ति । नसे यथार्थ कीं नृपती ।
अखंड ब्रह्मचर्य संपत्ति । ब्रह्मविचार ब्राह्मिष्ठां ॥
त्या तव बंधूंचे सत्र होत । मी तेथील मज कां न विदित ।
परि तुज न कळावयाचा वृतांत । ऐके सकारण मम मुखे ॥
कलियुगांत हरिनामस्मरणासारखा दुसरा भवतरणोपाय नाही, हे सांगतांना ज्योतिपंत म्हणतात -
ह्मणोनी तयां भाविकी सेविजे । तन्मुखे श्रवणादि साधनी शीघ्र  तरोनि जाइजे ।
कलियुगीं मायातारणा अन्य उपाय न जाणिजे । श्रुतिसिध्दांत हरिकीर्तीवांचुनी ॥
अमोल्य आयुष्य व्यर्थ जाऊ देऊं नका । नर हो या श्रवणकीर्तने भजा यदुनायका ।
विषयी जना विषयसुखसाधन मार्ग निका । निरतिशय अत्यंत सुखलाभ हा ॥
मुमुक्षूचे मोक्षसाधन । भवरोगाचे औषध हे प्रमाण ।
श्रीनारायणगुणश्रवणकीर्तन । मग अखंड हरिस्मरणे स्वानुभव जोडे तो ॥
स्वानुभवे अन्यथा भावनिवृत्ति । सहज बंधनाभावे स्वरुपस्थिति मुक्ती ।
त्यासी स्वरुपानंद भोगणे ठेवुनी चरमवृत्ति । श्रवण कीर्तन सध्दर्माने ॥
हे मुक्तांचे भजन स्वप्रयोजने । आणिक परप्रयोजन तिही हरिकीर्तन करणे ।
अन्यथा भासे दु:ख पावलो होतो या स्मरणे । मुमुक्षु अज्ञानबंधना छेदिती ॥
सर्व स्वरुपे सगुण हरी । विराट देही पुरुषावतारी ।
दृश्य न बाधितां अव्दय भावें अभय वरी । स्थूळावरुनी सहज सूक्ष्म अनुभवे ॥
हे हरिउपासनेचे मुख्य फ़ळ । हरि स्वात्मानुभव केवळ ।
अवांतर सृष्ट्यादि समर्थ्य निर्मळ । येणे विषयी जनां हरिनिष्ठ मुक्त करिती ते ॥
एक हरी जीवां न कळतां । पृथकत्वे तदंगजा ब्रह्मादि देवां भजतां ।
क्षणिक क्षुल्लक फ़ळे लाभती निरतिशयार्था । म्हणोनी अव्दय सर्वेश सर्वी भजावा ॥
वृक्षमूळी जीवन सिंचितां । सहज वृक्षपत्रांत होय पुष्टता ।
किंवा प्राणा उपाहर अर्पिता । रोमांत तुष्टी होय देही ते ॥
तेवी एक सर्वात्मा भजतां  । सकळ विश्व पूजिले तत्वता ।
तो ह्र्दयीं स्वानुभवा ये नरां समस्ता । .... गीतश्रवण कीर्तनें तो ॥
या श्रुतिगीताचा वक्ता । श्रीकृष्ण नारायण होय स्वतां ।
तो सर्वातर्यामी स्वत: सिध्द जाणता । प्राकृत शब्दें तदर्थकर्ता अन्य नव्हे की ॥
सर्वस्वरुपे जेव्हा हरी । तेव्हा महाराष्ट्र भाषा नव्हे भिन्न तरी ।
हे सुजनीं विचारावें अंतरी । आत्महित साधावें श्रवणादि पथाने ॥
कामधेनू कल्पतरु जरी जोडे । तरी रंका साम्राज्यवैभव प्राप्त रोकडे ।
तैसे व्यासगुरुप्रसादें मज हे जोडे । सर्वेपनिषद्रसपान प्रगटता ॥
अव्दय स्थितीने म्या कां नसावें । परी तृप्तीनंतर ढेकर येत स्वभावे ।
किंवा हरिगुण तैसेचि बरवे । आत्मारामा श्रवणकीर्तने रमविती जे ॥
अन्य विषयविरति घडत । स्वानंदे अखंड तृप्ति देत ।
आपली गोडी वाढवी न करी विरक्त । हरिगुणप्रताप हा कळे हरिणक्तां ॥

श्रीमद्भागवताच्या व्दादशस्कंधावरील व्दादश अभंग.
१.
नारदाच्या उपदेशे । ग्रंथ आरंभिला व्यासे ॥१॥
आदौ स्कंध तो प्रथम । उपोव्दात दावी नेम ॥
परिक्षितीजन्मकर्म । प्रायोपवेशी शुकागम ॥२॥
अध्याय एकोणीस ज्योती । राजप्रश्न शुकाप्रती ॥४॥
२.
सर्ग विसर्ग तें स्थान । पोष कला उती जाण ॥१॥
व्दितीय स्कंध दशाध्याय । संक्षेप वर्णन ते होय ॥२॥
उती मन्वंतर । ईश कथा लय च्यार ॥३॥
मुक्ति ऐसे नव ज्योती । आश्रेयासी लक्षिताती ॥४॥
३.
विदुरउध्दवसंगम । मैत्रेयासी तो उत्तम ॥१॥
तेतिस अध्याय तृतीय । सर्वलक्षण उदय ॥२॥
ब्रह्मांडसंभूती । क्षिति वराह धरी दंती ॥३॥
कर्दमपत्नी देवहूती । कपिल बोधी ह्मणे ज्योती ॥४॥
४.
मनुवंश यज्ञ हरी । दक्ष प्रसूतीते वरी ॥१॥
विसर्ग चतुर्थी । एकतिस अध्यायाते कथी ॥२॥
सती ध्रुव पृथुकथा । प्राचीन बर्ही यज्ञकर्ता ॥३॥
शंकर नारदप्रसादे । प्राचेतस ज्योती शुध्द ॥४॥
५.
प्रियव्रतवंशी भला । नाभीपुत्र वृषभ जाला ॥१॥
पंचमी वैकुंठ प्रियजन । सव्वीस अध्याय स्थान होय ॥२॥
भरतकथा वंशी दीप । स्वर्गपाताळी प्रताप ॥३॥
नरक स्थिति स्थळ कार्य । विश्वरुप ज्योतिमय ॥४॥
६.
अजामिळ तरुनी जाय । नारायणवमा इंद्रराय ॥१॥
षष्टी पोषण भक्ताचे । एकोणीस अध्यायाने साचे ॥२॥
चित्रकेतूज वृत्र झाला । शेष भक्त ज्ञानी भला ॥३॥
विष्णुव्रते दितीपुत्र । मरुत ज्योती ते पवित्र ॥४॥
७.
शिशुपाळ सायोज्यता । धर्मा नारद सांगता ॥१॥
शुभाशुभ कर्मेप्रती । पंधरा अध्यायी हे उती ॥२॥
हिरण्यकशिपु पुत्रा छळी । नरहरी प्रगट ते काळी ॥२॥
प्रल्हाद सत्पमी वर्णिला । धर्मनिर्णय ज्योती केला ॥४॥
८.
स्यायंभुवा राक्षि यज्ञ । गज सोडविला सुज्ञ ॥१॥
चोवीस अध्यायी हा क्रम । चवदा मनुकथनप्रेम ॥२॥
अमृतमथनी अजित । कांसवरुप ते धरित ॥३॥
बळी पातळी वामन । मत्स्य झाला ज्योती ह्मणे ॥४॥
९.
सुर्यवंश सोमवंश । नाना कथा भरे रस ॥१॥
अध्याय चोवीस नव  । ईशकथा गाती प्रेमे ॥२॥
वैवस्वत मनुसुत । दक्ष इक्ष्वाकादि होत ॥३॥
ऐलवंशी यदुकुळी । ज्याति जन्मे वनमाळी ॥४॥
१०.
भूमीभार हरावया । वासुदेव होत कार्या ॥१॥
नव्वद अध्याय दशम । निग्रह तो होय नेम ॥२॥
मथुरे जन्मुनी । क्रिडा केली वृंदावनी ॥३॥
कंसांतक पांडवमित्र । ज्योति संहारी अमित्र ॥४॥
११.
वसुदेव देवकीला । नारदें उपदेश केला ॥१॥
एकादशी मुक्ति । एकतीस अध्यायी निश्चिती ॥२॥
कृष्णउध्दवसंवाद । आत्मविद्याविशारद ॥३॥
ब्रह्मशाप कुलक्षय । स्वयंसिध्द ज्योतिर्मय ॥४॥
१२.
कली धर्मातें निर्दळी । कलंकी विष्णु होत बळी ॥१॥
आश्रयलक्षण व्दादशी । तेरा अध्याय सारांशी ॥२॥
परीक्षित ब्रह्मभूत । शुकमुखे अमृत होत ॥३॥
वेदभाग मार्कडेय । कथा सर्व ज्योतिर्मय ॥४॥
१३.
नारायण विधि सांगे । लाभ नारदा तत्संगे ॥१॥
भागवत संप्रदाय परंपराक्रम होय ॥२॥
व्यासा नारद बोलत । शुका व्यास पढवीत ॥३॥
ज्ञानदीप परिक्षिती । शोकहर्ता लाभे ज्योती ॥४॥
रामायणातील "य:पृथ्वीभर वाराणायदिविजै:" या श्लोकावर अभंग :-
भूमीभारनिवारणा । देवी प्रार्थिला जो जाणा ॥१॥
नारायण रघुकुळी । अवतरे भूमंडळी ॥
माया मनुष्य जो होत । सदा विनाशरहित ॥३॥
निर्मूळ राक्षसाचे कुळ । करुनि पावे निजमूळ ॥४॥
जीव पापहरा कीर्ती । ज्योती भजा प्रेमे चित्ती ॥५॥
स्फ़ुट अभंग.
१.
अहो वेदव्यास गुरु । तुम्हा माझा नमस्कारु ॥१॥
माझे कल्याण करावे । मज दासपद द्यावे ॥२॥
अहो आनंदनिधाना । कृष्णमूर्ति नारायणा ॥३॥
ज्योती म्हणे दीनोध्दारा । कृपासिंधू जी दातारा ॥४॥
२.
पांडुरंग बापा कृपा करी आतां ।
वारी भवचिंता दयानिधे ॥१॥
शरण आलो तुज सर्वस्व सद्भावे ।
अनुसरलो जीवें तुझे पायी ॥२॥
ज्योती म्हणे नंदकुमारा श्रीवरा ।
निर्मळ हो करा भक्तिमार्ग ॥३॥
पद
गुरुने माझी मजपाशी । दाविली काशी ॥ध्रृ.॥
मजला पूर्वेहुनि काढिले । पश्चिमपंथे चालविले ।
एकवीस स्वर्गावरती नेले । मूळ तीर्थासी  ॥गुरुने.॥१॥
अवघड  पश्चिमेची वाट । बिकट त्रिकुटीचा घाट ।
श्रीहाट गोल्हाट औटपीठ । ओलांडुनि त्यासी ॥गुरुने.॥२॥
इडा पिंगला शुषुम्ना । गंगा सरस्वती यमुना ।
तिचे संगमी स्नान करोनि । मुक्ति जिवनासी ॥गुरुने.॥३॥
पाहिले सहस्त्रदळ कमळ । तेथे मुनिजनाचा मेळ ।
हंस बाळ खेळे खेळ । केवळ संन्यासी॥गुरुने.॥४॥
ऐसी देहिंच यात्रा केली । कावड रामलिंगा वाहिली ।
ज्योती याने खेप चुकविली । लक्ष चौर्‍याशीची ॥गुरुने.॥५॥

ज्योतिपंतांची कविता-पद्यरचना ह्मटल्यास अधिक बरोबर होईल अगदी साधी आहे. साहित्य ग्रंथांत जिला ’काव्यप्रतिभा’ ह्मटले आहे, तिचा फ़ारच थोडा अंश त्यांच्या कवितेंत आढळ्तो. अशा स्थितीत वामन, मुक्तेश्वर, आनंदतनय यांच्या वर्गात त्यांची गणना न करितां दासोपंत, शिवकल्याण, वगैरे वेदांती कवींच्या वर्गात त्यांना घातले हंसराज पाहिजे हे उघड आहे. शेवटी, ज्योतिपंताची एक आरती येथे देऊन हे चरित्र पुरें करितो.
आरती

चित्ज्योतीची ज्योती अवतरतां धरणी ।
धान्यांकुर रोमंचित आनंदेकरुनी ॥
कलीकलंकित भाव त्यजूनी रत चरणी ।
जय जगती गर्जतसे हरिनामस्मरणी ॥१॥
जयदेव जयदेव जय ज्योतीरुपा ।
महाभागवता तूं विव्दज्जनभूपा ॥ध्रु.॥
शुकमुख चंचुप्रहर फ़ल भागवंताचे ।
धारसुधारससरिता वंध्या निगमाचे ॥
सज्जन मज्जन जेथे यात्रा त्रिजगाची ॥
मुक्त मुमुक्षु विषयी धणि घे सुरसाची ॥२॥
नरनारायण नरातनु आपलि दे ज्यास ।
विभाग भागवताचा वर दे गुरुव्यास ॥
वाचस्पति वाचली कीर्तनि सुविलास ।
पदकमली सौमित्रा भृगासम वास ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP