वामन नानाजी देशपांडे

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


प्रस्तुत ग्रंथात ज्या मौनीस्वामीचे चरित्र दिले आहे त्यांचे प्रस्तुत कवि हे चिरंजीव होते. मौनीस्वामी आपल्या पूर्वाश्रमी अहमदनगराकडे रोजगारनिमित्त गेले होते, तिकडे अष्टी या गांवी प्रस्तुत कवींचे जन्म, शके १७६० च्या सुमारास झाले. मौनी स्वामीच्या पत्नी सौ. यमुनाबाई यांचे पहिले चिरंजीव शिवराम तात्या. मुंबईतील मौनी स्वामीच्या ठाकुरव्दारची मालकी व व्यवस्था शिवराम तात्यांच्या वंशजांकडे आहे. शिवराम तात्यांच्या वंशजांकडे आहे. शिवराम तात्यांच्या पश्चात यमुनाबाईंस भागीरथी नामक कन्या झाली व वामनराव हे त्यांचे तिसरे अपत्य होय. वामनरावांचे उपनयन सिन्नर येथे झाले. त्यानंतर मराठी हिशोब, लिहिणे, वाचणे, ब्याकरण, इतिहास, भूगोल, गणित व मोडी अक्षर वगैरे त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळेत झाले. घरी संध्या, पूजा, वैश्वदेव, उपनिषदें वगैरे वेदांतशास्त्रावलोकन झाले. नंतर वयाचे १६ वे वर्षी, वृतिवंत मुळे जोशी मल्हार दिनकर रत्नाकर यांची कन्या सरस्वती इजबरोबर त्यांचा विवाह झाला. घरची स्थिति चांगली असल्यामुळे, वामनरावजींस प्रपंचाची काळजी विशेष नव्हती. घरची शेतीभाती असून वडील बंधु मौजे येथील कुलकर्णी होते; ह्मणून शास्त्राभ्य़ास, वेदांतावलोकन आणि भगवद्भक्ति इकडे त्यांनी लक्ष लावले. शिवाय तीर्थरुप साधु; ते जरी जामनेर तालुक्याचे फ़डणीस मामलेदार होते तरी त्यांच्या मनाचा कल परमार्थाकडेच विशेष होता. यामुळे वामनरावजीस ईश्वरभजनी प्रेम सहजच उत्पन्न झाले. पण पुढे सगळेच पारडे अकस्मात फ़िरले. वडिलांनी शेवटचे बाजीराव पेशव्यांजवळ दफ़्तरदारी करुन पालखी अबदागीर मिळविलेली आणि त्यांचे तीर्थरुप-कवीचे पितामह-भिकाराम यांनी औढ्यापट्टयास चवल्याचा मामला केलेला. असे असतां, मिळवलेले द्रव्य सिन्नर येथे एका सावकाराकडे ठेवले होते ते बुडाले व कार्यातरवशात कवीच्या पित्याचे आगमन मुंबई शहरी झाले. तेथे, पितृसेवेत व श्रवण, मनन, निदिध्यासन व ईशभजन यांत वामनरावजींची कालक्रमणा होऊं लागली. मुंबईस आग्र्याचे वाडीत मौनी स्वामीचे वास्तव्य अस्सतां, वामनरावजीस पुत्र श्रीधर व दुर्गा नामक कन्या अशी दोन अपत्ये झाली. पुढे थोड्याच दिवसांनी वामनरावजीस आमवाताचे जबर दुखणे झाले. वैद्य उपचार बहुत केले. शेवटी, कल्याण भिवंडीकडे डोंगरांत गोतशिंगीचे कंद मिळतात ते आणून ओल्या खोबर्‍याबरोबर खाल्ले. त्या योगे आमवात दूर झाला, परंतु दुखण्य़ांत पाय पोटाशी धरुन निजल्याने, आशक्ततेने व पाय वरचेवर न लांबविल्यामुळे गुढघ्यांच्या शिरा आंखडून जाऊन वामनरावांस जन्माचे पंगुत्व आले.
अपंग अवस्था, तरी हातांत लांकडी खडावा घेऊन घरांत सर्वत्र फ़िरावे, स्नान, भोजन, शतपावली, पूजन वगैरे करावे, माड्या पायर्‍या चढाव्या, याप्रमाणे उद्योग ते करीत. नंतर तशा स्थितींतच, तीर्थरुप श्रीमौनीनाथ स्वामी यांजबरोबर त्यांनी बर्‍याच यात्रा केल्या. प्रथम नासिक, त्र्यंबक, सप्तशृंग, चांदवड, डुबरे, पुणे, नगर पैठण राशीन, फ़लटण, शंभुमहादेव, पंढरपूर, वेरुळ, कोल्हापूर वगैरे, नंतर मुंबईहून ठाणे, कल्याण, नाशिक, सिन्नर, नागपूर, जबलपूर, मनमाड, मालेगांव, धुळे, इंदूर, खड्खडिया बजरंगगड, ओंकार उज्ज्नी, ग्वालेर, भरतपूर, मथूरा, गोकुळ, वृंदावन, कामवन, गोवर्धन, दिल्ली, आग्रा, हस्तिनापूर, ब्रह्मावर्त, कानपूर, अयोध्या, प्रयाग, काशी इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रवास केला. काशी येथे कायमचा मुक्काम करावा या विचाराने ११०० रुपयांस ब्रह्मघाटावर, आंग्र्याचे वाड्या शेजारी, भोसले बाईंचा वाडा विकत घेतला. श्रीमौनीस्वामी, शिवराम तात्या, त्यांची पत्नी रंगूबाई, वामनराव, त्यांची पत्नी सरस्वती, पुत्र श्रीधर, कन्या दुर्गा, शालक भाऊभट, सासू गंगाताई, धर्ममाता काशीमाई, गौडसारस्वत ब्राह्मण अंतोबादादा व त्यांची मंड्ळी एतकी माणसे यात्रेस गेली होती. इतर मंडळीसाठी चार गाड्या व मौनीस्वामी करिता १ मेणा व ९ भोई आणि रक्षणार्थ एक मोठा कुत्राही बरोबर होता.
’ प्रयत्नांती परमेश्वर’ ही ह्मण खरी आहे, पण वस्तुत: अन्नोदकऋणानुबंधाप्रमाणेच बहुतेक गोष्टी घडून येतात. सद्गुरुसेवा करुन आजन्म काशीवास करावा असा वामनरावजींचा मनोदय. परंतु त्यांस व मौनीनाथ यांस काशीची हवा मानवली नाही. प्रकृति नादुरुस्त होऊन रक्त आमांशाचा विकार जडला व त्यामुळे स्वदेशी निघून येणे भाग पडले !
काशी येथे, बरोबरच्या सर्व मंडळीसह वामनरावजींनी सुमारे ११ महिने वास्तव्य केले. त्या वेळी त्यांनी खरेदी केलेला वाडा, ’सिन्नरचा वाडा’, श्रीराधाकृष्णविलासभुवन, ब्रह्मघाटावर, अद्याप आहे. अलीकडे, वामनरावजींचे पुत्र श्रीधरशास्त्री यांनी, त्या वाड्यास लागून असलेला दुसरा एक लहानसा वाडा कांही वर्षापूर्वी ८०० रुपयांस खरेदी केला. वामनरावजींची पत्नी सरस्वतीबाई, काशी येथेच प्रसुत होऊन निवर्तली. ही बाई मोठी साध्वी, अत्यंत पुण्यशालीनी होती.
पत्निवियोग फ़ार दु:सह आहे; पूर्ववयांत माता, मध्यमवयांत स्त्री आणि उत्तरवयांत पुत्र यांचा वियोग होणे ह्मणजे मोठे दुर्देव होय. "भार्या मृता सर्व सुखस्य भंग:" परंतु ज्ञानी वामनरावजींनी वैराग्यविवेकाने मनाचे शांतवन केले. पुढे काशीतच, आपला पुत्र श्रीधर याचा त्यांनी व्रतबंध केला. नंतर काही दिवसांनी सर्वच  मंडळीस स्वदेशी येणे कसे भाग पडले ते वर सांगितलेच आहे. स्वदेशी येत असतां वाटेत धुळे १०८ श्रीमद्भागवत सप्ताह व सहस्त्र ब्राह्मणभोजन घातले. पु्ढे सिन्नरास गेल्यावर, तेथे मौनीनाथांचे तीर्थरुप ( हेही संन्यासी होते ) यांची समाधि श्री भैरवनाथमंदिरासमोर सरस्वती नदीकाठी आहे, तिची दुरुस्ती करुन पक्की चिरेबंदी केली व वर पादुका स्थापून , अर्चा केली. हल्ली ही समाधी पडत चालली आहे, पण वंशज तिकडे लक्ष देत नाहीत.
पुन: सर्व मंडळी मुंवईस आली. यात्रेस खर्च झाला तो बहुतेक सगळा मौनीस्वामीच्या शिष्यांनीच केला. बरेच शिष्य नासिकास येऊन सद्गुरुस प्रेमाने मुंबईस घेऊन गेले. त्या वेळी मुंबईत पाण्याचे नळ नुकतेच आणले होते व आगगाडी नासिकापर्यंत सुरु झाली होती. शिष्यांपैकी एकाने स्वामीसाठी नवीन घर बांधविले होते त्यांत सर्व मंडळी राहिली. कांही दिवसांनी वामनरावजीचा पुत्र श्रीधर यांचे व कन्या दुर्गा इचेही लग्न मुंबईंतच झाले. प्रसिद्ध पुणेकर पंडित वे. शा. सं. नारायण पंडित पुराणिक, श्रीमौनी स्वामीचे शिष्य, यांचा पुतण्या जगन्नाथ यास सालंकृत कन्यादान केले. तदनंतर वडिल बहुत वृद्ध झाले व त्यांची शरीरप्रकृतीही बिघडली, तेव्हा समाधीस स्थळ असावे व राममंदिर स्थापन करुन भक्तिमार्ग वाढविण्य़ाचा सद्गुरुंचा उद्देश सिद्धीस जावा एतदर्थ, शिष्यवर्गातर्गत कै. भास्कर त्रिंबक आचार्य यांची जागा ठाकुरव्दारी कोळ्याचेवाडीत श्रीविठ्ठलमंदिराजवळ होती ती पसंत करुन, वामनरावजींनी ३०० रु. देऊन आपले स्वत:चे नांवाने ’साठेखत’ केले, व वर्तमानपत्रांत नोटीसाही दिल्या. नंतर पांच काठ्या जागा ३५०० रुपयांस खरेदी करुन, काशीहून वडील बंधूंस बोलावून, उभयतांचे नावांचे खरेदी खत केले. पुढे बंधूंशी बेबनाव झाल्याने वामनरावजी सिन्नरास गेले व तेथे राहून तेथील वडिलार्जित मिळकतीची वहिवाट करुं लागले. तेथे त्यांनी काही कविताही केल्या व त्या चतु:शास्त्रसंपन्न घोंडभट तात्या शास्त्री यांस दाखविल्या. शास्त्रीबुवांस सदर कविता पसंत पडल्या. आपले गुरुबंधु श्रीहरिभक्त राजारामबुवा निसाळ , हरिदास यांसही आपली कविता वामनरावजी दाखवीत असत. त्यांच्या कविता, कै. गोपाळराव हरि देशमुख, रामचंद्र दिनकर परांजपे, न्या.मू.महादेव गोविंद् रानडे, कृष्णाशास्त्री राजवाडे, गणेश शास्त्री मालवणकर, पिता व गुरु मौनीनाथ व ज्येष्ठ बंधु शिवराम तात्या इत्यादि मंडळीने पाहिल्या होत्या.
वामनरावजींच्या घराण्यांत वडीलपणाबद्दल बरीच वर्षे तंटा चालला होता. चौदा पंधरा पिढ्यांपूर्वी मूळपुरुष नरसी केशव यांस दोन स्त्रिया. त्यापैकी धाकटे स्त्रीचा पुत्र वयाने मोठा म्हणून तोच घरचा कारभार पाहूं लागला. पुढे त्याचे वंशज ’ वडीलपणा आमच्या घराण्याकडे’ असे ह्मणू लागले. परंतु शास्त्रवचनाप्रमाणे खरा वडीलपणा ज्येष्ठ पत्नीच्या वंशजाचा. हा लढा इतकी वर्षे चालूच होता. शेवटी वामनरावजीनी महत्प्रयासाने, कागदपत्र, वंशवृक्ष व इतर पुरावा, अहमदनगर येथील कलेक्टरपुढे शाबीद करुन, सिन्नर व निफ़ाड तालुक्यांतील सर्व देशपांडे घराण्यांत यांचे घराणे वडील आहे, अशा अर्थाच्या दोन सनदा मुंबईच्या गव्हर्नरसाहेबांच्या सहीशिक्क्यानिशी मिळविल्या; त्या अद्यापि त्यांच्या नांवावर कायम आहेत.
वामनरावजींची गुरुपरंपरा मौनीस्वामीच्या चरित्रांत दिलीच आहे. स्वत: वामनरावजींनी कोणास उपदेश दिला नाही. फ़क्त त्यांचे चिरंजीव वे. शा. सं. श्रीधर शास्त्री यांनी सपत्निक शरण जाऊन, त्यांजकडून श्रीरामनाम मंत्रपूर्वक महावाक्य वेदमंत्र ग्रहण करुन अनुग्रह घेतला.
शके १८०९ सर्व्जिन्नाम संवत्सर फ़ाल्गुन शु. १३ रोजी सिन्नर येथे दिवसा दोन वाजतां वामनरावजींस देवाज्ञा झाली. तदनंतर पुत्र व शिष्य श्रीधरशास्त्री यांनी मुंबईहून येऊन त्यांचा अस्थिनिक्षेप नासिकास गोदावरीत रामकुंडात केला. तेरावे दिवशी सर्व भाऊबंध प्रसादास आले. रात्रौ पुत्राने स्वत: कीर्तन केले.
वामनरावजींनी बरीच कविता लिहिली त्यांतील कांही कविता त्यांचे विद्वान चिरंजीव वे. शा. सं. श्रीधरशास्त्री यांनी "काव्यकोष" नामक पुस्तकांत प्रसिद्ध केली आहे. १ भजनमाला ( पदे, अभंग वगैरे ) २ श्रीमौनीस्वामीचरित्र (ओव्या ११९) ३ श्रीसिद्धबोधानुवाद, ( श्लोक १५९ ) ४ स्वरुपज्ञानादर्श ( श्लोक १०८ हा ग्रंथ अपूर्ण आहे.) ५ श्रीरामगीता टीका ( श्लोक ६२ ) ६ श्रुतिस्तुति ( श्लोक ४५) ७ षटपदी स्त्रोत्र४ ( आर्या ११), ८ निर्गुण परा पुजा ( श्लोक ६ ), इतकी प्रकरणे वरील काव्यकोषांत समाविष्ट झाली आहेत.
वे. शा. सं श्रीधरशास्त्री यांनी आपल्या पूज्य तीर्थरुपांची कविता प्रसिद्ध करुन पितृऋण फ़ेडले, याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी लिहून पाठविलेल्या माहितीच्या आधारानेच प्रस्तुत चरित्रलेख लिहिला आहे.
वामनरावजींची कविता केवल परमार्थपर असून अगदी साधी आहे; किंबहुना, ती पद्यात्मक आहे ह्मणूनच तिला कविता ह्मणावयाचे. काव्याच्या दृष्टीने पाहण्याचा हा विषयच नव्हे. आतां त्यांच्या ग्रंथातले थोडेसे उतारे नमुन्यादाखल देऊन हे चरित्र पुरे करुं.
पद
रामा तारक तुझे पाय ॥ध्रु॥ स्थिरचर व्यापुनि अगणित उरले । माया लाजुनि जाय ॥१॥ जे भवरोगे ग्रस्त तयांसी । औषध तीर्थ उपाय ॥२॥ स्पर्शे मुक्तचि गौतमजाया । होऊनि भवना जाय ॥३॥ अमरचि झाला सेवुनि मारुति । सागर उतरुनि जाय ॥३॥ भवपाशांतुनि सोडविं वामना । कौतुक पाहसी काय ॥४॥
पद
पावन पाय चला पाहू । दैशिकसदनाप्रति राहूं ॥ध्रु.॥ राहिल्या गुरुकृपेचेनि कोडे । निष्काम पुण्य पदरि जोडे ॥ पुण्यें अंत:करण शुद्धि । तया उपजे मोक्षबुद्धि ॥१॥ मुमुक्षु तीव्र अनुतापे । शरण जाय गुरु मायबापे ॥ सद्गुरुराय दयाभरित । जीवात्मैक्य बोध करित ॥२॥। सच्चित्सुख ब्रम्ह लक्षी । प्रतीति तिन्हि देउनि साक्षी ॥ प्रगटोनि तीव्र बोधभानु । गत अज्ञानतम काय वानूं ॥३॥ जीवन्मुक्त करी जो कां । कृतकत्य होय मुक्त शोका ॥ अनुदिनि वामन लक्षि पाया । उपेक्षा नसे गुरुराया ॥४॥
पद
आदिपुरुषा निर्गुण रामराया रे । शेषवाणी कुंठित गुण गाया रे ॥ध्रु.॥ तूं अव्दय सच्चिदानंद मूर्ति रे । वेदशास्त्रे वर्णिती तुझी कीर्ती रे ॥१॥ तूंचि सर्वनियंता जगपाळा रे । ब्रह्मादिकां वर्तक ज्ञानकळा रे ॥२॥ उभा विराट न होय सर्व जड रे । ज्ञानकळेवांचुनि अवघड रे ॥३॥ स्वादु स्वादु भोग हे चर्मखंडा रे । देहभिंत चालवी दुडदुडा रे ॥४॥ दीनबंधु दयाळा दीननाथा रे । तुझे चरणी वामन ठेवी माथा रे ॥५॥
पद
असा करि संग । जेणे होय त्वरित भवभंग ॥ध्रु.॥ सुसंग तो हा पुण्यजनाचा । परोपकारी कल्पद्रुमाचा । कीर्ति गौरव भागवताचा । नामानुषंग ॥१॥ धन्य नारद प्रल्हादाचा । वसिष्ठ पराशर मुनि व्यासाचा । शुक योगीद्र परीक्षितीचा । प्राप्त श्रीरंग ॥२॥ भीष्म पुंडलीक अंबरीषाचा । विभीषण अर्जुन रक्मांगदाचा । अंजनीसुत ध्रुव अक्रूराचा । पाहुनी दंग ॥३॥ भरत उद्धव सुदामाचा । पुण्यकारक श्रीदत्ताचा । रघुनाथ यती मौनीगुरुचा । वामना संग ॥४॥
अभंग
पंच विषयाचा केला ज्यांनी न्यास । तोचि हा संन्यास देहातीत ॥१॥ देहत्रय घर ईषणा ते वित्त । गुण यज्ञोपवीत तोडियेले ॥२॥ तोडिला संबंध वासना शिखेचा । कामादि बंधूचा सर्वकाळ ॥३॥ सर्वासक्ती कन्या माया तेचि जाया । मोह या जांवाया त्यागियले ॥४॥ त्यागिला कुपुत्र संकल्प व्दैताचा । मठ अद्वैताचा स्वीकारुनी ॥५॥ स्वीकारिली भगवी सुबोध प्रकाश । नाही डाग ज्यांस अज्ञानाचा ॥६॥ काम्य कर्म हेचि त्यागिले अज्ञान । निष्कर्म ते ज्ञान स्वीकारिले ॥७॥ स्वीकारुनी सोहं शब्दाची हो दीक्षा । शांती सिद्धी भिक्षा क्षेमे करी ॥८॥ क्षमाजल पूर्णकमंडलु शम । हाती दंड दम धरियेला ॥९॥ धरिला तुरीय चतुर्थाश्रम तो । सर्व दृश्यातीत नारायण ॥१०॥ नारायण देव यांचे ज्ञान ज्यास । त्याचा हो संन्यास अंतरीचा ॥११॥ तरी निस्पृह परमार्थी उल्हास । बाह्य त्या संन्यास असो नसो ॥१२॥ असुनी सस्पृह प्रपंची उल्लास । लोकी जो संन्यास तरी व्यर्थ ॥१३॥ जरी असे योगी अंतरी निस्पृह । बाह्य तो संग्रह कैसा करी ॥१४॥ करुनी नमन श्रीगुरुचरण । तयासी वामन वांच्छितसे ॥१५॥
अभंग
पशू मारोनियां यज्ञाचे सायास । धरोनियां आस स्वर्गसुख ॥१॥ माझी ही विधवा राहोनियां खास । तेणे स्वर्गवास असो मला ॥२॥ पराया जीवास देवोनियां त्रास । परलोका आस करितसे ॥३॥ परवृक्षा पीडा देवोनिया देवा । बेल हा वहावा पुण्य जोडे ॥४॥ तेवी दुसर्‍यास दावी फ़ळा आस । दाने द्रव्य खास भोंदितसे ॥५॥ परयोगपुण्या जोडा रे यथार्थ । स्वीया तपें अर्थ का न जोडे ॥६॥ परजीवत्रासे होती महादोष । देवा नाही तोष यांत काही ॥७॥
अभंग
आशा ही करावी राघवपदाची । कदा दुसर्‍याची करुं नये ॥१॥ आशा ही दारुण जीवा दीनवाणा । करी अवमाना लोकी सदा ॥२॥
कष्ट पाप दु:खा भयाचे कारण । अधर्माचं स्थान आशा एक ॥३॥ आशायोगे थोर नीचत्व पावती । दास्यत्व करिती नीचा घरी ॥४॥ आशेने हे लोक संकटी पडती । लपोनी राहती चोरापरी ॥५॥ पंचाग्नीसाधन नवस सायास । व्रते उपवास आशेसाठी ॥६॥ आशेसाठी रांडा कुशब्द बोलती । पैजारा मारिती कोंडुनिया ॥७॥ जगामध्ये आशा सर्व दु:खमुळ । जीव हा व्याकुळ चिंतारुप ॥८॥ अन्य सर्व सोडी वामना तूं आशा । एक देव-आशा दृढ धरी ॥९॥
श्लोक
"देहा अन्नमय प्रकोश वदती कर्मेद्रिये पंचका ।
प्राणा प्राणमया तसेच वदती ज्ञानेंद्रिय पंचका ॥
तेणं युक्त मनोमयास वदती जो बुद्धिरुपे निका ।
जो आनंदमय क्रमेचि वदती अज्ञान गा तात्विका ॥
स्थूल शरीरी अन्नमयाते । सूक्ष्म शरीरी कोशत्रयाते ॥
प्राणमनो वा बुद्धिमयाते । कारण देही सौख्यमयाते ॥
जाणुनि ऐसे पंचहि कोशां । तीन शरीरी याचि प्रशंसा ॥
या सकलांचे आत्मप्रकाशा । वर्तन होते गा ऋषिकेशा ॥
जाग्रत स्वप्न शुषुप्ति यांहि सकलां विश्वादि हे जीव गा ।
स्थूलादीक समस्त भोगरचना साक्षी असे भिन्न गाअ ॥
दृश्याचा व्यतिरेक होत असतां साक्षीन्वये सिद्ध गा ।
एका एक परस्परांत नसती आत्मा सदा एक गा ॥ "
सिद्धबोधानुवाद

श्लोक
आकाशरुप जसि पोकळि तेवि आत्मा ।
ज्ञानस्वरुप अज मी नभ एक सद्मा ॥
कुभांत व्यापक तसे सम अंडपिंड ।
सर्वत्र व्यापक असो चिति मी अखंड ॥
जेवो उपाधि असतां निजपोकळींत ।
अभ्रास धारण करी नभ तेवि सत ॥
द्रष्टा सदा सकळ जीव तनुत्रयांत ।
मी जाणता विषय इंद्रिय धी अनंत ॥
तूं जाणता तरि वदे दुसर्‍या मनासं ।
कां नेणसी स्वरुप निश्चल स्वप्रकाश ॥
कर्पूरवाससम चंचल दृश्यवृत्ती ।
तीला गती तसि न चालत आत्मज्योती ॥
अर्थास कल्पित मती चिती त्यांस पाहे ।
पाहोनी ध्यास न धरी प्रतिबुद्धि राहे ॥
बुद्धिव्दयामधिल ज्ञान नसोनि अन्य ।
तेथील वृत्त इकडे अवधानशुन्य ॥
आकाशिं शब्द भरपूर असे निवांत ।
संयोगि भेरि टिपरा उमटोनि शांत ॥
तत्तदुपाधिकृत ज्ञान दिसे विशेष ।
तत्रापि मूळ चित्ति व्यापक निर्विशेष ॥
जेथील तेथ समजे चितिला यथार्थ ।
प्रत्यक्ष भाव तदभाव मृषा पदार्थ ॥
माया तदंश परि कल्पित दृश्यभावा ।
दृष्टा असंग विभु कारण सृष्टी देवा ॥
जातां घटी नभ न जात स्थळांतरासी ।
जातां उपाधि चितिना परलोकवासी ॥
जीवास भ्रांतिकृत संसृतिचा प्रयास ।
जैसे तुडुंब नभ तेविं चितिप्रकाश ॥
वायू फ़िरे रज फ़िरे गति दृश्य अर्था ।
आधारदृश्य चल तेवि अधेय अर्था ॥
चांचल्यता तसि न शुद्ध स्वरुपज्ञाना ।
साक्षी उपाधिस्थळिं जाणत अर्थ नाना ॥
सर्वेश्वरी महतशक्ति गती अपार ।
सर्वज्ञ तो मनुजबुद्धि न फ़ार ॥
धी एकदेशि निजरुपिं विकल्प नाही ।
धी अंतराय मग ज्ञान न अर्थ पाही ॥
स्वरुपज्ञानदर्श.
अज्ञाना भवमूलकत्व असतां संसारनाशास्तव ।
अज्ञाना क्षयरुप कर्मकुशली विद्या असे वास्तव ॥
तेथे कर्म नसे विरोधी न तमापासोन ज्या संभव ।
त्या कर्मा तमनाशकत्व न घडे विद्याच नष्टी भव ॥
अज्ञाना क्षय नाहि रागविषयां कर्मे टळेना नरा ।
होता कर्म तरी सदोष उपजे संसारसिंधू पुरा ॥
तेणे वाहत चालला परतिरा पावे कधी हा नर ।
कर्मांने गति ना ह्मणोनि मनुजा तूं ज्ञाननिष्ठा घर ॥
ना हो देवमुखे प्रचोदित जसी विद्या तसे कर्मही ।
जीवाते पुरुषार्थ साधन असे कर्तव्यता प्राप्तही ॥
पक्षी पक्षव्दये जसा उडतसे विद्या क्रिया साह्यता ।
दोघांच्याही समुच्चये परगती ऐकावि कर्तव्यता ॥
कर्मे ना करितां श्रुति वदतसे जीवास दोषादिक ।
यातें नित्य मुमुक्षुने निजहिता कर्मा करावे ठिक ॥
सिद्धांती वदतो स्वतंत्रचि मने किंचिंन्न आपेक्षिता ।
विद्याची पुरुषार्थ मोक्षफ़ल दे कर्माविना जी स्वता ॥
ऐसे कोणि वितर्कवादि वदती ते सर्वथा सत्य न ।
जैसे केवळ कर्मसाधन नसे तद्युक्त विद्याहि न ॥
येथे दृष्ट विरोध कारण पहा देहाभिमाने क्रिया ।
वाढे देह अहंकृती गत तदा विद्या फ़ळे अक्रिया ॥
रामगीता टीका.

षट्‍पदि स्त्रोत्र (आर्या )
अविनय घालवी विष्णो, दमविं मना शमविं विषयमृगतृष्णा ।
भूतदया विस्तारी, तारी संसारसागरी कृष्णा ॥१॥
गंगा ही मद ज्याची, वास जया भोग सच्चिदानंदे ।
श्रीपतिपदारविंदा भवभय खेदा विनाशका वंदे ॥२॥
गतभेदही जरी मी नाथ तुझा दास मी तुला नमितो ।
होय तरंग समुद्रा, काय तरंगा समुद्र होईल तो ॥३॥
गोवर्धनघृत वामन दैत्यारी चंद्र अर्यमा नयन ।
तूं ते जाणत असतां, सुख जनिं त्या कां भवां नव्हे शमन ॥४॥
मत्स्यादिक अवतारी विविधा रक्षुनि पुन्हा समग्र मही ।
रक्षिसि प्रभुत्व पालित, मी त्वद्भवतापभीत काम अही ॥५॥
दामोदर गुणमंदिर सुंदर वदनारविंद गोविंद ।
हे भवनिधि भिप्रंदर, मम दर दुर कर दुरंतकृत भेद ॥६॥
नारायण करुणालय आश्रयकृत मी तुझेचि पदकमला ।
ऐसी षट्‍पदि माझे देवा राहो सदा वदकमला ॥७॥
पुण्यश्लोका आर्या वंदुन त्वत्पाद शंकराचार्या ।
षट्‍पदि भा तव सूर्या प्रतिभा आर्या स्वबोधनाकार्या ॥८॥
वाचे अमोघवीर्या जगदुद्धारार्थ शंकराचार्या ।
विग्रह तव पदचर्या दुर्लभ सुरवर समार्यमा आर्या ॥९॥
वेदार्थ स्फ़ुट कार्या या जगि अवतार शंकराचार्या ।
तत्कृत आर्या ग्रंथ तोषचि पाहुनि तदर्थ सौंदर्या ॥१०॥
स्फ़ुट स्फ़ुट नव नव आर्या प्राकृत आर्या प्रबोध सौकर्या ।
श्रीराम मौनिवर्या वचन सपर्या हि वामना चर्या ॥११॥
"काव्यकोषांत आलेल्या वरील प्रकरणांशिवाय ’वामनरावजीकृत ’पंचापंच’ नाट्क या नावांचे एक श्लोकबद्ध प्रकरण व आणखी थोडीशी फ़ुटकळ कविता आहे. ’नाटक’ शब्दावरुन हे खरोखरच नाटक असेल अशी कोणाचीही समजूत होणे साहजिक आहे, पण वस्तुत: हे नाटक नसून एक अध्यात्मपर प्रकरण आहे. यांतील काही श्लोक पहा:-
विश्वासे सकला अभीष्ट फ़लदा श्रीसद्गुरुपादुका ।
देती शीघ्र फ़ळा ह्मणोनि भजनी अत्यादरे भाउका ॥
कोण्ही स्थापुनि पादुका स्वभवनी त्या नित्य वंदीतसे ।
मा स्पष्ट प्रिय विग्रहास भजकां त्या सिद्धै कां बा नसे ॥
निराकारी नसे चित्त जीवाचे या बहिर्मुखा ।
साकारी ठेवुनी चित्त ईशात ध्याइज सुखा ॥
श्रुती शास्त्रसंतप्रमाणे करुनि ।
असे ब्रह्म त तूचि साक्षात्कारोनी ॥
निजानंदरुपी करोनि समाधी ।
सदा राहता तूं न बाधे उपाधी ॥
गगन उडत पक्षी लक्षितो जेवि दाणा ।
विविध जग पदार्थी वर्ततो योगीराणा ॥
सतत मति जयाची ब्रह्मरुपी समान ।
अचल स्वरुप लक्षी ज्या नसे व्दैतभान ॥
बहुविध कटकादी जे अलंकार पाहे ।
समरुप तयिं जैसे हेमची तत्वताहे ॥
अखिल जग विचित्रा पाहतां व्दैतभावा ।
सत चित सुख योगी लक्षितो ब्रह्मभावा ॥
स्वत:च्या कवित्वाविषयी वामनरावजींनी काढलेले खालील उद्गार वाचनीय आहेत :-
असे पतित मी खरा रघुविरा जगत्पावना ।
तुझा भरंवसा मला शुभगतिप्रदाभावना ॥
सराम मुख हे असो तवपदाब्जप्रेमा मना ।
प्रसाद करि तूं असा विगतकामना वामना ॥
अन्यापासुनि जेविं पाक उपजे काही तया न्यूनता ।
होतां त्यांत दुजे रसे करुनियां भोक्तां करी सांगता ॥
तैशी ही रचना समग्र वचना ज्ञात्या जनीं पाहतां ।
माझ्या ह्या कवितेंत न्यून असतां तुम्ही करा पूर्णता ॥
शास्त्री घेंडभटा प्रदार्शित तिही पाहुनिया प्रीतिने
बोले ही बहुता प्रकार कविता केली असे युक्तिने ॥
हो का प्राकृत शब्द नाममहिमा ईशप्रिया भक्तिने ।
साध्वी वामन दास यानि रचिता जी हो यथाशक्तिने ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP