’ महाराष्ट्र कविचरित्राच्या ’ पहिल्या भागांत, वैदर्भस्थ संतकवि देवनाथ महाराज यांचे चरित्र दिले आहे, त्यांचे, दयाळनाथ हे शिष्य होत. यांची बरीचशी कविता रा. रा. अच्युत सीताराम साठे एम. ए.बी.एल. विव्दान गृहस्थांनी व्यवस्थित रीतीने छापून प्रसिध्द केली आहे. तिच्या प्रस्तावनेंत दयाळनाथांचे जे चरित्र त्यांनी दिले आहे, त्यांतील माहितीच्या आधाराने प्रस्तुत संक्षिप्त चरित्र लेख मी लिहिला आहे.
देवनाथ महाराजांचे प्रमुख शिष्य दोन - एक दयायाळनाथ व दुसरे रामराव काळी. देवनाथांनी खुद्द आपल्या आवडत्या सुरजी अंजनगांवच्या जन्मभूमींतील मठाचें आधिपत्य दयाळनाथ यांजकडेच सोपविले होते. दयाळनाथांचा जन्म शके १७१० कार्तिक शुद्ध १४ ( इ.स.१७८८ ) या दिवशी झाला; व शके १७५८ ( इ.स. १८३६) साली दक्षिण हैदराबाद येथे ते समाधिस्थ झाले. वर्हाडांत दर्यापूरपासून सात कोसांवर मुर्तिझापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे तेथे नाथांचे वडील राहात असत. हे मौतसगोत्री यजुर्वेदी ब्राह्मण . त्यांची सर्व संतति अल्पायुषी मरुं लागली, तेव्हा त्यांनी आपले शेवटचे अपत्य- हरि नांवाचा मुलगा पांच वर्षांचे होतांच देवनाथ महाराजांच्या चरणीं वाहिले. हरि रुपाने फ़ार सुंदर होता व पुढे त्याच्या अंत:करणाचा दयाळूपणा त्याचे आजेगुरु-देवनाथांचे गुरु- श्रीगोंविंदनाथ यांच्या निदर्शनास आल्यावरुन ते त्यास ’ दयाळ्या ’ या नांवाने संबोधू लागले. मुलांच्या अल्पायुषीपणाने गांजलेल्या बापाने, साधूच्या पायावर लेकरु वाहिले तर त्याला मार्कडेयाचे आयुष्य मिळेल, या सद्भावनेनें प्रेरित होऊन श्रीहरीला देवनाथांच्या पायांवर घातले, आणि त्यांनीही सुलक्षणी बाळ पाहून त्याचा स्वीकार केला व मोठा होईपर्यंत नाथाची ही भेट तूं जतन करुन ठेव असे बापाला बजावले. पुत्रापेक्षां जास्त ऋणानुबंधाने सेवा व सदाचरण दाखविणारा अनंत जन्मींचा जोडीदार शिष्य नाथांना प्राप्त झाला."
पुढे श्रीहरीला आणखी एक भाऊ झाला तेव्हा देवनाथ हे श्रीहरीला बरोबर घेऊन गेले. त्या वेळी श्रीहरींचे वय सहा वर्षांचे होते. पुढे दोन वर्षांनी सुरजी अंजनगांवच्या मठांत देवनाथांनी त्याची थाटाने मुंज केली आणि लग्न करविले. सुनेचें नांव राधाबाई ठेविले. " संस्कृत व प्राकृत कवींचा बरासचा अभ्यास, आणि कांही उर्दू व उत्कृष्ट गायन आणि ’ गुरोस्तु मौन व्याख्यानं शिष्योस्तुच्छिन्नसंशय: ’ असा गुरुगृहवासाचा आणि तपोनिष्ठ संतसमागमाचा लाभ, यांच्या योगाने श्रीहरीचा सर्वांगसुंदर विकास व्हावयास लागला. देवनाथ जितके तामसी व शीघ्रकोपी, तितकाच श्रीहरि शांत होता. श्रीगोविंदनाथांना या आपल्या नातशिष्याची अखंड प्रसन्नता पाहुन फ़ारच कौतुक वाटे. श्रीहरीच्या विवाहकाली गोविंदनाथांचे वय ऐशीहून अधिक होते. श्रीहरीचें दयालुत्व पाहून, गोविंदनाथांनीच त्यांचे नांव दयाळ्या ठेविले. " गोविंदनाथांच्या या अहेतुक व निस्सीम प्रेमाबद्दल दयाळनाथांना पुढे आयुष्यामध्यें वारंवार गहिंवरुन आठवण येत असे. गोविंदनाथांनी बर्हाणपूर येथे समाधि घेतल्यानंतर देवनाथ व दयाळनाथ यांची जोडी समाधिदर्शनाला गेली असतां दयाळनाथांनी गोविंदनाथांवर जे पद रचिले तसे सुरस व प्रासादिक पद दयाळनाथांच्या कवितेते अन्यत्र क्वचितच आढळते. गोपाळनाथ व त्यांच्या अगोदरचे ’राजारंक पहा समदृष्टि.’ वागणारे सरदारसाधु कसे बाणेदार्र व विरक्त असत यांचे मूर्तिमंत गोविंदस्वरुप नाहींसे झाल्यामुळे दयाळनाथांना फ़ार खेद झाला, आणि त्या वेळी साठीच्या घरांत आलेले देवनाथही आपल्याला असेच एखाद्या दिवशी सोडून जातील या कल्पनेनें तर त्यांचा उव्देग जास्तच दुणावला. ते एके ठिकाणी ह्मणतात :-
" आसन मुद्रा हे उपाधि । नेणेचि निरवधी ॥
नाथ गोपाळी गोविंदी । भेद नसे त्रिशुद्धि ॥
चित्पदी आनंदली । माउली ॥
तेचि कामदुधा दयाळू । देवनाथ कनवाळू ॥
करीत दासाचा प्रतिपाळू ॥ अगणित गुणकल्लोळ ॥
नामामृत दुभली । माउली ॥
श्रीहरीची विद्या पूर्ण होत आली, आणि झाडाखाली झाड वाढत नसल्यामुळे देवनाथांनी गोविंदनाथांच्या आज्ञेप्रमाणे दयाळनाथांना पर्यटणांस पाठविले. पंडितमैत्री, शास्त्रग्रंथविलोकन, देशपर्यटन आणि सभासंचार या साधनचतुष्ट्याने ज्ञानसंपन्न होऊन दयाळनाथ कीर्तन करुं लागले. लवकरच त्यांचा लौकिक सर्व महाराष्ट्रभर पसरला. शिष्याची कीर्ति ऐकून उभयतां वृद्धनाथांना संतोष वाटत असे. या गुरुवृद्धांप्रमाणेच श्रीहरिबुवांचे मनापासून कौतुक करणारे आणि कोड पुरविणारे तिसरे खुशालराव बाबा देशपांडे सुरजीकर हे होते. " त्याचप्रमाणे दर्यापूर येथील श्रीमंत बहादुरजी देशमुख, विदर्भ प्रांतातील तत्कालीन सरस्वतीकंठमणी श्रीमान विनायक शास्त्री पर्वते दर्यापुरकर, श्रीमान् गुंडो महाराज नांदगांवकर, श्रीमान सदाराम बोवा कौडण्यपुरकर वगैरे शरशापसमर्थाचांही त्यांच्यावर फ़ार लोभ असे. वर्धा जिल्ह्यांतील सुप्रसिद्ध अष्टीकर देशपांडयांचे तत्कालीन प्रमुख आत्मारामपंत व शामराव हे दयाळनाथांस फ़ार चाहत व साधुसज्जनाचा मेळा आपल्या येथे आला म्हणजे त्यांत दयाळनाथांना विशेष मान देत."
दयाळनाथ उमरेडच्या बाजूस फ़िरत असतांना, एका मुसलमानाने आपले मातृहीन अर्भक आणून त्यांच्या स्वाधीन केले. नाथांनी त्या मुलांचे मोठया प्रेमाने परिपालन केले व मोठा झाल्यावर तो मुलगा नाथांचा कायमचा आश्रित होऊन राहिला. अनाथांचा परामर्श घेण्यांचे हे व्रत नाथांनी शेवटपर्यंत चालविले. " जे कां रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा " ही तुकारामबुवांची उंक्ति नाथांच्या ठायी कशी यथार्थ झाली होती, हे यावरुन वाचकांच्या लक्ष्यांत येईल. मनुष्य धर्माचाराचे केवढेही अवडंबर माजवो किंवा पंढरपुरच्या वार्या जन्मभर करीत राहो, पण त्यांच्या अंत:करणास, रंजलेगांजलेल्या प्राण्य़ाची अत्यंत करुणास्पद स्थिति पाहून जर दयेचा पाझर फ़ुटत नसेल तर त्या मनुष्यापासून साधुत्व फ़ार दूर आहे, असे बेलाशक समजावे. " विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद कर्म अंमगळ, " हे महापुरुषांचे सुवर्णवचन प्रत्येक मुमुक्षुने आपल्या ह्रत्पटलावर खोदून ठेवून , तदनुसार आचरण केले तरच तो पुढे खरा साधु होईल, नाहीतर " साखरेचे ओझे बैलाचिये पाठी । तयाला शेवटी करबाडे " अशी स्थिति झाल्याशिवाय राहणार नाही.
दयाळनाथांच्या काली वर्हाडांत उर्दू भाषेस विशेष मान असल्यामुळे त्या वेळचे कांही हरिदास फ़ारशी व उर्दू या भाषांचा अभ्यास करीत असत. देवनाथ महाराजांचे उर्दू भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. दयाळनथांचा उर्दू भाषेशी विशेष परिचय नव्हता, तथापि एलिचपुरच्या नबाबसाहेबांपासून थेट चंदुलाल दिवाण व खुद्द निजाम सरकारांसारखे श्रोते मिळण्याचे त्यांचे भाग्य होते ; व तितक्या पुरती त्यांनी उर्दू कवितेला वश करुन ठेविली होती. अष्टसिद्धींपैकीं वशित्वाचा गुण त्यांच्या अंगी पूर्णपणे वसत असल्यामुळें त्यांना सभाविजय कधींच अंतरला नाही. शिवाजी गोविंदनाथ आणि देवनाथ या उभय वृद्धांचें छत्र जोपर्यंत त्यांच्या डोल्यावर होते तोपर्यंत या समर्थसेवकाकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिम्मत नव्हती. त्यांच्या वक्तृत्वाचा, कंठमाधुर्याचा आणि अव्याजमनोहर स्वभावाचा हेवा करुन जे लोक त्यांच्यावर टीका करावयाला पहात त्याचा मानभंग करावयास देवनाथमहाराज तयारच असत. बरेच दिवस देवनाथ महाराजांची भेट न झाल्यामुळें, गुरुदर्शनाची दयाळनाथांस किती उत्कंठा लागून राहिली होती हे त्यांच्या खालील पदावरुन व्यक्त होते :-
आधी कां नाही माझा अधिकार विचारिला ।
पल्लवी घेउनियां नुपेक्षी जगपाळा ॥
हीनदीन मतिमंद , माझी कीर्ति कां केली ।
लाविसी नेत्र आतां तरी ब्रीदावळी गेली ॥
दोष हे आचरावे हेचि आम्हा उचित ।
तव पदी ब्रीद गर्जे तारावे पतित ॥
निशाण फ़डके ते काष्ठ त्याचे मोल काय ।
परि त्या अभिमानास्तव रायाचे शिर जाय ॥
" एकदां एका पार्सभाषाब्रुव हरिदासाने आपल्या परवाक्पुष्ट कीर्तनाला कमोद तांदुळाची उपमा दयाळनाथांचे प्राकृतभाषाकीर्तन पर्यायाने हीन ठरविले. तेव्हा एका स्पष्टवक्त्या श्रोत्याने केलेल्या यथान्याय कानउघाडणीने सदरहू विव्दानाचे चित्त अधिकच भडकून त्यांनी दयाळनाथांना मेजवानीच्या निमित्ताने शेंदूर चारला असे म्हणतात. त्याच्यानंतर दर्यापुरांत कीर्तनप्रसंगी यांची श्रीविनायकशास्त्री पर्वते या रसिकवराशी गांठ पडली असतां शास्त्रीबुवांनी त्यांच्या समयसूचकतेचे अतिशय कौतुक केले. " नंदाच्या नंदना, नवनीरदतनु कोमलगात्रा दानवकुलकंदना " हे पद दयाळनाथांनी लावले होते. शास्त्रीबुवांनी विचारले की " संस्कृत पदाचे संबोधन अकारान्त करावयाचे असता " दानवकुलकंदना " असे आकारान्त रुप आपण का केले ? " दयाळनाथांनी सांगितले की " देव वैकुंठांतून यावयाचा असल्यामुळे जोराने हांक मारण्यासाठी आकारान्त प्रयोग करावा लागला. " शास्त्रीबुवांनी विचारले " भगवान काय तुमच्यापासून दूर आहे ! " नाथांनी उत्तर दिले " भगवानाला निर्गुणाचा सगुण करुन आणावयाचा होता म्हणून एवढी आक्रोशपूर्वक हांक मारली. " हे ऐकून शास्त्रीबुवांनी प्रेमातिशयाने यांना भरसभेत आलिंगन दिले आणि यांचा फ़ार गौरव केला.
पुढे एकदा बनसिंह नाइकांशी दयाळनाथांची गांठ पडली. नाईक हे पेंढार्यांचे मुख्य, आणि एक तर त्यांना आपले सर्वस्व अर्पून जीव वांचवावयाचे किंवा आपला गोट आंवळून त्यांच्याशी दोन हात करावयाचे याशिवाय दुसरी तोड निघेना. इतक्यांत नाईकांनी आपण होऊनच नाथांची भेट घेऊन सांगितले की, वाटेल तेवढें द्रव्य देतो, मला मंत्रोपदेश द्या. पापाचरणावर मिळविलेल्या त्याच्या द्रव्याचा, धर्मकारणार्थ त्याजकडून व्यय करवून नाथांनी त्यास मंत्र दिला आणि देशाला समर्थ चक्रवर्ती कोणीच न राहिल्यामुळे मोठमोठया शूर शिपायांनी देखील तत्समयविशिष्ट सार्वत्रिक बुद्धिभ्रंशाने अंगीकारलेल्या क्षात्रधर्माला अनुचित लुटारुपणापासून त्याला कायमचें परावृत्त केले. नाईक दरोडे घालीत आणि पापक्षालनप्रायश्चित्तार्थ धर्म करावयाला पहात." परंतु नाथांच्या अनुग्रहाने त्यांचा दुर्वासनाक्षय झाला.
खर्या सत्पुरुषास, स्वत:च्या योगक्षेमार्थ द्रव्याची फ़ारशी जरुरी कधी भासत नाही. तरी लोकसंग्रही सत्पुरुषांचे पैशावांचून पदोपदी नडते. देवनाथ महाराज काशीस गेले असतांना तेथे त्यांनी एका गृहस्थाला पांच हजारांचा रोखा लिहून दिला होता; आणि ते समाधिस्थ झाल्यावर कांही दिवसांनी दयाळनाथ नागपूर येथे गेले असता तो गृहस्थ त्यांजकडे रोखा घेऊन आला. " नाथांनी गुरुच्या ऋणाचा स्वीकार केला. भोसले यांच्या वाडयांतून श्री. बाकाबाई साहेबांनी एका कीर्तनाला पांच हजार रुपये देण्याचे आमंत्रण पाठविले परंतु ते शास्त्रनिषिद्ध जाणून नाथांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते शहरांत भिक्षेस निघाले आणि दानशूरांनी मंडित केलेल्या त्या कालांत नाथांचे सर्व कर्ज एका फ़ेरीतच फ़िटले !
नाथ एकदां दमयंतीस्वयंवराचे वर्णन करीत असतांना दमयंतीच्या अंगावरील दागिन्याची नामावली सांगूं लागले; आणि त्या वक्तृत्वाच्या भरांत असतांना, आपली कन्या मुक्ताबाई हिला विवाहप्रसंगी आपण फ़ुटका मणीही आंदण देऊं शकलों नाहीं ही कल्पना मनांत येऊन त्यांचे मुख किंचित् म्लान झाले. हे कीर्तन चातुर्मास्यांत श्रीमंत सरदार खंडेराव माणकेश्वर यांच्या वाडयांत चालले होते. त्यांनी पर्यायाने व चतुरस्त्रतेने खेदाचे कारण शोधून काढले आणि लागलीच मुक्ताबाईला आपली धर्मकन्या मानून चंद्रहारासकट सर्व दागिने तिच्या अंगावर घातले. " मोडली तरी राजधानी आणि भंगले तरी तीर्थ ही म्हण खोटी नव्हे. "
आपण शिष्याला जे शिकवले ते त्याच्या ठायी कितपत उतरले हे पाहण्याची सद्गुरुंची पूर्वापर चाल आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामीची शिष्यकसोटी पाहण्याची कडक पध्दत प्रसिद्धच आहे. देवनाथानीही आपल्या प्रिय शिष्याची पुष्कळ परिक्षा पाहिली. त्यांना नेहमी मारहाण करावी, दहाजणांत एकदम अपमान करावा, मध्येच जेवणाच्या वेळी प्रवासाला निघण्याची आज्ञा करावी, त्यांनी स्वपराक्रमाने मिळवून गुरुचरणी अर्पण करण्य़ाकरिता आणिलेले द्रव्य एकदम अनाथांना वांटून टाकावे, असे अनेक प्रकार करावे. परंतु दयाळनाथांनी आपल्या भक्तियोगांत तिळमात्र अंतर पडूं दिले नाहि. सर्व प्रकारचे दु:ख गुरुचरणी अर्पण करावयाचे, ही त्यांची वृत्ति होती. यासंबंधाने लिहितांना रा. रा. अच्युत सीताराम साठे यांनी काढलेले उद्गार अगदी यथार्थ आहेत. ते म्हणतात " तत्पुर्वकालीन धर्मशासनांत, राजकारणांत, ज्ञातिनिर्बंधांत, सेव्यसेवकसंबंधात, संप्रदायपद्धतीत इतकेच नव्हे तर संयुक्त कुटुंबपद्धतीतसुध्दा व्यवहारनिर्बध सर्व पक्षी असेच दृढपणे पाळले जात; आणि म्हणूनच अनेक विपरीत भावना प्रत्यही घडत असतां आमची समाजरचना स्थिरावली, दृढावली आणि पालवली. " दयाळनाथांची निस्सीम गुरुभक्ति आणि आज्ञाधारकपणा पाहून इतर सर्व साधुजन थक्क होत आणि शिष्य मिळाल्याबद्दल देवनाथांच्या थोर भाग्याचास्तव करीत.
दयाळनाथांनी आपल्या वयाच्या ४८ व्या वर्षी ( इ.स.१८३६) हैदराबाद येथे देह ठेविला. चंदुलाल राजे, आपल्या कर्णौदार्याला अनुसरुन त्यांना इनाम देणार होते, पण त्यांच्या आकस्मिक मृत्युमूळे ते राहिले. नाथांचे और्ध्वदेहिक निजामच्या राजधानीच्या वैभवाला व त्यांच्या लौकिकाला योग्य असेंच झाले. दयाळनाथांचा औरस वंश नाही. मुलीचा वंश रामटेक उमरेडला आहे. त्यांच्या मागून यांच्या गादीवर जयकृष्णनाथ आष्टीकर, ( मृत्यु इ.स.१८५१ ) श्रीरामकृष्णनाथ, ( मृत्यु इ.स.१८९१ ) श्रीभालचंद्रनाथ ( मृत्यु १९११ ) पंढरपूर येथे व श्रीमारुतीनाथ उमरेडकर इतके बसले आहेत. यांनी दयाळनाथांची सर्व काव्यकृति जपून ठेवली होती ती रा. सा.अच्युत सीताराम साठे यांस त्यांनी दिली व ती त्यांनी छापून प्रसिद्ध केली. वरिलपैकी श्रीभालचंद्रनाथ यांनीही चांगली कविता केली असून , गुरुपरंपरेवर एक ओवीबद्ध ग्रंथ केला आहे. " दयाळनाथांची कविता " या ग्रंथात त्यांची ८५ पदे व रामजन्म हे आख्यान प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या कवितेविषयी रा. साठे यांनी सदर ग्रंथारंभी दिलेल्या सुंदर चरित्रांत जे विवेचन केले आहे ते सर्वांस मान्य होण्यासारखे असल्यामुळें त्याचा सारांश येथे देतो.
" देवनाथांच्या प्रमाणेच दयाळनाथानी गणपती, शंकरपार्वती वगैरे निरनिराळ्या देवतांवर कविता केली आहे. तथापि कृष्णवर्णनाच्या कविता त्यांनी अधिक प्रेमाने रचिलेल्या आहेत आणि आख्यानकवितेवर त्यांचा देवनाथांपेक्षांही जास्त भर होता. देवनाथांचे धांवे व्यक्तिविषयक नाहीत, आर्त व दीनदुबळ्यांच्या दु:खप्रसंगाला शोभतील असे त्यांचे करुणरसपूर्ण धावे आहेत. दयाळनाथांचे धांवे व्यक्तिविषयक जास्त. म्हणूनच देवनाथ हे श्रेष्ठ प्रतिचे भक्तिकवि आणि दयाळनाथ हे श्रेष्ठप्रतीचे आख्यानकवि होत. बाकी शब्दसौष्टव पदलालित्य, अर्थगांभीर्य, इत्यादि गुणांत उभयनाथ समरस होतात. उभयतांचे प्राचीन ग्रंथांचे परिशीलन दांडगे होते. देवनाथ भागवताच्या बाहेर जात नसत; परंतु दयाळनाथांच्या कवितेमध्ये नवीन नवीन सुंदर कल्पना पुष्कळशा दृष्टीला पडतात."
देवनाथ हे सिध्द पुरुष होते म्हणून त्यांच्या वाणींत स्वानुभवाचा अधिकार फ़ार मोठा दिसतो, शिवाय निस्पृहता आणि औत्सुक्य हे गुण त्यांच्या कवितेंत ठिकठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. दयाळनाथ हे मुमुक्षु कोटीतले असल्यामुळे त्यांच्या कवितेंत त्यांची पारमार्थिक कळ्कळ जितकी दिसून येते, तितकी अधिकारक्षमता दिसून येत नाही. तथापि कवि या दृष्टीनें पाहिल्यास त्यांच्या कवितेंतील कित्येक स्थले खरोखरच फ़ार मनोरम आहेत. पुढील उतारे पहा :-
पद ( लावणी )
चाल सख्या मनमोहना युगसम । तुजविण जाते घडी ।
सख्या तूं जिविंचा जिवलग गडी ॥धृ.॥
सचिंत मन मानसी असे बहु दु:ख साहते ।
वाट मी टक मक तुझि पाहते ॥
दिनरजनीं विव्हळ अति मम मति दुश्चित राहते ।
आण तव पायाची वाहते ॥
बुडते दु:खसागरी । सागरी ।
तारक तूं तुजला खरी । अहो खरी ।
उपजावि दया अंतरी । अहो अंतरी ।
विरहाग्नी जाळितो तुझा करि कष्टि प्राण चरफ़डी ।
सख्या तूं जिविंचा जिवलग गडी ॥१॥
नूतन तनू तारुण्य वय बा जात असे वायां ।
नाही शाश्वत की हे काया ॥
उभा काळ लक्षितो इला उचलुनि न्यावया ।
करुणा कशी नये ह्रदया ॥
साहिना विरह दुर्धर ।
येवोनी मला करिं धर । करि धर ।
घाबरिले मम अंतर । अंतर ।
प्राण निघो पाहतो त्वरे धाउनि घाली उडी ।
सख्या तूं जिविचा जिवलग गडी ॥२॥
भर नवतीची बहर कहर करी लहर मदनाची ।
उठती तीव्र मला जाची ॥
श्रमदायक सोसेना शांती कोण करिल याची ।
सांग तुजविना सत्य साची ॥
जहालासी निष्ठूर कसा । अहो कसा ।
मागूती दिवस नये असा । अहो असा ।
तनू क्षणिक नाहि भरवंसा ।
जे होईल ते अशांत चतुरा समजुनि करि तांतडी ।
सख्या तूं जिविंचा जिवलग गडी ॥३॥
तूं दिनपति मी कांति तुझी अजि कोप कसा करिसी ।
जळाविण मीन तळमळी तशी ॥
साधन तरि कोणते करुं मी तुझिया प्राप्तीसी ।
किती म्हणुनिया अंत पाहशी ॥
मी सरिता तूं सागर । अहो सागर ।
मी चातक तूं जलधर । अहो जलधर ।
मी तारा तूं शीतकर । अहो शीतकर ।
आगळीक नसतांनि नजर कां मजवरती वांकडी ।
सख्या तूं जिविंचा जिवलग गडी ॥४॥
मनोवृत्ति भाकिता अशी करुणा ते विरहिणी ।
दयाळ माना रे विनवणी ॥
तूं आत्मा मी प्रकृति तुझी हे अनादिची मोळणी ।
कदापी ना दिसे दुजेपणी ॥
तूं दीप प्रभा मी बरी । अहो बरी ।
तूं सागर लहरी मी खरी । अहो खरी ।
अन्यथा नव्हे वैखरी । अहो वैखरी ।
देवनाथ प्रभु दयाळ भवनदी उतरी-पैलथडी ।
सरव्या तूं जिविंचा जिवलग गडी ॥५॥
दुर्वासाच्या आदरातिथ्याबद्दल घाबरलेल्या द्रौपदीची भावाकडे मागणी :-
मार्जन करुनि त्वरित येती । अन्न नसतांचि शाप देती ॥
तारक तूंचि या जगती । असा निश्चय माझे चित्ती ॥
म्हणुनि बाह्तें दीनवाणी । करुणार्णवा मोक्षदानी ॥
पिता तूं माझा मी दुहिता । कंचुकी वसन चुडेदाता ॥
राजसूय यज्ञ धर्म करितां । कौरवांसि वाढीत असतां ॥
कुंचुकि बिरडे तै फ़िटतां । चित्तिं तुज आठविलें ताता ॥
चतुर्भुज करुन गांठि देता । आनंद न समावे चित्ता ॥
कंचुकी मम देणे फ़िटलें । घालिना संकटे तुज वहिले ॥
ऋषींचे भय पोटी धरिलें । ह्मणुनि तुजलागी आठविले ॥
अनंतां जन्मीचें उसणें । भरुनि पावले भाक घेणे ।
परि तुजवरी एक उरलें । चुडे त्वां कधिं नाही भरले ॥
समय पहा कठिण समज वरिले । पांडुतनयांसि विघ्न आले ।
दास वांचवी चुडेदानी । करुणार्णवा मोक्षदानी ॥
दौपदीवस्त्रहरण
ये धांवत कृष्णबाई अति कनवाळे ।
निजजनमनसरस मराळे ॥धु.॥
हा मेला खळ दुर्योधन कुल बुडवाया ।
कुरुकुळिं आला उदया ॥
कौरवांसि गौरव रौरवगती कराया ॥
धरिली मति शीघ्र मराया ॥
दुर्बुध्दि दे मामा बुध्दि फ़िराया ।
कर्णादिक श्रवण भराया ॥
एकत्र होऊनी यांनी ।
प्रेरिला अनुज अघखाणी ।
याने अघटित केली करणी ।
कच धरुनी ओढूनी सभेत मजला आणिलें ।
अति कनवाळे । निजजनमन सरस मराळे
वेणिला धरुनि दु:शासन अंसडुनि पाडी ।
फ़र फ़र फ़र सभेत ओढी ॥
वाग्धनुष्य ओढूनि वचनशरांते सोडी
अंतर्गत काळिज फ़ोडी ॥
अर्धांगि बसुनि मांडीवर ह्मणतो जोडी ।
भर्त्यांची ममता सोडी ॥
’ दासी ’ ’ ही दासी ’ वदताहे ।
धर्मज्ञ गुरु बसलाहे ।
भीष्मही उगा तळिं पाहे ।
विदुरादिमतीची गति हे किमपि न चाले ।
अति कनवाळे । निजजनमन सरस मराळे ॥२॥
स्वस्त्री हरुनी आजि युधिष्ठीर झाला ।
अतिदीन कसा जी कृपाळा ॥
नागायुत बळिया भीम पराक्रमि असला ।
धर्माज्ञापाशी फ़सला ॥
अर्जुनही न वदे कांही उगाचि बसला ।
मजवरी कां ईश्वर रुसला ॥
हा अंध वृध्द मामाजी ।
तोही किमपि न बोले माजी ।
अवकळा ही दृष्टसमाजी म।
अजुनियां अंत पाहसि किती परम कृपाळे ।
अति कनवाळे । निजजनमन सरस मराळे ॥३॥
चांडाळे आज्ञा दिधली वसन हराया ।
तडतड झोंबत शरिरा या ॥
होतांचि नग्न असुत्याग करिन यदुराया ।
मग यावे प्रेत पहाया ॥
हा यवन जसा की धरि गो वधा कराया ।
वृक व्याघ्र मृगी ते खाया ॥
कृष्णाई धांब गे आई ।
तव बहिण ह्मणति सखेबाई ।
ये त्वरा करुनि चतुराई ।
ये दिनबंधु ब्रिद जाउं पहाते सगळे ।
अति कनवाळे । निजजनमन सरस मराळे ॥४॥
मजवरि तव मानस होते कसे कृपाळे ।
हे ममत्व कां जी लपाले ॥
मी व्यर्थचि की बा भगिनी ऐसे वदले ।
तूं ब्रह्म तुजसि मी न तुळे ॥
लाजोनि मनांतचि निजगुण ऐसे कळले ।
मी स्वसा न तुझी जगपाळे ॥
वदले ते नव्हेचि लटिक ।
दासांची लहानशी बटिक ।
जाणोनि रक्षावे, अटक ।
न पडावी पळभरि नष्टें वसना धरिले ।
अति कनवाळे । निजजनमनसरस मराळे ॥५॥
अनंता अपारा अपरिमिता श्रीरंगा ।
ये चुकवीं यमभयदंगा ॥
श्रीधरा मुकुंदा मनिमनपंकजभृंगा ।
प्रकटे मम अंतरंगा ॥
गोविंद कृष्ण केशवा भवब्धितरंगा ।
नाशी दुर्मददु:संगा ॥
हे मुरमर्दन कंसारी ।
मंदरधर मंगलकारी ।
गिरिधरा समय अति भारी ।
अशि करुणा ऐकुनि परब्रह्म गहिंवरलें धांउनि आले ।
अतिकनवाळे । निजजनमनसरस मराळे ॥६॥
मनपवन टाकुनि राजा व्दारावतिचा ।
ये ऐकुनियां रव सतिचा ।
पृष्ठभागिं राहूनि ध्वनि करि मेघगतीचा ।
प्रभु गंभीर सदय मतीचा ॥
नाभी नाभी वदतां ऐकुनि तदा सतीचा ।
प्रेमा उचंबळला गुणवतिचा ॥
परतोनि पाहतां मागें ।
आलिंगुनियां श्रीरंगे ।
पुसिले की नेत्र अभंगे ।
संबोखुनि सतिची ह्रद्नत आधी हरिली ।
निजरक्षणार्थ अवतरली ॥
हे माय बहिण कृष्णाई धाउनि आली ।
निजरक्षणार्थ अवतरली ॥७॥
ते प्रथम वसन सोडिले खले क्रोधाने ।
दुसरे पाहे अवधाने ॥
ते फ़र फ़र ओढित तेव्हा दोहिं करानें ।
निघताती बहुविध वसनें ॥
पाताळ मृत्यु स्वर्गातिल बहु हस्ताने ।
प्रभु नेसवीत सन्माने ॥
कृष्णातनु ही रत्नाकर म।
निघताति अनंत अंबर ।
उपसितसे टिटवी खळकर ।
विटला तो नेत्री गरगर भोंडी भरली ।
धांवुनी आली । निजरक्षणार्थ अवतरली ॥९॥
चावुनी अधर सरसावुनि आला जवळी ।
देखिली कशी पांचाळी ।
लखलखित वसन ते पीत चतुर्भुज बाळी ।
अवलोकिलि सर्व नृपाळी ॥
गंगात्मज व्दिज द्रोणहि विदुर दे टाळी ।
चांडाळमुकश्री काळी ।
तो भिष्म म्हणे फ़िर नष्टा ।
विदुरही वदे पापेष्टा ।
जळसि रे उभाचि भ्रष्टा ।
हे देवनाथ माउली दयाळू खिजली ।
धांवुनि आली । निजरक्षणार्थ अवतरली ॥
एवढे उतारे वाचून दयाळनाथांच्या काव्यसौदर्याची वाचकांस कल्पना होण्यासारखी असल्यामुळे आणखी वेचें देऊन ग्रंथविस्तार करीत नाही.