शिवरामस्वामी कल्याणकर

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


शंभुसखी धनदींही न तें जें निजवित्तज यश शिवरामीं ।
भुललों यातें जाणुनि निर्मळता चित्तजय शशिवरा मी ॥१॥
सन्मणिमाला-मोरोपंत.
हे प्रसिद्ध सत्पुरुष इसवी सनाच्या सतराव्या शतकांत कलबुर्गा येथें होऊन गेले. हे रामदास, तुकाराम, केशवस्वामी, वामन, रंगनाथ इत्यादि सत्पुरुषांचे समकालीन असून, त्यांचा व यांचा चांगला परिचय होता. कलबुर्गा प्रांतीं ‘महागांव’ नामक एक गांव आहे, तेथें तिम्मण दीक्षित व राम दीक्षित या नांवाचे दोन बंधु रहात असत; पैकीं तिम्मण दीक्षितांस जानकीच्या उदरीं नारायण दीक्षित हे पुत्र झाले. ह्यांनी आपली जोशीपणाची वृत्ति उत्तम प्रकारें चालविली. डंबळगांवचे बालकृष्णपंत चंद्रकेत यांची मुलगी लक्ष्मी ही नारायण दीक्षितांस दिली होती. ह्या नारायण दीक्षितांचे वडील व मातुश्री हीं उतार वयांत काशीस जाऊन राहिली होतीं, त्यांचे भेटीस एकदां नारायण दीक्षित गेले असतां, तेथें त्यांस उपरति होऊन, ब्रह्मानंदस्वामींकडून त्यांनीं संन्यासदीक्षा घेतली व तेव्हांपासून पूर्णानंद या नांवानें ते प्रसिद्धीस आले. ब्रह्मानंद स्वामी काशींत समाधिस्थ झाल्यावर पूर्णानंद कल्याणास आले व आपल्या मुलांबाळांस भेटून गांवाबाहेर मठांत राहूं लागले. पूर्णानंद यांस पूर्वाश्रमी संतती झाली, ती येणेंप्रमाणें "
१  तिम्मणभट्ट
२  कृष्णाबाई
३  अनंतभट्ट
४  विवेकंमा
५  रामभट्ट
६  गोदूबाई
७  शिवरामस्वामी.

शिवरामस्वामींची वृत्ति प्रथमपासूनच भगवत्परायण होती. पुढें ते मामलेदार झाले होते, पण लवकरच ती जागा सोडून त्यांनी पूर्णानंदस्वामींचा अनुग्रह घेतला’ असे काव्यसंग्रहांत लिहिलें आहे. शिवरामस्वामी एकदां पंढरपुरास गेले असतां, विजापुरचे कारभारी रुक्मणापंत यांशीं त्यांची गांठ पडली. रुक्मणापंत हे साक्षात्कारी पुरुष असून परमभागवत होते. त्यांच्या सहवासांत कांही वर्षे काढल्यावर शिवरामस्वामींचे परमार्थाकडे विशेष लक्ष्य लागत चाललें व पुढें त्यांनी आपले तीर्थरुप पूर्णानंदस्वामी यांजकडून उपदेश घेतला. शिवरामस्वामीस पार्वती व सावित्री अशा दोन स्त्रिया होत्या. भागानगरच्या तानशाचे कारभारी प्रसिद्ध साधु केशवस्वामी भागानगरकर यांचा शिवरामस्वामींवर विशेष लोभ असे. शिवरामस्वामींची गुरुपरंपरा पुढें दिल्याप्रमाणें :-
शिवरामस्वामी कल्याण येथेंच समाधिस्थ झाले. शिवराम स्वामींची कविता पुष्कळ आहे व ती बहुतेक अद्याप अप्रसिद्ध आहे. शिवरामस्वामींच्या शिष्यपरंपरेचे कांही लोक हैदराबाद (भागानगर) येथें राहतात, त्यांजपाशी शिवरामस्वामीचें एक ओवीबद्ध विस्तृत चरित्र आहे, असें समजतें. ‘महाराष्ट्रकवि’ चे संपादक रा० भावे यांनी महाराष्ट्र काव्यग्रंथांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, तींत शिवरामस्वामींच्या नांवावर पुढील ग्रंथ दिले आहेत :-
१  गंडिकाख्यान श्लोक (काव्यसंग्रहांत प्रसिद्ध झालें आहे.)
२  नानासाहेब पेशव्यास उपदेश
३  पदें
४  मुद्रिका
५  रामजन्म कटाव
६  हस्तामलकाचें भाषांतर
७  आत्मबोध श्लोक
८  मनीषापंचक श्लोक
९  शुकाष्टक
१० रामतुळसी अभंग
११ बोधबासष्टी
१२ शिवामृत
१३  अद्वोधदीपिका.
या ग्रंथांपैकी १ गंडिकाख्यान व २ नानासाहेब पेशव्यांस उपदेश हे ग्रंथ शिवरामस्वामी कल्याणकरांचे असतील असें वाटत नाही. रामदास-शिवाजीशीं समकालीन असलेले शिवरामस्वामीं इ०स० १७४० त पेशवे पदारुढ होणार्‍या नानासाहेब पेशव्यांस उपदेश करण्यास हयात होते, हें संभवनीय दिसत नाहीं. अर्थात्‍ शिवराम या नांवाचा दुसरा कोणी तरी कवि होऊन गेला असला पाहिजे, हें उघड आहे. पुण्यानजीक मुळा नदीच्या कांठीं पौड नामक गांव आहे, तेथें ‘दीननारायण’ नामक एक कवि ८० वर्षापूर्वी होऊन गेला, त्याच्या घरीं ‘शिवराम’ नांवाचे एक सत्पुरुष कांहीं वर्षे राहिले होते व त्यांच्याच सहवासामुळें दीननारायणाची कवित्काकडे प्रवृत्ती झाली, अशी माहिती मिळते; व ह्यावरुन नानासाहेबांस उपदेश करणारे ‘शिवरामस्वामी’ ते हेच असावेत; असें वाटतें. ह्या शिवरामाची बरीच कविता पौड येथें आहे. असो.  शिवरामस्वामी कल्याणकरांची कविता अगदी सुलभ व प्रासादिक अशी आहे. त्यांनीं ठिकठिकाणी आपले गुरु पूर्णानंद यांच्याही नांवाचा उल्लेख केला आहे. ‘रामदासस्वामींची बखर’ या ग्रंथांत शिवरामस्वामीची थोडीशी माहिती दिली आहे ती वाचकांनीं अवश्य पहावी. शिवरामस्वामीचीं कांही पदें पुढें दिलीं आहेत:-

पंचपदी.

गुरु अरुणोदय काळीम शिवगुरुवर गीतीं गांवीं ।
स्वहिताकारणें आपुला आपण विचार करावा ॥ध्रु०॥
इंद्रियासकट स्थूळ नव्हे मी जाणता त्याचा ।
याचें कारण विराट नोहे मी देखणा त्याचा ॥१॥
मनबुद्धि दों वृत्तिंसि जाणे अंत:करणाच्या ।
कारण हिरण्यगर्भ तयाचा साक्षी मी साचा ॥२॥
स्वरुपी कांहीं विस्मृति तें मायेचें रुप जाणा ।
तेंचि येथें कारण मीच जाणे आपणा ॥३॥
तनुभयाचा साक्षी तो मी महाकारण ।
तेथिल चौथे महामायेसी मीच वोळखण ॥४॥
शब्दवलय उपाधि निरसितां जिवशिवपण हरलें ।
शुद्ध पूर्णानंदीं रिघतां शिवरामचि झालें ॥५॥

मी देह नव्हेसा झालों तेव्हां उपजणें ना निमणें ।
रोड मोठा वृद्ध तरुण हें कांहिच मी नेणें ॥१॥
यापरि विचार करितां मनुजा सुमनें साक्षेपें ।
चैतन्य आत्मा मी हें कळतां विचारही लोपे ॥२॥
मनसह अंत:करणाचा परि देखणाचि वेगळा ।
वर्णाश्रम सुख-दु:खें येउनि बाधति कवणाला ॥३॥
क्षुतातृषादि प्राणधर्म हे मजला दिसताती ।
मज मी फिरोनि पाहतां मग हे कवणा बाधिती ॥४॥
हें जड ऐसें जाणुनि निराळा होउनी पाहतां ।
व्यतिरेकेंची चिदचिद्‍ग्रंथी सुटे तत्त्वता ॥५॥
सकळ सच्चिदानंदु हा हो अन्वयाचा बोधु ।
सकळ सच्चिदानंदु हा हो अन्वयाचा बोधु ।
तो जाणावा शिवरामाचा परिपूर्णानंदु ॥६॥

विषयइंद्रिये जड ओळखणें तेची विरक्ती ।
चैतन्याकडे वृत्ति फिरवणें या नांव भक्ती ॥१॥
मी चिडून वृत्तिची प्रतीती शुद्ध तें ज्ञान ।
यापरि त्रिवेणीचें नित्य करावें स्नान ॥२॥
वर्णाश्रमसंग्रह युक्ताचारचि इंद्रियां घडे ।
विरक्ति भक्ति ज्ञान होतां आपेआप चढे ॥३॥
मुळींच विचार हारपें हर्षामर्ष मग कैंचे ।
शिवराम भजे पाय पूर्णानंदाचे ॥४॥

वृत्ती जिकडे धांवे तिकडे न जावें तीपाठीं ।
साक्षी होउनि पाहतां स्वरुपी मग होय भेटी ॥१॥
वृत्तीकडे पाहतां स्वरुपी मग होय भेटी ॥१॥
वृत्तीकडे पाहतां वृत्ती आपणांतचि विरे ।
आपण चैतन्य मात्र केवळ परिपूर्ण उरे ॥२॥
मग देखे ऐके त्वचे आढळे ओ जो रस चाखे ।
बोले चाले वेव्हारितां आपआपणां देखें ॥३॥
सहज समाधि सहजचि भोगी पूर्नानंद उरे ।
शिवराम निरावरण होउनी आनंदे वावरे ॥४॥

गुरु अरुणोदयकाळी म्हणतां पदें पांच ही ।
अर्थी विवरुनि पाहतां होई देही विदेही ॥१॥
सद्गुरु आज्ञा वचन पाळणें या नांवे ।
वेव्हारितां आपण आपणां विसरुं न द्यावें ॥२॥
विसरा विसरुनि आठवा ग्रासुनि आत्मा स्वयें होणें ।
होणें न होणें वृत्तीविण तें अंगी अनुभवणें ॥३॥
जगीं आपण भरला आपणामाजी जग पाहे ।
तो जाणावा शिवरामाचा पूर्नानंदु आहे ॥४॥

ह्या पंचपदीचा अर्थ फार गहन आहे. सद्गुरुकृपेनें जो पारमार्थिक अनुभव आमच्या साधुसंतांस प्राप्त झाला, तो सगळा या पंचपदींत सांगितला आहे. शिवरामस्वामीचें बोधबासष्टी नांवाचें एक उपदेशपर प्रकरण आहे, त्यांतही मुमुक्षु-जनांस फार उत्तम बोध केला आहे. हें प्रकरण माझ्या तीर्थरुपांच्या संग्रही होतें, तें मी महाराष्ट्रविकर्त्यांकडे प्रसिद्धिसाठीं पाठविलें होतें. परंतु पुढें ते मासिक बंद पडल्यामुळें, सदर प्रकरण प्रसिद्ध झालें नाहीं. शिवरामस्वामींची आणखी कांही पदें येथें देतों.

भय कासयाचे आत्मानुभवी योगिया ॥ध्रु०॥
देह अहंभाव त्यागी । मृत्यु मारुनिया अंगीं । देव आपणचि झालिया ॥१॥
योग कर्मातें गाळी । ज्ञान संशयातें टाळी । आपुल्या ठायासी आलिया ॥२॥
पूर्णानंदें पूर्णपणीं । दुजयातें दृष्टी नाणी । शिवरामचि होउनि ठेलिया ॥३॥

निजीं नीज लागली मज माये । स्मरणाचा आठव तोहि नोहे नोहे ॥ध्रु॥
जागृति स्वप्न सुषुप्ति हारपली । तूर्या तेथें विरोनियां गेली ॥१॥
ब्रह्माविष्णुहरिहरादिक मूर्ति । मजमाजी स्मरोनी उठताती ॥२॥
पूर्णानंदी मी सहज निजों गेले । शिवरामी उठोंचि विसरलें ॥३॥

संत दयाळ कसे । राजा - रंक जयां सरिसे ॥ध्रु०॥
देउनि भेटी तोडिति माया । नेउनि दाविति निजपदठाया ॥१॥
श्रवणी पाजुनि अमृतवाणी । नेउनि दाविति चिन्मयखाणी ॥२॥
शिवरामाचें अभिनव लेणें । लेवविलें मज पूर्णकृपेने ॥३॥

तेचि गत बाई । आचार तिचे ठायीं ।
जाणिवेचा बोल अंगीं येऊं दिला नाहीं ॥ध्रु०॥
सत्कर्माचा सडा बरा घालुनियां द्वारी ।
माजघरचि बोज बरी दावि लोकाचारी ॥१॥
निष्कामाचें चहूं कोनीं सारविलें घर ।
सुरंग रंग रंगमाळ घालि निरंतर ॥२॥
घवघवीत प्रेमकुंकूं लावुनियां भाळीं ।
पूर्णानंदी शिवरामी विचरे वेल्हाळी ॥३॥

जीवगांठी समूळ छेदुनियां । उभा कैसा सन्मुख येउनियां ॥ध्रु०॥
कवण भाग्य नकळे मज माझें । दिली भेटी दयाळ गुरुराजें ॥१॥
दृश्य देखणें सर्व हिरुनि नेलें । मन माझें संकल्पशून्य केलें ॥२॥
स्फुरणाची मोडिली सर्व वाट । शिवरामी शिवराम असें दाट ॥३॥

हुकूम साहेबका । हम तो चोपदार बांका ॥ध्रु०॥
ब्रह्माविष्णुमहेशा । प्रभुका अवतार खासा ॥१॥
दश चारोंपर सत्ता । ब्रह्मा सत्यलोकका दाता ॥२॥
पूर्ण गुरु शिवराम बंदा । बंदगी करले येखादा ॥३॥

शिवरामस्वामींची अष्टोत्तरशत शिवबेल (अभंग), रामतुळसी (अभंग) व बोधामृत (श्लोक) अशीं तीन प्रकरणें बेळगांव येथील रामतत्त्व प्रकाश छापखान्याच्या मालकांनीं प्रसिद्ध केलीं आहेत. हीं प्रकरणे शिवरामस्वामीनींच रचिलीं आहेत, याबद्दल शंका नाहीं; पण ‘रामतुळसी’ प्रकरणाच्या शेवटीं ‘नारायण पाहीं अष्टोत्तरशत । शिवरामी बाहात रामतुळसी ॥’ असा जो चरण आहे, त्याचा अर्थ बरोबर लागत नाहीं. त्याच्या जागीं ‘नारायणपायी अष्टोत्तरशत । शिवराम वाहात रामतुळसी’ असा मूळ चरण असावा असें वाटतें. हें रामतुळसी प्रकरण फार गोड आणि अत्यंत भक्तिपूर्ण आहे. पुढील अभंग पहा:-
जेणें हें ब्रह्मांड सत्यत्व पैं भासे । तो राम आभासे चराचर ॥५॥
चराचरीं अवघें रामरुप झालें । मी तूंपण नेलें रामराजें ॥६॥
रामीं कामना ही रामी राम पाहीं । राम होउनि राहीं रामरुपी ॥७॥
विकल्प संकल्प मनाचे व्यापार । जाणता निर्धार रामराजा ॥१०॥
राजा इंद्रियांचा मनातें चाळवी । बुद्धीतें बोधवीं स्वसत्तेनें ॥११॥
बुद्धीतें बोधवी निश्चय करवी । अकर्ता म्हणवी रामराजा ॥१३॥
आपण श्रीराम कानातें ऐकवी । त्वचेतें जाणवी उष्णशीत ॥१७॥
सीताराम डोळां रुपानें दाखवी । रसनें चाखवी नानारस ॥१८॥
नाना परिमळ प्राणा हुंगवीत । तेजें भासवीत दिवा जैसा ॥१९॥
दिवीं जे करिती इंद्रियव्यापार । राम निर्विकार साक्षीमुख ॥२०॥
मुखीं जे बोलवी नाना शब्दरचना । तोचि रामराणा घरा हाती ॥२१॥
हातीं राम माझा देववी घेववी । चरण चालवी पाउलातें ॥२२॥
राम देखों स्वप्नी राम देखों शयनीं । जागृती नयनीं राम देखों ॥९३॥
राम डावा उजवा राम मागें पुढें । रामाचें रुपडें सबाह्येसी ॥९४॥
राम सर्वांहूनि वरता अंतराळी । पाताळाचा तळीं राम देखों ॥९५॥
सबाह्य कोंदले राम सीतापती । आकारली मूर्ति विश्वाकार ॥९६॥
हे एकंदर अभंग ११० आहेत. बोधामृताचे श्लोक ५२ असून त्यांतील पहिल्या ३५ श्लोकांत सद्गुरुस्तुति केली आहे. ह्या प्रकरणाचे शेवटचे दोन श्लोक असे आहेत: -
भजन निजगुरुचें सर्वभूती करावें । गुरुचरण पहाया सर्वकाळीं झुरावें ॥
गुरुमुख निज बोधें चित्त आधीं भरावें । गुरुवर शिवरामें बोलिलें आचरावें ॥
वंदूनि नारायणदेव पाउलां । बोधामृत ग्रंथ जगासि अर्पिला ॥
संतांसि जैं मानितसेल पाउलां । बोधामृत ग्रंथ जगासि अर्पिला ॥
संतांसि जै मानितसेल निश्चिती । तरी विचारा शिवरामभारती ॥
बोधबासष्टीचा शेवटचा चरण असा आहे: -
‘बासष्टी पड बोधाचें । जीवें करि जो वचनाचें ।
बळ हें श्रीगुरुचरणाचें । शिवरामचि होउनि नाचे ॥’
शिवबेल हें प्रकरण शिवरामस्वामीकृतच होय, हें त्याच्या शेवटच्या चरणावरुन स्पष्ट होतें:-
पूर्ण शिवरामी अष्टोत्तरशत । शिवराम वाहत शिवबेल ॥१०८॥
ह्या प्रकरणांत स्वामीनी आपला परमार्थनुभव वर्णिला आहे, ह्यांतील कांहीं अभंग पुढें दिले आहेत:-
नाहीच वियोग शिवाचा मजला । एकाकार झालों शिवरुप ॥९८॥
ऐसा कोणी नाही शिवाजीसारिखा । जेणें आत्मसखा भेटविला ॥९९॥
भेटता आणि भेटी भेटणे न दिसे । स्वयं शिव भासे आत्मरुप ॥१००॥
आत्मा अंतरीचा जीवाचें जीवन । प्राणाचाही प्राण शिवदेवो ॥१०१॥
शिवाच्या वियोगें जंव द्यावा प्राण । विवेकें येवोन ऐसें वाटे ॥१०३॥
वाटे जातां शिव देखिला अवचट । येणें जाणें खुंटे तेचि वेळां ॥१०४॥
वेळोवेळां मज बोलतां चालतां । शिवरुपी ममता लागली हे ॥१०५॥
लागलें शिवसुख आवडी वाढली । ओळंगू लागली मोक्षलक्ष्मी ॥१०६॥
लक्ष्मीच्या कडीये नारायण पढिये । शिव आवडीये वानूं किती ॥१०७॥
गंडीकाख्यानाचे शेवटचा श्लोक असा आहे: -
ऐशा लिला नाथगणेश कर्ता । जो नाममात्र जिवक्लेशहर्ता ॥
तो शीवरामा स्मरणीं रिघोनी । भरी स्वनामामृत नित्य गोणी ॥२३॥
ह्या श्लोकांतील नाथगणेश या नांवाचा उल्लेख पाहिला म्हणजे सदर काव्याचा कर्ता शिवरामस्वामी कल्याणकरांहून निराळा असला पाहिजे, हें उघड होतें. महाराष्ट्रकवि मासिक पुस्तकांत शिवकथामृत नामक एक मोठें काव्य प्रसिद्ध झालें आहे, तें शिवराम स्वामीचेंच होय. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडावर ही प्राकृत टीका आहे; अध्याय २२ असून श्लोकसंख्या सुमारें १२०० होईल. या काव्यांत ओवी, पदें व श्लोक इत्यादि वृत्तांचा उपयोग केला आहे. एकंदर काव्य सामान्य प्रतीचें दिसतें; भाषाशुद्धीकडे फारसें लक्ष्य दिलेलें दिसत नाहीं. काव्यांतला मुख्य रस् ‘भक्ति’ असून, कथाभागपरत्वें इतर रसांचीही थोडथोडी झांक मारते. ह्या काव्यावरुन व ‘शिवबेल’ प्रकरणावरुन शिवरामस्वामी शिवोपासक होते, असें दिसतें. शिवकथामृतांत शिवरामस्वामींनीं आपल्या आई-बापांचा व गुरुंचा सर्वत्र उल्लेख केला आहे:-
नारायणा शरण जातां । चरणींचा तो आमोद घेतां ।
त्या सुखें स्फुरली शिवकथा । श्रोता वक्ता शिवरावो ॥५०॥
हा बलात्कार लक्ष्मीपतीचा । तोचि कर्ता जाला कवित्वाचा ।
चेववूनि शिवरामवाचा । रची सुख्याच्या ग्रंथातें ॥५१॥
अध्याय १ ला.
लक्ष्मीनारायणा शरण । गोकर्णक्षेत्रमहिमावर्णन ।
श्रोतीं व्हावें सावधान । निरोपण अवधारा ॥४४॥
अध्याय २ रा.
ब्रह्मोत्तर खंडीची हे कथा । लक्ष्मीपतीच ग्रंथकर्ता ।
पूर्णानंदे रसिक वक्ता । शिवरामदाता गुरुरावो ॥३३॥
अध्याय ३ रा.
लक्ष्मीपतीनें धरुनि हातीं । शिवकथा मज दाविली निश्चितीं ।
ये‌र्‍हवी मज कैंची इतुकी मती । जे शिवकीर्ति वर्णावया ॥२९॥
अध्याय ५ वा.
ब्रह्मोत्तरखंडांतील कथाभागावर शिवरामस्वामीकृत शिवकथामृत, श्रीधरकृत शिवलीलामृत व मोरोपंतकृत ब्रह्मोत्तरखंड, असे तीन मराठी ग्रंथ आहेत; त्यांत शिवलीलामृत हाच ग्रंथ अधिक चांगला आहे व त्या मानानें त्याची लोकप्रियताही विशेष आहे.
विस्तारभयास्तव शिवकथामृतांतले वेंचे येथें देतां येत नाहींत; तरी तो ग्रंथ वाचकांनी महाराष्ट्रकवि मासिक पुस्तकांत वाचावा, अशी विनंति आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP