दांभिकास शिक्षा - ६०११ ते ६०२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६०११॥
परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥१॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥२॥
सोंवळ्याची स्फीति । क्रोधें विटाळला चित्तीं ॥३॥
तुका ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥४॥
॥६०१२॥
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥
अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥२॥
मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥३॥
तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥४॥
॥६०१३॥
ऐसे संत झाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥२॥
भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥३॥
तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥४॥
॥६०१४॥
जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥
आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥२॥
सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥३॥
तुका ह्मणे असल जाती । जातीसाठीं खाती माती ॥४॥
॥६०१५॥
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥
हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥२॥
साकर ह्मणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥३॥
तुका ह्मणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥४॥
॥६०१६॥
मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी ॥१॥
वाळवंटीं साकर पडे । गज येउनि काय रडे ॥२॥
झाला हरिदास गोसावी । अवघी मायिक क्रिया दावी ॥३॥
पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥४॥
प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ।
ब्रह्मज्ञान वाचे बोले । करणी पाहतां न निवती डोळे ॥६॥
मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥७॥
तुका ह्मणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥८॥
॥६०१७॥
वरतें करोनियां तोंड । हाका मारितां प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातोइ काय तें कळेना ॥२॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देईल ह्मणऊनि ॥३॥
पोटा एका साठीं । तुका ह्मणे झाले कष्टी ॥४॥
॥६०१८॥
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥
काय हातीं लागे भुसांचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुन काय ॥२॥
कवित्वाचे रुढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरकान्मय ॥३॥
तुका म्हणे देव केल्याविण साह्य । फजिती ते आहे लटक्या अंगीं ॥४॥
॥६०१९॥
तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥
अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥२॥
कासया मोकळ । भोंवते शिष्यांचे गाबाळ ॥३॥
तुका म्हणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें ॥४॥
॥६०२०॥
भजन या नासिलें हेंडि । दंभा लंडा आवडी ॥१॥
जेवीतना आइता पाक । नासी ताक घुसळुनि ॥२॥
एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥३॥
तुका ह्मणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2019
TOP