दांभिकास शिक्षा - ६०६१ ते ६०७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६०६१॥
गळां घालोनिया माळा । केला रामानंदी टिळा ॥१॥
टाळ मृदूंगाचे घोळ । नित्य मांडिला गोंधळ ॥२॥
परी नाहीं भक्ति प्रेम । मनीं नाहीं सिताराम ॥३॥
तुका ह्मणे ढोंग केलें । संतपणे वांयां गेलें ॥४॥
॥६०६२॥
एक म्हणती गुरु गुरु । भोंवती भार शिष्यांचा ॥१॥
पुच्छ नाहीं पायी चारी । मनुष्य परी कुतरें तें ॥२॥
परनारी पयपान । पेंड खाणें माजविलें ॥३॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । नर्का प्रति जावया ॥४॥
॥६०६३॥
गोसावी झाला गुंडा । केला परमार्थाचा लुंडा ॥१॥
बाइलेसी ह्मणे बाई । बोडी डोई खापराची ॥२॥
तुका ह्मणे अच्युत । या गाढवा प्रायश्चित्त ॥३॥
॥६०६४॥
मुद्रा घाली कानीं । जन मानाया लागुनी ॥१॥
टिळे टोपी उंच दावी । मानाया लागुनी गोसावी ॥२॥
स्नान विधि बुडविला । पुढें भोग ओढवला ॥३॥
तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥४॥
॥६०६५॥
राजसाच्या सभे संगीताचें गाणें । तेथें ब्रह्मज्ञान काई काज ॥१॥
सार मंडण हातीं धरिती रुद्रविण । सांगा जन्ममरण चुके कोणा ॥२॥
तुका ह्मणे अवघ्या जाणाव्या त्या चेष्टा । उगलेचि निष्ठा धरितां भले ॥३॥
॥६०६६॥
जपाचें निमित्त झोपेचा पसरु । देहाचा विसरु पाडूनियां ॥१॥
ऐसी तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरुप्याची ॥२॥
सेवेसी विकिलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥३॥
तुका ह्मणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करुं आह्मी ॥४॥
॥६०६७॥
गाजराची पुंगी । तैसे नवे झाले जोगी ॥१॥
काय करोनी पठन । केली अहंता जतन ॥२॥
अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥३॥
तुका ह्मणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥४॥
॥६०६८॥
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोठा करिताती ॥१॥
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥
॥६०६९॥
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥
शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥
तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभक्ति । व्यापार करिती संसाराचा ॥३॥
॥६०७०॥
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाठीं देशोदेशीं ॥१॥
नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पाहती पक्वान्न क्षेत्रीचें तें ॥२॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP