दांभिकास शिक्षा - ६१११ ते ६१२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६१११॥
समावे कारणें । नाहीं सोसत धरणें ॥१॥
लादी थिंके लाजिर्वाणी । हीन कमाईचें धाणी ॥२॥
पुष्पापाशीं नाका । नांवें दुर्गंधीच्या थुंका ॥३॥
तुका म्हणे किती । नाहीं उपदेश जाती ॥४॥
॥६११२॥
मैंदा बोली बरी असे । वाटे घालितसे फांसे ॥१॥
दिसे कैं बरी चांग । नव्हे भोळी तेचि मांग ॥२॥
पोटीं माळा कंठीं । चेपी अंधारीं ते धाटीं ॥३॥
तुका म्हणे तोचि पुंड । वरी वाजे यमदंड ॥४॥
॥६११३॥
शहाणा अत्यंत । जगीं मी एक पंडित ॥१॥
म्हणे विठोबाचा दास । पाहे परस्त्रीची आस ॥२॥
अंगीं नाहीं क्षमा दया । म्हणे देव देवराया ॥३॥
तुका म्हणे सोंग । नाहीं त्यापाशीं श्रीरंग ॥४॥
॥६११४॥
ऐसें पाहीं तुज कांहीं । वेद नाहीं सांगाती ॥१॥
दिव्य शृंगारिली काया । मागावया भिक्षेसी ॥२॥
पर्वकाळीं साधी दान । मंत्रध्यान सोडिलें ॥३॥
घेऊं नये प्रतिग्रह । तैसें गृह लोभीष्ठ ॥४॥
दावीं सोंग लोकांपुढें । लक्षी द्वाड द्रव्यासी ॥५॥
द्रव्य मिळे न ज्या दिसीं । पिशाऐशीं शरीरें ॥६॥
तुका तळमळी मन । जैसा श्वान पिसाट ॥७॥
॥६११५॥
टाळ घोळ गीत नृत्य । करी नित्य कामने ॥१॥
नाहीं शंका मागे दान । थुंके जन त्या कर्मा ॥२॥
टिळा टोपी कंठीं माळा । शोभे गळां मेखळा ॥३॥
नानावेषें सांगे गोष्टी । करी आटी द्रव्यासी ॥४॥
तुका म्हणे हित पाही । नेणे कांहीं मी कोण ॥५॥
॥६११६॥
उदकी पिशवी हालविती दाढी । माळे मणी ओढी निंदेचिया ॥१॥
त्याचे फळपाकीं यमाचिये दंड । घर केलें कुंड कुंभपाकीं ॥२॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुकेनें कुतरा जपकरी ॥३॥
तुका म्हणे स्नान केलें मळमुत्र । जेवविले पित्र अमंगळ ॥४॥
॥६११७॥
काय लटिकाची खरा । सोंग दाखवी पसारा ॥१॥
सर्व दिसतसे शिण । जरी बाग सोंग जाण ॥२॥
बहुरुपी नट । लावी जनालागीं चट ॥३॥
तुका म्हणे ऐसें सोंग । आम्ही जाणतसों ढोंग ॥४॥
॥६११८॥
टिळे माळा टोपी जयाचें स्मरण । लावितो करोन शुद्ध मुद्रा ॥१॥
भगवीं वसनें निर्मळ प्रावर्णे । शुद्ध उपकर्णे धूत असे ॥२॥
सोंवळ्याची स्फिति वागवी बहुत । जगासी आकांत दावी वरी ॥३॥
तुका म्हणे वरपंगीचें हें सोंग । भक्ति भावरंग तेथें कैंचा ॥४॥
॥६११९॥
करी दाटोनियां दोष । शिष्या देतो उपदेश ॥१॥
नाहीं स्वहित तें ठावें । जना करी खोटे गोवे ॥२॥
नाहीं ठावा पांडुरंग । दावी लटिकें तें सोंग ॥३॥
तुका म्हणे पुढें दगा । आला न कळे हें जगा ॥४॥
॥६१२०॥
मागीं बैसलासे मैंद । टिळे मुद्रा लावी शुद्ध ॥१॥
नम्र बोलतसे वाचा । खोटा भाव अंतरींचा ॥२॥
नेसे निरिया धोतर । जना दावी शिष्टाचार ॥३॥
येऊनि जवळी । दुष्ट कापितसे नळी ॥४॥
तुका म्हणे ते पातकी । जाणा विश्वासघातकी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP