दांभिकास शिक्षा - ५९६३ ते ५९७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५९६३॥
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥२॥
उष्टावळी करुनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥३॥
तुका ह्मणे बाहेरमुदी । आहाच गोविंदीं न सरती ॥४॥
॥५९६४॥
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥२॥
देवपूजेवरी ठेवोनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥३॥
तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥४॥
॥५९६५॥
माया ब्रह्म ऐसें ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥२॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दु:ख पावे ॥३॥
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥४॥
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजंट बोलणीं वारा त्यांचीं ॥५॥
तुका ह्मणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥६॥
॥५९६६॥
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशी कारण नाहीं देवा ॥२॥
जै जैई केलें तैसें ते पावती । भोग ते भोगिती केले कर्मी ॥३॥
आशाबद्ध नये करुं तें करिती । तुका ह्मणे जाती नरकामधीं ॥४॥
॥५९६७॥
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय नेणें न्यायें ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
तुका ह्मणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥
॥५९६८॥
काय काशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥२॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥३॥
तुका ह्मणे प्रेमें विण । बोलें भुंके अवघा शीण ॥४॥
॥५९६९॥
आमचे गोसावी अयाचितवृत्ति । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥
दगडाची नाव आधीं च ते जड । ते काय दगड तारुं जाणे ॥२॥
तुका ह्मणे वेष विटंबिला त्यांनीं । सोंगसंपादणीं करिती परी ॥३॥
॥५९७०॥
भजन घाली भोगावरी । अकर्त्तव्य मनीं धरी ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥२॥
नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवें आस ॥३॥
हें ना तैसें झालें । तुका ह्मणे वांयां गेलें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2019
TOP