श्रीगणेशायनम: । श्रीरामसमर्थ । महान साधू तत्वज्ञानी । मातां पिता श्रेष्ठ दोनी । वंदोनि श्री चापपाणी बोलू सद्‍गुरुकृपे ॥१॥
ब्रह्मज्ञान योगियांचे गुज । जें असे त्रिभुवनीं पूज्य । तेंचि प्राजल करुं आज । निज निर्धारे ॥२॥
माया ब्रह्माचा निवाडा । शुध्द परमार्थाचा धडा । मुख्य अभिमान सोडा । मुमुक्षु जनहो ॥३॥
अभिमान तो म्हणाल कैसा ॥ मी देहीं म्हणतो ऐसा । या देहाचा नाहीं भरवसा । उदकीं जैसे प्रतिबिंब ॥४॥
देही म्हणता अवघें बंधन । देहातीत आत्मज्ञान । ऐसा आधार जाणून । भुलले जन पुन्हां किती ॥५॥
देहाभिमान विलक्षण । कामक्रोधाचें बंधन । म्हणती झाले ब्रह्मज्ञान । प्रादुर्भाव कलीचा ॥६॥
क्रियेविण ब्रह्मज्ञान । म्हणे सद्‍गुरु झाले प्रसन्न । हर हर तोचि नाडला जाण । जीव विपरीत ज्ञानें ॥७॥
अर्थ गहन वेद मथित । ऐसें बोलती पंडित । धन्य म्हणविती जगांत । संमत घेवोनि भागवत गीता ॥८॥
पुस्तक ज्ञानी मिथ्या म्हणों तरी । अवघ्या बुडती नरनारी । परी भाविक नाडिती भारी । शब्द ज्ञानी पंडित ॥९॥
पुस्तकज्ञान सत्य कैसें । असत्य म्हणता लागेल पिसें । सत्या सत्य जाणोन विलसे । अनुभवी ज्ञानराशी ॥१०॥
चार अवस्थें बाहेर ब्रह्मज्ञान । डन्मनी पलीकडे जाण । तरी हा बोलतो कोण । त्याची शुध्दी तया नाहीं ॥११॥
तो जीव होवोनी राही । तेथें ज्ञान नाही नाहीं । शव्दब्रह्मी भ्रमला पाही । अनुभव तो वेगळा ॥१२॥
चित्राचा वाघ केला । तो काय मारिल मेंढयाला । प्रेताचा गौरव केला । काय सुख तयासी ॥१३॥
तेसें शब्द लाघव विचार । कैसा तरेल भवसागर । दृश्यष्ट्रा दर्शन प्रकार । त्या वेगळे स्थान माझें ॥१४॥
अहंसोहमाहून आगळा । माझा मी असे भला । त्रिगुण रहित असे संचला । निवांतपणें ॥१५॥
ऐसा वदवी सिध्दांत खरा । तूं निर्गुण म्हणतोस पामरा । विश्व जगाचा थारा । परमात्मा म्हणतोसी ॥१६॥
त्या परमात्म्याची चितशक्ती । नाहीं बा तुज कल्पांती । देह प्रारब्ध गती । चुकणार नाहीं ॥१७॥
ही असेल तैसी घडो । परी आत्मानुसंधान न मोडो । व्यर्थ नको बडबडो । अवघड असे तुजला हें ॥१८॥
पहारे भ्रांती बसली जडोन । कोणी केला तुझा अपमान । तेणें तुझें दुखलें मन । होय कीं नव्हें ॥१९॥
एक ब्रह्म द्वितिय नस्ती । ऐसे कथिती वेद श्रुती । मन आणि दु:खित स्थिति । कोठून आली ॥२०॥
तुज ब्रह्म म्हणविसी । आकाररहित अससी । तरी कैवारे उरशी । जगामाजीं ॥२१॥
जगी भरोन उरला । तोचि ह्मणविसी भला । ऐसा तुज भ्रम झाला । घेऊन शास्त्र संमत ॥२२॥
तरी ऐसा पडू नको कुव्यांत । अनुभवें बोल बोलती संत । तेचि शब्द बोलोनि येथ । घात करिसी आपुला ॥२३॥
जगी म्हणवोनि महंत । बुडाविसी जीव अनंत । आतां शुध्द करोन चित्त । आदी अंत पहावा ॥२४॥
परमात्मा निर्गुण निराकार । असोन झाला साकार । तैसाच साधूचा प्रकार । करिती सर्वही कर्मे ॥२५॥
परी ते कर्मे करोनि अलिप्त । तूंही मानिसी तैसेचि सत्य । या अहंकारे होसी उन्मत्त । येणेंचि जीव नरकी बुडती ॥२६॥
अरे ऐसा अधिकार आला । तो कोणी सांग पाहिला । जोंवरी तूं जाणता याला । तोवरी अल्पज्ञान ॥२७॥
चौदेह वाचा चारी । चार वेद अवस्था चारी । चार मात्रा पंचतत्वेंवरी । पंचविषयीं पंचकोश ॥२८॥
पिंड ब्रह्मांड बाह्य सोहळा । अघटित सच्चिदानंद रसभरित । उपनिषदांचा मथितार्थ । तें तूं स्वरूप ॥२९॥
ऐसें शब्दें अनुभव येतां । तरी सृष्टिक्रम झाला नसतां । तें गुरुगम्य नये हातां । शब्दातीत ओळखण ॥३०॥
ऐसी परंपराची खूण । तेथें काय शब्दज्ञान । गुरुपुत्र तें जाणून । भ्रांत म्हणती तुजलागी ॥३१॥
दरवेशी यानें मर्कट धरिला । शब्दज्ञानें तया पढविला । घरोघरी संसार माडिला । पोटास्तव ॥३२॥
म्हणे तुझा पति आला । तो लाजून बसे कोपर्‍याला । सासूची घागर म्हणून दिला । दगड एक मस्तकीं ॥३३॥
तत्क्षणीं क्रोधें भारी । फेकून देत दगड दुरी । पतिचा म्हणतां सत्वरी । प्रेमें घेत मस्तकीं ॥३४॥
काय लाज मर्कटाची । क्रोध येवोन करी ची ची । शिकवण दरवेशाची । मर्कट तो केवळ पशू ॥३५॥
तैसें तुझें गुरुचे ज्ञान । हें दृष्टांते ये दिसोन । पोटासाठीं पराधीन । मर्कटा क्रिया करितोसी ॥३६॥
राघवाचे भक्तिविण । सत्य सत्य हे अज्ञान । तुझे गुरुही भ्रमिष्ट जाण । शब्दज्ञान बडबडसी ॥३७॥
अज्ञान गुरु अडक्यास तीन । मिळाले तरी त्यजावे जाण । लावणी लाविती ब्रह्मज्ञान । गुरुगम्य ते वेगळे ॥३८॥
कर्म उपासना तुच्छ मानिती । सत्कर्म कर्तव्य ज्ञान नीती । जे प्रथमांग वेद बोलती । साधकासी पाहिजे ॥३९॥
दुसरें अंग उपासना । तिसरें अत्मज्ञान जाणा । ऐशा सत्पुरुषांच्या खुणा । तुज कैशा न मानवती ॥४०॥
तयांसी तूं दुषण दिलें । कर्म उपासने विण ज्ञान स्थापिलें । हें उचित कैसे गमलें । विवरोन पाहा ॥४१॥
वेदान्त म्हणजे क्रिये सहित । आणि पाहिजे अनुभव युक्त । क्रियेवीण जो वेदांत । तोचि घात जिवाचा ॥४२॥  
स्त्रीपुत्र प्रसवली कोणी । थोर झाला तत्क्षणीं । क्षुधा लागली म्हणोनी । अन्न मागें हंडाभरी ॥४३॥
तो पुत्र नव्हें ऐसें म्हणती । तैसें कर्म उपासना नीति क्क। सक्रिया वैराग्य विवेक ज्योती । अणुभरी नाही ॥४४॥
कामक्रोध असतां । आत्मज्ञान नव्हे सर्वथा । जें भासले तें मिथ्या । सत्य सत्य जाणवें ॥४५॥
आत्मज्ञानाचे मुख्य कारण । सगुण पाहिजे सुप्रसन्न । म्हणोनिया भावे भजन । केलेंचि पाहिजे ॥४६॥
सगुण साक्षात्‍ नाही झाले । नित्यानित्य नाहीं ओळखिलें । आणि म्हणतां आत्मज्ञान झाले । तरी हे विपरीत ॥४७॥
वेदशास्त्र बाह्य वर्तन । दुराचरण रात्रंदिन । काम क्रोधी अंत:करण । गर्व ताठा भरलासे ॥४८॥
जाणे मानापमान । मना आलें तैसें वर्तन । करी सत्याचें खंड्ण । समाधान नाहीं अंतरीं ॥४९॥
परपीडा निंद्दा करीत । साधू देव ब्राह्मण संत । वेदशास्त्र पुराणमत । याचा करी अव्हेर ॥५०॥
तीर्थ व्रत नित्य नेम । सगुणोपासना भजन सुगम । जप तप साधन परम । दूषण देती सर्वासी ॥५१॥
भेदिनी दुजाचे अंत:करण । भरी भरोनि आपण । ऐसे कलियुगीचें जन । त्यांचे वदन न पहावें ॥५२॥
त्यांसी दूषणही न द्यावें । त्यांचे शहाणपण न ऐकावें । त्यांचें गून न सेवावें । वाद त्यांसी करूं नये ॥५३॥
केव्हांच देतील दगा । अभिमान लावितील अंगा । उपासना पावेल भंगा । हातोहातीं ॥५४॥
इतके प्रकार सांगाया कारण । कली दुर्जन वाढला गहन । बहुत पावती पतन । साधनांतें सोडोनी ॥५५॥
वरील बोध घेऊन ध्यानीं । आतां कांही करा करणीं । तेणे पावाल समाधानी । हे सत्य वेदाज्ञा ॥५६॥
सहज सद्‍गुरु कृपा ओळे । वेदशास्त्र ज्ञान कळीं । साधनी चित्त असतां भलें । सहज होय जिवन्मुक्त ॥५७॥
 प्रथम आवडे परमार्थ । त्यानें हस्तगत होय चित्त । तैसेंचि साधन करितां सतत । समाधान प्राप्त होय ॥५८॥
ज्यासी पाहिजे शुध्दज्ञान । त्याचें सुप्रसन्न असावें मन । वेद्शास्त्र पुराण श्रवण । रात्रंदिन करावें ॥५९॥
सतत मनन असावें । मनीं अनुसंधान ठेवावें । स्वधर्म रक्षण करावें । उपासनीं प्रेम ॥६०॥
दया लीनतां आणि शांती । आश्रम धर्म न्याय नीती । असोनि मुके निंदा स्तुति । साधू ब्राह्मणीं पूर्ण आस्था ॥६१॥
विश्व अवघें परब्रह्म समान । आपण व्हावें अणुहून लहान । टाकून गर्व दंभ मान । आदर राखावा गुरुवचनीं ॥६२॥
घेवोनी सद्‍गुरु वचन । श्रीरामरुप करी मन । अखंड करी रामचिंतन । सुखदु:खसम मानावें ॥६३॥
टाकून निद्रा दुर्गुण आळस । गुरुआज्ञा विश्वास । विवेक वैराग्य भाग्यास । उणे नसावें ॥६४॥
प्रपंच व्यापारी खबरदार । संचित प्रारब्ध कलेवर । प्रवृत्तीमार्ग साचार । आपण वेगळे असावें ॥६५॥
जोवरीं देहाची संगती । तोंवरी पापें पदरी असतीं । त्यांची व्हावया निवृत्ती । अनुताप पूर्ण पाहिजे ॥६६॥
तरी तो कोणता अनुताप । जन्मजन्मांतरीचें पाप । जीवासी लागलें माप । दरिद्र दु:क्ज अपजय ॥६७॥
आपणा वाटे मी शहाणा । परि लोक निंदिती आपणा । जीव बहू श्रमला जाणा । क्लेश भोगी अनिवार ॥६८॥
पूर्व पापाची संचिती । न चाले उपाय युक्ती । कामक्रोधांची संगती । भ्रांती पडे ममत्वें ॥६९॥
सूक्ष्म अहंकार जाईना । वैभवेच्छा सुटेना । वृत्ति आवरितां आवरेना । म्हणोन तळमळ असावी ॥७०॥
संसार गिरीं कैसा उल्लंघावा । काय भोग भोगावा । काय करुं देवाधिदेवा । ऐसी करुणा भाकावी ॥७१॥
तैसेची गुरुसी पुसावें । नित्य नेमें अंतर शोधावें । सगुण दुर्गुण पाहावें । कैसे उठती ॥७२॥
तरुसी लागले भिरडा । कित्येक दिसा नासेल झाड । तैसे विवेकें विवरोनी जाड । दुर्गुणासी त्यागावे ॥७३॥
तो विवेक कैसा करावा । साधनीं देह कैसा असावा । जेणें तुटेल हा गोवां । पुढील समासीं निरुपण ॥७४॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते सप्तोमोध्यायांतर्गत तृतियसमास: । ओवीसंख्या ॥२०८॥
॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु  ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP