अध्याय सातवा - समास चवथा
श्रीसद्गुरुलीलामृत
श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ ।
मागां जो प्रश्न झाला । तोचि येथें अनुवादला । संसारगिरी उल्लंघिला । पाहिजे कैसा ॥१॥
सुखें उतरवेल संसार । माता पित्यासह उध्दार । तें तुज सांगेन सार । वेदशास्त्र गुज ॥२॥
योग तपानुष्ठान तीर्थ । धर्म व्रत नेम वेदान्त । सिध्दांत मतितार्थी निभ्रांत । आत्मदर्शी होइजे ॥३॥
गुरुकृपेचें अंजन । सहज होय आत्मज्ञान । असत्य मान जो सत्य जाण । गुरुसहित लटिका ॥४॥
त्याचें न ऐकावें भाषण । मोठें चातुर्य शहाणपण । मिथ्या पोचट शब्दज्ञान । संगति पीडा करील ॥५॥
हें एक मुख्य लक्षण । आतां सांगतो साधन । ब्रह्मकर्माची खूण । तुम्हांप्रती ॥६॥
संध्या स्नान प्राणायाम । अखंड जपा रामराम । आतां ज्ञानयज्ञ सांगतो सुगम । विवेक अग्नि पेटवावा ॥७॥
कामक्रोध जाळावे दोनी । निष्काम वृत्ती ठेवोनी । नामरुपी चित्त जडोनी । असावें सर्वकाळ ॥८॥
दया शांती करी जतन । अक्रोध सर्वाभूतीं लीन । जितेंद्रिय श्रवण मनन । जन प्रियत्वा असावें ॥९॥
समसमान सुखदु:ख । अपमान नसावा देख । शत्रु मित्रा मान एक । भगवद्भाव सर्वाठाईं ॥१०॥
आळस निद्रा आणि तृष्णा । लोभ दंभ आणि वासना । यांचे बीज भाजूनी म्हणा । अखंड मुखीं रामराम ॥११॥
देह ठेवोनी प्रारब्धावरी । उद्योगधंदा सर्व करी । परी आपण राहे दुरी । श्रीराम चिंतनीं ॥१२॥
ह्रदयांत स्मरण श्रीराम । म्हणजे वैखरी जपे नाम । ऐसा ज्याचा नित्य नेम । न विसंबे एकही पळ ॥१३॥
विश्वासपूर्वक वचन प्रमाण । तेथें सत्य आत्मज्ञान । या व्यतिरिक्त पाखंड जाण । कलीमाझी उदंड ॥१४॥
जीवन्मुक्ताचें लक्षण । देहदु:खी नस्से मन । अखंड ज्याचें समाधान । स्वानंद भरीत ॥१५॥
नामरुपी जडलें चित्त । चारी वाचा नाम गर्जत । धन्य तो एक जगांत । धन्य कूळ धन्य देश ॥१६॥
सर्व दु:खाचा परिहार । करी नामाचा गजर । कामक्रोध आवर आवर । आतां तरी ॥१७॥
नामस्मरणाविण कांही । दुजी वार्ता तूं न घेई । अखंड जप वैखरी पाही । तेचि परेचें अधिष्ठान ॥१८॥
तेणीं होईल सर्व काम । हातां येईल पुरुषोत्तम । तोचि आत्मज्ञानी परम । तोचि एक गुरुपुत्र ॥१९॥
नामीं रंगलें अंतर । तोचि ब्रह्मज्ञानी नर । तेथें कोण वैभव काय थोर । हें एक तो जाणे ॥२०॥
तोचि गुरुपुत्र गहन । एरवी जे पुस्तकज्ञान । बहु जल्पती अज्ञान । अति सावध तेथें राहे ॥२१॥
आपलें निजनिष्ठेचें साधन । तेथून न ढळावें मन । ही तुज सांगितली खूण । साधकांची ॥२२॥
त्यानेंच पावसी आत्मज्ञान । बहुतेक करिती श्रवण । परी निभ्रांत न होती जाण । विरहित नामानुसंधानें ॥२३॥
पक्षी बोले गंगाराम । पोपटपंची चतुरकी नेम । परी त्यांचें तो न जाणें नाम । अजाणबुध्दी म्हणोनी ॥२४॥
तैसा देह अभिमानीं गुंतला । तो काय जाणें भगवंताला । कपटी ताठा गर्वी भला । धन्य म्हणे मी एक ॥२५॥
मज झालें आत्मज्ञान । जग अवघें अज्ञान । बुध्दी भेद विलक्षण । निर्गुण ठाव न लागे ॥२६॥
सगुणासी देव न म्हणत । अर्थाचा करी अनर्थ । कर्म उपासना म्हणे व्यर्थ । मीच म्हणे झालों देव ॥२७॥
काय पराक्रम केला । वेदशास्त्र धुंडाळोनि आला । परी अहंभाव नाहीं गेला । तो सत्य बध्दजीव ॥२८॥
कैसा ज्ञानी म्हणतोसी । मी ब्रह्म जाहलों म्हणविसी । तरी दीनरुप कां होसी । उत्तर कांही सुचेना ॥२९॥
असो ऐसें मानूं नये । भलतें भ्रमीं पडूं नये । साधन आपुलें सोडूं नये । महंतीसी फसोनी ॥३०॥
सकल देवांचा जो देव । साक्षात् परमेश्वर गिरिजाधव । तोहि स्मरे रामराव । सिध्दपणा न भोगी ॥३१॥
एवं देह जंव सगुण । तोंवरी न सोडावें साधन । जरी आले सिध्दपण । तरी भजन सोडू नयें ॥३२॥
ज्ञानीं ऐसे मानूं नये । सिध्दपणें वागूं नये । ज्ञानी ऐसे सांगूं नये । जनामध्यें ॥३३॥
येथें एक संशय आला । सिध्द होवोन मौनी झाला । बोध कैसा होईल जनाला । भवसिंधू तराया ॥३४॥
त्यासे एक प्रमाण । गुरु आज्ञा मुख्य जाण । तेणें उध्दरिती जन । भवार्णवा पासोनी ॥३५॥
गुरुआज्ञेवांचून कांही । बोध निश्चयें रुजणार नाहीं । यास्तव जंव आज्ञा नाहीं । तवं बोध करूं नये ॥३६॥
स्वयें करितां विवरण । आर्त सहज शिकती जाण । यास्तव अधिक उपाधी पासोन । अलिप्त असावें ॥३७॥
गुरुअंतरसाक्षी ज्ञाता । शिष्या अंगीं पात्रता येता । आज्ञा करिती क्षण न लागतां । जगा बोध कराया ॥३८॥
दुसरें सगुण उपासना । अखंड करितां चालना । सहज पावती समाधान । संगती होय फलप्राप्ती ॥३९॥
आणि या राघवाची भक्ती । वाढवावी यथाशक्ती । परी न वाढवावी महंती । सिध्दपणाची ॥४०॥
महंती वाढविता वाढेना । सहज धांवती जीन नाना । मृगांकासी शोधिती पहाना । घोर अरण्यांत ॥४१॥
निर्जन वनीं मैलागिरी । तो चंदन घरोघरीं । तैसें लोक बोधिले जरी । ज्ञानी ऐसें म्हणो नये ॥४२॥
पुनरपि ज्ञानाचें लक्षण । ऐक गुरुकृपेची खूण । दया शांति अति गहन । समदृष्टी असावी ॥४३॥
इंद्रियें जिंकावीं समस्त । होऊं न द्यावें मन व्यस्त । अक्रोध वृत्ती भाषण सत्य । भूतीं नम्रता असावी ॥४४॥
व्यवहार असावा युक्त । रजतम गुण विरहित । सगुणोपासना नेमस्त । प्रपंची परमार्थ साधावा ॥४५॥
अखंड पांचवी अवस्था । सदैव समाधान चित्ता । वेळ व्यर्थ न दवडितां । लय साक्षित्व ठेवावें ॥४६॥
सदोदीत राम चिंतन । कामक्रोधीं लोभी मन । कधीही नसावें जाण । अहंकार सतत छेदावा ॥४७॥
मोहमायेसी दूर करावें । जन प्रियत्व ही ठेवावें । दुर्बुध्दीसी फिरको न द्यावें । घरांत शांति असावी ॥४८॥
बायका मुलें अप्तगोत । सखे सज्जन अभ्यागत । यांचें रक्षण नेमस्त । साधन साधुनी करावें ॥४९॥
विवेकयुक्त अंत:करण । चित्त प्रसन्न करुन । निरंतर रामचिंतन । भक्तियुक्त करावें ॥५०॥
आतां ऐका वागणुक । नित्य नेम निशं:क । जेणें घडलें सार्थक । नर जन्माचें ॥५१॥
प्रात:काली प्रात:स्मरण । प्रथम नमावा गजवदन । जानकीजीवन उमारमण । साधू सज्जन ऋषीमुनी ॥५२॥
जनक जननी नद्यासागर । यासी करुनी नमस्कार । शुध्द करोनी अंतर । मानसपूजा करावी ॥५३॥
घालोनी सिध्दासन । श्वासोछ्वासीं नामस्मरण । अंतरीं घ्यावा सीतारमण । सायुधसालंकार ॥५४॥
तैसेंचि घ्यावें गुरुसी । पूजा करावी शोडासी । साधोनिया एकांतासी । नेत्रोमीलन करावें ॥५५॥
वृत्ती असावी स्वानंद स्मरणीं । चहूंकडील परतवोनी । बळेंचि लावा भगवच्चरणीं । विवेकें सतत ॥५६॥
विवेक वैराग्य नाम त्रिपुटी । असावी सदा गाठी । काम क्रोध मोह त्रिपुटी । दृष्टीसमोर आणूं नये ॥५७॥
मान अपमान समसमान । सुख:दुख एक जाण । चिंता नसावी तिळप्रमाण । रामस्मरणीं वैखरी ॥५८॥
बहूत विचारें वागावें । सदा संतोषी रहावें । देहां प्रारब्धीं टाकावें । संसारी प्रयत्न करावा ॥५९॥
वृध्दाचार कुलाचार लौकिक । कधीं सोडू नये देख । शास्त्र विरुध्द निंदिती लोक । ऐसें वर्तन असूं नये ॥६०॥
अन्यायें धन जोडूं नय । पर पीडा करुं नये । वादें भरी भरो नये । भांडू नये नास्तिकासी ॥६१॥
मन वृत्ती कोठें राहतें । चित्त काय चिंतित असतें । शोधावें हे विवेकपंथे । दुर्गुणातें त्यजावया ॥६२॥
अहंभाव वासना रहित । वागावया प्रयत्न सतत । करावा जाणोनि प्राप्त । कलियुग दुर्बुध्दीचें ॥६३॥
काळ जन आणि मन । हे ह्या कली़चे स्वाधिन । सध्दर्म सत्कर्म अनुष्ठान । करणें बहु कठिण असे ॥६४॥
कलीचा तो ऐसा नेम । कोणी न भजावा राम । योग जप तप होम । सत्क्रिया न करावी ॥६५॥
म्हणोन बहू सावधान । स्वधर्माचें करावे रक्षण । युक्त करोनी व्यवहार धन । प्रपंच करा दक्षत्वें ॥६६॥
करोनिया स्नानसंध्या । श्राध्दपक्ष प्रपंच धंदा । वैखरीसी विसर कदा । नामाचा पडो देवो नये ॥६७॥
मन चंचल फिरणार । परी वैखरी नसावा विसर । वेद शास्त्र गुरुवर । येथें आदर असावा ॥६८॥
देव साधू ब्राह्मण । यांचे करावें पूजन । आदि करोनि दुर्जन । भूती दया असावी ॥६९॥
सदा शांत असावें । निर्लोबी मन ठेवावें । विषय चिंतन नसावें । सतत करा अभ्यास हा ॥७०॥
कोणास तुच्छ करुं नये । गर्वे कधीं वागूं नये । असत्य भाषण बोलूं नये । उर्मी सतत अवरावी ॥७१॥
प्राणांत बेतला तरी । स्वप्नी न चिंतावी पर नारी । तेणें आकळिला श्रीहरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥७२॥
काय देहाचा भरंवसा । कोण दिवस येईल कैसा । काळ संगती सरसा । हे लहान थोर जाणती ॥७३॥
काम क्रोध गर्व वासना । शोक चिंता वैभव जाणा । सुखदु:खादि कल्पना । हेचि देहाचें देह पण ॥७४॥
चित्त शुध्द नाहीं झालें । तरी जन्मा येवोनी काय केलें । नाही देवा ओळखिलें । स्वधर्म तो कोण जाणे ॥७५॥
सन्मार्ग तो नाही ठावा । संत संग कोणी करावा । आयता सद्गुरु भेटावा । म्हणती वाचाळ ॥७६॥
तरी ऐसें करुं नये । प्रयत्नें संती शरण जाये । नातरी वासना विये । चौर्यंशी लक्ष योनी ॥७७॥
संतसंगाची लक्षणें । सांगतों जी शाहाणे । साधन करा प्रयत्नें । निज हितासी ॥७८॥
मनोवृत्तीस अवरावें । देह दु:ख विसरावें । धैर्य बल सांभाळावें । विषय वासना अवरावी ॥७९॥
छळ कपट शब्द बाण । द्रव्य दारा वर्जित मन । जाणोन संताची खूण । सर्वत्रा लीन असावें ॥८०॥
श्रीरामी प्रेम फार । अभिमान नसे तिळभर । सगुणोपासना निरंतर । हर्ष ना विवाद ॥८१॥
भय चिंता भेदाभेद । नसे लोभ ममता मद । उद्विग्न चित्त आणि क्रोध । निंदा न करी कोणाची ॥८२॥
न सेवी कोणाचें वित्त न । करी कोणाचा घात । परदारा वर्जित चित्त । आवडी संतसंगाची ॥८३॥
असत्य न बोले वाणी । जन प्रिय मधुर वचनी । दया शांती अंत:करणीं । परदु:खें दु:खें मन ॥८४॥
पर उपकारी शूर । अंगी वैराग्याचा भर । विवेक जागृत बरोबर । तोचि संत कदर जाणें ॥८५॥
ऐसी लक्षणें धरावीं । संतसंग गोडी घ्यावी । नित्य जिवी धरावी सद्गुरुवचनें ॥८६॥
इति श्रीसद गुरुलीलामृते सप्तोमोध्यायांतर्गत चतुर्थसमास: । ओवीसंख्या ॥८६॥
॥ श्रीगुरूचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 23, 2019
TOP