तनू जीर्ण झाली बहू कृत्य केलें । गघूनायकें शीघ्र पाचारियेलें ॥
तदा रामरुपीं समाधिस्त होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥११॥

श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरु ब्रह्मचैतन्यायनम: ।
जयश्रीसद‍गुरु माहेरा । करुणार्ण्दव अघहरा । मायबाप सोयरा । निश्वयात्मक तूं एक ॥१॥
सूक्ष्म वासनें जन्म झाला । तिनें अहंता पती वरिला । औट चाहूर वतनाला । भूल पडली पाहोनी ॥२॥
द्वैत सासू आणि श्वशूर । मजवरी प्रेम तयांचे फार । लोभ मोह दोघे दीर । साहित्ये पुरविती ॥३॥
आशा ममता पतीच्या भगिनी । काय सांगूं तयांची करणी । ब्रह्मांड संसार उभारोनी । प्रपंची गोविती मजलागीं ॥४॥
मी मी ह्मणावया शिकविलें । माझे ह्मणोन वेड लाविलें । बळेचि संसारीं अडकविलें । नि:संगासी ॥५॥
अहं पतीचे प्रेम भारी । न विसंबे क्षणभरी । माहेरीची स्मृती सारी । बाळपणींची विसरली ॥६॥
मी आणि माझा संसार । हेंचि एक भासलें सार । सासू सासरें आणि दीर । नणंदांचे प्रेम बहू ॥७॥
ऐसा संसार थाटला । मद संपत्तिनें भरला । तत्क्षणीं फळा आला । क्रोध सुपुत्र ॥८॥
दुर्वच शर्करा वाटिली । आपली प्रौढी मिरविली । दुरित गुडी उभारिली । आनंद थोर मानिला ॥९॥
तव आणीक अपत्यें झाली । भय शोक बालकें वाढलीं । मानिले सुखाची समाधी केली । त्रिवर्ग सुतांनीं ॥१०॥
वासना विषय सूक्ष्म तंते । मजला आणिलें या पंथें । कष्ट करोनि मरतें । तरी सुखलेश नाहीं ॥११॥
मोहें केला हव्यास । तो झाला सासुरवास । जाच परी सुखास । इच्छितसे तयामध्यें ॥१२॥
तव संत मायबहिणी । भेटल्या संसारकाननीं । कथिली तयासी कहाणी । सुख सत्य की मिथ्या ॥१३॥
त्या सांगती संसार । दु:खराशीचे डोंगर । अंतीं घात घेणार । अंध वापींत बुडवोनी ॥१४॥
सुखासी केली खटपट । ती आवघीच पोचट । पोचट असोन बळकट । सुटणार नाहीं ॥१५॥
तेलीयाचा फिरता बैल । ह्मणे मार्ग कधीं सरेल । सत्यं पाहतां घरीच हा खेळ । होत जातो ॥१६॥
तैसाचि हा संसारपंथ । सरितां सरेना सत्य । अहंता अंधारी काढितां व्यक्त । क्षणिक भासे ॥१७॥
सत्य ह्मणतां स्वप्नवत । स्वप्न ह्मनतां भासे सत्य । गुरुमाय दुरोनी पाहत । कौतुक सारें ॥१८॥
ऐसें तयांनी कथिलें । तेव्हा बाळपण आठवलें । माहेरी जावें ह्मणितलें । पती हटटी सोडीना ॥१९॥
यास्तव करितसे विनवणीए । माय स्वहस्तें धरोनी । घेऊन जाई स्वसदनीं । प्रेमपान्हा पाजवी ॥२०॥
संतसज्जन मुराळी । पाठवोन लाविली कळी । जाचती ही अधिक सगळी । धीर मजसी धरवेना ॥२१॥
जीव द्यावा ह्मणाल झणी । तरी पती विलक्षणी । चौर्‍यांशी लक्षयोनी । कूपीं फिरता पाठी असे ॥२२॥
बहुत येवोन काकुलती । माये हीच विनंती । माहेत दाखवी स्वहस्ती । कृपादृष्टी करोनी ॥२३॥
असो ऐसी गुरुमाउली । आम्हीं आतां आठविली । कृपा करील ते काळी । सौक्य भोगूं ॥२४॥
बहुतां लागी पावली । इहपर सौख्यद झाली । मज दीनासी भेटली । तोची पुढती निरुपिजेल ॥२५॥
कागवाडकर रामदासी । गणूबुवा वदती जयासी । सदा ध्याती गुरुचरणासी । रामभक्त महाभले ॥२६॥
गृहीं बांधोनी मंदिर । मूर्ती स्थापिल्या सुंदर । सेवा करिती अत्यादर । गृहस्थाश्रमीं राहती ॥२७॥
गुरुदर्शनी अति प्रिती । वरचेवरी धांव घेती । प्रपंची उदास वागती । आवडी रामसेवेची ॥२८॥
एकदां स्थिती ऐसी झाली । हनुमानमूर्ती भंगली । चित्तवृत्ती दुश्चित झाली । आतां कैसे करावें ॥२९॥
धाव घेतली गुरुकडे । वदती झाले जें सांकडे । मारुती नसतां रामापुढें । व्यंग दिसे आह्मासी ॥३०॥
कृपा करोन दीनावरी । चरण लागावे मंदिरी । मारुतीची स्थापना बरी । स्वहस्तीं करावी ॥३१॥
संतचरण लागतां सहज । सुफल होईल धरिलें काज । एवढें द्यावें प्रेमव्याज । कृपादृष्टी करोनी ॥३२॥
वारंवार प्रार्थना करिती । सद्‍गुरु तया अभय देती । येऊं तुमचे गृहाप्रती । सत्यसत्य जाणावें ॥३३॥
ऐसें आश्वासन दिलें । दु:खित चित्ता शांतविलें । परी आज उद्या करितां गेले । बहुत दिवस ॥३४॥
संत येणार माझे घरी । सूक्ष्म अहंकार अंतरी । उठला तो जाणिला चतुरीं । ह्मणोनि विलंब लाविला ॥३५॥
बहुत केली प्रार्थना । उपवास करिती नाना । श्रीगुरु वदती हटयोग जाणा । कदापि करूं नये ॥३६॥
तुम्ही जावें आतां गृहासी । आम्ही येऊं अमुक दिवशीं । हर्षे भरोन रामदासी । स्वगृहीं परतले ॥३७॥
नाना साहित्य जमा केलें । मंदिर सर्व श्रुंगारिले । गुरुदर्शन घडेल वहिलें । आनंद नगरवासियां ॥३८॥
पदें रचोनि मेळा केला । तो प्रसाद मजसी मिळाला । कीर्ती परिसोनी कवित्वाला । रचिलें जनप्रीतीस्तव ॥३९॥
कलियुगी साधू नसती । ऐसी मज भावना होती । अनुग्रह घ्या कोणी वदती । उगाच होकार देतसे ॥४०॥
ठरली वेळ निघोन गेली । गुरुमूर्ती नाही आली । तै उदासीनता आली । रामदासीबुवासी ॥४१॥
आमुचा नसे अधिकार । कां कृपा करील गुरुवर । निराशेचा उद‍भवोनि अंकुत । उपोषण सुरु केलें ॥४२॥
सात दिवस पर्यंत । उपोषणें देह कष्टवित । जरी न येती समर्थ । तरी प्राण त्यजावा ॥४३॥
ऐसा निश्चय करोनी । सात दिवस काढिले त्यांनी । तरी श्रीगुरुजननी । येण्याची वार्ता दिसेना ॥४४॥
चित्त अत्यंत दुखावलें । जिणें निरर्थक भासलें । सोमल घेऊं आरंभिलें । औदासिन्य येवोनी ॥४५॥
तंव पूर्वीच गोंदवलीसी । सद्‍गुरु कथिती उभयतांसी । जावें शीघ्र कागवाडासी । अंताजीपंत व्यंकटभट ॥४६॥
येथें विष कालविलें । तव दोघे दारी उभे ठेले । सद्‍गुरु यावया निघाले । अमृतवाणी ऐकिली ॥४७॥
आम्हां पाठविले पुढती । समर्थ मागोन शीघ्र येती । सत्वर करावी आयती । रामदासें विष दडविलें ॥४८॥
अंतर्ज्ञानी गुरुवर । करणी करिती अभिनव । शरण्यादेती अनुभव । परी निष्ठा पाहती ॥४९॥
आगगाडीचे अडडयावरी । पावली सद‍गुरुंची स्वारी । निरोप येतांच सत्वरी । सामोरे धांवती ॥५०॥
रांगोळ्या सडे घातले । ताशेमर्फे थडथडले । भजनीसमुदाय निघाले । टाळविणा घेवोनी ॥५१॥
सुस्वर कंठें मेळे गाती । आणूं चला गुरुमूर्ती । हाती टिपर्‍या वाजविती । शोभा दिसे अपूर्व ॥५२॥
असो ऐसी आयती झाली । वेळी समीप मंडळी आली । लोळती श्रीचे चरणकमळीं । पोटी आनंदू न समाये ॥५३॥
वाजत गाजत मिरवित । रामनामें गर्जवित । माय पावली ते पेठेंत । सुवासिनी आरत्या ओवाळिती ॥५४॥
तेच क्षणी दृष्टादृष्ट । होता फळलें अदृष्ट । अंतरीचे निघालें क्लिष्ट । सर्व भावें नत झालों ॥५५॥
कृपादृष्टीचा महिमा । वर्णू न शके चतुर्मुख ब्रह्मा । शब्द खटाटोप रिकामा । अनुभवेचि जाणावें ॥५६॥
आनंदांतील शुध्द कंद । तो हा सद्‍गुरुप्रसाद । समरसें होवोनि धुंद । मायमोही गवसेना ॥५७॥
असो उत्साह चालिला थोर । समुदाय लोटला फार । रामनाम ध्वनीनें नगर । सर्वही दुमदुमिलें ॥५८॥
दोनशें माणसांचे अन्न । शतश: पात्रें उठलीं जाण । परी तेवेळीं आठवण । कोणासीच न झाली ॥५९॥
जितुके लोक दर्शना येती । तितुके प्रसादा सेविती । चक्रावळीनें पंक्ती उठती । वारंवार कित्येक ॥६०॥
गणपतराव रामदासी । याचे निमित्यें आह्मासी । दर्शन घडलें चरणासी । धन्य धन्य गुरुपद ॥६१॥
बाजारी नारळ मिळेना । पत्रावळी ह्मणती ना ना । यावरोनि पहाना । किती समुदाय लोटला ॥६२॥
रोगग्रस्ता नाहीं मती । भुतेंमि त्रस्त किती जमती । साधूदर्शना भाविक येती । बैसाया ठाव मिळेना ॥६३॥
इतुकीयांचें करिती समाधान । सकळां देती भोजन । लहानथोर समसमान । मधुर भाषणें शांतविती ॥६४॥
खेड्याचें शहर बनलें । जागोजागी थवे बैसले । संतमहात्म्य आगळें । अभाग्यासी उमजेना ॥६५॥
शके अठराशेंएकतीस । सौम्यनाम संवत्सरास । शुध्दपक्ष आषाढ मास । दिनशुध्दी पाहिली ॥६६॥
मघा पंचमी सुप्रभाती । बुधवारीं मिथुनावरती । स्वहस्तें स्थापिला मारुती । सद्‍गुरुनीं कागवाडीं ॥६७॥
दुसरे दिवशी गुरुवार । गुरुभक्ता शुभ फार । अनुग्रह केला मजवर । पतिता हाती धरियेलें ॥६८॥
अनंत सुकृतें फळा आली । चुकली माय भेटली । बोधामृत श्रवणी घाली । धन्य सुदिन आयुष्यीं ॥६९॥
निर्धना दाविलें धन । आंधळ्या दिधलें नयन । करविलें मृता अमृतपान । आनंद काय सांगावा ॥७०॥
विश्वबंधुत्व मिळालें । समर्थ पाठिराखे झाले । धन्य भाग्ये उदेलें । सेवक मी समर्थाचा ॥७१॥
असो ऐसे कागवाडासी । ब्रह्मचैतन्य हनुमदंशी । सद्‍गुरु भेटलें आह्मासी । पुढील कथा अवधारा ॥७२॥
चार दिवसपर्यंत । सोहळा झाला अद्‍भुत । श्रावण करा सावचित्त । श्रोते तुंम्हीं गुणभोक्ते ॥७३॥
अवगुणातें त्यजोनी । सद्‍गुणातें शोधोनी । गुरुलीला ही म्हणोनि । अव्हेर न करावा ॥७४॥
पुढील समासी निरुपण । कागवाडी श्रीज्ञानघन । बहुत चमत्कार दावोन । उपासना वाढविती ॥७५॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते एकादशअध्यायांतर्गत प्रथम:समास :। ओवीसंख्या ॥७५॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP