अध्याय अकरावा - समास चवथा
श्रीसद्गुरुलीलामृत
श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवे नम: । श्रीराम समर्थ ।
श्रीराममंदिरात । राहिले सद्गुरु समर्थ । दिवसेंदिवस क्षीन दिसत । सगुण देह ॥१॥
परी सर्वही व्यापार । अखंड चालिले अनिवार । विदेही श्रीगुरुवर । देहबंधन तया कैचें ॥२॥
गुरुपौर्णिमा समीप आली । भक्त मंडळी येऊं लागली । इकडे आशाढी यात्रा भरली । पंढरीक्षेत्रांत ॥३॥
गुरुपूजा करावयासी । बहुतेक येती ते समयासी । उत्साह चालिला दिवानिशीं । श्रीराममंदिरांत ॥४॥
अनंत संत श्रीगुरुसी । भेटिओ येती आदरेसीं । महाप्रसाद प्रतिदिवशीं । संतांगृहीं होतसे ॥५॥
सद्गुरुही समस्तांसी । मंदिरी नेती भोजनासी । विठठलकृपा छायेसी । संत भेटती आनंदे ॥६॥
नामरूप भक्तियोग । कोण साधनीं कैसा लाग । जीवशीव विवेक वैराग्य । नित्य संवाद चालती ॥७॥
तुकारामबुवा वलव्हणकर । हे वदती रुप थोर । गुरु वदती नाम थोर । साधन आन तुळेना ॥८॥
संवाद चलिला अतिशय । श्रवणीं संतसमुदाय । नामरुपीं श्रेष्ठ ध्येय । विवेचन चालिलें ॥९॥
वेदशास्त्र संतवचनें । काढून दाविती प्रमाणें । नाम श्रेष्ठ सदगुरुनें । सिध्द करोनी दाविलें ॥१०॥
मायोद्भवीं अक्षर ब्रह्म । सूक्ष्म भूतांचा कर्दम । अष्ठ्धे रुपांचा उगम । साकारला दिसे ॥११॥
वेदांत सिध्दांत धादांत । दावोनि काढिला किंत । परमात्मा नाम रुपातीत । नामस्मरणीं आतुडे ॥१२॥
सर्वांची समजूत घातली । बुवाची सही घेतली । भक्तमांदी मिळाली । तो सोहळा अपूर्व ॥१३॥
नामगर्जना करोनी । श्रीचे चरण वंदोनी । भक्त गेले स्वसदनीं । संतमहिमा वर्णित ॥१४॥
बहुत शिष्य तेथें आले । ब्रह्मानंद साधू भले । भागवतासी बोलाविलें । आणिक बहुतेक ॥१५॥
तैसेच बहुत शिष्यांप्रती । ज्या त्यापरी उपदेशिती । ब्रह्मानंद भेटी येकांती । घेते झाले ते समय़ीं ॥१६॥
बहुत वेळ बोलणें झालें । एकांती जावो नये भलें । महाप्रस्थान निवेदिलें । ऐसें वाटे ॥१७॥
जें न देखे रवी । तें पाहे सूज्ञ कवी । ऐसे सद्गुरु गोसावी । वदले तें आठवलें ॥१८॥
एकांती प्रयाणाचा । विचार ठरला उभयतांचा । लेशही नाही दु:खाचा । पूर्ण ज्ञानी ब्रह्मानंद ॥१९॥
असो पंढरीवास केला । बहुत काळ सोहळा झाला । शिष्यासमवेत खंडाळीला । गुरुमहाराज निघाले ॥२०॥
वझे नामें मामलेदार । विनवणी करिती फार । याकारणें गुरुवर । खंडाळीवरुनि चालिले ॥२१॥
तेथेंही बहु उपदेशिती । सकळांसी आनंदविती । धन्य साधूची संगती । पुण्यें पुण्य दुणावें ॥२२॥
वाकरीकर लक्ष्मणबुवा । यांची पुण्यतिथी तेव्हां । आली यास्तव शिष्यगांवा । श्रीसी नेत वाकरी ॥२३॥
सिध्दांचे समाधिस्थान । तेथें कथिले संतवर्णन । सकलां आनंद देवोन । रामनाम बोधिलें ॥२४॥
जेथें जाती श्रीगुरुराव । तेथें आनंद महोत्साव । सकलां वाटे देवाधिदेव । अवतरले मृत्युलोकीं ॥२५॥
नास्तिक दुरोनि निंदिती । दर्शन घडतां नम्र होती । ऐशी गुरुची तेजदीप्ती । लखलखीत सोज्वळ ॥२६॥
गुप्त हेर परिक्षूं येती । तेचि चरणी लीन होती । धन्य सज्जनसंगती । दुर्बुध्दी तेथें न रिघें ॥२७॥
जरी बळें झटों आली । तरी घर्षनें लीन झाली । गंगा बुडवाया निघाली । सागरा जैशी ॥२८॥
असो वाकरीहून निघाले । तें गोंदावलीस आले । नागरिकांसी आनंदविले । वियोग बहुत दिवसांचा ॥२९॥
तव विनविती कुरवलीकर । दामोदरबुवा भक्त थोर । पहावया राममंदिर । कुरवलीसी चलावें ॥३०॥
आपुली आज्ञा प्रमाण । मंदिर बांधिले शोभायमान । तरी लागअवे श्रीगुरुचरण । इच्छा एवढी पुरवावी ॥३१॥
भाव पाहोन रुकार दिला । सकलां वदती जाऊम चला । सिध्दस्थान पहावयाला । शंभुक्षेत्री ॥३२॥
सकलांसमवेत निघाले । कुरवलीसमीप आले । नगरवासी सामोरे धांवलें सद्गुरुसी आणावया ॥३३॥
वेशीपासून मंदिरापर्यंत । सडे रांगोळ्या शोभत । ओवाळिती स्त्रिया समस्त । ठायीं ठायीं गुरुसी ॥३४॥
गुलाल बुके उधळिती । रघुवीरसमर्थ गर्जती । मिरवणूक आली मंदिराप्रती । समर्थ सद्गुरुंची ॥३५॥
असो चार दिवसपर्यंत । उत्साह झाला अत्युद्भुत । दामोदरबुवा जागती सतत । न्यून नसावें सेवेसी ॥३६॥
सकलां आनंद देवोनी । स्वारी निघाली स्वसदनीं । शिष्य समस्त बोलाऊनी । आज्ञापिती ते वेळी ॥३७॥
आपआपले ग्रामासी । जावें ये समयासी । आम्हीं जाऊं गोंदावलीसी । पुढती यावें दर्शना ॥३८॥
आधी पंढरीहून धाडिले । उरलेसुरले येथे जमले । येथूनही पाठविले । बहुत जन ॥३९॥
नित्य जवळी ज्यांची वस्ती । तयांसी कार्ये सांगती । दुरदेशीं पाठविती । इच्छा श्रीसमर्थाची ॥४०॥
असो कांही लोक घेवोनी । शीघ्र आले गोंदवलेभुवनी । श्रीरामचरण वंदोनी । भेटती महारुद्रासी ॥४१॥
नागोबाची जत्रा आली । म्हणोन स्वारी निघाली । धेनू सोडावून ते काळीं । अखेर सेवा ही वदती ॥४२॥
आणीक एक बैस तेथें । विकत घेतला गुरुनाथें । लोक विनविती तयातें । वृषभ तुम्हीं न घ्यावा ॥४३॥
हा बहुत खोडगुणी । जेथे जाई तेथें हानी । यास्तव श्रीसमर्थानीं । याचा स्वीकार न करावा ॥४४॥
समर्थ वदती अति उत्तम । गरिवासी कष्टवी हा परम । आम्हीं गोसावी निष्काम । हानी होतां दु:ख नसे ॥४५॥
ऐसे म्हणोनी बैस घेतला । म्हणती आमचे उपयोगा आला । ज्ञानचक्षु सदगुरु भला । करणी करील अघटित ॥४६॥
दिवाणसाहेब नामें एक । म्हसवडी होते सांप्रदाइक । तयासी वदती सकौतुक । भेट हीच अखेरची ॥४७॥
असो म्हसवडाहून निघाले । शीघ्र गोंदावली आले । सकळालगीं उपदेशिले । रामनाम विसरू नये ॥४८॥
आमुची जागा खाली पडली । रामप्रभूची चिठी आली । आनंदे निरोप द्या सकळीं । हास्यमुखें बोलती ॥४९॥
सकळां वाटे हे सहज । विनोदें बोलती गुरुराज । अज्ञानी नेण्दती काज । समर्थ जाती स्वस्थानीं ॥५०॥
तृणाच्या गंज्या घेतल्य्या । गाईस गोठणीं घातल्या । गुरुआश्रयें शोभल्या । गोकुळी जैशा ॥५१॥
शके अठराशेपस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष । भानुवासरी नवमीस । समर्थ कार्ये करिसावीं ॥५२॥
काळे नामें शाळाधिकारी । उतरले मारुती मंदिरीं । समर्थासी नेवोन घरीं । महानैवेद्य समर्पिला ॥५३॥
भाऊसाहेब केतकर । होते पंक्तीस बरोबर । समर्थ वदती चिंतातुर । काय इच्छा सांगावी ॥५४॥
साहेब विनविती समर्थासी । देह पडावा चरणापाशीं । येवढी इच्छा आम्हांसी । आळी समर्थे पुरवावी ॥५५॥
समर्थ वदती ऐसें कांही । होणेचा योग नाही । जाणी आम्हां लवलाही । तुम्हीं शीघ्र पुढती याल ॥५६॥
ऐसें वंदोन मंदिरीं आले । खोळित जावोन बैसले । तव बाहेर भांडू लागले । अंताजीपंत आणि काका ॥५७॥
समर्थ दोघां बोलावूनी । कां झगडा रामसदनीं । वदतां करिती विनवणी । आपण नसतां ऐसें होतें ॥५८॥
समर्थ वदती सकौतुक । आम्हीं कोठें उदयीक । असेल ते मानोनी सुख । रामप्रसाद सेवावा ॥५९॥
आऊताईस बोलाविती । म्हणती सांगा सकलांप्रती । भात गेला गांवाप्रती । भाजीभाकर सुखें खावी ॥६०॥
असो सायंकाळसमयास । स्वारी आली गोशाळेस । बैसोन सुखासनास । रम्य पवित्र स्थान म्हणती ॥६१॥
येथें जागा सारवावी । रांगोळी सुंदर घालावी । तैसें करवून भक्तां करवीं । वरी आपण बैसले ॥६२॥
भवानरावाशीं पाचारिलें । येथें गाईचें गवत पडलें । उदयीक येऊं तो वहिलें । तुम्ही रहा वस्तीसी ॥६३॥
तैसेची गोशाळेचे कारकून । तया खडावा देऊन । आम्ही येऊ तोंवरी जतन । करीत येथें बैसावें ॥६४॥
ऐसें वदोन सत्वर क। मंदिरीं आले गुरुवर । आप्पा नामें जरंडीकर । पाचारिलें तयासी ॥६५॥
काय निमित्यें उपोषण । केलें तुह्मीं दिवस तीन । आप्पा वदे समर्थालागोन । प्रकृतीस स्वास्थ असावें ॥६६॥
समर्थ वदती ते अवसरी । माझी प्रकृती उदयीक बरी । होईल तूं चिंता न करी । आग्रहें भोजना बैसविती ॥६७॥
असो रात्रीं भजन अति केलें । निर्वाण अभंग गायीले । उदासीन भक्त झाले । संशय वाटे सकळांसी ॥६८॥
रात्रीं करोन प्रेमळ भजन । उपदेशीती सकळांलागोन । सतत करा नामस्मरण । गुरुवचनीं भाव धरा ॥६९॥
नामपाठ ज्याचे वैखरी । नित्य आम्हीं त्याचे अंतरी । सदा साह्य श्रीहरी । विश्वास धरा निश्चयें ॥७०॥
ऐस करोनी उपदेश । आळविलें अयोध्याधीश । अश्रू आले नयनास । श्रीरामप्रभूच्या ॥७१॥
तें देवभक्तांचें प्रेम । कोण वर्णील निरुपण । अवाप्त कामासी सकाम । भक्त व्हावया लाविती ॥७२॥
बहुतापरी सगुण भजन । करोनि केलें शयन । शिष्य समस्त उद्विग्न । गति बरवी दिसेना ॥७३॥
पहाटे पांच घटीसी । करिती शौचमुख मार्जनासी । श्रीगुरुवदती अम्मासी । आजची सेवा अखेर ॥७४॥
राममंदिरीं जावोनी । पुढती आसन घालोनी । सकलां वदती दीर्घ स्वरांनी । भजन करावें ॥७५॥
भजन कराया लावोन । समाधी लाविली आप्ण । ब्रह्मांड भेद करोन । ज्योत मिळविली रामरुपीं ॥७६॥
दु:खाचा कडेलाट झाल । येकमेकांचे पडती गळां । वंदन करिती वेळोवेळां । श्रीगुरुचरणासी ॥७७॥
आह्मां अर्भका टाकोन । कां बैसलात रुसोन । कृपा करोन सोडा मौन । प्रेमसंभाषण करावें ॥७८॥
आम्हीं बालकें अज्ञान । तूं माय सदा सघन । अनंत अपराधी दीन । कोठें जासी त्यजोनी ॥७९॥
काय आमुचें दुर्भाग्य । गुरुचरणाचा वियोग । घडला आतां तगमग । वारील कोण ॥८०॥
असो ऐसा बहुत शोक । करित झाले सकल लोक । प्रेम जिव्हाळा अत्यंतिक । गुरुमायेचा ॥८१॥
ब्रम्हानंद असती जरी । व्यवस्था करिती सारी । शिष्य तेचि अधिकारी । ह्मणती सर्व ॥८२॥
ते येईपर्यंत । देह ठेवावा तीन रात । ऐसें ठरोणि एकमत । तारा केल्या चहूंकडे ॥८३॥
परी कांही पत्ता नाहीं । पूर्वीच ठरलें सर्वही । प्रत्युत्तर नये कोठेंही । मग चिंता प्रवर्तली ॥८४॥
ते दिवशी ग्रामस्थानीं । सकल कर्मे सांडोनी । सदगुरुसंनिध उपोषणीं । राहिले अश्रु ढाळित ॥८५॥
आणिक नित्य यात्रा येती । तयांसी अडथळे मार्गावरती । नाना प्रकारें होऊन राहती । इच्छा श्रीसमर्थाची ॥८६॥
परस्थ कोणी येत नाही । देह पल्लवी ठेविला पाही । दृश्य दृश्यत्वें जाय विलयीं । यास्तव दहन करावें ॥८७॥
एकासशीस ऐसा विचार । ठरला सर्वानुमतें साचार । तंव नवमीचा प्रकार । आठवला ते समयीं ॥८८॥
गोठणीं भवानराव यासी । कथिलें येईन वस्तीशी । तैसे देती पादुकांसी । पंतोजीजवळी ॥८९॥
स्थान सारवोन स्वच्छ केले । रांगोळया घालोन वरी बैसले । विश्रांती घ्यावया वहिलें । स्थान असे पवित्र ॥९०॥
ऐसें वदले ते आठवलें । तें दहनस्थान ठरविलें । विमान करोन क्षृंगारिलें । मूर्ती भीतरी बैसविली ॥९१॥
तेज फांकले चहूं दिशीं । हनुमान रुपें भक्तांसी । दर्शन दिधलें तेसमयासी । इरतां सतेज सचेतन ॥९२॥
प्रचंड नामगजरांत । मिरवणूक आली गोठणाप्रत । पुनरपी स्थान शोभिवंत । केलें सडे घालोनी ॥९३॥
गोमायेचें मूत्र । मुरोनि आधींच पवित्र । बहुत दिवस केलें क्षेत्र । सदगुरु समर्थानीं ॥९४॥
कर्पूर बिल्व आणि चंदन । तुळशीकाष्ठें केलें दहन । सगुणाकृती लया पावोन । जगदाकार जाहली ॥९५॥
दृश्य दृश्यमाजीं दडलें । व्यापकत्वें जगतीं भरलें । निर्गुण आलें ना गेलें । अखंड भरलें गुरुरुप ॥९६॥
भाविकांचे भावनेसाठे । सगुण साक्षात देती भेटी । बहुतां दृष्टांती कथिती । आम्हीं असों येथेंची ॥९७॥
ज्ञानियां आले ना गेले । भाविक अंतरी भरले । अज्ञानियां दृश्य झालें । समाधिरुपें ॥९८॥
असो गोंदवलीचें चैतन्य । अदृश्य जाहलें येथून । उत्तरचरित्र जे गहन । परिस पुढील अध्याय़ीं ॥९९॥
श्रीचा दासानुदास कथितसे चरित्रास । निमित्तमात्र करिनि त्यास । त्याचा तोचि वदविता ॥१००॥
इति श्रीसद्गुरूलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासी याचा लळा । कृपाकटाक्षें ॥१०१॥
इति श्रीसद गुरुलीलामृते एकादशोध्यायांतर्गत चतुर्थ समास :। ओवीसंख्या ॥१०१॥
॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति एकादशोध्याय समाप्त. ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 23, 2019
TOP