श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवे नम: ।
ॐ नमो सद्‍गुरुराया । भीति दाविते मज माया । यास्तव धरिले पाया । दासउपेक्षा न करावी ॥१॥
ज्ञान अज्ञान कळेना । वरी पाहतां दिसेना । कागवाड क्षेत्रामाजी पहाना । माहारीण उध्दरिली ॥२॥
ती कथा आहे कैसी । श्रोते करिती प्रश्नांसी । तरी परिसा सविस्तरशी । कथन करुं ॥३॥
संताबाई नामे करुन । होती तेथें महारीण । नित्य मंदिरी येवोन । झाडलोट करितसे ॥४॥
महाराज श्रीगोंदवलेकर । कधी ना पाहिले साचार । पुरी पुसे वारंवार । कधी येती म्हणोन ॥५॥
बुवा पुसती तियेसी । समर्थ येतां काय करिसी । महारीण वदे तयासी । मरण मुक्ती मागेन ॥६॥   
जंव ते दिवस जवळी आले । तव स्वल्प धन मेळविलें । शेजारिया पाशी दिलें । उत्तरकार्य करा म्हणे ॥७॥
थटटेवारी चालिली गोष्ट । तव आले समर्थभेट । महारीण पावली नीट । समर्थचरणा वंदन करी ॥८॥
विनवीतसे कर जोडोन । आता सोडवा भवांतून । संचित होते तें दारुण । भोगून सारिलें आजवरी ॥९॥
कांही शेष उरला असेल । तरी दर्शनें विलया जाइल । तीर्थप्रसाद शमबील । संतमहात्म्य अगाधं ॥१०॥
तीर्थप्रसाद देवोनी । निरोप द्यावा मजलागोनी । आतां सोडवी ही जाचणे । मलीन देहाची ॥११॥
सद्‍गुरुं मनी संतोषले चरणतीर्थ तियेसी दिलें । प्रसाद देवोनि कथिलें । शीघ्र जाई स्वस्थाना ॥१२॥
वारंवार घेवोन दर्शन । वदे पतिता केलें पावन । दीनदयाळू कृपाघन । येतें लोभ असूं द्यावा ॥१३॥
गृही जावोन सकळांसी । निरोप मागें अति हर्षी । राम म्हणोन देहासी । सोडती झाली ॥१४॥
महार आले सांगत । महारिण झाली मृत । सद्‍गुरु वदती पुण्यशील बहुत । सांग संस्कार करावा ॥१५॥
पूर्णजन्मार्जित तिजसी ज्ञान । परी संचित राहिले दारुण । इहजन्मी भोगिले सारुन । आतां मुक्त झाली ॥१६॥
तिनें द्रव्य ठेविलें होतें । वरी दिधलें समर्थे । अन्नदानें सकळातें । तृप्त केले ॥१७॥
असो सांगावया कारण । साधीभोळी महारिण । दिसती तिजसी असेल ज्ञान । स्वप्नीही नसे कवणाच्या ॥१८॥
ज्ञान स्थिती सांभाळणें । किती कठीण देव जाणें । आम्ही अर्धशब्दज्ञानें । घरोघरीं बडबडतों ॥१९॥
अप्पासाहेब पाटिल थोर । श्रीगुरुसी करुनी नमस्कार । वदति गृही चलावें सत्वर । अटीव दूध करविलें ॥२०॥
शुध्दभाव पाहोनि । श्रीगुरु गेले त्यांचे सदनीं । क्षीर असे कळशीभरोनी । समुदाय तरी तीन शतक ॥२१॥
स्वहस्तें पात्रें भरोनी । सकला पाजी गुरुजननी । अभिनव केली करणी । प्रसाद राहिला दोन शेर ॥२२॥
आणीक जेथें राममंदिर । तेथें जवळीच असे विहीर । परी पाणी असे बहु क्षार । मुखीं कांही घालवेना ॥२३॥
समर्थ वदती बुवासी । श्रीउत्साह समयासी । घेत जा जल पाकासी । राम गोडी आणील ॥२४॥
तेच क्षणी गोसावी एक । रामेश्वरीं निघाला देख । मार्गी तया अकस्मित । दृष्टांत होय शंभूचा ॥२५॥
तेथून जवळी कागवड नगरीं । सद्‍गुरु ब्रह्मचैतन्य स्वारी । गंगा तया घाली सत्वरीं । म्हणजें आम्हां पावेल ॥२६॥
यास्तव गोसावी तेथें । आला गंगा घालावयातें । त्यांतीळ गंगा घेऊन हस्तें । विरिरीम जी सोडिली ॥२७॥
क्षार पाणी गोड झालें । मंदिरी उपयोगा आलें । प्रत्यक्ष परमात्मा अवतरले । म्हणती सर्व ॥२८॥
आत्मारामपंत कुलकर्णी । श्रीसी नेती स्वसदनीं । सद्‍भावें पद पूजोनी । फराळासी घालिती ॥२९॥
ते समयीं मेळ्यांतील पदें । मुलें म्हणती आनंदे । सद्‍गुरु पुसती विनोदें । कोणी केली मज सांगा ॥३०॥
मुलें म्हणती गोपाळराव । फडके असे उपनाव । तयानीं रचिलीं सर्व । श्रीचरणीं वहावया ॥३१॥
श्रीनी नारळ काढोनी । दिधला बहु मोदानी । नेऊन द्या तयालागोनी । महाप्रसाद कवित्वाचा ॥३२॥
तोचि प्रसाद ये समय़ीं । अर्पिलासे समर्थपायीं । तन्निमित्यें सेवा सर्वही । महा प्रसाद संतांचा ॥३३॥
अप्पासाहेब कागवाडकर । मामासाहेब इनामदार । दोघेही नेती गुरुवर । स्वगृहीं भोजना ॥३४॥
श्रीगुरु करविती पायस । वांटिती अन्य यातीस । जैन आणि लिंगायतांस । त्यांचे हस्तें वाढविती ॥३५॥
आपुला धर्म सोडूं नये । दुजियांचा धरूं नये । बोधिती सद्‍गुरु स्वयें । ध्यानी धरा भाविकहो ॥३६॥
असो ऐसा उत्साह थोर । होतां आनंदलें नगर । दर्शना येती असंख्य नर । गांवोगांवीचे ॥३७॥
मुरारजी भाटे गिरणीवाले । भाविक श्रीमान गृहस्थ भले । श्रीगुरुचे दर्शना आले । आनंदले मानसीं ॥३८॥
प्रसाद व्हावा गिरणीवरी । ऐसें विनविती परोपरी । गुरुवदती ते अवसरी । अवश्य येऊं म्हणोनि ॥३९॥
परी अठरापगड यातीसी । बोलवावें प्रसादासी । जैनं आणि लिंगाइतांसी । निराळा पाक करावा ॥४०॥
होजी म्हणोनि अंगिकारिलें । स्थान सर्व श्रुंगारिलें । बल्लव सूज्ञ आणिले । षड्रसान्नें करावया ॥४१॥
ग्रामवासी समस्त जन । केलें तया निमंत्रण । सद्‍भावें श्रीसीं पुजोन । वस्त्रे अर्पिली बहु मोल ॥४२॥
प्रेमें केलें गांगभोजन । पाहतां श्रीगुरु झाले प्रसन्न । आशिर्वाद देती संतान । होईल तुजसी म्हणोनी ॥४३॥
संतान नाही म्हणोनी । चिंता करित होता मनीं । श्रीनीं हें जाणोनी । कृपा केली तयावरी ॥४४॥
पुढती तया पुत्र झाला । आशीर्वाद फळा आला । ऐसा सद्‍गुरु पावला । बहुतांसी ॥४५॥
कगुडराय पुरातन । स्थान भुयारीं असे गहन । श्रीगुरु तेथें जाऊन । शालिग्राममूर्ती पाहती ॥४६॥
आणि अंतर्भुयारांत । योगमार्गे सद्‍गुरु जात । योगी बैसले ध्यानस्त । म्हणोनि सांगती सकळांसी ॥४७॥
आत कोणी जाऊं पाहती । तरी भुंगे डसो धांवती । शोधूं जातां सद्‍गुरु वदती । ग्रामात घडेल अपाय ॥४८॥
असो ऐशी गुरुमाउली । कागवाड क्षेत्री बहु रमली । रामउपासना वाढविली । अनुग्रह देवोनिया ॥४९॥
निघतां सकल आडवे पडती । वियोगें दु:खाश्रु ढाळिती । चार दिवस गृहाप्रती । विसरले होते ॥५०॥
बोधून सकला शांतविती । येउं म्हणती शीघ्र पुढती । नामधारकापाशी वस्ती । अहर्निशी असे आमुची ॥५१॥
असो नामाच्या गजरांत । निघते झाले श्रीगुरुनाथ । भक्त उगारीं घेऊन जात । अत्याग्रह करोनी ॥५२॥
तेथून पुढें मिरजेसी । जाते झाले ज्ञानरासी । अनंत भक्त दर्शनासी । आजूबाजूचे धांवती ॥५३॥
श्रोती अशंका घेतली । हीच फेरी सविस्तर वर्णिली । सद्‍गुरु जाती अनेक स्थळीं । उत्तर दक्षिण भागांत ॥५४॥
साच प्रश्न बरवा केला । साग्र वर्णावी सद्‍गुरुलीला । परी शक्ती कैची मानवाला । सद्‍गुरुलीला अगाध ॥५५॥
काशी पासोन रामेश्वरी । बारा वेळ पादचारी । फिरती झाली श्रीगुरुस्वारी । मार्गी गांव कित्येक ॥५६॥
जे गांवचें नाम ध्यावें । वदती आम्हां असे ठावें । बाळपणीं गेलो होतों स्वभावें । खाणाखुणा सांगती ॥५७॥
प्रत्येक ठायीं परोपकार । कांही घडती चमत्कार । लिहितां ग्रंथ वाढेल फार । अशक्य असे आम्हांसी ॥५८॥
येविषयीं एक दृष्टांत । आठवला तो कथितों येथ । त्यावरोन जाईल किंत । अशक्य दुर्लध्य म्हणोनी ॥५९॥
बालपणी फिरता मही । हल्याळग्रामी पाही । गेलें परी ठावठिकाणा नाही । कोण कोठील म्हणोनी ॥६०॥
तेथें विप्रसुतासी । ज्वर भरला प्राणनाशी । सद्‍गुरु अकस्मात त्यासमयासी । भिक्षामिषें गृही गेले ॥६१॥
माउली दिसे सचिंत । नयनी अश्रु ढाळित । द्रवले श्रीगुरुनाथ । वृत्तांत सर्व परिसला ॥६२॥
शीघ्र जावोन गृहांत । मुलाकरवी उदक हातांत । स्वयें घेवोनि निश्चित । रहा म्हणती तयासी ॥६३॥
वासुदेवभटट नामेंकरोनी । ओळखीचे गृहस्थ होते कोणी । कथिती तयांलागोनी । घेतला ज्वर भोगणे असे ॥६४॥
विप्र मुलगा असावा । गोसावी जातां नाहीं परवा । तुम्हीं समाचार घेत जावा । भोगून सारूं ज्वरासी ॥६५॥
ऐसें झाले संभाषण । कांही दिवस गेले निघोन । विप्र पुन्हां करिती प्रश्न । ज्वर केव्हां भोगिता ॥६६॥
होहो विसरलो आम्ही । बरी आठवण दिली तुम्हीं । एक खोली रिकामी । करोन द्यावी ॥६७॥
अकरा दिवसपर्यंत । होते तेथें निद्रिस्त । ज्वर धुमारे बाहेर येत । कवाडा बंद केलें असे ॥६८॥
द्वादशी बाहेर निघोनी । पथ्य घाला म्हणती झणी । येतो स्नान करोनी । भोग भोगूनि सारिला ॥६९॥
नको म्हणता शिघ्र निघाले । विहिरीत जावोन बुडाले । वासुदेवभटट वरी राहिले । वाटा पाहत समर्थाची ॥७०॥
बहुतकाळ निघोन गेला । गोसावी वर नाहीं आला । म्हणती बाल बुडूनी मेला । आतां कैसे करावें ॥७१॥
बोलाविती ग्रामाधिकारी । तंव वरी बैसली स्वारी । आश्चर्य मानिती सारी । चरणा वंदूं लागले ॥७२॥
बहुतलोक दर्शना येती । उपाधी नको साधक स्थिती । म्हणोन शीघ्र निघोन जाती । ध्यास लागला सकळांसी ॥७३॥
कांही दिवस गेल्यावर । दामुबुवा कुरवलीकर । कीर्तनाचा करीत गजर । सहज गेले हल्ल्याळीं ॥७४॥
सद्‍गुरुची वर्णिली कीर्ती । वासुदेवभटट तया वंदिती । दर्शना न्यावें आम्हाप्रती । अनुग्रहाची इच्छा असे ॥७५॥
मार्गी कथिली मागील कथा । ऐसा साधू नाही आतां । थकलों आम्हीं तया शोधितां । मंदभाग्य आमुचें ॥७६॥
उभयता गोंदावली आले । श्रीचें चरण वंदिले । तव श्रीगुरुनी अलिंगिलें । वासुदेवभटट म्हणोनी ॥७७॥
इकडे कोणीकडे आला । प्रपंच करोनी भागला । गृहवृत्तांत पुशिला । सर्व कुशल असतीना ॥७८॥
पूर्वी पाहिली सिध्द मूर्ती । तीच दिसे डोळ्यांपुढती । नयनी आनंदाश्रु येती । चरण न्हाणिती श्रीगुरुचे ॥७९॥
असो ऐसे बालपणीं । बहुत फिरले जे अवनी । लिहितां न पुरे लेखणी । श्रोती रोष न करावा ॥८०॥
स्वल्प काळ राहिले घरीं । बहुतेक फिरती दिशा चारी । जगदोध्दार अवतारी । सिध्दपुरुष ॥८१॥
कागवाडा येथील स्थिती । म्यां पाहिली प्रत्यक्षरीती । यास्तव कथिली तुम्हाप्रती । गुरुकथा रसाळ ॥८२॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते एकादशअध्यायांतर्गत द्वितीय:समास :। ओवीसंख्या ॥८२॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP