दशम आणि एकादश स्कंध हें भागवताचें ह्र्दय आणि प्राणच होत. भागवतांतील सर्व तत्त्वज्ञान एकादश स्कंधांत आणि
भक्तिरस दशम स्कंधात सांठविला आहे.
एकाद्श स्कंधाच्या विवेचनांत सामान्यपणें तीन भाग पडतात. पहिले पांच अध्याय हा पहिला भाग, त्या पुढील तेवीस
म्हणजे एकोणतिसाव्या अध्यायापर्यंतचा विषय हा दुसरा भाग आणि शेवटचे दोन अध्याय हा तिसरा भाग.
पहिल्या भागांत भूभारहरणार्थ भगवंताचा यदुकुलक्षयाचा संकल्प व लोह -मुसळाची कथा आहे. मायामोहित वसुदेव
श्रीकृष्णाचें स्वरुप व अधिकार विसरुन, नारदाला मोक्षलाभाचा मार्ग विचारतो, तेव्हां ऋषभपुत्र कवि, हरि, अंतरिक्षादि
नवयोग्यांचा व जनकराजाचा संवाद, नारद वसुदेवाला सांगतो. या संवादांत, अत्यंत परिणामकारक असें भागवत धर्माचें
कथन केलें आहे. कलियुगांत संकीर्तनरुपी, भक्तिमार्गच सर्वांना श्रेयस्कर आहे हें त्यांतील विवेचन आज ध्यानांत
ठेवण्यासारखें आहे.
सहाव्या अध्यायापासून एकोणतिसाव्या अध्यायापर्यंतचा दुसरा भाग अभ्यासनीय आणि महत्वाचा आहे. त्यांत भगवंतानें
निजधामाला येण्याची देवांची प्रार्थना, कृष्णाचा, उध्दवाला उपदेश, अवधूताअचे चोविस गुरु, मुमुक्षूचीं कर्तव्ये, साधकाचें व
शिष्याचें आचरण, द्वैतखंडन, जीव, ईश, बंध, मोक्ष यांच्या व्याख्या, सत्संगमहत्व, हंसगीता, भक्तिमार्ग, विविध सिध्दि,
ईशविभूति, इत्यादि विषय सांगितले आहेत.
पुढें आश्रमधर्म, वर्णधर्म, शमादि लक्षणे, योगत्रय, गुण-दोषांचें सविस्तर विवेचन, श्रुतींचा गूढार्थ, तत्वांचा विवेक, समन्वय,
प्रकृति-पुरुषविचार, जन्म -मरणविचार, भिक्षुगीता, मनाचें महत्व, विषयासक्तीचे परिणाम, सत्पुरुषलक्षणें, पूजाविधि, संक्षिप्त
ज्ञानयोग व उध्दवास भागवत धर्मानें मोक्षप्राप्ति, इत्यादिरुपानें या भागांत मोक्षविषयक सांगोपांग चर्चा केली आहे.
शेवटीं तिसर्या भागांत यादवांचे प्रभासगमन, कलह व यादवांचा कुळक्षय, बलरामाचें निर्याण, व्याधाचा उध्दार, श्रीकृष्णाचा
निजधामवास, वसुदेवादींचा देहत्याग, वज्रास राज्यभिषेक, जलमग्नद्वारका, पांडवांचें महाप्रस्थान, व फलश्रुति असे विषय
या स्कंधांत आलेले आहेत.