स्कंध ११ वा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२३५॥ ।१-६।
शास्त्रें स्वानुभवें तर्कनिरपेक्ष । कृष्ण म्हणे बोध जयालागीं ॥१॥
विश्वमायाभास जाणूनि मजसी । अर्पी ज्ञातृत्वासी जीवन्मुक्त ॥२॥
इष्ट मी ज्ञात्यातें स्वार्थ त्याचा मीचि । प्रयोजन मीचि सन्मान्य मी ॥३॥
स्वर्ग, अपवर्ग, मीचि तयाप्रति । मजवीण त्यासी प्रिय न कांहीं ॥४॥
ज्ञान-विज्ञानें तो श्रेष्ठ मी, या ज्ञानें । ममाधार तेणें मम प्राण ॥५॥
ज्ञानांशेंही सिध्दि लाभे, ते सहस्त्र । करितां उपाय न लाभेचि ॥६॥
यास्तव उध्दवा, जीव-शिवैक्यानें । सप्रेम भजनें, कृतार्थ हो ॥७॥
ज्ञानेयज्ञें मज यज्ञपतीलागीं । आराधूनि सिध्दि वरिती ज्ञाते ॥८॥
वासुदेव म्हणे ज्ञानभक्ति त्याची । तयासी अर्पिती तेचि मुक्त ॥९॥

॥२३६॥ ।७-१०।
उध्दवा, मायेचे विकार, न तव । नसे त्यां अस्तित्व आदि-अंतीं ॥१॥
निर्विकारासी न हर्ष-खेद त्यांचा । आद्यंत नसतां, दिसती भ्रमें ॥२॥
कृष्णालागीं म्हणे उध्दव हे देवा । सुलभ निवेदा ज्ञान मज ॥३॥
वैराग्यासहित भक्तिही कथावी । ब्रह्ययासही पाहीं दुर्लभ जे ॥४॥
त्रिविधतापानें पीडलों मी देवा । संसारवणवा जाळी मज ॥५॥
अमृतस्त्रावी त्वत्पादपद्मछ्त्र । कोणरे आधार, मजसी अन्य ॥६॥
प्रपंचवारुळीं काळसर्पद्ष्ट । विषयतृष्णेंत रमलों बहु ॥७॥
मोक्षद मंत्रानें सिंचूनियां जळ । करावा उध्दार देवा, माझा ॥८॥
वासुदेव म्हणे विषयविषबाधा । हरावया सोपा मार्ग भक्ति ॥९॥

॥२३७॥ ।११-१५।
धर्मज्ञवरिष्ठ भीष्माप्रति हाचि । कृष्ण म्हणे पुशी प्रश्न धर्म ॥१॥
मोक्षधर्माविण गोत्रवधतप्त । न होईचि शांत विविध धर्मे ॥२॥
देवव्रतें तदा कथिलें जें तेंचि । कथितों तुजसी भक्तश्रेष्ठा ॥३॥
विज्ञान-वैराग्यासवें ज्ञान, भक्ति । सांठविली उक्ति ऐसी श्रेष्ठ ॥४॥
अष्टाविंशति जीं तत्त्वें सर्वठायीं । तयांतही राही तत्त्व एक ॥५॥
ऐसें ज्ञानातेंही असे एकरुप । बोध हाचि देख विज्ञान तें ॥६॥
वासुदेव म्हणे अनेकत्व भास । ब्रह्मरुप एक कथी कृष्ण ॥७॥

॥२३८॥ ।१६-१९।
आदि, मध्य, अंतकालींही मृद्‍घट । मृत्तिकास्वरुप जैशापरी ॥१॥
तैसें विश्वाचें या अधिष्ठान तेंचि । सत्य सर्वव्यापी एकमेव ॥२॥
श्रुति, प्रत्यक्ष तैं ऐतिह्य अनुमानें । गोचर न जाणे खंडीतही ॥३॥
भेदभाव तया न शिवे कल्पांती । म्हणे बाधितासी नश्वर तो ॥४॥
दृष्टादृष्टकर्मे फलेही नश्वर । जाणे तो पंडित भक्तश्रेष्ठा ॥५॥
समाधानास्तव कथिला लाडक्या । पूर्वीचि भक्तीचा मार्ग तुज ॥६॥
वासुदेव म्हणे पूर्तता भक्तीची । करावया उक्ति पुढती ऐका ॥७॥

॥२३९॥ ।२०-२४।
कथामृतीं माझ्या आत्यंतिक श्रध्दा । गुणकीर्तनाचा ध्यास सदा ॥१॥
अर्चन, स्तवन, सादरें पूजन, । साष्टांग वंदन भक्तपूजा ॥२॥
भूतीं भगवंतभाव नित्य ज्याचा । मदर्थचि साचा व्यवहारही ॥३॥
काया-वाचा-मन अर्पी जो मजसी । लवही न चित्तीं अन्य आशा ॥४॥
मजसाठीं सर्व सुख -भोगत्याग । दान-व्रतें सर्व माझ्यासाठीं ॥५॥
ऐशा सर्वार्पणें लाभे मम भक्ति । प्राप्तव्य त्या लोकीं अन्य काय ॥६॥

॥२४०॥ ।२५-२७।
परम सात्विक ऐसें शांतचित्त । आत्मस्वरुपांत समर्पावें ॥१॥
तरीच वैराग्य तेंवी धर्मज्ञान । लाभे तैं संपूर्ण ऐश्वर्यही ॥२॥
यदा तेंचि चित्त इंद्रियानुगामी । नश्वराभिमानी विषयासक्त ॥३॥
तदा तें अज्ञान, अधर्म, आसक्ति । अनैश्वर्य, भोगी दु:खरुप ॥४॥
मजमाजी भक्ति जडे तोचि धर्म । ऐकात्म्यदर्शन तेंचि ज्ञान ॥५॥
वैराग्य तें त्रिगुणांमाजी न आसक्ति । आणिमादिक सिध्दि ऐश्वर्य तें ॥६॥
वासुदेव म्हणे धरितां ईशभाव । ईश्वरचि होय भक्तश्रेष्ठ ॥७॥

॥२४१॥ ।२८-३२।
म्हणे उध्द्व देवासी । कथावे ते यम किती ॥१॥
नियमही शम-दम । तितिक्षा ते धृति, दान ॥२॥
तप, शौर्य, सत्य, ऋत । शौचही ते कथीं मज ॥३॥
त्याग, इष्टधन, यज्ञ । दक्षिणा तैं बल पूर्ण ॥४॥
भग, लाभ, यश विद्या । परा, र्‍हीही मजसी कथा ॥५॥
तेंवी श्रीही, सुख-दु:ख । समजूं कवणातें पंडित ॥६॥
मूर्ख कोण तैं सत्पंथ । असत्पंथ, नरक स्वर्ग ॥७॥
कवण बंधु तैं सुगृह । वदो मजसी केशव ॥८॥
आढय दरिद्रि वा कोण । कृपण, ईश्वरही जाण ॥९॥
ऐके कृष्णोक्ति उध्दव । ऐका कथी वासुदेव ॥१०॥

॥२४२॥ ।३३-३५।
अहिंसा, सत्य तैं अस्तेय, असंग । र्‍ही, असंचय आस्तिक्य तें ॥१॥
ब्रह्मचर्य, मौन, स्थैर्य तेंवी क्षमा । अभय, हे जाण यम श्रेष्ठ ॥२॥
शौच, जप तप, होम तेंवी श्रध्दा । आतिथ्य उध्दवा मदर्चन ॥३॥
तीर्थाटन मोक्षप्राप्त्यर्थ प्रयत्न । संतोष तैं जाण गुरुसेवा ॥४॥
सुविख्यात ऐसे नियम द्वादश । होती कल्पवृक्ष सेवकासी ॥५॥
वासुदेव म्हणे यति गृहस्थही । पूर्णकाम होई नियमें, यमें ॥६॥

॥२४३॥ ।३६-४०।
उध्दवा, मन्निष्ठवुध्दि तोचि शम । इंद्रियसंमय दम जाणें ॥१॥
तितिक्षा ते सर्वदु:खसहिष्णुता । धृति जिव्होपस्थां जिंकणें ते ॥२॥
अभय सर्वासी हेंचि श्रेष्ठ दान । कामत्याग जाण तप लोकीं ॥३॥
स्वभावविजय शौर्य तें जाणावें । सत्य तें गणावें समदर्शन ॥४॥
सुमधुर सत्यवाणी तेंचि ऋत । अनासक्ति शौच, त्याग न्यास ॥५॥
धर्म तेंचि धन, यज्ञ मी भगवंत । करणें ज्ञानबोध दक्षिणा ते ॥६॥
श्रेष्ठ बल जाण प्राणायाम लोकीं । मदैश्वर्य तेंचि भाग्य भक्ता ॥७॥
भक्ति तोचि लाभ, विद्या भेदाभाव । र्‍ही ते तिरस्कार दुष्कर्माचा ॥८॥
वासुदेव म्हणे नैरपेक्षादिक । सद्‍गुण तें रुप जाणा श्रीचें ॥९॥

॥२४४॥ ।४१-४५।
सुख-दु:खातीत होणें तेंचि सौख्य । भोगेच्छा तें दु:ख समजें जनीं ॥१॥
बंधमोक्षज्ञाता म्हणावा पंडित । मीच देहादिक मूर्ख म्हणे ॥२॥
मम लाभ जेणे घडे तो सन्मार्ग । चित्ताचा विक्षेप कुमार्ग तो ॥३॥
सत्त्वोत्कर्ष स्वर्ग, नरक तो तम । बंधु, गुरु जाण सकलां मीचि ॥४॥
सुगृह मानवशरीरचि श्रेष्ठ । जाणावें श्रीमंत गुणवंतासी ॥५॥
असंतुष्ट तोचि दरिद्रि म्हणावा । कृपण गणावा अजितेंद्रिय ॥६॥
अनासक्त गुणी जाणावा तो ईश । जाणावें अनीश गुणासक्त ॥७॥
उध्दवा, कथिली उत्तरें प्रश्नाचीं । गुणदोषदृष्टि हाचि दोष ॥८॥
गुणदोषातीत होणें हा सद्‍गुण । वासुदेवा ज्ञान होवो ऐसें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP