स्कंध ११ वा - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१९९॥
उध्दव म्हणे तूं परब्रह्ममूर्ति । अनंत अनादि मायानाथ ॥१॥
उत्पत्ति स्थिति तैं संहारकारक । सकल विश्वास स्वतंत्रत्वें ॥२॥
सान-थोर वस्तुंमाजी तूं अससी । गोचर न होसी परी अज्ञां ॥३॥
जाणुनियां ज्ञातें उपासिती तुज । गोचर सर्वत्र होसी तयां ॥४॥
ज्या ज्या स्वरुपें ते उपासूनि मुक्त । होती, तें तें रुप कथीं मज ॥५॥
सकल नियंता, संचारही गूढ । अदृश्य मूढांस, सकल द्र्ष्टा ॥६॥
परी सकलांचें करिसी कल्याण । विभूतीचें ज्ञान कथीं मज ॥७॥
बोलुनियां ऐसें वंदितो उध्दव । कथी वासुदेव पुढती ऐका ॥८॥
६-९

॥२००॥
उध्दवासी म्हणे कृष्ण हाचि प्रश्न । कुरुक्षेत्रीं जाण केला पार्थे ॥१॥
कर्तृत्वाभिमानें केवळ राज्यार्थ । करणें ज्ञातिवध अहितकारी ॥२॥
मानूनियां ऐसें युध्दपराड्‍.मुख । होतां, तो रणांत पुशी हेंचि ॥३॥
नरपुंगवा त्या युक्तिप्रयुक्तीनें । उध्दवा पाजिलें ज्ञानामृत ॥४॥
चराचराचा मी नियंता सुह्रद । स्थित्युद्भवन्नाश सकलांचा मी ॥५॥
वासुदेव म्हणे ईश तो सर्वांचा । जाणील तयाचा दु:खनाश ॥६॥
१०-१३

॥२०१॥
वेगवंतांचा मी वेग । कालवंतांमाजी काल ॥१॥
गुणत्रयाचें मी साम्य । द्रव्यी स्वाभाविक गुण ॥२॥
जाणेंसूत्रात्मा तो मीचि । मीचि महत्तत्व तेंही ॥३॥
तेंवी सूक्ष्माहूनि सूक्ष्म । जीवकला ते मी जाण ॥४॥
मन दुर्जय तेम मीचि । उत्पादकही वेदांसी ॥५॥
मुख्यमंत्र अ उ म युक्त । अकार मी अक्षरांत ॥६॥
छंदी गायत्री, देवांत । इंद्र, अग्नि मी वसूंत ॥७॥
विष्णु जाणें आदित्यांत । रुद्रामाजी नीलकंठ ॥८॥
वासुदेव म्हणे एक । रुपें यद्यपि अनेक ॥९॥
१४-१८

॥२०२॥
ब्रह्मऋषीमाजी भृगु मी गणावा । मनु मी उध्दवा, राजर्षीत ॥१॥
देवर्षि नारद, धेनु हविर्धानी । कपिल श्रेष्ठ मी सिध्दांमाजी ॥२॥
पक्षांत गरुड, प्रजापती दक्ष । अर्यमा पितरांत जाणें मज ॥३॥
प्रल्हाद दैत्यांत, नक्षत्रांत सोम । कुबेर मी जाण यक्षादिकी ॥४॥
गजेंद्रामाजी मी जाण ऐरावत । वरूण मी मुख्य जलाधिप ॥५॥
ताप-प्रकाशदांमाजी सूर्य तो मी । मानवांमाजी मी नृप श्रेष्ठ ॥६॥
अश्व उच्चैश्रवा, धातूंत कांचन । नियामकीं यम, वासुकी मी ॥७॥
वासुदेव म्हणे नागांत अनंत । श्वापदीं मृगेंद्र देव कथी ॥८॥
१९-२३

॥२०३॥
आश्रमीं चतुर्थ, वर्णात प्रथम । तीर्थामाजी जाण गंगा ते मी ॥१॥
सरसीं सागर, आयुधांत चाप । शस्त्रधारी श्रेष्ठ त्रिपुरहंता ॥२॥
संरक्षित स्थान मेरु तो मी जाण । हिमाचल जाण दुर्गमांत ॥३॥
वृक्षांत अश्वत्थ, यव औषधीत । श्रेष्ठ पुरोहित वसिष्ठ मी ॥४॥
ब्रह्मनिष्ठांमाजी जाण बृहस्पति । प्रमुख सेनापति स्कंद तो मी ॥५॥
नायकांत ब्रह्मा, यज्ञी, ब्रह्मयज्ञ । व्रतामाजी जाण अहिंसा मी ॥६॥
वासुदेव म्म्हणे वाय्वादि शुचींत । शुचितां तो मीच म्हणे देव ॥७॥
२४-२९

॥२०४॥
योगांत समाधि, मंत्रविजयेच्छूंत । आत्मानात्मबोध कौशल्यांत ॥१॥
संशयरुप त्या ख्यातींत ’ विकल्प ’ । शतरुपा श्रेष्ठ स्त्रियांमाजी ॥२॥
मनु पुरुषांत, नारायण मुनि । सनत्कुमार मी ब्रह्मचारी ॥३॥
धर्मात संन्यास, आत्मश्रध्दा क्षेमी । गुह्यांत मौनकीं मधुर वच ॥४॥
दांपत्य ब्रह्ययाचें, सद जागृतांत । संवत्सर मज समजें भावें ॥५॥
ऋतूंत वसंत, मासी मार्गशीर्ष । अभिजित्‍ नक्षत्र जाणे मज ॥६॥
कृतयुग तें मी, देवल-असित । बुध्दिमंत श्रेष्ठ मीचि जाण ॥७॥
द्वैपायन व्यास, शुक्र मी कवींत । भगवंती श्रेष्ठ वासुदेव ॥८॥
भक्तांत उध्दव, किंपुरुषीं कपि । विद्याधरांमाजी सुदर्शन ॥९॥
वासुदेव म्हणे विभूती या श्रेष्ठ । कथिल्या, ध्यानार्थ श्रवण करा ॥१०॥
३०-३३

॥२०५॥
पद्मराग रत्नीं सुंदर्र कोशांत । पद्मकोष, कुश दर्भामाजी ॥१॥
हवीमाजि गव्याआज्य तें मी जाण । व्यापार्‍याचा प्राण लक्ष्मी ते मी ॥२॥
द्यूतांत कपटद्यूरकार तो मी । तितिक्ष्यूंमाजी मी सहनशक्ति ॥३॥
उत्साहीजनांचा उत्साह मी जाण । ओज तें मी जाण बलवंतांचें ॥४॥
भक्तिरुप कर्म मीचि सात्वतांचे । नेवांत समजें वासुदेव ॥५॥
गंधर्वात विश्वावस्तु, अप्सरांत । पूर्वचित्ति श्रेष्ठ सुंदरा मी ॥६॥
पर्वतांचें स्थैर्य, गंध मी पृथ्वीचा । रसही जलाचा, तेजी सूर्य ॥७॥
ग्रहतारकांची प्रभा मीचि जाणें । नभाचा मी जाणे गुण शब्द ॥८॥
वासुदेव म्हणे सावध होऊनि । अन्यही त्या ध्यानी विभूती घ्याव्या ॥९॥
३४-३८

॥२०६॥
अवदान जाणें पावनांत तें मी । अथवा तो दानी वलि मीचि ॥१॥
वीरांत अर्जुन, उत्पत्त्यादि भूतीं । मीचि इंद्रियशक्ति, मनही मीचि ॥२॥
तन्मात्रा अहं तैं महत्तत्व तेंही । षोडशविकृति जीवा माया ॥३॥
गुणांचे गणन तत्त्वनिश्चय मी । अन्य मजवांचूनि नसे कांहीं ॥४॥
वासुदेव म्हणी सर्वव्यापी तोचि । नसे विभूतीसीं अंत त्याच्या ॥५॥
३९-४१

॥२०७॥
परमाणुही गण्य उध्दवा, होतील । विभूति गणील परी कोण ॥१॥
ब्रह्मांडे अनंत कोटी ज्या उदरीं । गणना ती करी कोण कैसी ॥२॥
तेज, शोभा, कीर्ति, ऐश्वर्य, मर्यादा । त्याग, सुंदरता, भाग्य, वीर्य ॥३॥
विज्ञान, तितिक्षा, गुण हे ज्या ठाई । जाणावे ते पाही अंश माझे ॥४॥
वासुदेव म्हणे संक्षिप्त विभूति । मन-वाणीचाचि खेळ सर्व ॥५॥
४२-४४

॥२०८॥
वाणी, मन, प्राण, इंद्रियांचा त्याग । करुनि, आत्मबोध जीवभाव ॥१॥
संयमें त्यजूनि, होई स्वस्थ शांत । जन्म-मरणचक्र संपे त्याचें ॥२॥
सर्वत्याग ऐसा न घडे जयासी । तप-व्रतें त्याचीं सकल व्यर्थ ॥३॥
अपक्क घटांत उदक न राहे । व्रत, दान पाहें सकल तेंवी ॥४॥
भक्तियुक्त बुध्दिसाह्यानें यास्तव । करावा निरोध मनादींचा ॥५॥
वासुदेव म्हणे अनन्यभक्त तो । कृतार्थचि होतो ज्ञानानंदे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP