भजनावली - सोमवारची भजनावली

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.



ब्रह्मा नंदम्‍ परम सुखदम्‍ केवलम्‍ ज्ञान मूर्तीम्‍ ।
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षम्‍
एकं नित्यं विमल, मचलं सर्वधी साक्षी भूतम्‍
भावातीतं त्रिगुण रहितम्‍ सद्‍गुरु तं नमामी ॥१॥

शांताकारम्‍ भुजग शयनम्‍ पद्मनाभम्‍ सुरेशम्‍
विश्वाधारं गगनं सदृशं मेघवर्णम्‍ शुभांगम्‍
लक्ष्मी कांतम्‍ कमल नमनम्‍ योगीभिर्ध्यान गम्यम‍
वंदे विष्णुम्‍ भवभय हरम्‍ सर्वलोकैक नाथम्‍

गुरुर्र ब्रह्मा गुरुर्र विष्णू गुरुर्र देवो महेश्वरः
गुरुर्र साक्षात्‍ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
जय जय राम कृष्ण हरी । जय जय राम कृष्ण हरी

श्री गजानन स्तवन

ॐकार प्रधान रुप गणेशाचें
हे तिन्ही देवांचें जन्म स्थान ॥धृ०॥१॥
अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू ।
मकार महेश जाणियेला ॥२॥
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न ।
तो हा गजानन माय बाप ॥३॥
तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी ।
पहावे पुराणी व्यासाचिया ॥४॥

२ शारदा स्तवन

मोरावरी बसली विधी कुमरी ॥धृ०॥
हाती वीणा मुगुट मस्तकी
पैठणी जरतारी ॥ नेसली । पैठणी जरतारी ॥१॥

ब्रह्मा विष्णू सुत तुज गाती ।
वर्णिती वेद चारी ॥ तुजला । वर्णिती वेद जारी ॥२॥

तिन्ही लोक तुज मंगल गाती ।
कुंठित मती झाली माझी । माझी । कुंठित मती झाली ॥३॥

विद्यादेवी जे तुज गाती ।
अज्ञान निवारी त्यांचे । अज्ञान निवारी ॥४॥

३ सद्‍गुरु स्तवन

सद्‍गुरु वाचोनी सांपडेना सोय ।
धरावे ते पाय आधी आधी ॥१॥

आपणांसारिखे करिती तात्काळ ।
नाही काळ वेळ तयालागी ॥धृ०॥२॥

लोह परिसाची न साहे उपमा ।
सद्‍गुरु महिमा अगाधची ॥३॥

तुका म्हणे कैसे आंधळे हे जन ।
गेले विसरून खर्‍या देवा ॥४॥

४ रुपाचा अभंग शंकराचा
सोमवार

भोळया माझ्या महादेवा । आवड तुला बेलाची ॥धृ०॥
गळा शोभे रुंडमाळा । रुप सुंदर सावळा
कपाळी कोर चंद्राची । आवड तुला बेलाची ॥१॥
हाती शोभे त्रिशुल डमरु । शंख वाजे नाना छंदू ।
अंगी उटी विभूतीची । आवड तुला बेलाची ॥२॥
अर्धांगी पार्वती पुढे शोभे गणपती ।
जटेमधुनी गंगा वहाती । आवड तुला बेलाची ॥३॥
नंदी वरी झाले स्वार । पुढे चाले हरीहर ।
महानंदा जोडूनी कर । आवड तुला बेलाची ॥४॥

५ बुक्याचा अभंग

समय बुक्याचा हा आला
हार तुरे वाहूं प्रभूला ॥धृ०॥
जिवभावाचें भस्म करोनी ।
तत्व मसीने खललेला हा ॥१॥ समय
संचित क्रिय-माणासी गाळुनी ।
प्राकतन भोग सुशोभित केला ॥२॥
भक्तीत मुरला गुरुपदी नुरला ।
परी सेवेसी परतुनी आला ॥३॥
ऐसा श्रीहरी सखा पुजुनी ।
जन्म मृत्यूला झोका दिधला ॥४॥

पूर्वार्ध पूर्ण

मधील भजन (गजर) जयजयकार
पशूपती शंकर उमावरा । भोलानाथा दिगंबरा
पशूपती शंकर उमावरा । भोलानाथा दिगंबरा
पशूपती शंकर उमावरा । भोलानाथ दिगंबरा

गरज २ रा
शिव हर रे शिव हर रे । सांब सदाशिव शिव हर रे
शिव हर शंकर गौरीशं । वंदे गंगाधर ईशं

भजनाचा उपक्रम संपूर्ण
भजनाचे मध्यांतर

नाम तुमचें नारायणा । फोडी पाषाणाला पान्हा ॥धृ०॥
नाम जपिलें वाल्मीकाने । टोणप्याला फुटली पाने ॥२॥
अजामेळा पाप राशी । नामे गेला वैकुंठासी ॥३॥
ऐसा नामाचा महिमा । तुका म्हणे झाली सीमा ॥४॥

ऐसे असावें संसारी । जोवरी प्राचिन्नाची दोरी ॥धृ०॥
पक्षी आंगणासी आले । चारा चरोनिया गेले ॥२॥
मुली घरचार मांडिला । खेळ मोडोनी टाकिला ॥३॥
वाटसरू वाटे आले । प्रातःकाळी उठूनी गेले ॥४॥
मार्गी बहु साल भेटले । तेथें मन ना गुंतले ॥५॥
एका विनवी जनार्दना । ऐसे असता भय कोणा ॥६॥

हिमालयाच्या घरच्या नारी हसती पार्वतीला ॥धृ०॥
शुध्द स्पटिकासाराखा नवरा मिळाला गौरबाईला
वर बापाचा ठाव नाही वरमाई ती शून्य ।
नाहीत नणंदा नाहीत जावा केवढं इचं पुण्य ॥१॥
घण घण घंटा नील कंठा पुढे वाजतो शंख ।
वाजंत्र्याला पैका नाही तो का बेटा खंक ॥२॥
महादेवाची वरात निघाली छ्ळणुक सार्‍या लोकाला ।
वर्‍हाडणीचीं पोरें म्हणती आई बागुल आला ॥३॥
पार्वतीचे रुप पाहूनी ब्रह्मा पळुनी गेला ।
मध्व मुनिश्वर स्वामी रमावती नमितो शिवचरणांला ॥४॥

भक्तीऋण घेतले माझी । चरण गहाण आहेत तुझे ॥धृ०॥
प्रेम व्याज देई हरी । माझा हिशोब लवकर करी ॥
तुझे नामी माझे खत । सूखे करी पंचायत ॥३॥
माझे मी न सोडी धन । नित्य करीन हरी कीर्तन ॥४॥
तुका म्हणे गरुडध्वजा । यासी साक्ष सद्‍गुरु राजा ॥५॥
१०
माझी झोपडी मोडेल बरं का रे । माझी झोपडी मोडेल बरं का रे
नको आशेचा बांबु लावू तिरका रे ॥धृ०॥
साधु संतांच्या बसऊनी पंक्ती रे
आत्मज्ञानाची होते प्राप्ती रे
ज्ञान सूर्याचें काम तुम्ही उरका रे ॥१॥
स्थूल देहाचे बसऊनी मेढे रे ।
आत्मज्ञानाचे पसरिले आढे रे ।
आता गूढाचें काम तुम्ही ऊरका रे ॥२॥
तुकड्या दास सांगे जनाला रे
आधीं कसाबे आपुल्या मनाला रे
मग लागून जाईल चटका रे ॥३॥

मध्यंतर संपूर्ण

उपसंहार संतांचा अभंग
११ संतांचा अभंग

ज्ञानाचा हा सागर । मी तर पामर किंकर ।
इवली माझी घागर । भरु किती ग भरु किती ॥धृ०॥
नाही म्हटले थोर लहान । ना ब्राह्मण ना अज्ञ अजाण
अबलानांही दिधलें ज्ञान । घ्याल किती ग घ्याल किती
रेडया करवी वदवी वेद । स्वयें जाहला हा निर्वेद ।
मिटवी सारे भेदाभेद । सांगु किती ग सांगु किती ॥३॥
निर्जिव भिंती चालविली । मांडे भाजष्या पाठ दिली
मुक्ताईची पुरविली । हौस किती ग हौस किती ॥४॥
सान वयाचें बाळ असे । कर्मयोग तो सांगतसे ।
मुग्ध सभाही डोलतसे । वर्णू किती ग वर्णू किती ॥५॥
भोळ्या भाविक भक्ताला । पांडुरंग तो दाखविला
ऐशा त्याच्या किर्तीला । गाऊ किती ग गाऊ किती ॥६॥
सीतापती रघुविरु । देवो भक्ती निरंतरु ।
तो करुणेचा सागरू । मागु किती ग मागु किती ॥७॥

गजर  
ज्ञानेश्वर माऊली । ज्ञानराज माऊली तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ।
चोखा राका बंका बंका कबीर कमाल सखाराम ॥
पूर्ण गजर

१२ अभंग शंकराचा

उभारिलें देऊल देऊळामध्यें बसले नंदी ।
निराकार अकार पाया रचिला चिरेंबंदी ॥धृ०॥
ओहं सोहंची जुंपनी जोडी धरलीई असे मोट ।
आयुष्याचा नाडा याने वळिला बळकट ॥१॥
बत्तीस राजे हरोहरीने बसले अती दृष्ट ।
त्यामध्यें एक नागिण पद्मीण बोले अती स्पष्ट ॥२॥
नऊ दरवाजे येतील जातील नाही कुणां बंदी ।
दहावा दरवाज बंद राहिला ऊघडेल कधी ॥३॥
म्हणे तुकया नका पडू यमाचे फंदी ।
सद्‍गुरुपाशी किल्ली राहिली त्यासी पुसा आधी ॥४॥

१३ गौळण

कृष्णा तुझी मुरली पाहिली मी आज रे ।
यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे
विसरला देहभाव वासनेचे बीज रे
शुध्द पंथे जाते कृष्णा वाट माझी सोड ना ।
जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना
कमल नयना कृष्णा कमल नयना ॥१॥
घरी सासू-सासर्‍यांचा जाच मला भारी ।
नणंद माझी भांडखोर मज ना पाहे बरी ॥
पती लागी राग येतो जीव माझा जाईना ॥२॥
पतीविना पतीव्रता नेम माझा ढळला किरे सारा ।
तुझ्यापाय़ी संसार माझा झाला पाठमोरा
एका जनार्दनी सार्‍या चुकल्य़ा येरझारा ॥३॥

१४ गौळण
साते निघाली गौळणी । साते निघाली गौळणी ।
दुडिवरी दुडी गौळणी । साते निघाली गौळणी ।
गौळण गोरस म्हणू विसरलिइई
गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या गे ।
तव तव हासती मथुरेच्या गे । गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे ॥धृ०॥
दुडिया माझारी कान्हा झाला भारी
उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥ गोविंद घ्या ॥
एका जनार्दनी सबलस गौळणी
ब्रह्मानंदू न समाये मनीं ॥ गोविंद घ्या ॥२॥

१५ मागणीचा अभंग
कृपाळू सज्जन तुम्ही संत जन ।
एवढे कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
किंवा माझी सांगा काकुळती ॥धृ०॥
अनाथ अपराधी पतीत अगळा ।
परी माया वेगळा नका करु नका करु ॥२॥ आठ० ॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।
मग मज हरी उपेक्षीना ॥३॥ आठ० ॥

१६
हेंची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हासी ॥४॥

१७ आरती
लवथवती विक्राळा । ब्रह्माडी माळा ।
विषें कंठ काळा । त्रिनेत्री ज्याळा ।
लावण्य सुंदर । मस्तकीं बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
जयदेव जयदेव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूर गौरा । जयदेव जयदेव
कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचें उधळण शिती कंठ निळा
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥ जयदेव ॥२॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी ।
शत कोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघकुल तिलक रामदासा अंतरी ॥ जय ॥३॥
घालिन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीण रुप तुझे ॥
प्रेमे आलिंगीन आनंदे पुजीन ।
भावे ओंवाळीन म्हणे नामा ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझें कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेची आता ॥१॥
उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव संतासी सदा नमावें ॥
सत्कर्म योगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ॥२॥
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निजरुप तूझें
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझी सद्‍गुरु पाय दोन्ही ॥३॥

हरी प्राप्तीसाठी कितिक गिरी गव्हारी बसले ।
आम्हां स्त्री वर्गाला नच जमत कांहींच असले ।
म्हणोनी संतांना शरण रिघुनी मार्ग पुशिला ।
बहु वात्सल्याने त्वरित भजनी ठाव दिधला ॥१॥
कसेही करोनी हरी नामी गावा ।
कळेना तरी अर्थ संता पुसावा ।
प्रसाद घेवोनी समाधान पावा ।
एकेक सदगुण उचलीत जावा ।
पुंडलिक वरदा हारी विठठल ।
श्रीज्ञानदेव तुकाराम । गोपालकृष्ण महाराज की जय ।
जय जय रघुवीर समर्थ ॥
पार्वती पते हर हर महादेव । श्रीगुरुदेव दत्त ।
॥ ॐ तत्‍ सत्‍ ब्रह्मार्पण मस्तु ॥
सोमवारचे भजन संपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP