भजनावली - बुधवारची भजनावली
भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.
पंचपदी विठ्ठलाचे अभंग
महायोग पीटे तटे भीमरथ्याम्
वरं पुंडरीकाय दातुं मुनीःद्रम
समागत्य तिष्ठंत मानंदकंदम्
परब्रह्म लिंगम् भजे पांडूरंगम् ॥१॥
समचरण सरोजं सांघ्र निलांबुदायम्
जधान निहीत पाणी मंडनं मंडनानाम्
तरूण तुलसी माला कंधरं कंजनेत्रम्
सदय धवल हास्यं । विठ्ठल चिंतयामी ॥२॥
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी ।
म्हणावें कसे हो तयालागीं वाणी ॥
परब्रह्म रुपी आस जो तुकावा ।
तयाचें तुकीं कोण दुजा तुकावा ॥३॥
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
तया आठविता महापुण्य राशी ।
नमस्कार माझा श्रीज्ञानेश्वरासी ॥४॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही ।
नूपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥५॥
पुंडलीक वरदा हारी विठ्ठ्ल
श्रीज्ञानदेव तुकाराम
भगवान गोपालकृष्ण महाराज की जय
जय जय रघुवीर समर्थ ॥
जय जय कृष्ण हरी । जय जय राम कृष्ण हरी
३६ रुपाचा विठ्ठलाचा अभंग
रुप पाहतां लोचनी । सुख झाले हो साजणी ।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥धृ०॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठ्ली आवडी ।
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमा देवीवर ॥४॥
३७ अभंग
तुझी सेव करीन मनोभावे हो
माझे मन हे गोविंदु रंगले हो ॥१॥
नवसिये माझे नवसीये हो
पंढरीचें दैवत विठ्ठल । पंढरीचें दैवत विठ्ठल ।
पंढरीचे दैवत विठ्ठल । नवसीये हो ॥धृ०॥
बाप रखुमा देवीवरु विठ्ठल हो
चित्त चैतन्य चोरुनी नेले हो ॥२॥
३८ अभंग
सुंदर ने ध्यान ऊभे विटेवरी
कर कटावरी । ठेवोनिया ॥१॥
गळा तुळशीहार । कासे पितांबर
आवडे निरंतर । हेची ध्यान ॥२॥॥धृ०॥
मकर कुंडले । तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी । वीराजीत ॥३॥
तुका म्हणे माझें । हेची सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख । आवडीने ॥४॥
३९ अभंग
आवडे हे रुंप । गोजिरे सगुण
पाहतां लोचन । सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाची तूं राहे ।
जो मी तुज पाहे । वेळोवेळां ॥२॥॥धृ०॥
लांचावलें मन । लागलीसे गोडी ।
ते जीवे न सोडी । ऐसें झालें ॥३॥
तुका म्हणे आम्ही । मागावे लडिवाळी ।
पुरवावी आळी । मायबाप ॥४॥
४० अभंग बुक्का
विठोबाचें गळां शोभे तुळशीहार ।
बुक्का वाहूनिया करू नमस्कार ॥धृ०॥
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
चरणाचें तीर्थ भीमा चंद्रभागा ॥
पुंदलिकासाठी घेई अवतार ॥१॥
भावे पुरवावी भक्ती रमापती ।
मन हा मोगरा अर्पण शेंवंती ॥
नामाचिये संगे हाची गजर ॥२॥
विठ्ठ्लाचे चरणी ठेवोनिया माथा ।
अखंड तू देवा राहे माझे चित्ता ॥
भक्त मागतसे हाची एक वर ॥३॥
गजर ( जय जयकार )
विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल । हरी ॐ विठ्ठ्ल
माय बापा विठ्ठ्ल । हरी ॐ विठ्ठ्ल
४१ मध्यंतरांतील अभंग
धरोनिया राहे विठ्ठ्लाचे पाय ।
संसार तो काय । करील पुढें ॥धृ०॥
संसाराचे भय । नाही हरीच्या दासा ।
विठू आम्हां सरिसा । निरंतर ॥१॥
निरंतर वसे । हरी भक्ता पाशी ।
विसंबेना त्यासी । कधीं काळी ॥२॥
नामा म्हणे ऐसा । विठठल सोडोनी ।
व्यर्थ काय जनी । शिणतोसी ॥३॥
४२ अभंग
दळिता कांडिता तूज गाईन अनंता ॥धृ०॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥१॥
माय बाप बंधू भगिनी । तूच सखा चक्रपाणी ॥२॥
नित्य हाची कारभार । मुखी नाम निरंतर ॥३॥
लक्ष लागलेसें चरणीं । म्हणे नामयांची जनी ॥४॥
४३ अभंग
सखा पांडुरंग आला माझ्या घरी ।
बैसला देव्हारी । भाग्य माझे ॥धृ०॥
मद मत्सराचे ओतीले रांजण ।
त्यांत साठवण भक्ती करी ॥१॥
शंख चक्र गदा सूदर्शन करी ।
भक्तांचा कैवारी धांव घेई ॥२॥
चंचल मनासी आवरण घाला ।
विठू आळवावा नामा म्हणे ॥३॥
४४ अभंग
घरादाराचा केला बाई खेळ ॥धृ०॥
माझा पती देवा तुझ्या पायी रे ।
वेडा केलास शुध्द बुध्द नाही रे ॥
तुळशी काष्टाची घाली गळा माळ ॥१॥
तुझ्या देवाचा काय मोठा गुण रे ।
खाण्या पिण्याची घरी आहे वाण रे ।
दिली कशाला चार पोरं बाळं ॥२॥
घरी दुकानदारी मोठी होती रे ।
तुझ्या छंदाने झाली त्याची माती रे ।
गेला तराजू हाती आले टाळ ॥३॥
मी नांवाची आहे जिजी रे ।
बर्या बोलाने वाट लाव माझी रे
गणू म्हणे वायद्याची गेली वेळ ॥४॥
४५ अभंग
इंद्रायणी तीर पावन सुंदर ।
माझे हें माहेर आळंदीत ॥१॥ ॥धृ०॥
प्रेमळ माऊली समाधी भोगीत ।
पाजी गीतामृत आम्हालागी ॥२॥
निवृत्ती सोपाना मुक्ताई सुंदरा ।
सोडी प्रेमधारा आम्हांवरी ॥३॥
टाळ मृदुंगाचा नामाचा गजर ।
तेथे मी हजर हरीदिनी ॥४॥
वारीचा सोहळा माऊली डोलते ।
लक्ष्मी बोलते अभंगात ॥५॥
४६ अभंग
सेवितो हा रस वाटीतो अनेका
घ्या रे होऊ नका रानभरी । रानभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाऊलें समान ।
तोची एक दानशूर दाता ॥२॥॥धृ०॥
मनाचा संकल्प पाववेल सिध्दी ।
जरी राहे बुध्दी हरिचे पायी ॥३॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा ।
मार्ग हा सोपा सुखरुप ॥४॥
४७ अभंग
आळ का घेता माझ्यावरी ।
नाही नाही केली विठूची चोरी ॥धृ०॥
रात्री माझ्या मंदिरी आला ।
माझ्या संगे दळूं लागला ॥
माळा पदक विसरुनी गेला हरी ॥१॥
पाहाट झाली बडवे आले ।
काकड आरती करु लागले ।
जनीची वाकळ प्रभू पांघरले ।
विस्मीत झाले अंतरी ॥२॥
अपराधी धरुनीया जनीला ।
चंद्रभागेतीरी सूळ रोविला ।
म्हणती चढवा सुळावरी ॥३॥
काळया कपट्या कळले अंतर ।
वृथा आळ आणिलास मजवर ॥
भक्ती माझी भोळी खरी ॥४॥
चमत्कार श्रीहरीने केला ।
क्षणांत पल्लव फुटती सुळाला ।
जनी सुखावे अंतरी ॥५॥
मागणीचा अभंग
४८ मागणी उत्तरार्ध
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहीला ।
नाम आठविता रुपीं प्रगट पै झाला ॥१॥
गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना ।
अणु न विसंबे हरी हा जगत्र जिवना ॥धृ०॥
तनु मन शरण तुझ्या विनटलो पायी ।
एका विठ्ठलावाचोनी अणु नेणे कांही ॥२॥
४९ अभंग
रुप एक नामे तुझी रे अनंत
परब्रह्म देवा तुला दंडवत ॥धृ०॥
कुणाचा कन्हया । कुणाचा गोविंद ।
कुणी विष्णू भजनी सदा राहे धुंद ।
कुणी नीलकंठ पुजीतो मनांत ॥१॥
कुणी साकडें घालितो विठ्ठ्लासी ।
कुणी आळवी त्या प्रभू राघवासी ।
कुणाच्या वसे तो दत्त चिंतनात ॥२॥
माझा रोम रोम तुझ्या नामी रंगे ।
तुझी मूर्ती माझ्या नयनी तरंगे ।
मज पामरासी देई देई हात ॥३॥
५० अभंग गौळण
खांद्यावरी घोंगडी हातामधे काठी ।
चारितसे धेनू सावळा जगजेठी ॥
राधे राधे राधे मुकुंद मुरारी
वाजवितो वेणु सावळा गिरीधारी ॥धृ०॥
एक एक गवळण । एक एक गोपाळ ।
हाती धरुनी खेळति रास मंडळ ॥१॥
एका जनार्दनी रास मंडळ रचिले ।
जिकडे पाहावें तिकडे ब्रह्मची कोंदले ॥२॥
५१ गौळण
बांधा उखळिला याला बांधा उखळीला ।
नंदाचा पोर याला बांधा उखळीला ॥धृ०॥
न कळत कान्हा घरासी येतो ।
दही दूध लोणी चोरुन खातो ॥
सासू मारी मला बाई सासू मारी मला ॥१॥
पाण्यासी जाता घागर हा फोडी ।
भर रस्त्यावरी पदर हा ओढी ॥
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥२॥
नाटकी कान्हा खटयाळ भारी
मोका आला बहरा बाई मोका आला बहरा
चोरावरचा मोर याल बांद्धा उखळीला ॥३॥
एका जनार्दनी कृष्ण मुरारी ।
येईल कान्हा कुंजविहारी ॥
सोडू नका याला बाई सोडू नका याला ॥४॥
५२ गौळण
यशोदे कृष्णाला सांगावे
गोकुळी राहावे का जावे ॥धृ०॥
अवघ्या मिळोनी गौळणी । यशोदेसी सांगती गार्हाणीं
याच्या पाय़ीं गोकुळ सोडावे ॥१॥
अनया गौळी करी धंदा । त्याची आहे मी राधा ।
हरीला उखळासी बांधावे ॥२॥
हरी हा विश्वाचा जनिता । भानुदास चरणी ठेवी माथा
प्रभुच्या चरणांसी लागावे ॥३॥
५३ मागणी
नमो सतचितानंद नारायणा ।
मनो वासना देतसे यातना ॥धृ०॥
अविद्या भ्रमें जीव घे जन्मना । सुखा मागुनी दुःख भासे मना । जरा जन्म मृत्यू पुन्हा जन्म ना ॥१॥
जिवा कर्म योगे जगी जन्मना । न सोडीच देहास यम यातना ॥ सख्या श्रीहरी दे तुझी भक्ती ना ॥२॥
५४ आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांकी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंलिकाचे भेटी परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ।
जय देव जय देव जय पांडूरंगा ।
रखुमाई वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसी माळा गळा कर ठेऊनी कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा ।
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणिया सकळां ।
ओंवाळीती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळुं आरत्या कुर्वंडया येती ।
चंद्रभागेमध्यें सोडूनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नानें जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥
बुधवारचें भजन संपूर्ण
५५
मागणें ते एक तुजप्रती आहे ।
देशी तरी पाहे पांडुरंगा ॥
या संतासी निरवी हेची मज देई ।
आणिक तुज कांही न मागो देवा ।
तुका म्हणे आतां उदार तू होई ।
मज ठेवी पायीं संताचिया ॥२॥
पुंडलिक वरदे हरी विठ्ठ्ल,
श्री ज्ञानदेव तुकाराम । गोपाल कृष्ण महाराज की जय ।
जय जय रघुवीर समर्थ
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2019
TOP