सौ आनंदीबाई वझेकृत एकादशी भजने
भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.
१ दिंडी
दैव योगे नरतनु प्राप्त झाली । लक्ष चौर्याशीं स्थळें धुंडियेलीं ।
सत्य सुख ना कोठेची पाहू जाता । शरण आले रे तुला कृपावंता ॥१॥
मनुष्य जन्माची सफलता कराया । जन्म मरणाचे फेरे चूकवाया ॥
जिचें उदरी जन्म दिला देवा । सतत मातेची झडो अल्प सेवा ॥२॥
जिने दिधले मज योग्य शिक्षणाला । म्हणुनी आजी हा सुदीन प्राप्त झाला ।
नांव शोभे लक्ष्मी हे जियेला । अर्पी आनंदी तिजसी भजन माला ॥३॥
२ आर्या
परमात्मा सुह्रदयी नमिते आधी तयास स्वानंदे
प्रभुचरणी मन ठेऊन हरिगुण गाते आनंदी आनंदे ॥१॥
नमुनी श्री गजराजा । नमिते तैसी सरस्वती माता
नमुनी श्रीगुरुनाथा । नमिते माझी पिता तशी माता
उदरीं जन्मा आले त्या मातेने बहु अमोल गुणी
बाळकडू पाजियले हरी नामाचें मला लहानपणी ॥
हे जगदीशा ईशा मनिषा माझी प्रभो सदा पुरवी ।
जनता जनार्दनाची सेवा माझेकडून तू करवी ॥३॥
३ भजन उपक्रम -गणेशस्तवन
प्रारंभी विनती करु श्रीगजानना ॥धृ०॥
स्फूर्ती द्यावी भजनासी । मती द्यावी कवनासी
चुकवी लक्ष चौर्यांशी । देह यातना ॥१॥
हस्ताने टाळ धरू । गोंधळी पदन्यास करु ।
सर्व इंद्रियांत भरू । ईश भावना ॥२॥
रुप नयनी पाहू दे । श्रवणीं नाम ऐकु दे ।
भजनामृत जिव्हेसी । अन्य विषय ना ॥३॥
प्राणांच्या गती मधून । सो हं नाद उठे ।
तत्वमसी बोधाने । शांतवी मना ॥४॥
आकाशी पूर्ण चंद्र । सागरास ये भरती ।
आनंदी सागर तू भेद दे आम्हां ॥५॥
४ शारदा स्तवन
नमन तुजला वेद माते । अखंड गाई । तुज गुण सरिते ।
जगदंबे मज मती ते ॥धृ०॥
निर्गुण हरीची सगुण तू राणी । योग निद्रा । प्रभुची मोडुनी ।
नांव रुपाला आणिला त्याते ॥
ब्रह्मा हरिहर शचिवर दिनकर । तव आज्ञेने वर्तती भूवर
पार नच कळे सहस्त्र फणीते ॥२॥
भजन प्रसंगी या देवीने । कृपा करावी सरस्वतीने
लक्ष्मी कन्या तुला विनवीते ॥३॥
५ सद्गुरु स्तवन
श्री गुरुवरा करी विनंती पद कमला ।
भव सागर हा तरण्याला ॥धृ०॥
तू गुणावतार धरोनी । अध नेसी जनांचा तरुनी
आम्ही लीन आहो तव चरणी । ने आम्हां पैल तिराला ॥१॥
सागर हा सारुनी मागे । तव चरण धरियेले वेगे ।
तरी कृपा करी माऊली गे । लोटू नको या समयाला ॥२॥
मज दया क्षमा चिर शांती । उपरती भगिनी ही असती
प्रभू चरणी ज्यांची प्रीती । तरी कृपा करावी दयाळा ॥३॥
६ ( सगुण ) रुपाचा अभंग
मुरलीधराला पाहू चला । देह भाव त्या वाहू चला ॥धृ०॥
हातात मुरली मान वाकडी । राधिका उभी प्रभू शेजारी । भक्त निरखिती वदनाला ॥१॥ ( धेनु )
शामल सुंदर रुप मनोहर । कटीं कसुनिया पीत पितांबर । अंगरखाही वरी पिवळा ॥२॥
पायामधे चाळ घातले । त्यावरी रुणझुण वाजती वाळे । मयुर पिसे किरीटाला ॥३॥
मधुर हास्य ते वदनावरती । नयनाची तर होत न तृप्ती । पाहता तन्मय जिव झाला ॥४॥
अहं-भाव हा मुरुनी राहतो । म्हणुनी मुरलीधर म्हणवीतो ॥
जिवा शिवाच्या ऐक्याला । आनंदी नमी पद कमळा ॥५॥
७ ( निर्गुण ) राम दर्शन
कधी नच घडो स्वराज्यी माझा
कधी न घडावा रामा मजला तव चरणाचा वियोग हा ।
शडरिपु हरीन प्रभूपद धरीन करीन ऐसा प्रयोग हा ॥धृ०॥
मंदिरी मी जात असता रज तमांनी अडविले ।
स्थूल देहा मधुनी देवा कशितरी मी निसटले ।
सत्वगुण येऊन पुढे मज नेऊन सू मार्ग दावीतसे पहा ॥१॥
सूक्ष्म देहामधुनी जाता भीती वाटते । भाव बंधू-भगिनी शांति घेऊनी जातसे ।
निरसुनी कारण आणि महाकारण आनंदाची प्रभा पहा ॥२॥
मीपणा ज्या ठायी विरला भाव तो श्रीराम हा ।
त्या प्रभूच्या दर्शनाला नवविधा भक्ति पाहा ॥
आनंदी आनंद लुटावा सुगंध गुरुकृपेचा प्रभाव हा ॥३॥
रामाचे मधले भजन
जय जयकार जय जयकार राजा रामाचा
राजा राचाचा जय कार जय जय कार ॥१॥
भजन रामकृष्णाचे
हरे राम हरे राम । राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे ॥२॥
भजन मुरलीधराचे
जय जय माधवं कृष्णं सचित्तानंद गोविंद
जय मुरलीधरं देव वंदे द्वारकाधीश ॥३॥
८ मनास बोध
फेरे चुकवी रे चुकवी रे या नरदेही ॥धृ०॥
लक्ष चौर्यांशी योनी फिरता । आपदा भोगिसी किती ही ॥१॥
सुमना आता धरुनी सुबोधा । शरण जाई सद्गुरु पायी ॥२॥
रामकृष्ण नाम तारक भवी या । हरीं सतत मुखाने गाई ॥३॥
ध्यास अंतरी धरुनी सोहंम् । स्व-स्वरुपी समरस होई ॥४॥
मनास ऐसा बोध करिता । शिणे लक्षुनी कन्या ही ॥५॥
९ देव शोधन
चैतन्या आत्मदेवा पाहूं तुला मी कुठे ॥धृ०॥
भासचि सारा या विश्वाचा । दृश्यचि ते सर्व खोटें ॥१॥
स्थूली न दिससी । सूक्ष्मीं न अससी । कारणी अज्ञान मोठे ॥२॥
श्रीगुरु शास्त्र ही ऐसे कथिती । सुह्र्दयीं देव भेटे ॥
समाधी साधन । विरता मीपण । भाव तोचि देव प्रगटे ॥४॥
१० गुरू पौर्णिमा
आज गुरु पौर्णिमा । आम्हांला । आज ॥धृ०॥
श्रीगुरुराये मार्ग दाविला । कोण कुठुन तू जन्मा आला
विचार याचा शिकवी मनाला । लक्ष चौर्यांशी
चुकवी यातना ॥ आज गुरु पौर्णिमा ॥१॥
करुनी साधना । धरू उपासना । ध्यानामधली
सुषुप्ती जाणा । लीन होतसे जिथें मी पणा ।
शुध्द भाव तो देव होय ना ॥२॥
कर्म उपासन ज्ञान भक्तीने । त्या देवाच्या संन्निध राहणे ।
जनी जनार्दन । नित्यची पाहणे । जिवन साफल्य ना ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2019
TOP