गणेश जयंती - गिरिजेची प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ३०-१-१९३०

गिरिजा प्रार्थितसे जय मधुसूदना । आतां करुणाघना धांव घेई ॥१॥
संकटी पडली तुझी ही बहिण । तरी नारायण धांव घेई ॥२॥
वैर्‍याहाती आज तुझी हे भगिनी । सांपडली झणी सोडवावी ॥३॥
घोर विटबंणा देवास हे आली । आतां उडी घाली कृपासिंधु ॥४॥
किती वाट पाहूं घात असे झाला । उडी हे दयाळा घेई घेई ॥५॥
प्रसंग दारुण पडला असे घाला । हांक मी स्नेहाळा किती मारुं ॥६॥
क्षण हा मोलाचा पुन्हां ये न साचा । वीर तूं न काचा कदाकाळी ॥७॥
भव पराभूत आतां कोण तारी । असहाय नारी रुद्राची हे ॥८॥
जेथे रुद्रगति खुंटोनि राहिली । तेथे कोणा भली गति असे ॥९॥
ब्रह्मदेव भ्याड, भ्याड तो इंद्रही । शिवासि सन्देही पाडीयेले ॥१०॥
सकळ लपाले गण तेही भ्याले । कोणी न उरले मज रक्षाया ॥११॥
कैलास-पतिची राणी हे हरोनी । स्कंधासी वाहोनी नेत दैत्य ॥१२॥
हाहा:कार झाला सकळ जगतांत । नेत्रांसी झांकित विश्वसारे ॥१३॥
पालक तूं विष्णु सर्व त्रैलोक्याचा । देवादिदेव साचा मा-पति तूं ॥१४॥
व्यापनाद्विष्णुत्व तुज प्राप्त झाले । रक्षितोसी भले त्रैलोक्य हे ॥१५॥
तुम्ही शिव विष्णु भक्त परस्पर । तरी आतां अंतर देऊं नको ॥१६॥
तुजवीण कोणा सांग हांका मारुं । दु:खांबुधिपारु नेई नेई ॥१७॥
माझा पाठीराखा बंधू तूंच सखा । आतां माझ्या दु:खा वेगे हरी ॥१८॥
विसंबिसी कैसा वैरियाचे करी । कठीण अंतरी कैसा होसी ॥१९॥
दीन हीन गाय हंबरडा फ़ोडी । विश्वास न तोडी रमाधवा ॥२०॥
कसायाचे हाती मान सांपडली । पाहिजे सोडविली रमाकांता ॥२१॥
आणोनियां अश्रू नेत्रांत ही गाय । मोकलीत धाय तुजपुढे ॥२२॥
थरथर कांपे हंबरडा फ़ोडी । करित वांकुडी आपुली मान ॥२३॥
घाल उडी आतां संकटांत नाथा । सोडवी अनाथा भगिनी हे ॥२४॥
काकुळती पेशी करित रुद्रकांता । कृपा भगवंता उपजली ॥२५॥
द्विजरुपे आला धाबोनि कैवारी । दैत्यांसी संगरी योजी पुन्हा ॥२६॥
दोघेही झुंजता फ़रश मारीतसे । दैत्या पाडीतसे मूर्छित की ॥२७॥
पळविला दैत्य सोडविली गौरी । प्रगटरुप धरी विश्वात्मा तो ॥२८॥
तोच गजानन अवतारी झाला । प्रसिद्ध जो भला जगी असे ॥२९॥
अवतार ऐसा जाणा श्रीविष्णूचा । बालक गौरीचा झाला असे ॥३०॥
संहारीला दैत्य नामे जो सिंदूर । तोच श्रेष्ठ वीर प्रार्थितो मी ॥३१॥
विनायक म्हणे वैरी संहारावे । निर्भय करावे मजलागी ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP