राम नवमी - मसलतीची अंमलबजावणी
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
राजा हात जोडी, कोठे ऋष्यशृंग, । वृत्तांत तो सांग, सांगा मज ॥१॥
मुनि सांगताती ऋष्यशृंग कथा । जरी त्या समर्था आणशील ॥२॥
पुत्रासाठी येथे येई विभाण्डक । करील यज्ञमख तोची तूझा ॥३॥
परि त्या आणणे बहुत कठीण । कैसे प्रलोभन करशील ॥४॥
विषयाचे नाही तयासी दर्शन । कैसे तूं मोहन साधशील ॥५॥
परि नैसर्गिकी ओढ जे मनाची । विषयाची साची प्राणिमात्रां ॥६॥
तयायोगे कार्य सुलभ होईल । उपाय साधेल तूजलागी ॥७॥
सुंदर गणिका शृंगारोनी धाडी । भुरळ की पाडी त्याच्या मना ॥८॥
अवश्य म्हणे राजा, बोलावि गणिका । षोडश वार्षिका तरुणी ज्या ॥९॥
नृत्यगायनांत निपुण चतुर । करुनी शृंगार धाडीतसे ॥१०॥
कामाचे हे शस्त्र अमोघ जगती । पाठवी नृपति अरण्यासी ॥११॥
जावोनी वनांत पाहती सुंदरी । ऋष्यशृंग तरी कोठे वसे ॥१२॥
आश्रम शोधिला तया गणिकांनी । सावध राहोनि योजिताती ॥१३॥
जवळचि केला एक निजाश्रम । मोहाया अकाम मुनिपुत्र ॥१४॥
पिता नाही ऐशी संधी साधोनियां । तया भुलवाया जाती वैश्या ॥१५॥
दुरुनि साश्चर्य पाहे ऋषिसुत । येतसे धांवत त्यांच्यापाशी ॥१६॥
कवण तुम्ही मुनि कवण धाम सांगा । प्रेरिती अपांगा गणिका त्या ॥१७॥
नकळतची की मोहिला बालक । बनत पूजक त्या स्त्रियांचा ॥१८॥
अर्ध्य पाद्य देई, देई फ़लाहार । नारी त्या चतूर कामशास्त्री ॥१९॥
हाव भाव दाविती तया भुलविती । तयालागी देती खाद्ये कांही ॥२०॥
देताति मोदक आमुची ही फ़ळे । मिष्टान्नाते बळे देती तया ॥२१॥
ऐसा भुलवीला ऋषीचा कुमार । जावया साचार पुसताती ॥२२॥
व्रताचीये काज आम्ही जातो आतां । म्हणोनि विभ्रांता बोलती त्या ॥२३॥
आश्रय तूमचा कोठे विचारित । दुरुनी दावित तयालागी ॥२४॥
स्थिर मन त्याचे चंचल बनले । मतांत सांचले लावण्य त्यांचे ॥२५॥
दुजा दिन येतां पुन्हा: त्या पातल्या । मनांत हर्षल्या बहुतची ॥२६॥
तया म्हणताती आमुच्या आश्रमा । पावतां आरामा पावशील ॥२७॥
बहु भुलवोनि तयालागी नेले । तंव मेघ वळले आकाशांत ॥२८॥
रोमपाद जाय सामोरा तयासी । करित लग्नासी त्याच्या तदा ॥२९॥
निजकन्या शांता ऋष्यशृंगालागी । देवोनियां जगीं धन्य झाला ॥३०॥
विभांडक देखे स्नुषा आणि सुत । आनंद पावत बहुतची ॥३१॥
विनायक म्हणे अवर्षण गेले । विभाण्डके केले प्रसादाते ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2020
TOP