अंगार्याचा उत्सव - भिक्षा समारंभ
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
वार्षिक तुझे कार्य भिक्षा समारंभ । कराया आरंभ आज्ञा देई ॥१॥
जेथे तूझे स्थान तेथे अन्नपूर्णा । ठेविसी परिपूर्णा कृपेने तूं ॥२॥
तूझी झोळी सदा भरली वृद्धीने । आम्ही ती प्रमाने घेऊं दत्ता ॥३॥
आमुचाच येथे पूर्ण अधिकार । घेवूंच साचार जवळी ती ॥४॥
झोळीसाठी भांडूं प्रेमे आढि धरुं । जैसे वो लेकरुं मातेपाशी ॥५॥
त्रैलोक्य फ़िरसी भिक्षा तूं मागसी । आम्हां पुरविसी सर्व कांही ॥६॥
भिक्षाद्रव्य थोर असे तुझेपाशी । आम्हालागी देसी कृपाळूवा ॥७॥
आमुच्याचसाठी ब्रह्मांडात फ़ेरी । तुझी नरहरी कृपावंता ॥८॥
उलट असे तुझा भिक्षेचा प्रकार । देसी अनिवार भक्तांलागी ॥९॥
ज्याचे घरी जासी सर्वस्वाते देसी । त्याचाच तूं होसी दासापरी ॥१०॥
ऐसा तूझा आहे भिक्षेचा प्रकार । खराच ईश्वर शोभसी तूं ॥११॥
तोच खेळ आम्ही येथे करणार । तुजला घेणार सांगाती की ॥१२॥
आमुचे प्रेमासाठी आम्हांमध्ये येई । कौतुकार्थ आई जैशापरी ॥१३॥
आम्हां खेळवाया आम्हां रमवाया । येई दत्तात्रेया सत्वरी तूं ॥१४॥
तुजसंगे आम्ही येथे खेळ करुं । आम्ही फ़ेर धरुं तुजभोवती ॥१५॥
तुझा दंड देई आमुचे तूं हाती । समारंभाप्रति करुं येथे ॥१६॥
अन्नपूर्णा येथे तुझ्या स्थानापाशी । प्रगट विशेषी कृपावंता ॥१७॥
तुझ्या कार्यासाठी आमुच्या हौसेसाठी । करणे जगजेठी समारंभ ॥१८॥
करी साक्षात्कार प्रगट तूं स्वये । आम्हांपाशी तूं ये आतां देवा ॥१९॥
भूलोक वैकुंठ करुनीया सोडूं । ऐसे भजन मांडूं प्रेमाचे की ॥२०॥
वैकुंठ ते तुच्छ भजनाचे पुढे । रंग असा गाढे प्रवेशवूं ॥२१॥
तरी दंड आता माझ्या हाती देई । स्वये प्रगट होई गुरुदत्ता ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP