अंगार्याचा उत्सव - विभूतिपूजनासाठी आज्ञा मागणी
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
आज्ञा द्यावी आतां विभूतिपूजना । गुरु दयाघना स्वामिराया ॥१॥
वार्षिक हे कार्य तुवां चालविले । करवोनी घेतले आम्हां हाती ॥२॥
अनुग्रहाची जे प्रसादाची खूण । तुम्ही नारायण पाठविली ॥३॥
गरुडेश्वराहुनी मज जी धाडिली । तुम्ही पूजविली जी का नाथा ॥४॥
दृष्टांत देवोनी समारंभ करोनी । पुजविली झणी जी का तुम्ही ॥५॥
स्वये प्रगटली चमत्कार दावीला । श्रीगुरुदयाळा तुम्हीं आम्हां ॥६॥
आणिक स्थानाच्या विभूति आणोनी । तुम्ही गुरु-मुनि मज दिल्या ॥७॥
मिळवुनी भस्म पवित्र आणिक । पूजियेले निक विभूतिसी ॥८॥
प्रसाद समृद्धि तुम्ही जी दाविली । अपूर्व ती भली त्या समयी ॥९॥
ज्याला त्याला झाला थोर चमत्कार । विस्मयही फ़ार नास्तिकांही ॥१०॥
फ़ळाची समृद्धी समृद्धी अन्नाची । समृद्धि पुष्पाची दिली आम्हां ॥११॥
गायनवादनाची तेवि अत्तराची । वैदिकमंत्राची समृद्धि जी ॥१२॥
एकाएकी तुम्ही तेव्हां उपजवीली । चमत्कृती केली थोर तेव्हा ॥१३॥
ब्राह्मणभोजन जाहले अपार । समारंभ थोर घडविला ॥१४॥
तेव्हा पासोनियां स्थानासी जागृती । आणिली महती तुम्ही दत्ता ॥१५॥
तुम्ही वाढविला सर्व बडिवार । आजवरि उदार गुरुनाथा ॥१६॥
ऋद्धिसिद्धी तुम्ही क्रीडत ठेविल्या । अनुभवा भल्या येताती की ॥१७॥
स्थान हे जागृत अनुभवा येत । सफ़ळ की होत मन:कामना ॥१८॥
ऐसा जो सुयोग तुम्ही घडवीला । आजवरी आणिला घडवित ॥१९॥
त्याचसाठी आतां आज्ञा मी मागतो । मस्तक ठेवितो चरणावरी ॥२०॥
वैदिक मंत्रानी पुराण मंत्रानी । संस्कृत करोनी विभूति ही ॥२१॥
ठेवा तेजवंत, यांत तुम्ही मूर्त । श्रीगुरु भगवंत जाणतो मी ॥२२॥
विनायक नमी तुमच्यापदांनां । गुरु दयाघना आज्ञा द्यावी ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP