अंगार्याचा उत्सव - ध्यानयोग
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शनिवार सकाळ ता. २८-६-१९३०
पुन्हां पुन्हां जेव्हां ईश्वरासी गावे । तन्मय करावे मन जेव्हा ॥१॥
डोळे मिटुनियां त्रिकरणांसहित । जेव्हां ह्रदयांत प्रवेशावे ॥२॥
ह्रदयकमळ जेव्हां विकासवावे । ज्योतिते लक्षावे कमलस्थित ॥३॥
ब्रम्हरंध्रापर्यत ज्वाला-मालाकुला । ऐशा या ज्योतिला देखावे की ॥४॥
सुषुग्नेतुनी गेली ब्रह्मरंध्री लेखा । अंतरीची रेखा पाहावी ती ॥५॥
पीत आहे तिची कांति मनोहर । तेजस्वी ती थोर जळतसे ॥६॥
पहातां पहातां दिसे हरिमुख । चित्तासी हरिख थोर होय ॥७॥
सुहास्यवदन सुरुचि मधुर । चमक सुंदर मन वेधी ॥८॥
पाहतां पाहतां ज्योती साकारत । देवरुप होत लक्षितां ती ॥९॥
पाहतां पाहतां दिसती तीन शिरे । सहा भुजा निकरे मूर्ति शोभे ॥१०॥
लक्षित जो जावे आयुधे दिसती । परम शोभती देवकरी ॥११॥
कमलांत ऊभा पीत वसनधारी । नाना अलंकारी नटला जो ॥१२॥
सुवासाचा जणुं बनला देवदेह । सुधाच नि:संदेह मूर्त झाली ॥१३॥
जणुं जाणा ज्योत्स्ना परम विकासली । छाया पसरली आल्हादाची ॥१४॥
प्रखर तेजाचे कडे मूर्तिभोवती । त्यांत प्रकाशेती ज्योत्स्नामय ॥१५॥
सौदर्याचे सार सौकुमार्य मूर्त । ऐशी प्रगटत मूर्ति तेथे ॥१६॥
किरीट कुंडले मधुर शोभती । चंद्रमाची दीप्ती उदेली की ॥१७॥
हिरे चमकती पाचू रत्न खडे । आसक्तीच जडे शोभे वरी ॥१८॥
मृदुल कपोल ओष्ठ ते सुरक्त । पाहतां होत सक्त दृष्टी तेथे ॥१९॥
नयनांत तेज भरले अमृताचे । भाजन कृपेचे जे का सदा ॥२०॥
कृपापूर्ण दृष्टि ह्रदय विकासवी । मनासी रमवी निजठायी ॥२१॥
वनमाळा गळां आपाद शोभत । सुगंध सुटत अमोलीक ॥२२॥
मृदुल पदाब्जे रत्ने कोंदणीची । ह्रदयांत साची दिसती की ॥२३॥
अत्यंत वेल्हाळ अत्यंतचि शांत । प्रसन्न शोभत गोड छाया ॥२४॥
ज्योतीमध्ये छाया ऐशी प्रकाशली । दत्तरुप भली शोभतसे ॥२५॥
तेथच नयन गुंतोनी राहती । परम चिकटती मूर्तिलागी ॥२६॥
सोडितां सुटेना संबंध तुटेना । दृष्टी परतेना ऐसे होई ॥२७॥
मधुर ते रुप मधुर ते तेज । ज्योर्तीत सहज प्रगटत ॥२८॥
तेथे मन मुरे तदाकार होत । दत्तचि बनत दत्ताकारे ॥२९॥
क्षीरसागरांत जणूं हा प्रवेश । मन हे विशेष तेज लभे ॥३०॥
ईश्वरसंबंधे रुप पालटत । मन जाणा होत तेजवंत ॥३१॥
संप्रसाद येथे अनुभवा येत । चित्त हे बुडत ईश्वरांत ॥३२॥
सर्वैश्वर्ययुत चित्त हे बनत । समाधि मिळत निर्भरचि ॥३३॥
समाधिचे सुख कोणा वर्णवेना । निर्विकारता मना येत असे ॥३४॥
समाहित चित्ते देवासी प्राथितो । आज्ञा मी मागतो सेवायासी ॥३५॥
विभूति पूजनाचा दिवस हा आज । गुरु महाराज प्राप्त झाला ॥३६॥
वार्षिक हे कार्य तुमचे गुरुदेवा । प्रकाशा वैभवा येथे आज ॥३७॥
लक्षुमीसहित प्रगट येथे व्हावे । अनुभवा यावे आमुचीया ॥३८॥
साक्षात्कार येथे आज दाखवावा । चमत्कार व्हावा अपूर्व की ॥३९॥
तेजस्वी हे स्थान असे शस्त्रधारी । दुष्टां शिक्षा करी ऐसे व्हावे ॥४०॥
भक्तां कल्पद्रुम स्थान हे सुखाचे । परम कल्याणाचे प्रीति केल्या ॥४१॥
इष्ट वरप्राप्ति येथे घडतसे । अनिष्ट नासतसे येथे ऐसे ॥४२॥
दावा प्रभुजी हो आजच्या या दिनी । आम्हांत भरोनी यावे तुम्ही ॥४३॥
आम्हाठायी व्हावा संचार तुमचा । प्रगटवा साचा मूर्त येथे ॥४४॥
आजचे महिमान अपूर्व करावे । आम्हां अनुग्रहावे करुणेसी ॥४५॥
विनायक झाला शरण चरणी । तरी चक्रपाणी आज्ञा द्यावी ॥४६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP