चंपाषष्ठी - स्थान स्थापनेचा इतिहास
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शनिवार ता. ७-१२-१९२९
स्थापनेचा दिन आजिचा मंगल । कृपेने दयाळ आला तुमच्या ॥१॥
आज पहांटेला अनुग्रह केला । आम्हांवरी भला तुम्ही स्वामि ॥२॥
पूर्णानंद यति स्वये येथ पातलां । मज करायाला अनुग्रह ॥३॥
द्यावयासी दीक्षा मजलागी दत्ता । येथे निजसत्ता स्थापियेली ॥४॥
अमुच्या कुलांत द्त्त उपासना । तीच दयाघना अनुग्रहीली ॥५॥
केली उपासना जी कां वर्षे आठ । तिचाच हा थाट वाढविला ॥६॥
सिद्ध करावया माझी उपासना । केली हे स्थापना निजकरी ॥७॥
करित जे होतो तेच अभिमत केले । पुढे आज्ञापिले चालवावया ॥८॥
ऐसाच हा क्रम पुढे चालवावा । खंड न पडावा सांगितले ॥९॥
शिरी कर माझ्या ठेविला गुरुनी । मज आशिर्वचन अनुग्रहीले ॥१०॥
उपासना सिद्ध खचित होईल । तुजला भेटेल दत्तनाथ ॥११॥
प्रिय तूं दत्ताला येथे आणशील । वैकुंठ करशील तू हे स्थान ॥१२॥
भजन पूजन सिद्धीसी पावेल । जयजयकार होईल पूर्ण तुझा ॥१३॥
उपासना धर्म वाढवाया जनी । नियुक्त या स्थानी तूज केले ॥१४॥
ऐसा आशीर्वाद श्रीनी मज दिला । माझा थोर केला बडिवार ॥१५॥
गौरवीले मज अधिकृत केले । स्वये संकल्पीले संकल्पाते ॥१६॥
संकल्प करोनी स्थानाची स्थापना । तुम्ही करुणाघना येथे केली ॥१७॥
काय वानूं नाथा वात्सल्य तुमचे । काम हे वाचेचे नव्हे जाणा ॥१८॥
वाणीचा विषय नव्हे गुरुराया । तुम्हां वर्णावया शक्ती कोणा ॥१९॥
तुमचे सर्वज्ञत्व तुम्हांसीच साजे । त्रिभुवनी गाजे महिमान ॥२०॥
आज अठरा झाली वर्षे परिपूर्ण । तुम्ही नारायण अनुग्रहीले ॥२१॥
आजवरी माझे करवी कार्याते । निर्विघ्नपणाते देवोनियां ॥२२॥
करवोनि नाथा स्वये त्वां घेतले । महिमान भले अपूर्व ते ॥२३॥
वाचाळ ते मूक अंध ते पाहाती । बहिरे ऐकती तुझ्या कृपे ॥२४॥
पांगळे चढती मोठे गिरिवर । काय न होणार तुझ्या कृपे ॥२५॥
मज पामरास अमृत पाजीले । मज भूषविले कनकाने ॥२६॥
कुरुपासी दिले स्वरुप सुंदर । सकळ विद्यासार अज्ञानासी ॥२७॥
आंधळ्यासी डोळे बहिर्यासी कान । तुवां दयाघन दिधले की ॥२८॥
वामनाचा हात स्वर्गासी लाविला । पांगळा चढविला हिमगिरी ॥२९॥
मेलीयासी केले जणूं त्वां सजीव । अभावासी भाव दिधला त्वां ॥३०॥
काय उपमा देऊं तव या कृत्यासी । टिटवी सागरासि प्राशितसे ॥३१॥
खद्योतासी दिले भास्कराचे तेज । नपुंसका ओज पुरुषत्वाचे ॥३२॥
काय बोलूं अधिक वाचा हे खुंटली । मतिस्तब्ध झाली सुचेनाच ॥३३॥
कल्पवृक्ष केला साधारण वृक्ष । चंचलासी दक्ष बनविले ॥३४॥
पतंगाने उल्लंघिला की सागर । काय बडिवार बोलूं सांग ॥३५॥
मातीचे त्वां सोने नाथा बनवीले । पाषाणासी केले परिस तुवां ॥३६॥
नरकाचा स्वर्ग ओहोळाची गंगा । तुवां रमारंगा जणूं केली ॥३७॥
विषाचे अमृत तुवां बनविले । ऐसे जणूं केले गुरुनाथा ॥३८॥
जिह्वेवरी नाम ह्र्दयी स्वरुप । अंतरी उमोप प्रेमभाव ॥३९॥
दिली उपासना दिले कवित्वासी । काय न मजसी तुवां दिले ॥४०॥
तुझेच तुजला सर्व हे अर्पण । साजे परिपूर्ण तुझेठायी ॥४१॥
तन मन धन सर्वस्व हे तुझे । येथे काय माझे आहे सांग ॥४२॥
फ़टिंग मी आहे पायांचा किंकर । तुझाच साचार बनलोसे ॥४३॥
दोन कर तुझे पुढती जोडणे । मस्तक ठेवणे तुझे पायी ॥४४॥
येवढेच कृत्य आम्हां जीवांकडे । मग न वांकडे कधी होय ॥४५॥
विनायक म्हणे अनन्य शरण । तुज नारायण द्त्तनाथ ॥४६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP