रविवार ता. ८-१२-१९२९
 
अनिष्ट ते इष्ट इष्ट ते अनिष्ट । दोन्ही इष्टानिष्ट ऐशी जया ॥१॥
तोच येथे टिके दत्ताचीये पाशी । जये शुभाशुभांसी दूर केले ॥२॥
अनन्य जो भक्त कांही न चिंतीत । दत्तपदी ठेवित शुद्ध भाव ॥३॥
आचार अनाचार कांही न पाहत । विकल्प न येत मनामध्ये ॥४॥
तोच येथे टिके द्त्त कृपा पावे । इतरां काय व्हावे साध्य येथे ॥५॥
प्रेम हे आंधळे ऐसा  हा सिद्धांन्त । जगती बोलत सुज्ञ जन ॥६॥
विषय परमार्थ दोन्ही पाशी प्रेम । लागतसे सम वृत्ति जाणा ॥७॥
प्रियपण झाला स्वभाव जयाचा । तोच की दत्ताचा सत्यभक्त ॥८॥
परमार्थासी जो प्रमाने जडला । अनर्थ तयाला बाधती ना ॥९॥
देह सुख मुळी मानिना तो नर न। अशुभ करणार त्यांचे कोण ॥१०॥
अशुभ ते शुभ नरासी गमत । ज्याचे लांचावत चित्त कामे ॥११॥
विषय प्रेमाने विद्ध तुळशीदास । कथा ते सुरस दृष्टांतासी ॥१२॥
बायकोच्या प्रेमे मूढ तिचा दास । धरितां सर्पास रज्जू मानी ॥१३॥
भयानक सर्प तया न उमगला । जाहला आंधळा काम मदे ॥१४॥
तैसे दत्त प्रेमे आंधळे होवोनी । सादर भजनी असावे की ॥१५॥
तोच दत्तालागी प्रिय होत फ़ार । अपमान थोर साहत जो ॥१६॥
ज्याचे मन कांही झाल्या न चळत । स्थिरचि राहत दत्ताठाय़ी ॥१७॥
मग देहा सुख होवो किंवा दु:ख । विषाद हरिख मानीनाच ॥१८॥
शर्करेसी जैसी पिप्पीलिका जडे । तुटल्या न मुरडे वृत्तिभाव ॥१९॥
तैसे दत्त पदी मन हे जोडावे । कधी न परतावे कांही झाल्या ॥२०॥
नपुंसक पति पतिव्रता मनी । देवासम मानी भजे त्यासी ॥२१॥
तैसे दत्तपदी मन समर्पावे । वंचित न व्हावे स्वार्थ प्रेमे ॥२२॥
स्वार्थी नरा कधी दत्त न पावत । रहावे भजत निर्धाराने ॥२३॥
जयाचा निर्धार अचळ गिरीसम । तोच जाणा परम भक्तप्रिय ॥२४॥
सर्वस्वाचे त्यासी करावे अर्पण । विषय चिंतन करुं नये ॥२५॥
तुझे शुभाशुभ सकळ जाणतो । सर्वज्ञ प्रभु तो शुभ दाता ॥२६॥
एकदा तूं त्याचा बन भृत्य खरा । मग भार सारा तोच वाहे ॥२७॥
तुज न समजतां तुज सांभाळील । उडी तो घालील दयासिंधू ॥२८॥
घाबरा नको होऊं पळून न जाई । तोच सुखदायी संरक्षील ॥२९॥
भय उभारतां भय नको धरुं । तो जगदाधारु भय वारी ॥३०॥
हर्षामर्ष सारे सांडी ह्रदयांतूनी । दृढभाव मनी ठेवी भला ॥३१॥
परम भाग्य ज्याचे त्यासीच हा योग । लाभत अभंग दत्तकृपे ॥३२॥
विनायक म्हणे मी श्रीदत्ताचा । माझे रक्षणाचा भार त्यासी ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP