श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २० वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
जो निद्रित सूर्य असे ॥ त्याचें तेज बहु उग्र वसे ॥ त्याच्या लक्षांशाच्या प्रकाशें ॥ असें द्वादश आदित्य ॥७८॥
तो सूर्य होतां जागृत ॥ जळेल ब्रह्मांड समस्त ॥ यालागीं तो निद्रित ॥ जागृत होईल कल्पांतीं ॥७९॥
त्या सूर्याची भानु अंगना ॥ तिचे स्वाधीन बारा जाणा ॥ एका मासीं एक गगना ॥ प्रेरी सृष्टिभ्रमणातें ॥८०॥
बारा मासीं बारा सूर्य ॥ चालविती सृष्टिचें कार्य ॥ यालागीं भानु स्वामिणी होय ॥ द्वादश आदित्यांची ॥८१॥
ऐसें बोलतां जगन्नायक ॥ ब्राह्मण चरणांवरी ठेवी मस्तक ॥ म्हणे माझे हृदयीं एक ॥ पृच्छा असे राहिली ॥८२॥
तुम्हीं सांगीतले तेरा सूर्य ॥ त्यांचा फिटला संदेह ॥ परी चंद्राची उत्पत्ति कसी काय ॥ ते मज सांगा दयाब्धि ॥८३॥
हा चंद्र कोठें जन्मला ॥ याचा वृत्तांत सांगा वहिला ॥ आम्ही ऐकों ऋषीनें शापिला ॥ जन्मला सिंधुमंथनीं ॥८४॥
एक म्हणती गणेशें शापिला ॥ एक बोलती गौतमें शापिला ॥ एक म्हणती गुरुपत्नीसी रतला ॥ तिणें केला कलंकी ॥८५॥
येथें एकही निश्चय नाहीं ॥ यथार्थ तें तुम्ही सांगा पाहीं ॥ या त्रैलोक्याचें ठायीं ॥ गम्य तुम्हां सर्वही ॥८६॥
ऐसें ऐकोनि द्विजवचन ॥ संतोषला श्री भगवान ॥ म्हणे तुझें मातें वचन ॥ गोड वाटे हरुषाचें ॥८७॥
तुवां पुसली चंद्राची कथा ॥ तेचि परिस द्विजा आतां ॥ विश्वरुपाचें वीर्य होतां ॥ तोचि चंद्र प्रगटला ॥८८॥
तें चंद्रबिंब वाटोळें ॥ सूर्यापरीस तेज आगळें ॥ दिसे प्रकाशित सोज्वळें ॥ पाहतां मूर्छित सुर होती ॥८९॥
दिवसा सूर्याचा प्रकाश ॥ रात्रीं चंद्राचें तेज बहुवस ॥ तेव्हा रात्रीं किंवा दिवस ॥ नये ओळखों जनांसी ॥९०॥
मग महाविष्णूनें ॥ चंद्रबिंबाचें तेज काढून ॥ त्याचा निर्मिला मदन ॥ अति चंचळ कटाक्ष ॥९१॥
तो मदन बहु चंचळ ॥ तेणें शिवाचा केला छळ ॥ मग कोपोन रुद्रबळ ॥ केलें दहन मदनाचें ॥९२॥
त्यांतील उरला लक्षांश ॥ त्याचे पांच भाग केले सुरस ॥ मग वांटितां जाहला महेश ॥ पांचांठायीं तें ऐका ॥९३॥
एक भाग दिला देवांसी ॥ दुजा दैत्यराक्षसांसी ॥ तिचा अर्पिला मानवांसी ॥ चौथा तो पशुपक्षियां ॥९४॥
बहुत सूक्ष्म जीवांसी ॥ पांचवा अर्पिला हो त्यासी ॥ त्या जीवाची गणना विधीसी ॥ करितां नये चौमुखें ॥९५॥
म्हणोन या चंद्रासी ॥ उणीव आली प्रकाशासी ॥ तेणें पडिलें छिद्रासी ॥ लोक म्हणती कलंक ॥९६॥
हें वर्म नेणती गा जन ॥ लाविती ऋषिशापलांछन ॥ यथार्थ सांगतों मी जाण ॥ इतर शास्त्रां कळेना ॥९७॥
ऐसें वदतां जगदीश ॥ ऐकोनि हृदयीं ब्राह्मण हर्ष ॥ मग म्हणे देवा संतोष ॥ बहूत जाहला आमुतें ॥९८॥
या जन्पापरियंत ॥ ऐकों ऋषिशापाची मात ॥ तोचि निश्चय मनांत ॥ मानिला होता आजिवरी ॥९९॥
परी तेथें नव्हता ताळा ॥ शाप तीन ठायीं सांगितला ॥ ऐसा शास्त्रांचा गलबला ॥ कोठें थांग लागेना ॥१००॥
तें देवा तुमच्या वचनेंकरुन ॥ यथार्थ कळले मजलागून ॥ जें चंद्राचें तेज काढून ॥ केला पुतळा मदनाचा ॥१॥
म्हणोनि मदनाचें लावण्य ॥ वर्णिती विशेष पुराणें जाण ॥ शापशब्दाचें लांछन ॥ मिथ्या वदंती जनाची ॥२॥
परी एक आस्था मजलागीं ॥ तुम्हां पुसावया शारंगी ॥ जें चंद्राचिया अंगीं ॥ कळा कैशा तूटती ॥३॥
अंवसे पासोनि पूर्णिमेसी ॥ कळा भरती सर्व त्यासी ॥ मग उणीव दिवसदिवसीं ॥ अंवसेसी नुरे एकही ॥४॥
यापरी कळा तुटती वाढती ॥ हें काय जी कैवल्यपती ॥ याविषयीं भ्रांती ॥ निरसीं कृपासागरा ॥५॥
जों जों पुसे ब्राह्मण ॥ तों तों आनंदें ब्रह्म पूर्ण ॥ बोलावया सहस्त्रगुण ॥ हरुष वाटे जगदीशा ॥६॥
मग परमात्मा बोलिला ॥ ऐकें सांगतों द्विजा तुजला ॥ तुवांपुसिल्या चंद्राच्या कळा ॥ कांही तुटती वाढती ॥७॥
येविषयीं सांगतों प्रमाण ॥ ऐकें द्विजा चित्त देऊन ॥ चंद्रतेज महाविष्णुनें काढून ॥ निर्मिलेंसे मदनासी ॥८॥
छिन्न भिन्न जाहला शशी ॥ विटंबणा जाहली शरीरासी ॥ मग खेद पावोन मानसीं ॥ संतप्त जाहला अंतरीं ॥९॥
बहुत पावोनियां दु:ख ॥ करिता जाहला थोर शोक ॥ ऐसें जाणोनि चतुर्मुख ॥ बहु शांतवी चंद्रासी ॥११०॥
चंद्रासी म्हणे चतुरानन ॥ शोक सांडीं मनापासोन ॥ जें होणार तें आलें घडोन ॥ त्याचा खेद कां करिसी ॥११॥
चंद्र म्हणे अहो विधाता ॥ विष्णुपद येईल माझे हाता ॥ तरी शमेल माझी श्रमता ॥ येर्हवी चैन पडेना ॥१२॥
हें परिसोनि चतुरानन ॥ मनीं विचार करी पूर्ण ॥ पुढें सृष्टीचें कारण ॥ चालविलें पाहिजे ॥१३॥
एक दिवसाचा एक मास ॥ मासांचें केलें पाहिजे वर्ष ॥ वर्षाच हिशोब विशेष ॥ सहस्त्र लक्ष धरावा ॥१४॥
लक्षापासोनि कोटिवरी ॥ खर्च पद्में युगें च्यारी ॥ ऐसी गणना व्हावी बरी ॥ हें विधीचे मानसीं ॥१५॥
ऐसें योजुनि सत्वर ॥ सांगे चंद्रासी विचार ॥ म्हणे तुज सांगतों साचार ॥ करीशी उपाव तरी आहे ॥१६॥
तुजपासी असती सत्रा कळा ॥ दिव्य अंगना सोज्वळा ॥ त्या दोन देयीं विष्णूला ॥ संकल्पोनि स्वहस्तें ॥१७॥
यापरी स्त्रियांचें दान ॥ देशी महाविष्णूलागुन तरी त्याचें पद निर्वाण ॥ तुज प्राप्त होईल ॥१८॥
हे मानवलें चंद्रासी ॥ तितक्या अर्पून विष्णूसी ॥ घेईन त्याचे पदवीसी ॥ हा अभिप्राय मनींचा ॥१९॥
मग चंद्र विष्णूपासी जाऊन ॥ म्हणे तुज देतों स्त्रीदान ॥ एक कळेशी घेऊन ॥ समर्पिली विष्णुसी ॥१२०॥
चंद्र सर्वांगीं होता संपूर्ण ॥ कळा अर्पितां विष्णुलागुन ॥ तितुकाचि पडिला अंगें न्यून ॥ ब्रह्मा करी तो पाडवा ॥२१॥
दुजी कळा अर्पितां विष्णुसी ॥ ब्रह्मा म्हणे बीज त्यासी ॥ तेव्हां अर्पितां तिसरीसी ॥ तेज तीज मांडली ॥२२॥
ऐसें भरतां पंधरा दिवस ॥ सोळा अर्पी चंद्र विष्णूस ॥ यासी ब्रह्मा करी अंवस ॥ तेथूनि गणित मासाचें ॥२३॥
जे सतरावी जीवनकळा ॥ ते नार्पिली विष्णूला ॥ देहीं हीनत्व पावला ॥ खेद करी सोळांचा ॥२४॥
मग विष्णूसी देऊन धन ॥ एक आणी सोडवून ॥ पंधरा दिवसां आंतून ॥ आणी षोडश आपणापासी ॥२५॥
येतां बिजेचा दिवस ॥ सूत ओंवाळिती चंद्रास ॥ हाचि उदीम शशीस ॥ नित्यनित्य लागला ॥२६॥
जरी अर्पिता सतरावी कळा ॥ तरी पावता विष्णुपदाला ॥ तुवां पुसिलें प्रश्नाला ॥ तोचि दाविला अन्वय ॥२७॥
यालागीं अंवस आणि पूर्णिमा ॥ होऊं लागली द्विजोत्तमा ॥ हा उपाय कर्ता ब्रह्मा ॥ जाहला सृष्टीकारणें ॥२८॥
यालागीं तुटती वाढती कळा ॥ चंद्रबिंब दिसे वाटोळा ॥ हें मजवांचोनि आणिकाला ॥ श्रुत नाहीं शास्त्रासी ॥२९॥
सकळदेवांचें जन्मकर्म ॥ मीच जाणें परब्रह्म ॥ तें मजवांचोनि वर्म ॥ न कळे ऋषि अमरांसी ॥१३०॥
जैसें उंबराचे झाड ॥ त्यास लागती फळांचे घड ॥ एका फळांत लक्ष कीड ॥ जन्मोनि मरती तेथेंचि ॥३१॥
त्या किडयांच्या मनाचे ठायीं ॥ अवघें ब्रह्मांड इतुकेंचि पाहीं ॥ याखेरीज आणिक नाहीं ॥ हाचि निश्चय तयांचा ॥३२॥
लक्षावधि किडे एक्या फळांत ॥ आणि अनेक फळें एक्या घडांत ॥ ऐसीं झाडें पृथ्वीतळांत ॥ किती संख्या करावी ॥३३॥
पृथ्वी आणि आकाश ॥ एक अंडें म्हणावें त्यास ॥ ऐसा कोटि अंडांचा रहिवास ॥ विश्वरुपाचिया अंगीं ॥३४॥
विश्वरुप मायेच्या पोटीं ॥ सांठवीं जैसी सागरांत गोटी ॥ ते मायाचरण संपुटी ॥ असे परमेश्वराचें ॥३५॥
तोचि गा परमेश्वर ॥ मीच ओळखें निर्धार ॥ म्हणोनि आदि अंतींचा निर्धार ॥ तूतें सांगतों द्विजवर्या ॥३६॥
सकळ देवांची उत्पत्ती ॥ तूतें सांगितली द्विजमुर्ती ॥ आतां याची संहारस्थिती ॥ तेही ऐके सुजाणा ॥३७॥
जैं पृथ्वीस प्रळय होत ॥ तैं कर्म भूमीचा देव समस्त ॥ अष्टदेव कोनीं समवेत ॥ यक्षिणी समवेत जाणपां ॥३८॥
अष्टकोनींचे देव मिळोनी ॥ जाती अंतराळीं मिळोनि ॥ सांबासहित जाउनी ॥ चित्रसेनीं समरसती ॥३९॥
अंतराळींचा चित्रसेन ॥ जाय स्वर्गीच्या देवांत मिळोन ॥ स्वर्गीचा सहस्त्रनयन ॥ जिरे उदरीं ब्रह्मयाच्या ॥४०॥
ब्रह्मा विष्णूंत लय पावे ॥ विष्णु शिवरुपीं सामावे ॥ शिव महाविष्णूंत सांठवे ॥ सकळ देवांसमवेत ॥४१॥
जेव्हां ब्रह्मांड अवघें कोसळे ॥ तेव्हां महाविष्णु अष्टभैरवीं मिळे ॥ अष्टभैरव विश्वरुपीं मिसळे ॥ विश्वरुप मायेंत ॥४२॥
जेवी वृक्षसांठ बीजाचें पोटीं ॥ तेवीं सर्व देवांच्या कोटी ॥ जिरती मायेच्या पोटीं ॥ बीजरुपें राहोनी ॥४३॥
तरी त्या बीजास नाहीं नाश ॥ असती अनादीसिध्द आपैस ॥ संहारासरिसे उत्पत्तीस ॥ येती जाती सृष्टीतें ॥४४॥
देव स्वरुपीं नाहीं जाहले ॥ ना स्वरुपीं सामावले ॥ हे जीवंत ना मेले ॥ असती संचले अनादी ॥४५॥
देवांस नाहीं बध्दता ॥ नाश त्यांस ना मुक्तता ॥ हे न मिळती कवण्या पदार्था ॥ खापरवत असती ॥४६॥
ब्रह्मादिक हरिहर ॥ हे ब्रह्माचें अवतार ॥ ऐसें बोलतां शास्त्रांतर ॥ ते नेणोनि वर्म विवादती ॥४७॥
तोचि स्त्रजिता प्रतिपाळिता ॥ शेखीं तोचि संहारिता ॥ ऐसी करिती जे वार्ता ॥ ते स्वप्नन्यायें चावळती ॥४८॥
उत्पत्ति आणि संहार ॥ हा तो स्वरुपीं नाहीं व्यवहार ॥ तो अकर्ता परमेश्वर ॥ कर्तव्यता असेना ॥४९॥
हेंही ज्ञान बोलती पाहीं ॥ शेखीं त्यास लाविता सर्वही ॥ हा विपरीत बोध पाहीं ॥ काय सांगों संचरला ॥१५०॥
भिन्न भिन्न निवडिती देख ॥ शेखीं म्हणती अवघें एक ॥ यापरी चालती मतीचे तर्क ॥ द्वैत कीं अद्वैत निरखेना ॥५१॥
ज्या शास्त्रास ऐकती ॥ तेथेंचि बैसें त्यांची मती ॥ तोचि अनुभव ठसावे चित्तीं ॥ इतरास म्हणती कुतर्क ॥५२॥
हें परमेश्वरावांचून ॥ नेणती शास्त्रें पुराण ॥ यालागीं तोचि धन्य ॥ जो तरला भगवंतीं ॥५३॥
मुख्य परमेश्वर तो कवण ॥ जे ओळखती ज्ञानलोचन ॥ त्यांसी मोक्षपदाचें ठेवण ॥ प्राप्त होय निजभाग्यें ॥५४॥
ऐसें बोलिला जगदीश ॥ ब्राह्मण हृदयीं परमहर्ष ॥ पुढें पुसेल प्रश्न देवास ॥ तेंचि रहस्य परिसावें ॥५५॥
ऐसें देवांचे संवाद मिळणीं ॥ जैसें गंगेयमुनेचें पाणी ॥ माझी बुध्दि सरस्वती होऊनी ॥ गुप्तरुपें मिसळली ॥५६॥
यापरी जाहली हे त्रिवेणी ॥ श्रवणें उध्दरती सकळ प्राणी ॥ एक पारायण होतांक्षणीं ॥ तेथीचें माघस्नान फळ त्यांसी ॥५७॥
येथील तीर्थवासी श्रोतियांसी ॥ भक्तीचें अन्नसत्र घालूनि त्यांसी ॥ वाढी शहामुनी ब्रह्मरसासी ॥ तृप्त होतील मोक्षमार्गी ॥१५८॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपनतत्वसारनिर्णये विंशतितमोध्याय: ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2020
TOP