श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४७ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
ओं नमो ब्रह्मांडकर्त्या ॥ भवार्णवांत तारिसी जीवां बुडत्यां ॥ आनंदमाया करिती आरत्या ॥ करुन अकर्ता तूं होसी ॥१॥
योगियांसी तूं अलक्ष ॥ करिती तुझी साक्ष ॥ लक्षा न येसी तूं अलक्ष ॥ पक्षपाती भक्तांचा ॥२॥
भक्तिप्रिय रघुनंदन ॥ जो अवतार रामचंद्र पूर्ण ॥ सत्यस्वरुप अगाध गहन ॥ दयावंत धर्मात्मा ॥३॥
उदय केला सूर्यवंशाचा ॥ निर्मूळ केला निशाचरांचा ॥ बंद सोडविला सुरवरांचा ॥ नवग्रहांची बेडी तोडिली ॥४॥
मारोन लंकापति रावण बिभीषणास राज्यीं स्थापून ॥ विजयाची ध्वजा उभारुन ॥ प्रयागवटीं पातला ॥५॥
श्रीराम म्हणे अंजनीकुमरा ॥ त्वां जावें नंदिग्राम नगरा ॥ भेटोनि भरता प्रियकरा ॥ वृत्तांत निवेदीं वर्तला ॥६॥
राम आले प्रयागतटीं ॥ श्रुत करा कर्णपुटीं ॥ उदयीक होतील तुमच्या भेटी ॥ ऐसी गोष्टी सुचवीं ॥७॥
चौदा वरुषांचा नेम पूर्ण ॥ म्यां भेटीचां केला गहन ॥ त्यांत दोन दिवस अधिक जाण ॥ मर्यादेचे लोटले ॥८॥
एक एक घटिका भरताकारणें ॥ जाय चौं युगांसमान ॥ आतां त्यजील तो प्राण ॥ विलंब त्यातें साहीना ॥९॥
भरत कोमळ निर्मळ ॥ सुढाळ सखोल सरळ ॥ नेमीं जैसा ध्रुव अढळ ॥ हृदयीं कल्लोळ प्रेमाचा ॥१०॥
भरत तपियांत शिरोमणी ॥ भरत विवेकाची खाणी ॥ भरत महा अनुभवी ज्ञानी ॥ भक्तीचें रत्न होय भरत ॥११॥
भरत वैराग्याचा थाट ॥ भरत शांतीचा लोट ॥ भरत धैर्याचा अचाट ॥ अविट एकनिष्ठ होय भरत ॥१२॥
भरत सखोल विशाल सिंधू ॥ भरत शुध्द सात्विक साधू ॥ भरताचा अगाध बोधू ॥ भरत बंधु सखा माझा ॥१३॥
भरत आनंदाची मूर्ती ॥ भरत प्रेमाची जाती ॥ भरताची निर्विकल्प मती ॥ भरत भावार्थी जिवलग ॥१४॥
भरत स्वानंदाचा पुतळा ॥ भरत आत्मसुखाचा जिव्हाळा ॥ भरत माझ्या नामीं रंगोन गेला ॥ माझा कळवळा भरतासी ॥१५॥
भरताची माझी परमप्रीती ॥ भरतासी माझी स्वरुपस्थिती ॥ भरताची माझी एकज्योती ॥ उभयतां गति एकचि ॥१६॥
भरतें मजसाठीं वाढविल्या जटा ॥ सांडिला राज्यभोगवटा ॥ भरत भावार्थी मोठा ॥ मनोलाट मजकडे ॥१७॥
भरत मजसाठीं उदासी ॥ भरतें त्यागिलें विषयांसी ॥ नावडे भोग सुख त्यासी ॥ जाहला विरक्त मजसाठीं ॥१८॥
भरत अनुभवाचा स्तंभ ॥ भरतास पैस जैसा नभ ॥ भरत आत्मज्ञानाचा गर्भ ॥ भरत बिंब ब्रह्मींचा ॥१९॥
भरत उदार धीर गंभीर ॥ भरत शाहाणा विवेकचतुर ॥ भरत जिवलग सखा सहोदर ॥ भरत चिद्रत्न चित्कळा ॥२०॥
भरतास माझ्या भेटीची हुडहुडी ॥ मला त्याच्या भेटीची तांतडी ॥ यालागीं उभवूनि गुढी ॥ जाय भेटी भरताच्या ॥२१॥
राम लक्ष्मण सीतेसहित ॥ प्रयागीं आले सांग त्वरित ॥ जेणें आनंद भरे भरतातें ॥ तें तूं करी मारुती ॥२२॥
परिसोनि श्रीरामवचन ॥ आनंदें अंजनीनंदन ॥ वंदोनि श्रीरामचरण ॥ गुढी उभविली यशाची ॥२३॥
वंदोनि श्रीरामपादपद्मा ॥ स्वानंदमय मारुतीचा आत्मा ॥ मनोवेगें नंदिग्रामा ॥ गगनमार्गें पातला ॥२४॥
इकडे भरत चिंताक्रांत ॥ रामभेटीस उतावेळ चित्त ॥ पाचारुनि प्रधान सुमंत ॥ विचार पुसे त्यालागीं ॥२५॥
भरत म्हणे सुमंत सखया ॥ रामाचा नेम गेला टळोनियां ॥ आतां त्यजीन आपुली काया ॥ दहन करीन हुताशनीं ॥२६॥
चौदा वरुषें गेलीं लोटोन ॥ अधिक वाढेल दोन दिन ॥ श्रीराम न ये परतोन ॥ मी पाषाण वांचलों ॥२७॥
श्रीराम परब्रह्म ॥ निर्गुण निराकार पुरुषोत्तम ॥ नाशवंत आकारभ्रम ॥ याचा लोभ त्या कैंचा ॥२८॥
राज्य उपाधि मानून ॥ उदास होतां रघुनंदन ॥ त्यावर कैकयीनें पुट देऊन ॥ पुरतां बोध ठासला ॥२९॥
राम निष्काम विषयातीत ॥ त्यावर कैकयीची मसलत ॥ त्याच्या सुखास पडली रीत ॥ गेला संतोषें वनासी ॥३०॥
ज्यास लाधला परीस ॥ तो काय वैचित बसेल कवडयांस ॥ जो गेला क्षीरसिंधूतीरास ॥ कूप आशा त्या कैंची ॥३१॥
जो ब्रह्मानंदीं ब्रह्म जाहला ॥ संसार सोस करील कशाला ॥ इंद्रपदीं जो बैसला ॥ तो काय कैकाडी होईल ॥३२॥
राम ब्रह्मरुप चोखट ॥ अनंत सुखाचा जो पैं थाट ॥ तो नाशवंत राज्यपट ॥ कशास अंगीकारील ॥३३॥
जो नांदे अक्षयीं वैकुंठीं ॥ तो काय बैसेल मसणवटीं ॥ ब्रह्मानंदें रस घोटी ॥ तो काय भंग पावेल ॥३४॥
संसार जाणोनि नाशवंत ॥ राज्यभोगीं उपाधि बहुत ॥ हें समजोन रघुनाथ ॥ वांतिप्राय त्यागिलें ॥३५॥
लक्ष्मण जानकीचें शाहाणपण ॥ विषय भोग टाकिलें थुंकोन ॥ निर्वासना शुध्द होऊनियां मन ॥ गेली रामीं मिळोनियां ॥३६॥
माझेच मंदभाग्यें ॥ गुंतलों संसार घोर उदयोगें ॥ नाहीं रंगलों श्रीरामरंगें ॥ पडलों उदयोगें भवचक्रीं ॥३७॥
म्यां कां धरिला राज्यलोभ ॥ शोकसंतापाचा आरंभ ॥ सेविला नाहीं जानकीवल्लभ ॥ महालाभ त्यागिला ॥३८॥
संसार घोर फांसाटी ॥ ताणोनि जीव कष्टी ॥ शोकसंताप कर्मराहाटी ॥ न होय भेटी स्वहिताची ॥३९॥
जें करावें तें अवघें सोस ॥ चित्तास चिंतेचा अपार फांस ॥ न मिळे विश्रांतीचा लेश ॥ जीव फिरे भवचक्रीं ॥४०॥
हर्षशोकांचे डोंगर ॥ भरले दु:खाचे सागर ॥ जन्ममरण चौर्यांशी फेर ॥ शेवटीं ये मायेचे कचाटीं ॥४१॥
काम क्रोध मद मत्सर ॥ मोह ममता वासना शिरजोर ॥ आयुष्य पाहतां क्षणभंगुर ॥ स्वल्पांत प्राणताप नुरला ॥४२॥
धन दारा पुत्र कन्या घर ॥ यांनीं केला जीवास घोर ॥ नाना कष्ट करुनि अपार ॥ दमें पोसी कुटुंबा ॥४३॥
ना धरी संतसंगासी ॥ ना करी दानधर्मासी ॥ कुटुंबासाठीं जाहली पिसीं ॥ स्वहित विचार सुचेना ॥४४॥
अगा संसारासारिखा ॥ तसा नव्हे श्रीराम सखा ॥ ज्ञानियांचा मुगुट देखा ॥ नये लेखा ब्रह्मादिकांसी ॥४५॥
राम निजाचा सांगाती ॥ राम ब्रह्मींची निजमूर्तीं ॥ राम निर्गुण प्रकाशज्योती ॥ भक्तपति श्रीराम ॥४६॥
दयाळु मायाळु राम कृपाळु ॥ राम स्वानंदसुखाचा कल्लोळ ॥ त्या श्रीरामाचे चरणकमळ ॥ ब्रह्मादिका इच्छिती ॥४७॥
शिवादिकांचें चिंतन ॥ श्रीराम गुणनिधान ॥ ज्याचें जाहलिया दर्शन ॥ तुटे बंधन भवाचें ॥४८॥
भवभयाची कहाणी ॥ नुरे राम देखिल्या नयनीं ॥ त्या रामासी मी सोडोनी ॥ नंदिग्रामीं राहिलों ॥४९॥
रामावांचोनि जें जिणें ॥ तेंचि दिसे लाजिरवाणें ॥ धिक् मज भरतालागोन ॥ अदयापि देह वागवीं ॥५०॥
राम नये परतोन ॥ आतां सुमंत्रा त्यजीन प्राण ॥ ऐसें बोलोन भरतानें ॥ करें ललाट पिटिलें ॥५१॥
पसरोनि दोनी नयन ॥ आकर्षोनि पंच प्राण ॥ त्यजूं पाहे जीवालागोन ॥ तों कपीनें लक्षिला ॥५२॥
आला आला राम राणा ॥ भरता त्यजूं नको प्राणा ॥ ऐसी ध्वनि पडतां काना ॥ भरत जाहला सावध ॥५३॥
हर्ष पावोनि विलोकीं गगनीं ॥ तों सन्निधा पातला प्रणापतरणी ॥ भरतास सद्भावें नमूनी ॥ विनयें वदें नम्रते ॥५४॥
ऐकें भरता रामबंधु ॥ प्रयागीं आला सुखसिंधु ॥ संगें लक्ष्मण सीता बंधु ॥ निरोग निर्भय पातलीं ॥५५॥
हें परिसोनि भरतानें ॥ मारुतीस घाली लोटांगण ॥ आंसुवें भरलें दोन्ही नयन ॥ सप्रेम हृदयीं दाटला ॥५६॥
मग म्हणे अंजनीकुमरा ॥ मज सुकतिया अंकुरा ॥ वार्तामेघ वळूनियां पुरा ॥ वर्षलासी मजवरी ॥५७॥
सूळीं देतां सोडविला ॥ तैसा उपकार मज जाहला ॥ अथवा तपाअंतीं योगियाला ॥ भेटे शंकर त्यापरी ॥५८॥
पद्मिणीस रविकिरण ॥ तेवीं उल्हासे माझें मन ॥ सांग श्रीरामचंद्रानें ॥ इतुके दिवस कां लाविले ॥५९॥
परिसोनि भरताची विनयवाणी ॥ बोलता जाहला कपींद्र ज्ञानी ॥ वदें तुझा भाव देखोनी ॥ संतोष पावला मम आत्मा ॥६०॥
धन्य तुझें बंधुपण ॥ धन्य तुझें लक्षण ॥ धन्य तुझी एक निष्ठा पूर्ण ॥ धन्य संसारीं तूं एक ॥६१॥
मर्तयास सुधापानी ॥ घेऊनि आलासि कृपा करुनी ॥ किंवा बुडतां अगाध जीवनीं ॥ नौका जैसा धांवली ॥६२॥
धन्य तुझा प्रेमा अद्भुत ॥ धन्य तूं अगाध भावार्थ ॥ धन्य तूं एक जगीं समर्थ ॥ धन्य श्रीराम सखा जोडिला ॥६३॥
त्वां जिंकिले चारी पुरुषार्थ ॥ भक्तीस शिरोमणी तूं समर्थ ॥ केलें वैराग्य अद्भुत ॥ कृतांत तोडरीं बांधिला ॥६४॥
शुध्द साधु धर्मात्मा ॥ दृढ तुझा अगाध रामीं प्रेमा ॥ आतां ऐके रामाचा प्रेममहिमा ॥ सांगों प्रताप तुजलागीं ॥६५॥
चित्रकुटींहूनि निघाला जगजेठी ॥ पंचवटी गंगातटीं ॥ बोधोनियां पर्णकुटी ॥ वेदांत बोधी लक्ष्मणा ॥६६॥
लक्ष्मण ऐके सावधान ॥ ब्रह्म अंकूर आकार पूर्ण ॥ अवघाचिद्विलास विश्वमय जाण ॥ बध्द मुक्त मिथ्या भ्रम ॥६७॥
हीच खूण सीतेसी ॥ बोधोनि सावध केलें तिसी ॥ स्वानंदपद पावोन मानसीं ॥ गुरुत्वें भजती रामातें ॥६८॥
पुढे रावणे कपट करुन ॥ चोरिली सीता सुढाळ रत्न ॥ तिच्या शुध्दीलागोन ॥ वन शोधिलें पुरुषोत्तमें ॥६९॥
जटायू कबंध भिल्लटी मुक्त केली ॥ सुग्रीवासि मैत्री जोडिली ॥ अठरा पद्में कपींची मंडळी ॥ सेवेसि सादर पैं जाहली ॥७०॥
त्यांत मी एक रंक दीन सेवक त्याचा ॥ काया वाचा मनें साचा ॥ ऋणानुबंध अनंतजन्मींचा ॥ पडला सत्य संकल्प ॥७१॥
वाळी मारुन चौंदिशांप्रती ॥ वानर धाडिले शोधार्थी ॥ गेलों लंके आतौती ॥ सीता सती पाहावया ॥७२॥
अपमानून दशानन ॥ करुन लंकेचें दहन ॥ विध्वंसोनि अशोकवन ॥ जानकीस भेटलों ॥७३॥
समाचार सांगोन श्रीरामाचा ॥ संतोषी केला आत्मा जानकीचा ॥ यश घेऊन हरुषाचा ॥ तुज अग्रजा भेटलों ॥७४॥
जानकीची सांगतां गोष्टी ॥ आनंद सर्वां कपींच्या पोटीं ॥ रामें परीसोनि कर्णपुटीं ॥ मिठी घातली मज तेव्हां ॥७५॥
कपिसैन्यांत उभविली गुढी ॥ राम चालिले तांतडी ॥ दक्षिणसमुद्राचे थडीं ॥ मिळे कपींचा थोकला ॥७६॥
अद्भुत सामर्थ्य श्रीरघुनंदन ॥ जळार्णवावर पाषाण तारुन ॥ शतगांवे सेतु बांधोन ॥ सैन्य नेलें परथडी ॥७७॥
बिभीषण आला शरण ॥ त्यास संकल्पी लंकाभुवन ॥ सुवेलशिखरीं चढून ॥ पुढें लंका लक्षिली ॥७८॥
अंगद धाडिला शिष्टाईसी ॥ मान्य न करी गर्वराशी ॥ मग आरंभिलें युध्दासी ॥ ज्यासि जोडा असेना ॥७९॥
सोळा प्रधान इंद्रजित ॥ कुंभकर्ण बलोन्मत्त ॥ पुत्र पौत्र असंख्यात ॥ निशाचर संहारिले ॥८०॥
संहारिले राक्षस कोटयानकोटी ॥ संताप आला रावणा पोटीं ॥ युध्दा आला रामा निकटीं ॥ थाट घेऊनी सैन्याचा ॥८१॥
रथारुढ रावण ॥ जैसा दिसे गिरी द्रोण ॥ निर्भय भयंकर कठीण ॥ जेवीं बिडाळ मुशकातें ॥८२॥
दोघे थडकले एकमेकां ॥ जैसे रत्नाकर महोदधी देखा ॥ किंवा महिषासुर अंबिका ॥ अथवा जालंधर शंकर ॥८३॥
किंवा गंड भैरव विवरभैरव ॥ शार्दूलावर शार्दूलाची हांव ॥ गजावर गज करी उठाव ॥ नातरी उभयतां सिंह मीनले ॥८४॥
किंवा सूर्यावर सूर्य धांवला ॥ कीं चंद्रासी चंद्र थडकला ॥ अथवा आकाशावर आकाश लोटला ॥ किंवा मेरुवर मांदार ॥८५॥
हिरण्यकशिपू नृसिंहावरी ॥ तैसे भिडले दोन्ही समरीं ॥ कौतुक पाहावया सुंदरी ॥ गगनीं विमानें दाटली ॥८६॥
दोघांच्या शस्त्रांचा कडाका ॥ कोटि विजांचा जैसा भडका ॥ कृतांत हृदयी बैसे धडका ॥ शिवही माथा डोलवी ॥८७॥
त्या युध्दाची गोष्टी ॥ सांगतां नये भरतां होटीं ॥ प्रतापी राम जगजेठी ॥ रावण रणीं आणिला ॥८८॥
निवटोन दशमुख वीस भुजा ॥ उभविली याची अपार ध्वजा ॥ यशस्वी जाहला श्रीरामराजा ॥ पुष्पवृष्टी केली सुरवरीं ॥८९॥
ज्यासाठीं अवतार घेतला कृपानिधी ॥ तें कार्य गेलें सकळ सिध्दी ॥ फार दिवस देव होते बंदी ॥ मुक्त केले नवग्रहांसहित ॥९०॥
बिभीषण राज्यीं स्थापून ॥ सृष्टीचें अरिष्ट निवारुन ॥ जानकीसंगें घेऊन ॥ तुझे भेटी पातला ॥९१॥
उदयीक गुरुपुष्य मुहूर्त ॥ अमृतसिध्दीयोगें विख्यात ॥ उभयतां भेटतां आनंदभरित ॥ डोळे आमुचे निवतील ॥९२॥
परिसोनि अंजनीकुमाराची गोष्टी ॥ आनंद न माय भरताचे पोटीं ॥ सुमंत्रा सज्जी सैन्याच्या थाटी ॥ रथ अश्वकुंजर ॥९३॥
राम जाहला प्रतापी बळी ॥ अयोध्येंत सांगा पिटोनि टाळी ॥ वसिष्ठासहित सकळ मंडळी ॥ तिघी माता पाचारा ॥९४॥
पालालोण सकल सैन्य ॥ ऋषिमंडळी माता वनिता घेऊन ॥ अयोध्येचे सकळ जन ॥ रामभेटी निघाले ॥९५॥
भरत चालिला चरणचाली ॥ मारुतीनें धरिला करकमळीं ॥ राम लक्ष्मण जनकबाळी ॥ तिघें आलीं सन्मुख ॥९६॥
पाहतां रामलक्ष्मण ॥ लोटांगण घातलें भरतानें ॥ रामें धरिला कवटाळून ॥ उभयतां अश्रु लोटले ॥९७॥
तैसीच लक्ष्मणें घातली मिठी ॥ घेतली जानकीची भेटी ॥ तिघी मातांनीं पाहतां दृष्टीं ॥ ब्रह्मानंद कोंदला ॥९८॥
गुरु वसिष्ठा लोटांगण ॥ सुमत्रांसि आलिंगन ॥ तिघी मातांचे वंदोनि चरण ॥ सुखी जाहली अयोध्या ॥९९॥
जाहला सुखाचा अगाध सिंधू ॥ भरतभेटी चालिला आनंदू ॥ शत्रुघ्नासहित चौघेबंधु ॥ आत्मस्वरुपीं एकची ॥१००॥
ज्यांत रहस्य गुज बीज ॥ तीच लिहिली कवीनें मौज ॥ संतांचें वंदोनि चरणरज ॥ ग्रंथि रंग भरियेला ॥१॥
मुनींद्र स्वामी गुरु पूर्ण ॥ तो परमहंस नारायण ॥ तेणें अंगीकार करुन ॥ अनुग्रह दीधला ॥२॥
होतें पूर्वींचें पुण्य शुध्द ॥ म्हणोनि लाधलों पाय अगाध ॥ स्वामीनें केला पूर्ण बोध ॥ भ्रांति निरसिली मनाची ॥३॥
तो मुनी स्वामी परमहंस ॥ दैवें भेटला आम्हास ॥ नाहीं पाहिलें यातीस ॥ केला अंगिकार समर्थें ॥४॥
जो स्वयें मुक्त पुरुष ॥ त्यासि विश्वचि ब्रह्म दिसे ॥ भेदवादी काल्पनिकास ॥ भिन्नाकार भासत ॥५॥
मुनि नाम गुरुस्वामीस ॥ शहा शरण असे त्यास ॥ म्हणोनि शहामुनी नामास ॥ प्रसिध्द ग्रंथी मांडिलें ॥६॥
नामरुप हें सोंग ॥ जैसा मृगजळींचा तरंग ॥ किंवा स्वप्नींचा उदयोग ॥ काय सत्य मानावा ॥७॥
इंद्रधनुष्याची उमटे रेषा ॥ किंवा गंधर्वनगरींचा गिरी जैसा ॥ नळिकेवर गुंते राव जैसा ॥ तैसा लेखा नामरुपीं ॥८॥
ज्याची उघडली ज्ञानदृष्टी ॥ त्यास तत्त्वमय दिसे सृष्टी ॥ सूर्यबिंबास पोटपाठीं ॥ पाहाणारा हिंपुटी तो होय ॥९॥
जो ब्रह्मींचा अंकुर ॥ ज्ञानस्वरुप परमेश्वर ॥ ब्रह्मादिक हरिहर ॥ त्यास गुरु तो होय ॥११०॥
तो सद्गुरु जीव उध्दरिता ॥ ज्ञानस्वरुप प्रकाशकर्ता ॥ त्यास वोळखे जो निज हिता ॥ तेव्हां गुरुमार्गी तो होय ॥११॥
ज्ञानस्वरुप परमेश्वर ॥ ज्याचें हृदयीं प्रगटेल साचार ॥ तोचि सद्गुरु निर्धार ॥ अधिकारी शिष्यासी ॥१२॥
ज्ञानासि नाहीं जाती ॥ जेथें ज्ञान तो सद्गुरुमूर्ती ॥ विदुर ज्ञानी पुराणीं बोलती ॥ ती जात कोणें मोजावी ॥१३॥
पक्षियांत गरुड ज्ञानी ॥ सर्प कुळांत सहस्त्रफणी ॥ निशाचरांची अशुभ करणी ॥ बिभीषण कैसा निवडला ॥१४॥
अंगद जांबुवंत हनुमान ॥ नळ नीळ सुग्रीव गवेषण ॥ यातीचे वानर असोन ॥ ज्ञानी जैसे बृहस्पती ॥१५॥
व्यासवाल्मीकांचें न्यूनपण ॥ प्रज्ञा ईश्वरासमान ॥ प्रल्हाद दैत्यनंदन ॥ सुरांस वंदय तो जाहला ॥१६॥
यालागीं ज्ञानास नाहीं जात ॥ ज्यापें ज्ञान तो गुरु समर्थ ॥ शाहाणे फिरंगीची किंमत करित ॥ मूर्ख पाहे मेणाकडे ॥१७॥
ज्ञानी पाहे जळ एक ॥ अज्ञान मोजी तरंग अनेक ॥ हा सांगावया विवेक ॥ जगासी बोलतां पुरेना ॥१८॥
आपुलें स्वहित आपण पाहणें ॥ हें ज्ञानियाचें लक्षण ॥ रामामागें राज्य ना करणें ॥ ही अक्कल भरताची ॥१९॥
आपुलें बरें होण्यासाठीं ॥ संसारास लावूनियां काठी ॥ सद्गुरुचरणीं घातली मिठी ॥ बैसलों पाटीं मोक्षाचे ॥१२०॥
सांडोनि जातीचा अभिमान ॥ श्रीगुरुस गेलों शरण ॥ फिटलें जन्ममरणांचें धरणें ॥ निमग्न जाहलों स्वानंदीं ॥२१॥
आनंदमय जाहली मती ॥ हृदयीं प्रकाशली ज्ञानज्योती ॥ मांडिली सिध्दांतबोधाची मौज ॥२२॥
परिसतां श्रोतयां वाटे चोज ॥ अनुभवाचें रहस्य बीज ॥ गुरुचें गुज मांडिलें ॥२३॥
ऐका सिध्दांत बोधाची गती ॥ श्रवणें उडे कल्पना भ्रांती ॥ अनुभव बोध ठसावे चित्तीं ॥ होय विश्रांति स्वानंदीं ॥२४॥
बहुत मतांची उभारणी ॥ मांडिन तर्हातर्हांची बोलणीं ॥ श्रोतीं उबग न मानावा मनीं ॥ रहस्यगोडी घेइजे ॥२५॥
तीस प्रसंगांपर्यंत ॥ सांगेन अनेक मतांचे सिध्दांत ॥ ती मौज आणोनि मनांत ॥ पुढें लक्ष ठेविजे ॥२६॥
तिसांपुढें सोळा प्रसंग ॥ स्वानंदाचा माजवीन रंग ॥ जें परिसोनि अभंग ॥ चित्त रमे आत्मरमणीं ॥२७॥
ऐसा उल्लेख मतीचा ॥ रस वोतीन अनुभवाचा ॥ अर्थ मांडीन निगम आगमाचा ॥ डोलेल श्रोता पाहोनी ॥२८॥
मध्यें अनेक चरित्र भासन ॥ ज्यांत विवेक चातुर्य गहन ॥ दृष्टांत साहित्यरचना मांडीन ॥ समजे संसार परमार्थ ॥२९॥
आतां असो ही बोली ॥ पुढें परिसा ग्रंथचाली ॥ कुरुक्षेत्रीं संग्राममेळीं ॥ दुर्योधनें काय केलें ॥१३०॥
धांवोनि भीष्मापासीं आला ॥ शोकें बहु संतापला ॥ शिरींचा मुगुट आपटिला ॥ प्राण त्यजीन म्हणे ताता ॥३१॥
आम्ही तुझ्या भरंवसियावर ॥ केला पांडवांसी वैराकार ॥ धर्म अर्जून वृकोदर ॥ तृणप्राय ममदृष्टीं ॥३२॥
तूं बळाचा समीर ॥ पांडव वितुळती जैसें अभ्र ॥ कीं तूं पेटल्या वैश्वानर ॥ पांडव तृण भस्म होती ॥३३॥
अथवा तुज वज्रापुढें ॥ पांडव गिरिपक्ष पडे ॥ किंवा सिंहापुढें दडे ॥ गजसैन्य ज्यापरी ॥३४॥
तूं प्रचंड कोपल्या मारुती ॥ पांडव निशाचर कांपती ॥ नातरी तुज गरुडाचे झडपगती ॥ पांडव सर्प त्यजिती प्राण ॥३५॥
तूं प्रगटल्या प्रतापरवी ॥ पांडव निशा नाहींसी व्हावी ॥ त्वां हांव धरिल्या जीवीं ॥ भयभीत हरि होय ॥३६॥
तूं बैसलासि बकध्यान धरुन ॥ आतां त्वां घेतल्या मौन ॥ करितील निर्मूळ जाण ॥ माझी गती बरी नव्हे ॥३७॥
अकरा अक्षौहिणी सैन्या आंतून ॥ संहारलें आठ अक्षौहिणी सैन्य ॥ तीन अक्षौहिणी तेही जाण ॥ पूर्णाआहुति मजसुध्दां ॥३८॥
करीं शस्त्र धरुन ॥ तुजपुढें त्यजीन प्राण ॥ ऐसें बोलतां दुर्योधन ॥ उत्तर करी भीष्म तेव्हां ॥३९॥
म्हणे तूं एक जगीं मूर्ख ॥ दुसरा ऐकिला दशमुख ॥ तिसरा शिशुपाळ देख ॥ चौथा जरासंध पांचवां कंस ॥१४०॥
साहवा हिरण्यकशिपु असूर ॥ सातवा जाण भस्मासुर ॥ आठवा रुक्मिया अविचार ॥ नववा जयद्रथ दाहवा शकुनी मामा तुझा ॥४१॥
ऐसे दशमूर्ख संसारीं ॥ म्यां ऐकिले पाहिले नेत्रीं ॥ गर्विष्ठ फुगीर अहंकारी ॥ अविचारी कुमती नष्ट भ्रष्ट ॥४२॥
देवद्रोही हिंसाचारी ॥ पापकर्मीं निर्दय निष्ठुरी ॥ जितां नांदती नरकद्वारीं ॥ शुध्दवासना त्यां कैंची ॥४३॥
त्यांत तूं आग्रहवादी ॥ ना ऐकसी शिकविली बुध्दी ॥ निज प्राप्तीची नाहीं शुध्दी ॥ निज प्राप्तीची नाहीं शुध्दी ॥ विकार नदीच्या पुरीं वाहसी ॥४४॥
तुम्ही कुबुध्दि धरुन ॥ उदकीं बुडविला भीमसेन ॥ तो जिवंत आला घरालागून ॥ अपयश आलें तुम्हांसी ॥४५॥
कपटें लाखज्वाहार केला ॥ दुष्ट हातें वन्ही लाविला ॥ विवरातून हरी वांचवी त्यांला ॥ जग निंदीं तुम्हांसी ॥४६॥
द्रौपदीस्वयंवरी जाऊनी ॥ प्रतापें जिंकिली याज्ञसेनी ॥ लाज लावूनी तुम्हांलागूनी ॥ अपयश पदरीं बांधिलें ॥४७॥
कपटफांशानें राज्य जिंकिलें ॥ विना अपराधें द्रौपदीस छळिलें ॥ शेखीं वनवासास धाडिलें ॥ तेथेंहि करा उपाधी ॥४८॥
कर्णाचा भरवंसा धरोनि पाहीं ॥ विराटनगरीं वळविल्या गाई ॥ अपयश पावलां त्या समयीं ॥ कौतुक अर्जुनें दाविलें ॥४९॥
वारंवार विदुरानें ॥ तुम्हांस उपदेश केला जाण ॥ त्याचे ना ऐकोनियां वचन ॥ या थरासी आणिलें ॥१५०॥
कृष्ण येऊनि आपण ॥ तुम्हांसी शिष्टाई केली जाण ॥ त्याचीं आव्हेरिलीं वचनें ॥ केला नाश कुळाचा ॥५१॥
जें जाहलें तें बहुत बरवें ॥ आतां तरी सावध व्हावें ॥ धर्मरायासी सख्य करावें ॥ यांत कल्याण होईल ॥५२॥
अल्प आयुष्यासाठीं ॥ करुं नये कर्मराहटी ॥ अपयश बांधोनि गांठीं ॥ नरका जाणें बरें नव्हे ॥५३॥
वमीं गर्व अहंकार अमंगळ ॥ होई शांत पवित्र निर्मळ ॥ निर्वैर जाहल्या भूपाळ ॥ मग सोमवंशीं धन्य तूं ॥५४॥
हें भूषण यावया ॥ अपार पुण्य पाहिजे राया ॥ तूं गर्वें व्यापूनियां ॥ निंदय कर्म जोडिलें ॥५५॥
बायपास केला उपदेश ॥ तो ना होय राजहंस ॥ अहिग्रीवेंत वसे विष ॥ तें कैसा त्याग होईल ॥५६॥
वन्हि पावेल शीतळता ॥ पाषाण ना सोडी कठिणता ॥ राक्षस मांस खातां ॥ वीट मानील घडेना ॥५७॥
काळ येईल शांती ॥ दया करील जीवांवरुती ॥ हें न घडे कल्पांतीं ॥ जन्मस्वभाव अनिवार ॥५८॥
जैसा तुझा जन्मकाळ कठिण ॥ उपजलास आगियावृक्ष होऊन ॥ आतां तुळसीदशा तूतें होणें ॥ हें कैसें घडेल सांग पां ॥५९॥
आतां असो तुझिया स्वभावासी ॥ पाहे माझिया संग्रामासी ॥ ऐसें वदोनि दुर्योधनासी ॥ रथारुढ पैं जाहला ॥१६०॥
रहंवरीं जुंपिले वारु श्वेत ॥ श्वेत छत्र श्वेत ध्वज विराजित ॥ श्वेत वस्त्रें अंगीं भोभत ॥ श्वेत मुक्तांचे हार गळां ॥६१॥
ठाणमाण चपळगति जाण ॥ मनोमय फिरती घेऊन उड्डाण ॥ तैसे रथीं जुंपिले चुचकारुन ॥ जैसे गरुडभावंडे ॥६२॥
सत्यस्वरुप भीष्ममूर्ती ॥ रथीं बैसला जेवीं गभस्ती ॥ बाण धनुष्य घेतलें हातीं ॥ रहंवर चालविला पवनगतीनें ॥६३॥
जैसा प्रळयीं शोभे काळ ॥ तैसा जाहला गंगेचा बाळ ॥ आरक्तता पावले नेत्रकमळ ॥ सिंहदृष्टीं विलोकी ॥६४॥
पाहोनि भीष्माचा कोप ॥ पांडवसैन्यांत भरला कंप ॥ भय पावले महाभूप ॥ दचक बैसला धर्मासी ॥६५॥
जैसा फूल फूलल्या पलसाचा ॥ तैसा रंग केला सैन्याचा ॥ सपाटा लावून शरांचा ॥ वीर सर्व भेदले ॥६६॥
बाण रोवोनि ध्वजेसी ॥ चक्राकार फिरविलें मारुतीसी ॥ मूर्च्छा आली अर्जुनासी ॥ कृष्णही करी अचंबा ॥६७॥
कृष्ण थापटी अर्जुनाला ॥ म्हणे सावध कुंतीबाळा ॥ पहा भीष्माच्या युध्दाला ॥ जोडा नसे ब्रह्मांडीं ॥६८॥
कैसा विवेकाचा पुतळा ॥ शूर जेवीं रुद्र कोपला ॥ धैर्यमेरुहूनि आगळा ॥ शीतळ जैसा चंद्रमा ॥६९॥
ज्ञानीं तरी बृहस्पती ॥ भला तरी धैर्यमूर्ती ॥ इंद्रियजित विशाळ कीर्ती ॥ सत्यवादी पुण्यश्लोक ॥१७०॥
आतां यासीं युध्द करणें ॥ पाहूं तुझें शहाणपण ॥ हा घेईल तुझा प्राण ॥ कीं शस्त्र मातें धरवील ॥७१॥
अर्जूनें सोडिले शर कोटी ॥ तृणप्राय भीष्माचे दृष्टी ॥ शरें शर तोडून शेवटीं ॥ तिधार्या बाण काढिला ॥७२॥
पार्थ फोडावा ललाटीं ॥ येवढा बाण लाविला नेहटीं ॥ भार घालून जगजेठीं ॥ रथ खालीं दडपिला ॥७३॥
तुरंग मेटाखुंटीं येऊन ॥ रथ गेला भूमींत रुतोन ॥ बाण गेला मुगुट फोडून ॥ पार्थ रक्षिला जगदात्में ॥७४॥
कौतुक पाहोनि भीष्मानें ॥ विषाद पावला चौंगुण ॥ म्हणे त्वां वांचविला अर्जुन ॥ हुन्नर करुन जगदीशा ॥७५॥
आतां पाहे माझा पुरुषार्थ ॥ जीवें मारीन कुंतीसुत ॥ किंवा शस्त्र तुझें हातांत ॥ धरवीन ही प्रतिज्ञा ॥७६॥
जन्मलों जीच्या उदरांत ॥ ती जननी गंगा अद्भुत ॥ तरीच शंतनूचा सुत ॥ हारीं आणीन तुजलागीं ॥७७॥
मीनल्या सुरांचियां कोटी ॥ साह्य जाहल्या पार्थनिकटीं ॥ तितुक्यांच्या झोडीन पाठी ॥ तरी मी पुत्र गंगेचा ॥७८॥
ऐसें बोलोनि गंगानंदनें ॥ काढिला अर्धचंद्र कुर्हाडा बाणा ॥ त्या शराचें निवारण ॥ करावया संकट सुरेंद्रा ॥७९॥
आव्हानोनि मंत्रशक्ती बळी ॥ बाण सोडिला गगनमंडळीं ॥ गडबडिली देवांची मंडळी ॥ भूकंप जाहला थरारिला शेष ॥१८०॥
कडाडिली प्रळयींची वीज ॥ कीं द्वादशअग्नींचें तेज ॥ काळ खेचरी शक्तीचें बीज ॥ अथवा अष्टभैरव क्षोभले ॥८१॥
हेलावले सप्तही सागर ॥ भय पावले दैत्य निशाचर ॥ थरारले ऋषीश्वर ॥ म्हणती सृष्टी बुडाली ॥८२॥
धर्माचा निधों पाहे प्राण ॥ भीमाचें अवसान गेलें निघून ॥ नकूळ सहदेव घाबरे होऊन ॥ मिठी घालिती एकमेकां ॥८३॥
ज्या बाणाच्या तेजेंकरुन ॥ लोपलीं चंद्र सूर्य तारागणें ॥ अर्जुनें नेत्र झांकून ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८४॥
ब्रह्मा आणि शंकर ॥ आश्चर्य करिती वारंवार ॥ म्हणती सोमवंशीं नर ॥ ऐसा नाहीं लक्षिला ॥८५॥
पाहोनि भीष्माचा पुरुषार्थ ॥ पराक्रम अति अद्भुत ॥ मग पातला श्रीकृष्णनाथ ॥ चक्र हातीं घेतलें ॥८६॥
चक्र सोडिलें गगनमंडळीं ॥ बाणशक्ती निवारिली ॥ हें पाहोनि भीष्मबळी ॥ धनुष्य हातिचें ठेविलें ॥८७॥
रथाखालीं उडी टाकोन ॥ घाली कृष्णास लोटांगण ॥ वदे माझा अवघा पण ॥ सिध्दीं गेला जगदीशा ॥८८॥
काय यशाची बांधणें मोट ॥ जाहला पुरुषार्थाचा शेवट ॥ येथून युध्दाची खटपट ॥ संकल्प म्यां सोडिला ॥८९॥
आतां शस्त्र घेऊनियां करीं ॥ माझा मस्तक उतरी हरी ॥ मुक्त होईन पायांवरी ॥ तुज देखतां गोविंदा ॥१९०॥
तूं दृष्टी करिसी वांकुडी ॥ पाडिसी ब्रह्मांडाच्या उतरडी ॥ त्यांत मी काय बापुडी ॥ शस्त्र मजवर धरावें ॥९१॥
परंतु त्वां घेतलें अपयश ॥ मातें दीधलें परमयश ॥ जगीं वाढविला कीर्तीघोष ॥ ही यशपदवी तुज शोभे ॥९२॥
मातें मुक्त करावया ॥ कृपा केली भक्तराया ॥ ऐसें वदोनि गंगतनया ॥ नेत्र पाती झांकिल्या ॥ नेत्र पाती झांकिल्या ॥९३॥
येथून शरपंजरीं भीष्म पहुडेल ॥ तें लिहितां कवीस्स गंहिवर येईल ॥ यालागीं काव्यरसकल्लोळ ॥ समाप्त केला सिध्दांतीं ॥९४॥
पुण्यश्लोक रायाचें कथन ॥ आवडीनें लिहिलें अर्थ भरुन ॥ श्रवण केलिया समाधान ॥ श्रोतियांचें होईल ॥९५॥
पुढें परिसा चरित्रगोडी ॥ पुरेल भाविकांची आवडी ॥ जन्मा आलिया हेचि जोडी ॥ कृपा गुरुची होईल ॥९६॥
गुरुकृपेनें श्रीकृष्णचरण ॥ जोडे हेंचि धरुन ध्यान ॥ ज्यांत होय आपुलें कल्याण ॥ तोचि लाभ साधावा ॥९७॥
अगाध श्रीकृष्णाची लीला ॥ वर्णितां वेद मौनावला ॥ तेथें आमुची मती बोलावयाला ॥ शेषापुढें दर्दुरी ॥९८॥
परंतु व्हावें अनन्यशरण ॥ यांतच संतोषे नारायण ॥ यालागीं वारंवार नमन ॥ करितां लाभ भक्तीचा ॥९९॥
नमनाएवढा मंत्र थोर ॥ कोटि साधनांचें सार ॥ नमनीं नमावा श्रीकृष्ण अवतार ॥ मूळबीज अंकुर ब्रह्मींचा ॥२००॥
ॐ कार मूळबीज माया ॥ प्रगटलीं ब्रह्मांडे रचावया ॥ तिचें सूत्र तुझे हातीं देवराया ॥ यालागीं नमूं तुज एका ॥२०१॥
एकाएकीं अवघा एक ॥ हा प्रकाशला गुरुनायक ॥ शहामुनीचा विवेक ॥ विराला जेवीं जळगार ॥२०२॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये सप्तचत्त्वारिंशो ध्याय: ॥४७॥
॥अध्याय ४७॥ ओव्या २०२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2020
TOP