श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३७ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
कोटि अवतारांचा मुगुटमणी ॥ श्रीकृष्णअवतार प्रतापतरणी ॥ पांडव पूर्वदिशा पूर्वभुवनीं ॥ उदेला प्रकाश ब्रह्मांडीं ॥१॥
पांच पांडव पंचभूत ॥ आपण महत्तत्व जाहला समर्थ ॥ पांच अंगुळी कुंतीसुत ॥ आपण तळहात साजिरा ॥२॥
पांडव अंत:करणपंचक ॥ हृदय जाहला यदुनायक ॥ पांडव प्रंचप्राण देख ॥ आपण जाहला जीवात्मा ॥३॥
पांडव पंच इद्रियें ॥ आंतील स्फुरण श्रीकृष्ण होये ॥ अथवा मुकुंद उदधी द्ये ॥ पांडव गंगा पंचमुखें ॥४॥
पांडव शाखा कृष्ण तरुवरु ॥ पांडव शिखर कृष्ण मेरु ॥ पांडव तर्या कृष्ण सागरु ॥ पांडव अवयव कृष्ण शरीर ॥५॥
पांडव दर्पण अवलोकून ॥ आंत बिंबला श्रीकृष्ण ॥ कृष्णदर्पणीं पांच जण ॥ तदाकार दीसती ॥६॥
पांचांतही अर्जुन गुणनिधी ॥ जैसा सप्तसिधूंत क्षीराब्धी ॥ प्रेमळ सखेपणाची बुध्दी ॥ आवडे गोविंदा सर्वदा ॥७॥
यापरी पाहोनि किरीटी ॥ कृष्ण आवडीं धरोनि पोटीं ॥ आपुल्या जीवाच्या गोष्टी ॥ तुजसाठीं सांगतों ॥८॥
माझा अवघा योगमहिमा ॥ तूतें सांगतों विरोत्तमा ॥ ओळखावया माझा आत्मा ॥ फार पुण्य़ पाहिजे ॥९॥
बहुत जन्में कष्टीं ॥ जो आचरे सुकृतकोटी ॥ तैं माझी होय भेटी ॥ दिसे जगीं जगदीश ॥१०॥
ऐसें ज्ञान व्हावया लागून ॥ सहस्त्रांत एक निघे जाण ॥ ज्याचे दृष्टीस सबाह्य चैतन्य ॥ कोंदें प्रळयांबुसारिखें ॥११॥
सुवर्णमणी सुवर्णसुतीं ॥ गुंफिलें रुपें मिरवती ॥ तैसी जनांची गुंती ॥ आत्मतंतूनें वेष्टिली ॥१२॥
हें विश्व माझेंचि असे ॥ परंतु मायेनें केलें पिसें ॥ माया भुलवी ब्रह्मादिकांस ॥ इतरांचा केवा तो किती ॥१३॥
बुध्दि अहंकार मन ॥ पंचभूतें मिळोन ॥ ही महदादि माया जाण ॥ इणें सृष्टि विस्तारिली ॥१४॥
दुसरी जीवरुपिणी ॥ गुणसाम्य म्हणावे तिजलागूनी ॥ या मायेच्या पसार्यांतूनी ॥ निघतां जीवास निकट ॥१५॥
आब्रह्मभुवनाचा वळसा ॥ पडिले जीव न निघती सहसा ॥ मातें अर्थ भजती त्यां भरवंसा ॥ सायुज्याचा निर्धारें ॥१६॥
चहूंप्रकारें भजती मातें ॥ आर्त जिज्ञासू अर्थार्थी ॥ चौथा ज्ञानी महाभारत ॥ याचा अर्थ आकर्णीं ॥१७॥
संसारभवरोगातें ॥ त्रासूनि काकुळती जीवशिव ये मातें ॥ माझ्या भेटीस तळमळ चित्तें ॥ आर्त त्यातें म्हणावें ॥१८॥
सर्वशास्त्रीं प्रवीण ॥ जाणते सारनिर्णय पूर्ण ॥ ओळखे जीवशिव माया निर्गुण ॥ जिज्ञासू त्यातें बोलिजे ॥१९॥
अर्थार्थींची भक्ती ॥ म्हणे मज द्यावी मुक्ती ॥ ऐसी जयाची रीती ॥ अर्थार्थी त्यासी म्हणावें ॥२०॥
चौथा ज्ञानी जीवन्मुक्त ॥ मीच ब्रह्म हा सिध्दांत ॥ ध्यानधारणा लयलक्षातीत ॥ निष्काम शुध्द स्वानंदी ॥२१॥
येरु चौघे मुक्त ॥ गुणमायेनें केले भ्रांत ॥ ज्यासि गुरुकृपा प्राप्त ॥ तोचि मुक्त जाणिजे ॥२२॥
यापरी संपला सातवा ॥ पुढती परिसावा आठवा ॥ सप्तप्रश्नांचा उगावा ॥ अर्जुनाचा होईल ॥२३॥
पार्थ बोले प्रार्थून ॥ ब्रह्म अध्यात्म कर्ण कोण ॥ अधिदैवत अधिभूत अधियज्ञ ॥ अंतीं प्राप्ति अप्राप्ति कोणती ॥२४॥
देव म्हणे भलाभला ॥ तत्व देखणा तूं जाहला ॥ तुझ्या प्रश्नाच्या अर्थाला ॥ सप्तही पदर उकलितों ॥२५॥
ब्रह्म म्हणिजे निराकार ॥ ज्यासीं नाहीं पारावर ॥ अपार अमूप परात्पर ॥ ज्यांत चराचर दिसेना ॥२६॥
लयलक्षातीत शुध्द स्वानंद ॥ निर्विकल्प निरायम आनंदकंद ॥ निराभास चिदाकाश परमानंद ॥ नादबिंदु तुर्या न स्पर्शे ॥२७॥
नसे पंचभूत त्रिगुण ॥ नसे कार्य ना कारण ॥ बंधमुक्त असाध्य साधन ॥ त्रिपुटी क्षीण ज्यासाठीं ॥२८॥
नसे कर्म क्रिया जात विजात ॥ देवदेवी नाम रुपातीत ॥ सबाह्य अभ्यंतरीं परिपूर्ण भरित ॥ नसे अंत अनंत तो ॥२९॥
कुंठित वेदशास्त्रें पुराण ॥ विशाल शब्दें घेतलें मौन ॥ ज्याचें हृदयीं सांठवें गगन ॥ जुनाट अविट अफाट ॥३०॥
मनबुध्दींद्रियामाझारी ॥ तुझ्या स्फुरणाचें जिव्हारीं ॥ उठवी मी अर्जुना लहरी ॥ तोचि ब्रह्म हृदयस्थ ॥३१॥
माझा मी अनादिसिध्द ॥ मम स्वरुपीं नसे भेद ॥ मी जगाचा मूळकंद ॥ अध्यात्म त्यासी म्हणावें ॥३२॥
मी विश्व विश्वातीत मी ॥ हरिहरांचा आत्मा उल्लेख मी ॥ मी मायेचा निय़ंता ब्रह्म मी ॥ अध्यात्म यासी म्हणावें ॥३३॥
चंद्रसूर्यांभोंवतें खळयाचें मंडळ ॥ दिसे परी नादिसे मूळ डाळ ॥ इंद्रधनुष्य पसरे विशाळ ॥ तेवीं कर्म जाणावें ॥३४॥
हें पाहासी अवयव ॥ अवयवीं इंद्रियांचा भाव ॥ इंद्रियांपासीं कर्तव्य ॥ कर्म त्यासीं म्हणावें ॥३५॥
जैसे आकाशीं अभ्र प्रगटलें ॥ मृगजळ पाहोनि मृग भुलले ॥ पति निमाल्या वैधव्य आलें ॥ विटाळ कपाळीं सुटेना ॥३६॥
नारद ब्रह्मचारी अढळ ॥ साठ पुत्रांचा लागला विटाळ ॥ हनुमंत इंद्रियजित प्रबळ ॥ मकरध्वज पुत्र कर्मगतीं ॥३७॥
स्वप्नीं वासनेच्या मूळें ॥ कल्पितस्त्रीआलिंगनमेळें ॥ खवळे विषयरेत ढांसळे ॥ होतो खेळ कर्माचा ॥३८॥
अनुष्ठानीं मांडव्य अचळ ॥ त्या प्राप्त जाहला शूळ ॥ धर्म सत्यवादी सरळ ॥ त्याचा अंगुष्ठ गळाला ॥३९॥
जडदेहास कर्म नसे ॥ शेखी आत्म्यालागीं न दिसे ॥ मध्यें कर्म भासे ॥ रज्जुसर्प ज्यापरी ॥४०॥
ऐसी कर्माची गती ॥ तूतें सांगीतली सुमती ॥ आतां आधिदैवत म्हणती ॥ तेही रीती अवधारीं ॥४१॥
अधिदैवत म्हणिजे जीवास ॥ जो ब्रह्मींचा जाणावा अंश ॥ साधनांचें लावूनि पिशाच ॥ विसरोनी आपणा भ्रमिष्ट ॥४२॥
जो देहगांवींचा मोकासी ॥ संसार आटाळा चाले ज्यासी ॥ घेऊनि पापपुण्याचें ओझ्यासी ॥ तुझें माझें नाचवी ॥४३॥
जैसा जळीं बिंबोनि रवी ॥ दुजेपणाचा भास दावी ॥ तैसा अविद्येचें गांवीं ॥ अडकलों म्हणे सोडवी ॥४४॥
यासी अधिदैवत म्हणिजे ॥ आतां अद्भुत ओळखिजे ॥ जेणें अंत:करण तुझें रिझे ॥ तैसें परिसें सुजाणा ॥४५॥
विद्युल्लता दिसोन हरपे ॥ तरंग उठोनि दडपे ॥ देह होय आणि लोप ॥ यासी अधिभूत म्हणावें ॥४६॥
पंचभूतांचा अंश ॥ आकारें चौखाणीस ॥ नसोनि दिसे असोनि नसे ॥ अधिभूत यास म्हणावें ॥४७॥
अदियज्ञ म्हणावें ज्यासी ॥ सत्तेनें चालवी पिंडब्रह्माडांसी ॥ लोहचुंबकवत जडासी ॥ चेष्टवी सामर्थ्यें आपुल्या ॥४८॥
जयासाठीं एकाग्रता होऊन ॥ योगी लक्षिती धरुन ध्यान ॥ जो अंतर्बाह्य व्यापून ॥ वसे हृदयीं सर्वांच्या ॥४९॥
बुडे प्रणवाचा माथा ॥ त्यासि अदियज्ञ म्हणावें पार्था ॥ जेथें जिरे पुरुषार्थ चौथा ॥ त्यासी म्हणावें अदियज्ञ ॥५०॥
अंतकाळाचा विचार ॥ त्याचे सांगतों दोन प्रकार ॥ एक दावी मोक्षाचें द्वार ॥ एक नेत पतनासी ॥५१॥
शुक्लपक्ष दिवस उत्तरायण ॥ अग्नि प्रदीप्त सावध मन ॥ ऐशा समयीं पावे मरण ॥ जाय प्राणी उत्तम गती ॥५२॥
कृष्णपक्ष रात्र दक्षिणायन ॥ दाटे कफ अग्नि जाय विझोन ॥ तैशा समयीं पावे मरण ॥ जाय प्राणी अधोगती ॥५३॥
दोनी समय दोनी पंथा नेती ॥ हे पूर्वपक्षाची भ्रांती ॥ ज्ञाते जितांचि मुक्त असती ॥ त्यांहि समय कायसा ॥५४॥
यापरी निश्चयाची वाणी ॥ स्वये वदला शार्ड्गपाणी ॥ आठवा प्रसंग येथूनी ॥ समाप्त जाहला जाणिजे ॥५५॥
राजविद्ये गुज ॥ तूतें सांगतों मूळबीज ॥ मागें आचरले श्रेष्ठराज ॥ पुण्यशीळ धर्मात्मे ॥५६॥
नलगे एकांतीं जाणें ॥ संसार परमार्थ साधणें ॥ पयनीरांचें मिसळणें ॥ हंस निवडी वेगळें ॥५७॥
डेरियात दधि मंथोनी ॥ माखण काढी सुगरणी ॥ तैसें प्रपंचाचे मेळणीं ॥ तत्व निवडिती जाणते ॥५८॥
सोनाराचे केरांतून ॥ झारी काढी रज निवडून ॥ इंद्रादि नळ फार जाहले जाण ॥ दमयंतीनें खरा निवडिला ॥५९॥
बहुत राजे अव्हेरुन ॥ छप्पन्न कोटि यादवांत शोधून ॥ श्रीकृष्णातें पणीं रुक्मिण ॥ निजपद मोक्षदाता ॥६०॥
सकळ देवांची मंडळी ॥ त्यांत पंचभूतें निर्गुण कालविलीं ॥ आंत शाश्वतवस्तू आपुली ॥ पारखिती तत्ववेत्ते ॥६१॥
यापरी सकळांचे हृदयीं ॥ असोनि वेगळा असे पाहीं ॥ रवी बिंबोनी जळाचे डोहीं ॥ अलिप्त जेथिंचा तेथेंचि ॥६२॥
अगा उदय पावल्या रवी ॥ विश्वाचें कार्य चालवी ॥ परी जगाचें कर्म गोवीं ॥ गुंतेल काय सवितां ॥६३॥
अवलोकितां चंद्रनयन ॥ समुद्र भरे दुणावून ॥ चंद्रकांत पाझरोन ॥ कुमुदिनी विकासती ॥६४॥
यापरी मी सर्वांहूनि वेगळा ॥ चालवी कलाप कुशला ॥ जैसा चुंबक हालवी जडाला ॥ आपण अचळ निजस्थानीं ॥६५॥
आकाश सर्वांत वसे ॥ कोणाचे मानसीं खुपतसे ॥ तेवीं मी गा परेशें ॥ व्यापिलें साक्षित्वें सर्वांतरी ॥६६॥
सर्व माझिये पोटी सांठवलीं मी सर्वांचें हृदयकमळीं ॥ शेखीं मजपासून तीं वेगळीं ॥ मी त्यांत असेना ॥६७॥
बीजापोटी वृक्ष न मिळे ॥ वृक्षापोटीं बीज आलें ॥ बीजापोटीं वृक्ष न मिळे ॥ वृक्षापोटीं बीज कैंचें ॥६८॥
ही आमुचि लपनडाई ॥ ब्रह्मादिकां न सांपडे पाहीं ॥ तुझ्या भाग्याची नवाई ॥ म्हणोनि उकल दाविला ॥६९॥
आकाशीं अभ्रें जाहलीं ॥ आकाश ना गवसे अभ्रमेळीं ॥ दीपापासोनि निघे काजळी ॥ काजळींत दीप असेना ॥७०॥
सूर्यापासोनि मृगजळ ॥ मृगजळीं नसे रविमंडळ । तैसें मजपासोनि विश्व सकळ ॥ विश्वामाजी मी नसें ॥७१॥
जग पाहतां मी नसें ॥ मी पाहतां जग ना दिसे ॥ नग कल्पितां सोनें नसे ॥ सोन्यांत नग दिसेना ॥७२॥
कापुसापासोनि पेळू जाहला ॥ कापुस काय बुडाला ॥ पेळूपासोनि दोर निघाला ॥ तेव्हां पेळू काय हरपली ॥७३॥
सुतापासोनि जाहले कुकडें ॥ मग सूत काय वेगळें दडे ॥ कुकडयापासोनि चिवट जोडे ॥ चिवट म्हणतां कुकडें बुडालें ॥७४॥
चिवटापासोनि पांजणी ॥ पांजजी म्हणतां चिवटाची हानी ॥ पांजणीपासोनि परमनी ॥ परमनींत पांजणी नसे काय ॥७५॥
परमनीचीं लुगडीं जाहलीं ॥ लुगडयांत परमनी वेगळी राहिली ॥ याप्रमाणें समज किल्ली ॥ आदि अंतीं मी एकचि ॥७६॥
असंख्य बुडबुडे उठोनि फुटत ॥ तळीं उदक असे आंत ॥ तैसी जगाची उत्पत्ति होत जात ॥ मी व्यापक जळन्यायें ॥७७॥
अवघा मीच एक पाहीं ॥ दुजेपणाचा लेश नाहीं ॥ एकचि गोडी ढेंप घेई ॥ फोडाफोड कशाला ॥७८॥
साकरे कशाला सडावें ॥ कापुरा कां गा पाखंडावें ॥ दूढपेढयाचें सलपट सोलावें ॥ बीज काढणें मूर्खता ॥७९॥
मी अवघाचि नारायण ॥ त्यांत वंद्य निंद्य म्हणावा कोण ॥ सोन्याचा खंडेराव सोन्याचें श्वान ॥ किंमत उंच नीच करावी ॥८०॥
मी जगीं निराकार ॥ ओंकार तो माझा अंकुर ॥ तयापासोनि वेदविस्तार ॥ तोहि कर्ता मीच कीं ॥८१॥
मीच वेदस्वरुपीं नारायण ॥ यालागीं वेदवचन प्रमाण ॥ कर्म किया या वेद हवन ॥ मंत्र समिधा अग्नि मी ॥८२॥
प्रकृति पुरुष माझेंचि रुप ॥ जगाचा मीच मायबाप ॥ जग तें माझें रुप ॥ बोलती मूर्ति ब्रह्मींची ॥८३॥
यापरी जो अद्वैत बोधी ॥ श्रीकृष्ण पार्थासी प्रबोधी ॥ ज्ञानाचा जगीं सुधाब्धी ॥ मीही वंदी तयासी ॥८४॥
हाचि म्हणावा राजयोग ॥ महाभाग्यें हें भाग्य ॥ हाचि साधकांसी सिध्दयोग ॥ मीही श्रीरंग सन्मानीं ॥८५॥
हेंचि देखण्याची दिठी ॥ ब्रह्मस्वरुप देखे सृष्टी ॥ तोचि ज्ञानमुगुट किरीटी ॥ मोक्ष वंदी पाय त्याचे ॥८६॥
ऐसें देखणें राजस ॥ तोचि ज्ञानाचा कळस ॥ याविरहित करिती सायास ॥ मजप्राप्तीकारणें ॥८७॥
एक कीर्तनीं सुरवाडले ॥ एक नामींच रंगले ॥ एक योगमार्गीं लागले ॥ एक यज्ञीं एक तपीं ॥८८॥
अगा द्वैत धरोनि किरीटी ॥ करितीं साधनें अनेक कोटी ॥ मी न सांपडें शेवटीं ॥ श्रम होती साधकां ॥८९॥
आतां आणिकही प्रकार ॥ करिती यज्ञ समग्र ॥ तया पुण्यें स्वर्गनगर ॥ भोगिती भोग शक्रासम ॥९०॥
पुण्य सरतां लोटून देती ॥ मृत्युलोकीं येऊनि पडती ॥ केलें पुण्य क्षया जाती ॥ पुन्हा प्राप्ति गर्भासी ॥९१॥
माझे भक्तिवीण जाण ॥ केलें तें व्यर्थ दानपुण्य़ ॥ कथिलीं वेदशास्त्रें पुराण ॥ शेषाची हुटहुटी जिराली ॥९२॥
यालागीं सोडूनि थोरपण ॥ मातें व्हावें अनन्यशरण ॥ मी जगदीश त्यालागूण ॥ स्कंधीं वाहे आपुल्या ॥९३॥
हो कां यातीचा नीच ॥ भक्तीनें मानीं उंच ॥ न पाहे जातीचा पेंच ॥ करीं पूज्य सुरांसीं ॥९४॥
माझिया भक्तिविण ॥ काय जाळावें थोरपण ॥ उंच वटवृक्ष सांडोन ॥ तुळसी पूजिती सर्वत्र ॥९५॥
पूर्णिमेचे दिवशीं ॥ कोण सन्मानी चंद्रासी ॥ लहान होतां विजेसीं ॥ विश्व नमी त्या समयीं ॥९६॥
सरितेस पूर येतां भरोन ॥ वृक्ष जाती वाहोन ॥ लोहाळे लहान होवोन ॥ अक्षयी वसती तटाकीं ॥९७॥
जो बैल उडी मारी ॥ त्यावरी ओझें घालिती भारी ॥ पडिल्याचें काढिती लौकरी ॥ थोरां पीडा लहान सुखी ॥९८॥
जो विश्वांत चाले नम्र ॥ त्यासी मानिती सर्वत्र ॥ मीही सन्मानीं शार्ड्गधर ॥ नम्र मजला आवडे ॥९९॥
थोर वाढलें केळीचें पान ॥ तें वारियानें जाय चिरोन ॥ शेखीं करोनि पात्र द्रोण ॥ होय खरकटें पडे ॥१००॥
नागवेलीचें लहान पान ॥ राजसभेंत पावे मान ॥ हात पसरती त्यालागून ॥ देवां संतां संतोष ॥१॥
लहान मुंगी साकर मिळे ॥ थोर गज काष्टें चघळे ॥ उंच माहालीं हागती कावळे ॥ संतझोंपडींवर देउळें मंडप ॥२॥
दूर्योधनाच्या भोजनीं नाहीं राजी ॥ विदुराची खाय भाजी ॥ या भक्ताचे काजीं ॥ देह विकला आपुला ॥३॥
भक्तीनें नीचासि मानीं ॥ ब्राह्मण श्रेष्ठ सर्वांहूनी ॥ ज्यापासी भक्तीची खाणी ॥ तो मी पूजीं जगदात्मा ॥४॥
यालागीं माझिया भक्तीसी ॥ नलगे वेंचावे द्रव्यासी ॥ फळ फूल पत्र तोयासी ॥ अर्पितां संतोषें मी परमात्मा ॥५॥
म्हणोनि मातें पुजावें भजावें ॥ प्रेमें अथवा वैर धरावें ॥ पूर्वपश्चिमे सरितेने वाहावें ॥ भेटी एक सिंधूची ॥६॥
येथें मृत्यु एक ग्रासे ॥ काळ भयंकर लागलासे ॥ सर्वांच्या मुळीं लागला दिसे ॥ तो न सोडी सर्वथा ॥७॥
ऐसें जाणोनि मातें शरण ॥ होतां कल्याण मी करीन ॥ यापरी वदला जगज्जीवन ॥ प्रसंग नववा तो जाहला ॥८॥
मग म्हणे मोक्षदानी ॥ मी ब्रह्म निरंजन निर्गुणी ॥ आदि अंतीं निर्वाणीं ॥ भजपरता दुजा असेना ॥९॥
मी जगदीश जगाचा आत्मा ॥ माझा न कळे ब्रह्मादिकां महिमा ॥ मी परमात्मा वीरोत्तमा ॥ माझा महिमा मी जाणें ॥११०॥
मी नाकळें गा वेदासी ॥ न सांपडें सुरां असुरांसी ॥ मातें नेणती महर्षी ॥ माझ्या पोटीं अवघेचि ॥११॥
चार मनु सप्तऋषी ॥ हे योजिले माझें मानसीं ॥ या आकारें जगासी ॥ लोकपाळांसी निर्मिले ॥१२॥
शुभ अशुभ भाव अभाव ॥ यश अपयश देवी देव ॥ मोहो ममता जीव शिव ॥ मी निर्मिता सर्वांसी ॥१३॥
हें परिसोनि अर्जुन ॥ कर जोडोनि करी नमन ॥ तूं जुनाटपुरुष भगवान ॥ म्यां तुज आजी ओळखिलें ॥१४॥
मागें ऋषीश्वरांलागून ॥ त्यांस पुसे ब्रह्मज्ञान ॥ ते म्हणती पुरातन ॥ श्रीकृष्ण परमात्मा ॥१५॥
तेव्हां विषयीं लंपट मन ॥ राजमदें अंध नयन अव्हेरिलें ऋषींचें वचन ॥ अविद्या-कैफीं भुललों ॥१६॥
आतां कृपेचा दिवा ॥ हृदयीं लाविला माधवा ॥ ओळखिलासि करुणार्णवा ॥ तूं सत्य ब्रह्म कीं ॥१७॥
तूं परब्रह्म परंधाम ॥ पवित्र तूं पुरुषोत्तम ॥ तूं जगदीश निजवर्म ॥ तूं अगम्य सर्वांसी ॥१८॥
मायापर परात्पर ॥ अजरामर परमेश्वर ॥ तूं दयेचा सागर ॥ दया करिसी मज दीना ॥१९॥
आतां परिसिजे जगदीशा ॥ माझी पुरवी मनींची आशा ॥ तुझ्या विभूति कैशा ॥ मज परेशा दाखवी ॥१२०॥
मग म्हणे अच्युत ॥ विष्णुभूत आदित्यांत ॥ प्रकाशामाजी विख्यात ॥ रवि माझी विभूती ॥२१॥
मरुद्गणांत मरीची ॥ तारागणांत चंद्रची ॥ वेदांत सामवेदची ॥ विभूति माझी असे कीं ॥२२॥
इंद्रियांत चालक मन ॥ जो सर्वेंद्रियांस खेळवी जाण ॥ तो मीच गा चिध्दन ॥ ओळखें खूण मुळींची ॥२३॥
भूतांमाजी चेतना ॥ देवांत इंद्र जाणा ॥ अकरा रुद्रांत कैलासराणा ॥ रक्षोगणांत कुबेर ॥२४॥
शिखरीमाजी महामेरु ॥ पुरोहितांत सुरगुरु ॥ जळराशींत सागरु ॥ ऋषि भृगु विभूती माझी ॥२५॥
यज्ञांत जपयज्ञ होय ॥ गिरीमाजी हिमालय ॥ वृक्षांमाजी अश्वत्थ आद्य ॥ देवऋषींत नारद ॥२६॥
गंधर्वात चित्ररथ ॥ सिध्दांत कपिल समर्थ ॥ गजामांजी ऐरावत ॥ अश्वांत उच्चै:श्रवा विभूती ॥२७॥
सिध्दरसांत अमृत ॥ नरांमाजी राजा समर्थ ॥ शस्त्रांत वज्र कामधेनू गौतमींत ॥ विश्वांत कंदर्प कीं ॥२८॥
सर्पीं वासुकी नागांत शेष ॥ पश्चिमे वरुण पितृगणांत अर्यमा विशेष ॥ न्यायकर्त्यांत यम धर्मपुरुष ॥ दैत्यांत प्रल्हाद विभुति कीं ॥२९॥
सर्वांसि ग्रासिता महाकाळ ॥ श्वापदामाजी शार्दूळ ॥ पक्षियांमाजी गरुड प्रबळ ॥ चपळ वायु विभुती माझी ॥१३०॥
शस्त्रधरांत श्रीराम ॥ जळचरांत मकर उत्तम ॥ सरितामाजी परम ॥ श्रेष्ठ गंगा विभूति कीं ॥३१॥
अध्यात्मविद्या विद्यांत ॥ वादांमाजी वेदांत ॥ अक्षरांत ओंकार विख्यात ॥ समासांत द्वंद्व विभुती कीं ॥३२॥
स्त्रींत कीर्ति औदार्य ॥ न्यायांत वाचा स्फूर्ती होय ॥ स्वहिताच्या ज्ञानी मेधा आदय ॥ धृति क्षमा विभूती कीं ॥३३॥
छंदांत गायत्री मंत्र ॥ मासांत मार्गेश्वर ॥ षड्ऋतूंत वसंत थोर ॥ खेळत्यांत द्यूत विभुति कीं ॥३४॥
जयामाजी विजय ॥ शास्त्रांत न्याय होय ॥ तत्वांत श्रेष्ठ सत्य आद्य ॥ यादवांत श्रीकृष्ण ॥३५॥
पांडवांत पार्थ ॥ मुनींमाजी व्यास विख्यात ॥ दैत्यगुरु शुक्र विख्यात ॥ जपांत मौन विभुति कीं ॥३६॥
ज्ञानियांत ज्ञान मी चिध्दन ॥ उदार संपतींत दया मी जाण ॥ मनुष्यांत वागती सज्जन ॥ सत्य साधु विभुति माझी ॥३७॥
आतां माझिया एक अंशांत ॥ या विभुति पाहा समस्त ॥ म्हणोनि सर्व पदार्थ ॥ माझा अंश जाणिजे ॥३८॥
यालागीं सांडोनि भेद ॥ एकवस्तु जगप्रसिध्द ॥ हा माझा अगाध बोध ॥ धरीं कल्पना टाकुनी ॥३९॥
यापरी प्रसंग दहावा ॥ श्रीकृष्णें कथिला पांडवा ॥ पुढें परिसा अकरावा ॥ संशय गोवा उगवेल ॥१४०॥
परिसोनि विभुति सकळ ॥ संतोष पावला कुंतीबाळ ॥ मग म्हणे जी दयाळ ॥ तुजपरता दुजा दिसेना ॥४१॥
अपरिमित तुझी कळा ॥ होसी सर्वांचा जिव्हाळा ॥ माझ्या मनीं हेत उदेला ॥ तो तूं पुरवी दयानिधी ॥४२॥
तुजसी करावया गोष्टी ॥ माझा पाड काय जगजेठी ॥ मनांत आहे एक हुटहुटी ॥ कृपादृष्टीनें फेडावी ॥४३॥
अनंत तुझ्या विभुती ॥ स्वरुप-समुद्रांत रंग उठती ॥ त्या मूळस्वरुपाची ज्योति ॥ पाहीं ऐसी वासना ॥४४॥
जें स्वरुप व्योमापासून ॥ ब्रह्मांड अभ्र पसरे दारुण ॥ तो प्रकाश तेज गहन ॥ दावीं याची लोचनीं ॥४५॥
अर्जुनाची प्रार्थना परिसोन ॥ नेत्रीं घातलें दिव्यांजन ॥ कृष्णस्वरुप महींतून ॥ दावी प्रकाश धनासी ॥४६॥
समरंगणीं युध्दाची दाटी ॥ उभयसंबंधी शरांची वृष्टी ॥ चमत्कार दाविला किरीटी ॥ पातें न हालतां नेत्राचें ॥४७॥
ब्रह्म सनातन जगजेठी ॥ पार्थालागोनि उठाउठी ॥ दाविता जाहला अनंतकोटी ॥ ब्रह्मांडें आपुलें मुखांत ॥४८॥
गारोडी दृष्टिबंधनेंकरुन ॥ एकाचे अनेक पाहती जन ॥ तैसें एका स्वरुपांतून ॥ अनेक दावी पदार्थांसी ॥४९॥
श्याम हरित आरक्त श्वेत ॥ पीत वर्णिती आख्यात ॥ उग्र विशाल भयांकित ॥ विक्राळ तामसी शांतहि ॥१५०॥
दयाळू उदार रागिट ॥ अफाट दंत करीं शस्त्रें तिखट ॥ विशाळ डोळे ललाटपट ॥ मुकुट कुंडलें दंड भुजा ॥५१॥
यापरी नवलपरी ॥ दाविलें तेज न माय अंबरीं ॥ कोंदलें सबाह्य अभ्यंतरीं ॥ वेडावला पार्थ सुचेना ॥५२॥
संजय म्हणे ऐक राया ॥ हरीनें दाविली नवलचर्या ॥ पार्थें पाहोनि लवलाह्या ॥ भयभीत पैं जाहला ॥५३॥
मग विस्मयो करी मानसीं ॥ म्हणे काय जाह्लें सैन्यासी ॥ कृष्णही न दिसे दृष्टीसी ॥ आकाश सूर्य हरपले ॥५४॥
मग कर जोडोनि अर्जुन ॥ विश्वरुपा करी नमन ॥ यांत माझें समाधान ॥ कैसें होईल कृपाळुवा ॥५५॥
तूं अपार तेजोराशी ॥ दाह न सोसवे प्रळयवन्हीसी ॥ न देखे दिव्यचक्षूंसी ॥ मृत्युसी गांठ पडली असे ॥५६॥
बुडाली सृष्टी कौरवपांडव ॥ जाहला प्रळय न दिसे जीव ॥ थोर मांडिला प्रस्ताव ॥ बोलों आतां कवणासी ॥५७॥
आतां दावी कृष्णरुप ॥ देवें आवरोनि पसार अमूप ॥ अपारवन्हि होय दीप ॥ जाहला तद्रूप मनुष्य ॥५८॥
म्हणे भ्यालासि किरिटी ॥ पार्थें चरणीं घातली मिठी ॥ म्हणे आतां संतुष्टी ॥ मरणापासून वांचलों ॥५९॥
तूं जगदीश परमेश्वर ॥ म्यां मर्यादा सोडिली फार ॥ कितीएकदां बोललों कठोर ॥ उध्दटपण बहु केलें ॥१६०॥
आसनीं भोजनीं शयनीं ॥ जळक्रीडा झोंबी सभास्थानीं ॥ दांडपणा टवाळी विनोदमेहुणीं ॥ केली करणी अविचार ॥६१॥
सर्व अपराध करावे क्षमा ॥ मायबाप सखा तूं आम्हां ॥ शरण आलों मेघश्यामा ॥ तूं परमात्मा सत्य होसी ॥६२॥
ऐसें बोलोनि गहिवरला ॥ नेत्रीं अश्रुपात आला ॥ सद्गदित कंठ दाटला ॥ रोम अंगीं उभारले ॥६३॥
मग घाली लोटांगण ॥ मी अपराधी अनाथ दीन ॥ तूं परमेश्वर सन्निध असोन ॥ मी मानीं यादव ॥६४॥
केल्या अपराधांच्या राशी ॥ त्वां सोशिल्या हृषींकेशी ॥ आण वाहतों तुझिया पायांसी ॥ नकळत राहाटलों ॥६५॥
पाहोनि अर्जुनाचा प्रेमा ॥ करुणा आली मेघश्यामा ॥ म्हणे गा वीरोत्तमा ॥ मी जगदीश कळलों कीं ॥६६॥
म्या अवतार घेतला यासाठीं ॥ मारावे दुर्जन दुष्ट कपटी ॥ तूं निमित्तासि किरीटी ॥ कर्ता मी जगदीश ॥६७॥
जाण तुझा दोष गेला ॥ माझे आज्ञेने वधीं सकळां ॥ भीष्मद्रोण शल्यजयद्रथांला ॥ मारी निर्भय भिऊं नको ॥६८॥
मी न सांपडे कवणासी ॥ वेद तप दान नेमांसी ॥ त्वां ओळखिलें आम्हांसी ॥ सीमा भाग्यासी असेना ॥६९॥
अवतार माझे तरंग ॥ मूळ स्वरुपीं अंतरंग ॥ अढळ अचळ अभंग ॥ त्याचें लक्ष सोडूं नको ॥१७०॥
एका भक्तीवांचून ॥ न सांपडें करितां कोटि प्रयत्न ॥ ऐसें बोलिला मनमोहन ॥ अकरावा प्रसंग संपला ॥७१॥
अर्जुन म्हणे शारड्गपाणी ॥ तूचि निर्गुणी गुणी ॥ दोन्ही तूंचि प्राप्त साधनीं ॥ सांगें श्रीअनंता ॥७२॥
देव म्हणे कुंतीसुता ॥ प्राणापान आणून समता ॥ घालिजे पश्चिमपंथा ॥ नीट धारणा धरोनी ॥७३॥
जिंकोनि क्षुधातृषेसी ॥ संहारोनि कामक्रोधंसी ॥ भेदोनि षट्चक्रांसी ॥ पुण्यगिरिवरी चढावें ॥७४॥
प्राशूनि सत्रावी संजीवनी ॥ सहस्त्रदळीं प्रवेशूनि ॥ निर्गुणस्वरुपीं मिसळोनि ॥ ऐक्य व्हावें स्वरुपीं ॥७५॥
हेचि प्राप्तीची वाट होय ॥ परंतु कष्ट फार आह्य ॥ यापरीस सोपा मार्ग होय ॥ भक्तियोग सर्वांसी ॥७६॥
जैसी पतीसी अनुसरे कामिनी ॥ सरिता सिंधूचे मिळणीं ॥ तैसा भजे मजलागूनी ॥ सर्वभावें तो भक्त ॥७७॥
तरंगसागरीं एकपण ॥ तैसा मज होय अनन्य ॥ मी त्यासी न विसंबें क्षण ॥ तो मला मी त्याला ॥७८॥
तो मजसाठीं होय वेडा ॥ मी त्याचे मागां पुढां ॥ धांवें त्याचें गृहीं दुडदुडां ॥ करीं कामें लवडसवडीं ॥७९॥
भक्तांसि घेऊनि कडिये ॥ मुख पाहें घडिये घडिये ॥ उतरीं भवनदीचे थडिये ॥ ऐसा पढियंता मज ॥१८०॥
तो मजसाठी भुकेला ॥ मी त्यासाठीं तान्हेला ॥ त्यासी माझा छंद लागला ॥ मी भुललों त्यासाठीं ॥८१॥
तो करी माझें ध्यान ॥ मी करीं त्याचें चिंतन ॥ तो करी माझें कीर्तन ॥ मी नाचें त्या छंदें ॥८२॥
तो करी माझी गोष्टी ॥ मी थापटी त्याची पाठी ॥ त्याची माझी पडली मिठी ॥ कदा कल्पांतीं सुटेना ॥८३॥
तो पाहे मजकडे ॥ मी पाहे त्याकडे ॥ दोघांमाजी आवडी पडे ॥ किती गोड सांगावें ॥८४॥
त्याचा मज छंद ॥ माझा त्यासी वेध ॥ तो मजमध्यें आनंद ॥ मी त्यांत सगळाची ॥८५॥
भक्त मातें दुर्लभ ॥ मी त्यासी सुलभ ॥ तो माझा वल्लभ ॥ मी पद्मनाभ होय त्याचा ॥८६॥
तो मजसाठीं रोकडा ॥ मी त्याचा लाडका ॥ मजसाठीं आला सुटका ॥ म्या आडका नाहीं दिला ॥८७॥
तो माझा पाडस मी त्याची हरिणी ॥ तो माझा मीन मी त्याचें पाणी ॥ तो माझी अब्जिनी मी त्याचा दिनमणी ॥ तो माझा चकोर मी त्याचा चंद्र ॥८८॥
तो माझी तुळसी मी त्याचा शालिग्राम ॥ तो माझी पिलीं मी त्याचा कूर्म ॥ तो माझा पक्षी मी त्याचा दम ॥ तो चातक मी मेघ ॥८९॥
तो मजसाठीं पिसा ॥ मी त्यासाठीं फिरें दाही दिशा ॥ तो माझी करी आशा ॥ मी कोवसा तयाचा ॥१९०॥
त्याणें मजसाठीं घेतला विषयांचा वीट ॥ त्यासाठीं मी सोडिलें वैकुंठ ॥ त्याणें धरिली माझी नीट वाट ॥ माझा लोट त्यांकडे ॥९१॥
त्याणें घेतला मजसाठीं तुंबा ॥ मी त्यासाठीं करीं अचंबा ॥ तो म्हणे मला बाबा ॥ मी त्याला अबा म्हणें ॥९२॥
जैसी भक्तांची आवडी ॥ म्यां शास्त्रीं उभविली गुढी ॥ त्यानें केली माझी जोडी ॥ म्यांही भक्त जोडिला ॥९३॥
यासाठीं मातें पाववयास ॥ कीजे भक्तीचा उल्हास ॥ प्रेमें नेमें सावकाश ॥ माझा भक्त होईजे ॥९४॥
मी सम सर्वांसी ॥ भक्ति धरावी तेचि भावनेसी ॥ हा बोध ठसावला मानसीं ॥ माझें सुख त्यांसी मी जाहलों ॥९५॥
आकाश सर्वांठायीं समान ॥ एक वायु विश्वाचा प्राण ॥ विश्वास एकचि जीवन ॥ सर्वां जठरीं वन्हि एक ॥९६॥
एक पृथ्वी सकळांसी ॥ एक चेतना चेतवी जीवासी ॥ मुंगीपासोनि ब्रह्मादिकांसी ॥ वस्तु एक व्यापक ॥९७॥
यालागीं दुराग्रह त्यजून ॥ शत्रुमित्र धरावे समसमान ॥ मानापमानीं जाण ॥ सारिखें राहाटावें ॥९८॥
माझ्या बोधाची शक्ती ॥ न मिळे फिरतां कोटितीर्थी ॥ तीर्थें फार पुण्य़ देती ॥ मुक्तीचा महिमा अगाध ॥९९॥
हा भगवद्गीताप्रपंध ॥ स्वयें वदला श्रीगोविंद ॥ द्वादशाध्यायीं अनुवाद ॥ ब्रह्मानंद निवेदिला ॥२००॥
सांडा थोरपणाचें डंभ ॥ भक्तीनें जोडे पद्मनाभ ॥ निर्गुणापरीस सगुणी लाभ ॥ श्रम थोडे सुख फार ॥१॥
भक्ति संतांचें माहेर ॥ सर्वसुखाचा श्रृंगार ॥ भक्तीनें तरले फार ॥ नारीनर शूद्रयाती ॥२॥
संतसंगें करुन ॥ त्यांसी भक्तीचें भूषण ॥ विश्व वाटे सज्जन ॥ दुर्जन कोणी दिसेना ॥३॥
कवण पुण्याची राशी ॥ बैसलों संतांच्या पादुकांसी ॥ चुकली कळिकाची फांसी ॥ निर्भय जाहलों संसारीं ॥४॥
सद्गुरुबोध भारी ॥ विवेकचवरी उडे शिरीं ॥ सायुज्यता पदावरी ॥ शहामुनि विराजे ॥२०५॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये सप्तत्रिंशत्तमोध्याय: ॥३७॥ ॥अध्याय॥३७॥ ओव्या॥ ॥२०५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2020
TOP