ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण २१ ते २५
महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.
प्रकरण २१ : केवळ राजमढस्तव, ओव्या १९
सूरनरपन्नकां : जें वंद्य तीहीं लोकां : क्रीडास्थान कैवल्यनायेका : भणौनिया ॥२२७॥
तें योगियांचे मानस : कीं कैवल्यनायेका मांदुस : ना तें मज पाहातां भानवस : परब्रह्माचें ॥२२८॥
तें मोक्षनीधीचें भांडार : कीं विस्वबीजाचें कोठार : ना तें हों काज सेजार : परसूखाचें ॥२२९॥
तें श्रीमूर्तीचें देउळ : कि देवरायाचें राउळ : कीं भवार्णवीं वेलाउळ : मूक्तीचें तें ॥२३०॥
कीं ब्रह्मविद्येचा घरठा : चैतन्यचोराचा कुरठा : कीं परमपुरुषाचा वसैठा : राजमठू तो ॥२३१॥
सकळसूखादि वरिष्ट : जो परादि वैकूंठ : तो परमाअत्मा होऊनि प्रकट : जेथ सूल्लभु जाला ॥२३२॥
भणौनि तें वानितां कवतीकें : वाचे सौरसू न देखे : जर्ही मागिजती मूखें : शेषादिकातें ॥२३३॥
सकळ शास्त्रांचाळी कोडें : धांडोळीतां उपमेचें दळवाडें : पुन पाहातां उजियेरी न जोडे : तेव्हेळि सांडिएलीं ॥२३४॥
ताजूवा नीवृत्तीचा : धडा बांधोनि तीर्थाचा : परि कांटा कलताय दैवांचा : जेउता राजमठू ॥२३५॥
तेव्हळिं येज्ञव्रातदानें : जपतप अनुष्ठानें : तुका न पूरतीचि पुण्यें : सृष्टीचीहीं ॥२३६॥
तो नीर्हां घनवटू : देवाचा क्रीडामठू : जो भवर्णावाचा सेवटु : मूमूक्षुसी ॥२३७॥
भवपांसछेदु : जेथ क्रीडे रावो गोवींदु : भणौनि सर्वतीर्थास्पदु : जाला तो ॥२३८॥
की पंचाननाचा कीसरु : म्हणो मार्गपरु : वरि अधिष्टीला जगदगुरु : तें परीयेसा पां ।\२३९॥
जीये मठीं ब्रह्मगीरे : नांदणूक गौतमीये परे : वरि अत्मयारामाचेंनि वरें : जीवोधरीले ॥२४०॥
भवावरि पवीत्रता : जेथिची तीर्थभुतता : भणौनि तीर्थासि जालें तीर्थ : सेवावेया ॥२४१॥
सीळामया मूर्ती : जडां उदकांचां तीर्थी : जग झांकोनि प्रवृत्ति : दुरि नेलें ॥२४२॥
आपण प्रतिष्टतें : जीये लोक बोलति देवतें तीयें स्थानें सेवितां पूण्यातें : जरि शास्त बोले ॥२४३॥
तरि साक्षात परात्परु : जो सकळ प्रमाणा आगोचरु : तो जगदात्मा सर्वेश्वरु : जेथ राज्य करी ॥२४४॥
तीये स्थानीचा महिमा : केवी वर्णवे प्राकृता आम्हां : जे अवडलें परब्रह्मा : क्रीडा करूं ॥२४५॥
प्रकरण २२ : ईश्वराचें विरुध्दाचरण, ओव्या १२
पांता आश्वर्ये येक : जे वस्तु अगाध अलेख : तें कळीयुगीं होऊनि माणुष : सुल्लभु जालें ॥२४६॥
पाहातां आसमसाहास : जेथ कूंठले नीर्देश : तें परब्रह्म स्वयेंप्रकाश : लोकांमाजि खेळे ॥२४७॥
लींगत्रयाची वीवंचना : वीचारितां जीये स्वरुपीं ना : तया नीरामया नीरंजना : कें पुरुषाकृती ॥२४८॥
वीस्त उपजे संहारे : पुण जो नीरवीक्षेपु न वीकरे : तो दाउनि मायावेषाचें मोहीरें : जेथ चरित्रें करी ॥२४९॥
दुर्लभु ब्रह्मादिकां : जें नीर्भये असेखां : पाउले भवमोचक : जोडले जीये स्थानीं ॥२५०॥
जे परसूख साकारपणें : परब्रह्म परगुणें : परदैवां कीं नांदणें : आपूलेनि आंगें ॥२५१॥
तें व्यापक हाले : कुटस्त चाले : आनुर्वाच्या बोले : आमृतोपम ॥२५२॥
जेथ नीरंतरासि रवण : आकर्तयासि करण : नीर्ग (र्गु) णासि गुण : अलौकीका ॥२५३॥
नीराकारासि आवयेव : नीरुपाधिसि बरव : जेथ नीःप्रपंचा सेव्य : नीजकींकरां ॥२५४॥
प्रमाणुचेनि पाडें : रोमे लपाली ब्रह्मांडें : तें परब्रह्म क्रीडे : जीय मठीं ॥२५५॥
आसो हे अनादि अविट : जो वाकचातुष्टया नूचीष्ट : तेणें ब्रह्मरसें राजमठू : देखे सदोदित ॥२५६॥
म्हणें माझेया स्वामिचें : क्रीडास्थान श्रीप्रभूचे : भणौनि दंडवत न वचें : केले आंगे ॥२५७॥
प्रकरण २३ : जीवप्रपंचविवादें ईश्वराची करुणा, ओव्या २३
भीतरि अवस्था व्यापीलें : उरकें वागइंद्रिय कोंदलें : दृष्टीआड राहिलें : आनंदजळ ॥२५८॥
गाहाळैलेनि अंतष्करणें : उन्मतवत बोलणें : जैसा कां गांजिला दे गार्हाणें : समर्थासी ॥२५९॥
भीतरि भरलीया उर्मी : म्ह्ने आहो जी स्वामी : कां संसारें गांजीलों आम्ही : तें पूसा ना ॥२६०॥
नव्हें आमचा दाइदु : परि म्हणे तुम्हांसि मींचि वधु : हा वेव्हार कृपासींधु : आनें तुटे ना ॥२६१॥
वाढवीला आमचिया माया : हेंचि नातें जी देवराया : वायांचि बहुतां ठायां : भवंडीलें एणें ॥२६२॥
मीं तरि आनाथ एकलें : वीस्व तवं एयासि वीकलें : कव्हणी पर पाहूनि न बोले : नीःप्रपंचू ॥२६३॥
न मनी चौघांचीं उतरें : उपवासीं नावरें : रीगालों बहुतांचीं घरें : परि न सोडी हा ॥२६४॥
नेणों कोणें लागला कर्मे : मेलों वांचेनि भ्रमें : तुज सर्वज्ञा वीचारीता धर्मे : कांहीं संसारा आती ॥२६५॥
आहो जी भीतरें वीण : माझें वायाचें माणुसपण : लटीकें बोलें तरि मज आण : सर्वज्ञांची ॥२६६॥
म्हणाल लवे लागणीचा : तरी मध्यें लटीका वायाचा : सर्वज्ञ तवं जाणताति आमचा : पूर्वापार ॥२६७॥
अन्या उपदेश सीकवी : नाना मार्ग दाखवी : आपणचि प्रमाणे आंगवी : बोलिलीं जीयें ॥२६८॥
म्हणतां बहुतीं परीं : न येचि राउळीचां ठावो वेर्ही : आतां काइ करणें यावरी : तें सर्वज्ञ सांधतु ॥२६९॥
परि हे लटिकी वीवंचनी : जाणतों देवची खावणी : कां म्हणाल मेलति गुणी : आपुलांचि ॥२७०॥
भणितलें आमचें : जरि आदरसीं तुम्हांसि रुचे : तरि प्रतिभव वायाचें : कां देखाल येवढे ॥२७१॥
परि करणीयें आकरणियें न देखा : आपापर नोळखा : परि वांयाचि वीषयें लोका : होत आसा ॥२७२॥
आम्हां म्हणतांही पुडती : न संडाचि हे प्रकृती : परस्परें द्वेषें अधपाती : पडिलेति जीया ॥२७३॥
तेथे हो जी भणौनि प्रतिभवीं : आम्हीं सर्वापराधीं जीवीं : जें तुजसारिखा गोसांद्वी : दुराविला ॥२७४॥
सकळ सूमूर्धीवंतु बापू : असतां उदास सकृपू : कां मीं जीत असें पापरूपू : नावें आणिकाचेनि ॥२७५॥
आहो जी परियेसा पां पाइक : जरि होये स्वामीवंचक : ऐसा गोसावी कवण आणीकू : जो आपुलें म्हणे ॥२७६॥
तुं कृपालु माउली : न म्हणेसि परावी आपुलीं : तुवां जन्मोनि पोसिलीं : भुतजातें ॥२७७॥
आधीन प्रागत्ना : आनेगी जमजाचना : मज भोगितां भवयातना : की सलती तुज ॥२७८॥
स्वर्गनीरये वसवीत : कें मीं सोच्य प्राकृत : तया माझेनि तुं वेसनभुत : स्वात्मरामू ॥२७९॥
लेंकरुंवांचेनि दुखें : जेवि माउली उभी सूके : तेवि तुं जगदांबिके : मजलागौनी ॥२८०॥
प्रकरण २४ : जीवेश्वरभिन्नत्वदर्शक, ओव्या १२
कीं आहो जी आइका : केउता संबंधु रायारंका : ना तरि कृपाळुवाचिया सोइरीका : नीमीत्येंवीण ॥२८१॥
देवो आत्मसुखरमणु : मी कामबाणीं वीछीनु : देवो सकळसूरसरण्य : मी हीन बहुतें पाडें ॥२८२॥
देवो नीजानंदेंत्रूप्तु : मीं क्षुधापीपासीं ग्रस्तु : देवो आगाध आलेख आनंतु : मी आती सोच्य ॥२८३॥
देवो परावरनाएकु : मी आनदि प्रणीत रंकू : देवो मायापर एकू : मी नानावस तीए ॥२८४॥
देवो परात्परतरू : मी आधोगांमियां नीरंतरु : देवो सूखपूर्ण सागरू : मी दुखग्रहस्तु ॥२८५॥
देवो अप्रमये अनुर्वाच्यू : मी आल्पू जीवू सोच्यू : ऐसांही दिन वंच्यू : कहीं नव्हेचि तुज ॥२८६॥
आसमाना अद्वैता : केवला घनीभुता : तुज प्रभू पाहुनि केउता : मी जीवू ॥२८७॥
उछळींद्र कें पुर्णचंद्रु : वछपद कें समूद्रु : पंचानन आणि दर्दरु : जेणें पाडें ॥२८८॥
सूरभा आणि सुपूर्णा : कां रासभा ऐरावना : पाडु कां जैअसा हरिचंदना : पुस्करेंसीं ॥२८९॥
प्रमाणु कें सूवर्णाचळु : चींतामणीसीं हरळु : दैत्यगुरु पाहुनि उजाळु : काइ सूक्तिखंडी ॥२९०॥
चक्रवाहा का देवेंची : केवि करू कूलाळा सरिसी : तेवि तुं जगदात्मा हृषीकेसी : पाहूनि मीं जीवू काइ ॥२९१॥
ऐसा आपाडेंसी हीन : भवपासबंधदीनु : नीदैवं नीष्टुरु नीष्कंचनु : सर्वदोषिया ॥२९२॥
प्रकरण २५ : आत्मनिर्वेद संवादभूत , ओव्या ५८
तापासि सांटवणें : जालें दुखासि वीसंवणें : आहो अमंगळासि आंगवणें : होउनि असें ॥२९३॥
इंद्रियाचें खेळवणीं : रजस्तमाचें नांदणें : जगीं पापेंसीं साजणें : मजचि एका ॥२९४॥
वीषयाची परम प्रीती : कामक्रोधाची स्तीती : सावेव अविद्येची मूर्ती : जन्म माझे ॥२९५॥
ऐसा कृतघ्नू आनादि : पापीया सर्वापराधी : जें कणव करुणानीधी : उरवींचि ना ॥२९६॥
जैसें अंतेजा ग्रहीचें : सोत्रीया उपयोगा न वचे : तेवी मज अधमाचें : जीणें तुज लागौनी ॥२९७॥
कीं अव्हाटीचा म्हैसवाथरु : नव्हतां दृष्टीगोचरु : तो जेवि भुमी भारु : होऊनि असे ॥२९८॥
तेवि मी पाषाण नसूधा : न घडें न मंडे वीण श्रधा : उपयोगा न वचेचि प्रसादा : राउळीचेया ॥२९९॥
अंधकार घनीभूता : सूभर ह्र्दये ग्रहस्ता : आंतष्करणी केवि देखें आतां : श्रीचरणश्रेणी ॥३००॥
जी तुझेनि स्नेहेवसें : वीण माझीये जीवदसे : ज्ञानदीप न प्रकासे कव्हणीये काळी ॥३०१॥
जी तूं भवतापसत्रू : उदयो करीसी जगन्मीत्रू : कीं मीं जात्यंध विचीत्रू : जो करस्पर्शूही नेणे ॥३०२॥
तुं सूखपुर्ण मयेंकु : मी वीरहिया वीशेकू : तुं जीवपती मी वंचकू : वीभचार्या ॥३०३॥
तु रावो मी योगिया : तू तापसू मी भोगिया : तुं अन्नादाता मी रोगिया : सदा अरुची ॥३०४॥
आवेचु आमोध सीधी : तुं प्रकट कृपानीधी : की मज दैवहतची बूधी : वीषयांकडे ॥३०५॥
पथतापें छायाघनु : होसि मार्गीचा संतानु : कींमी पथ चूकौनि अज्ञानु : पडें अन्यमार्गी ॥३०६॥
तुंवां परमपुरुषें : याचिजे शरीराचें चोळाखें : की म्यां कृपीणीं परागमूखें : होऊनी वंचिजे तुज ॥३०७॥
झाडे वेधति बरवेपणें : सौंदर्ये नटसि मजकारणें : कीं परश्री संतापाचेनि सादुखणें : मी आधीकाचि जळे ॥३०८॥
कृपावसें दोन्हीं : होसि जनकु जननी : कीं मीं अपठौळ अज्ञापालनीं : स्थीर नव्हें ॥३०९॥
बीजें करितां चूकवी : न र्हायें दृष्टीचिये आळवी : आतां कवण एक आठवी : अपराध आपुले ॥३१०॥
गोसावी तरि ऐसे : पाठी धांवती आपैसें : धेनु जेवि वोरसे : वछालागौनिया ॥३११॥
आनंदतरुचे आरव : सूखफळीं फळत सदैवां : संसारतापतप्तां जीवां : वीसावां जे ॥३१२॥
ऐसे अवतार धरुनि सैरा : पाठीं लागौनि उदारा : केला परसूखाचा मोकारा : जीवपसूवां ॥११३॥
बाक्प कणवेची व्याप्ति : दाउनि सूंदरा श्रीमूर्ती : कीं जडां वेध उपजती : देखिलेयां ॥३१४॥
नवल लावंण्याची थोरी : काई म्हणो नरनारी : नपूसका प्रेमाचां वीकारी : राऊळही भाळे ॥११५॥
तरी आमृत घालुनि आधणा : कापूर मेळउनि इंधना : ऐसें काई बोलो ये परीवाना : जेवितया ॥३१६॥
चक्रवतीचेया संभोगचीन्हां : पात्र नव्हेति राजकन्या : तो सेनपुंजीचेया मना : काइ भाउं ये ॥३१७॥
चंद्रा आपुलेनि उन्मेषें : जो पदार्थु न तर्के : तो जातंधाचेनि नीमीसें : काई देखिला होये ॥३१८॥
जयाचीया वाहाणा : चींतामणी खेवणा : तेथ बोरयाचेया गुणा : काइ रुप अती ॥३१९॥
पेणें करीतां कूस्मकरा : झाडे वेधति श्रूंघारा : तेथ कोकिळांचीये पांती दुर्दुरा : केवी लाभे ॥३२०॥
चंद्र चकोरां चोखटीं : वोळे आमृतधारीं अतुटीं : तें गोडपणा पणिकूकटीं : केवी लाहीजे ॥३२१॥
तेवी तुम्हां जी स्वामी: प्रकटलेया कर्मभुमी : परि सूख केवि लाहों आम्हीं : जे दैवंहत ॥३२२॥
देवो अवतरौनि जीमूतीं : पृथवी करी अनार्ती : कीं माझी क्षेत्रवृती : नोडवेचि ते ॥३२३॥
पाहालिया श्रूष्टीचेया पाहाटा : प्रमादु न एचि सेवटा : जो मज वीषयेलंपटा : घडत असे ॥३२४॥
स्नेहप्रतिभवीं : तुवा दीधलें ज्ञान हारवीं : पुन तुं करुणाळा गोसावी : भणौनि वीटेसि ना ॥३२५॥
कैवल्य कें कर्मभुमी : आकारे हो जी स्वामीं : बीजें करितां तुम्हीं : का उबगा ना ॥३२६॥
ऐसेयां आमंगलाकारणे : कां जी संसारा करा पेणें : तुज परसूखाचेनि सीणें : कें रीगैन आतां ॥३२७॥
सर्वनीरइं सर्वदा : पचितां नव्हीजे सुधा : स्वामी जे पाप प्रमादा : तवं जोडिलें म्या ॥३२८॥
कैसी आंगवण दुखा : नाहीं आपणपें अंतका : येर्हवीं स्वामि दुर्हा असीका : मी केवी उरे ॥३२९॥
कीं ना स्वामी वंचकु : हे कूणप त्रीधा (तु) कू : आपवीत्र भणौनि आइक : काळही नातळे ॥३३०॥
कीं आगाधा परसूखा जीवू : होऊनि वीमूख नीदैवू : सेवीत असे वीषये लऊ : गोड भणौनि ॥३३१॥
काइ आवेचू सूहावा : देवापासौनि वीखो बरवा : जो आनादि या जिवा : अवडतु असे ॥३३२॥
जैसे आनुरुढा रुपवंती : देखोनि वेध चक्रव्रती : ते वरूं जाय पती : पामर जेवी ॥३३३॥
ना तरि उद्यानीचयां फळां : च्युतद्राक्षादि रसाळा : वरि बैसोनि काउळा : पाहे आपुला आहारु ॥३३४॥
रत्नप्रभेचेनि कोंडें : मेढिया श्रुंघारीति भारुडें : राजवल्लभें पांगुरवीलें वेडें : नेणे सूखवीशेषू ॥३३५॥
तेवी मींया सगुणें : लाधलीं नृदेहाचीं पांगुरणें : परी एकहीं राउळां पायेपुसणें : भणौनि नेदिचि तुज ॥३३६॥
नवें ठांइ तडकलें : हे पांचपूडें आंगुलें : माया मज कोडें दीधलें : बहुतां दीसां ॥३३७॥
तेहीं आपुलीये चाडे : इंद्रियें बोढिती वीसयांकडे : सेवटीं होये तापा वरिपुडें : दुखाग्निमाजी ॥३३८॥
हे जेही मारिला शब्दे: एकाचेनि आंगलगेंचि वेधे : रसाचेनि मीषें नसूधें : वीखचि सूती ॥३३९॥
कैसीं रुपसें कामाणें : जीवा घालीति देखणें : परीमळा भीतरि देऊनि घ्राणे : नागवीलां ॥३४०॥
ऐसी पांचवटें जवळीके : करुनि वाहाति अभिळाषें : तें मनहीं चंचळ वादकें : नव्हेचि आपु ॥३४१॥
माझेनि आंगलगें मासी : वैर चाळीति अहीर्नीसीं : मीं माणुष नव्हे ऐसीया थरासी : नाणीतीचि काइ ॥३४२॥
कैसी अनादि इंद्रियें : प्रवर्तली चोरियें : मज नीद्रीस्तातें खाणौरियें : लुसौनि नेती ॥३४३॥
राहुनि तारुण्याचां घाटीईं : मार्ग लूसीजति इंद्रियें तुटी : मज जीवावरि ये सेवटीं : वेसन येयाचें ॥३४४॥
ऐसा अज्ञान आनाथ बापुडा : पडीलां भवखूडां : त्या मागीला सूडा : झोंबैन आतां ॥३४५॥
रीगौनि वैराग्यवळणी : मेळउनि वीवेकसींगणी : मग अवचीती घालुं घालणी : इंद्रियेग्रामीं ॥३४६॥
इंद्रिया माराची सवे : एकू घालीति रातिवे : तेथ ब्रह्मचर्याचीये सौरिये : केवि पूरति तिये ॥३४७॥
समदमाचा खडगघातु कवण साहों सके तयांतु : जें सांडुनि मन्मथु : वस्य नव्हे ॥३४८॥
सरळ स्वासाचा वारा : अनुताप वैस्वानरा : उधवत इंद्रिये जोहोरा : आंतु कवणु वांचे ॥३४९॥
ऐसीया मनोर्थ तुष्टी : करुनि दंडवतें मीं उठी : तवं रचाना देखे गोमटि : राजद्वारीं ॥३५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 28, 2020
TOP