श्री दत्त लेकुरवाळा
श्री गुरुराज लेकुरवाळा, गुरुराज लेकुरवाळा ॥धृo॥
स्कंधि मच्छिंदर, दुज्या जालिंदर, भर्तरि पाठीवर
करांगुळी धरि कर्म गोरख, नृत्यानंद माणिकाला ॥१॥
रेवण चर्पट बसे कडेवर, गहिनि-मीनडोईवर,
नाग कानिफा उडया मारिती, चाचपिती झोळीला ॥२॥
वीणा चिपळ्या विठा चौरंगी, चौर्यांशी फेरा धरती
वामन श्रीचे चुके चौर्यांशी, कण धुळ लाभ कपाळी ॥३॥
॥ ॐ श्री दिनानाथ ॥
॥ श्री गोरक्षाय नम: ॥
==
नवनाथ पारायणानंतर नवनाथांची पूजा व पुढे सारांश नवनाथ वाचन केले गेले तर अधिक उत्तम होईल. तरी सत्यनारायणाची पूजा मांडावी. कलशाचे वर ताम्हनात, नवग्रहांच्या १० सुपार्यांची रांग *, त्या भोवती सोळा सुपार्याची गोलाई रांग ** मांडावी. मग पुराणोक्त पूजा करावी. प्रसाद शिरा करावा. त्यांत थोडी खारीकेची पूड टाकावी व महाप्रसादात मुगाची खिचडी, वडे व शक्य असल्यास, निदान नैवेदयापुरते श्रीखंड असावे. ध्यानाला, शांताकारं वगैरे म्हणून नंतर गोरक्ष जालंधर वगैरे महामंत्र म्हणावा. आवाहनाला ॐ चैतन्य कुलदेवतेनम: ॐ रवयेनम:, वगैरे म्हणावे नंतर ॐ चैतन्य दतात्रयाय नम:, ॐ चैत्तन्य मच्छिंद्रनाथाय नम: वगैरे म्हणून नंतर यथासांग पूजा नैवेदय आरती करावी.
* १ कुलदेवता व ९ नवग्रह अशा १० सुपार्या
** श्रीदत्त, श्रीमच्छिंद्र, श्रीगोरक्ष, श्री जालिंधर
श्री कानीफ, श्री चर्पट, श्री वटसिध्द, श्री भर्तरि,
श्री रेवण, श्री गहिनी, श्री मीननाथ, श्री चौरंगी
श्री धर्मनाथ, श्री अड्बंग, श्री चौर्यांशीसिध्द व श्री विठामाई (१६)
श्री. ना. कन्हेरीकर
==
॥ॐ॥
प्रस्तावना
भारतीय अध्यात्म ज्ञानाच्या क्षेत्रांत ज्या परंपरा किंवा पंथ हे आपले स्वतंत्र अस्तित्व व वेगळेपणा टिकवून आहेत, त्या पंथा बद्दल जनमानसांत आदरभाव आहे, अपार श्रध्दा आहे, असा एक पंथ म्हणजे नाथपंथ ! हा नाथपंथ त्याच्या नांवाप्रमाणेच आदिनाथापासून आलेला असून, जनकल्याण, लोकजागृती, लोकोध्दार, भक्तिचा प्रसार, ह्या कार्यासाठी भूतलावर नवनारायणानी नवनाथरुपाने अवतार घेऊन या पंथाचे कार्य केले आहे. कवि-मच्छिंद्र, हरि-गोरख, अंतरिक्ष-जालंधर, प्रबुध्द-कानिफा, पिप्पलायन-चर्पट, आग्निहोत्र-नागनाथ, ढुमिल-भर्तृरी, चमस-रेवण, करभाजन-गहिनी या रुपाने नवनारायणाचेच पुढे नवनाथ झाले व त्यांनीच कार्य केले. या पंथाचा प्रचार व प्रसार नवनाथांनी व चौर्यांशी सिध्दांनी केला. असा उल्लेख ग्रंथात नमूद केलेला आहे. नाथपंथीयाचा आदरणीय, वंदनीय व वाचनीय ग्रंथ म्हणजे श्रीनवनाथ भक्तिसार, श्रीमालू कविविरचित या ग्रंथात नवनारायणांचे नवनाथ म्हणून कसे अवतार झाले, त्यांनी कोठे व कसे कार्य केले, प्रचार कसा केला, लोक-जागृती, भक्ति-प्रसार कसा केला, लोक-सेवा, लोक-कल्याण कसे केले, या गोष्टी, चाळीस अध्यायात वर्णन केलेल्या आहेत. या नवनाथ ग्रंथाच्या वाचनाने प्रभावीत झालेला खूप मोठा समाज आजही पहावयास मिळतो ! वरकरणी या पंथाबद्दल, कांही वेगळ्या कल्पना व समजुती असल्या त्या कशा फोल आहेत व या पंथाने शिवशक्ती समावेश, पिंड-ब्रह्मांड, आत्मोध्दार व आत्मज्ञान याचा किती खोलवर विचार केला आहे, ते जवळ जाऊन अभ्यास, मनन, चिंतन केल्याशिवाय कळणार नाही. या पंथाचे आणखी एक वैशिष्टय असे की देवदेवतांनी माणसावर न रागावता त्यांच्या चुका मोठेपणाने पोटी घालावी अन् त्यांना जवळ करावे त्यासाठी या नाथांनी वेळप्रसंगी त्या देवदेवतांशी तंटेही केले. कां तर अनाथांचा कळवळा म्हणून या गोष्टीही नवनाथ ग्रंथात पहावयास मिळतातच ! आजकालच्या या विज्ञान युगात, मन:शांती व मानसिक संतुलन ढासळत असताना या पंथाने दाखवलेला मार्ग काय सांगतो हे समजाऊन घेणे आवश्यक आहे, त्यासाठी या पंथाबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, त्या कथा, त्यांचे बोध व बोधामागचे मर्माचे शोध घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. कलियुगांत माणूस पोटापाण्याच्या विवंचनेत एवढा गुंतून जात आहे की दिवसाचे चोवीस तासह्ही पुरे पडणार नाहीत तर मग - या चाळीस अध्यायाच्या पोथीचे वाचन, त्यासाठी लागणारा वेळ, करावे लागणारे नियमबध्द वर्तन हे कसे काय शक्य होणार ? पण म्हणून कांही त्याकडे, जायच्या वाटा किंवा ओढ थांबत नाही. या अन् अशाच सामान्यांच्या ओढीतून त्यांच्या अल्प उपलब्ध वेळेचा विचार करुनच श्री. श्री. ना. कन्हेरीकर यांनी हा लेखन प्रपंच केला आहे, त्यांचे मनोगत त्यांची भूमीका स्पष्ट करेलच, पण - श्री सत्यनारायणाच्या पोथीप्रमाणे अगदी अल्प काळात संपूर्ण चाळीस अध्यायातील कथा भागाचा आढावा घेत त्यांनी ही छोटी, "श्री सत्यनवनाथ" पूजा कथा पोथी तयार केली आहे. सध्याच्या सर्वमान्य सत्यनारायण पूजा विधीप्रमाणेच, हाही पूजाविधी लोकांना सहज करता येण्यासारखा आहे. श्रध्दाळू भक्तांना या पूजेचा आनंद सुखावेल, यात शंकाच नाही !
नवनाथावरील अपार श्रध्दा, आपल्या गुरुची आज्ञा व निष्ठा यातून साकार झालेली ही श्री कन्हेरीकर यांची नाथसेवा इतरांनाही आनंद देईल. अल्प ओळी संख्येत मूळ कथा भागात कोठेही धक्का न लावता, तोच भाव, त्याच भावाने पण नेमक्या अचूक व मोजक्या समर्थ शब्दात मांडण्याचा त्यांचा प्रयत्न खासच कौतुकास पात्र आहे. अनेक फुलांचा सुगंधा हा जसा एका अत्तराच्या फायात सामावलेला असतो, त्याचप्रमाणे सर्व गोष्टींचा नेमक्या सुयोग्य शब्दातील दर्शन गेयतेसह आपल्या हाती देण्याचे हे श्री. कन्हेरीकरांचे कार्य स्वागतार्ह निश्चितच आहे. तेंव्हा सकल नाथ भक्तांनी व अन्यही सश्रध्द जिज्ञासू व भाविकांनी या पोथीचे स्वागत करावे ! त्यात नमूद केलेला पूजा विधी रीतसर करुन भक्तिभावाने पोथीवाचन करावे आणि नाथाचा कृपाप्रसाद संपादन करावा हीच इच्छा !