॥सप्तमोऽध्याय:॥
श्री गणेशानम: सहजसारुका सहजरिती रेवातीरी विधीसुतमुर्ती, अवचित लाभे मांदुस हाती, चमसनारायण अवतार ॥१॥
बाल संगोपनानंतर, कृषीवलरेवण नांगर, शेतात सहज दत्त गुरुवर, वसनस्पर्श होतसे ॥२॥
मी कोण कार्य कारण, दत्त चरण घरी रेवण, दत्ते अपुले नांव सांगुन, महिमा सिध्दी अर्पिली ॥३॥
दत्त गायनी महिमा उभी, रेवण वचे धान्य रास उभी, काम न करण्या उत्तम खुबी, गृही आराम करितसे ॥४॥
साधके आराम न करावा, म्हणुन काय मच्छिंद्र यावा, धनधान्य देतसे गांवा, गवगवा पाही रेवणाचा ॥५॥
मच्छिंद्र खादी पशुपक्षी, वैरभाव सोडून आलक्षी, महीमे विनवी प्रत्यक्षी ब्रह्म वेत्या वाचुन ना ॥६॥
रेवण रानी दत्त धारणा, पाहुन त्याच्या अनुष्ठाना, मच्छिंद्र विनवी दत्तचरणा, दत्तानुग्रह देवविला ॥७॥
दिक्षीत रेवण विटे प्रांती, सहज न यें भिक्षे प्रती, जो त्यां गृहीं बारसे निमित्ती, सोहळा चालला होता ॥८॥
ब्राह्मण विनवी रेवण ऋषी, भोजन करावे तुम्ही हर्षी, राहिले रेवण विटे प्रांती, सहज बालक झडपले ॥९॥
ब्राह्मण स्त्री रोदनी, रेवण, पुसे काय झाले कारण, सात बालका असेच मरण, द्वादशदिना पर्यंत एवढेच ॥१०॥
रेवण जाती शिवाप्रत, जिंकुन घेती जीव रेणु हस्तगत, येती परत ब्राह्मणगृहाप्रत, नाथपंथा दुणावया ॥११॥
मेणा समान कुटून सात, भाग केले संजीवनी जपत, दिव्यतेजी सिध्दीसात, गहिनी प्ररव्यात सातवा ॥१२॥
हे आख्यान जे पढती, त्यांची बालके चेवली न जाती, सतातिथ्य प्रभाव किती, कळुन ये भाविक जना ॥१३॥
रेवण रमती विटे प्रांती, समाधी घेती तेथेच ख्याती, भक्त जे प्रेमे गाती, सभाग्य होती निरंतर ॥१४॥
दुसरे आख्यान कोशधर्म, रानी जाय दर्भाच्या कामा, वट पोरवरणी घन:शामा, बालरुपी आविर्होत्र ये ॥१५॥
तक्षीणी जठर नंदन, वाढु लागला होय संगोपन, होय पंच वर्षीय वयमान, खेळतसे शिशुसह ॥१६॥
पूर्व संचिताने बुध्दि सुचे, गृह संस्कार येती वाचे, त्यासमयी दत्त सम शिशुचें, तेज ये जवळ मुलांच्या ॥१७॥
इतर मुलें झिडकारिती, अतिथी सत्कार करावा रिती, नागनाथ समजाविती, जें गृही चाले पहा जरा ॥१८॥
मग नागनाथे दत्त पुजिला, मानसपुजा करु लागला, लटकमटक अर्चनाला, अंतरी भाव निर्मळ ॥१९॥
अवधुत झाले प्रसन्न अती, बालक कर्णी मंत्र सांगती, जें तुझें ये वाचे प्रती, अन्न घाली, न खाई तु ॥२०॥
अन्न वाढले, वय वाढले, नागनाथाचें महत्व वाढले. पितृ विचारणा करता कळले, दत्त मंत्राचा प्रभाव ॥२१॥
कोठे दत्त पाहु आतां, स्नान काशी असे अवधुता, भिक्षा कोल्हापुरी क्षेत्रा, माहुरीं निद्रा जयाची ॥२२॥
नागनाथ जाय कोल्हापुरी, अन्न प्रयोजन करी तयारी, ग्रामजन जेवे, दत्त न स्वीकारी, इतर जन न ओळखती ॥२३॥
कोरडा शिधा भाविक जना, दयावयास सांगे याचक जना, न घे कोणी तों मज खुणा, वेध लागला दत्त ध्यानी ॥२४॥
एके दिनी भाग्य फळे, सिध्द अन्न न घे तो कळे, दत्त चरणी नागनाथ लोळे, प्रसन्न झाले अत्रीसुत ॥२५॥
मानस पुजन मज आवडले, तेव्हांच सिध्दी तुज अर्पिले, परि तव मन ना घोटाळले, सिध्दी मागे सत् सिध्दा ॥२६॥
दत्ते दिधला अनुग्रह पूर्ण, पंथी केला करिपूर्ण, सावरी प्रवीण सर्व वीष हरण, नागनाथाचे प्रसिध्द ॥२७॥
असा प्रभावी आविर्होत्र, हिंडता यात्रा वडवळ तीर्थ, मठ स्थापना करी पवित्र, दत्त ध्यानी निमग्न राहे ॥२८॥
सिध्दी अन्ना ना घ्यावे, मानस पुजन करावे, हेची या कथनी शिकावे श्रमिक जने अत्यादरे ॥२९॥
विषबाधा जाईल भक्ता, मानसपुजा करेल भक्त्या, सिध्दी नको मर्म कळेल भक्ता, गुळवणीच्या आळवणी ॥३०॥
इति श्री नवनाथसार, गोरक्ष मुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार, सप्तमोध्याय गोड हा ॥३१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥