॥अष्टमोऽध्याय:॥
श्री गणेशायनम: । सहज एकदा मच्छिंद्र मुनी, जेथे बसले नागनाथ ध्यानी, सेवकेदारी अटकाविता मनीं, मच्छिंद्रास राग ये ॥१॥
साधुद्वार मुक्त असावे, सेवका विनवी जाऊ दयावे, पुन्हा अटकाविता, भस्म प्रभावे, स्पर्शास्त्रे खिळिले ते ॥२॥
कोल्हाट ध्यानस्थ नागनाथ कानी, जागृत हो कोपे करोनी, गरुड धुनी अस्त्र प्रथम कवळुनी, रळी माजे नाथ व्दयां ॥३॥
जेव्हा नागनाथा कळले, आदय जेष्ठ गुरु बंधू आले, प्रेमेभावे आलिंगुनी वंदीले, अटकाव टाकीले ॥४॥
मुक्तद्वार होता जनजमती आधी व्याधी दारुण मुक्त होती विनंती करुन, मृतांनाही जीवविती ॥५॥
बहिरंभट उध्दरिला, विधि अटकाव न देव साधु व्दारामृत जीवनी थांबविला, असा वडवापी समाधिस्थ झाला, अदयापिही साक्षात्कार ॥६॥
सत्यश्रवा कुशवेटी, जाई पिप्पलायन सहज भेटी, बालक गोंडस हाती चर्पटी, नारदे दिधला प्रेमभरे ॥७॥
चर्पट जो वाढु लागला, विदयासंपन्न ग्रामजोशीपणाला, विधिस वाटे केविं दत्त कृपेला, हुरहुर अंतरी अत्यंत ॥८॥
नारद कुलंब ये शिकण्याला, अल्प दक्षिणे राग बंधुला, चर्पट दुखवि यजमानाला चर्पटा ताडी सत्यश्रवा ॥९॥
पश्चातापी निघे चर्पटी, कुलंब बंधू देवालयी गांठी, बद्रिकाश्रमी भेटवी श्रेष्ठी, दत्तानुग्रह लाभवी ॥१०॥
नारद नेई विधिच्या भेटी, दत्त दिक्षितानाथ चर्पटी, नारद चर्पटी बंधू गोष्टी, करती रमती सत्यलोकी ॥११॥
सहज हिंडता दिसली तयांना, सुवर्ण कमळे इंद्राच्या बना, न्यावी तोडूनी चर्पट मना, ब्रह्मादेवाच्या पुजेस्तव ॥१२॥
रोज रोज खुडता कमळे, बनकर पहारा देती तो मले, चर्पट खुडी तोंच ताडीले, बनकरे जेव्हा चर्पटला ॥१३॥
रागे चर्पट स्पर्शास्त्र सोडी, बनकराची वळली बोबडी, कितीक पळती भरे हूडहूडी, सांगती प्रकार इंद्राला ॥१४॥
इंद्र करी विनंती शिवाला, नंतर विनवी श्री विष्णुला, शिवविष्णु येती झुंजावयाला, नाथ प्रताप पहावया ॥१५॥
चर्पट भानगडीत मुळी न पडें, एक वाताकर्षण अस्त्र सोडे, अस्त्र सोडिता शिवविष्णु पडे, मूर्च्छित होऊन तेथ ॥१६॥
शिवविष्णुची आयुधे चर्पटी, शंख, चक्र, गदा कारवुटी, घेऊन जाई विधिच्या भेटी, काय केलेस मुला म्हणे ॥१७॥
चर्पट सांगत कथा साद्यंत, विष्णु सदाशिव जगतवंद्य, उठवी, नातरी मज त्याप्रती, करी चर्पटा सत्वर ॥१८॥
चर्पट आकर्षण, अस्त्र काढी, शिवविष्णु तो उठवी तातडी, नारद काढी इंद्राची अढी, इंद्र कळी न म्हणतसे ॥१९॥।
आयुधे आपुली वेगळी न झाली, नारायण अवतार चर्पट माऊली, दत्तविदया वाखाणली, नाथपंथा द्वारे ही ॥२०॥
मग शिवविष्णु राहवुनी घेती, चर्पटाचे कौतुक करती, दत्तगुरुंचा महिमा गाती, अत्यादरे प्रेमळ मने ॥२१॥
सर्व देव एक दिन, चर्पटास घेती राहवून सत्कार करती, नाथगुण वाखाणती विनम्रते ॥२२॥
चर्पट मनिषा मनकर्णिका स्नान तो पर्वणी येता घे साधुन, चर्पट निघे विधी वंदुन, तीर्थाटन भूमीवरी ॥२३॥
नाथनिर्मिती सिध्द महामुनी चौर्यांशीचा झाडा बहुगुणी, वंदन करता हो निशीदिनी, चौर्यांशी फेरे चुकतील ॥२४॥
बालवय परि प्रभाव काय, वधूत महिमा वर्णिला न जाय, इंद्र विचार करी उपाय काय, नाथश्रेष्ठ देवापरी ॥२५॥
अशक्य आहे रळी खेळणे, विनवुन घ्यावे विदया लेणे, वाताकर्षण अस्त्र मिळविणे, इंद्रा वाटे आवश्यक ॥२६॥
बृहस्पतीच्या सल्ल्यानुसारु नवनाथ आदरें पाचारु, याग निमित्ते पाय धरु, अग्रपुजा करु मच्छिंद्राची ॥२७॥
सर्व देवास हे मानले. नवनाथांना पाचारले, यागास्तव मंडप घातले, सिंहलद्विपी इंद्राने ॥२८॥
मुळी घालता जलसिंचन, सर्ववृक्षी फळा पान टवटवी कशी ये बहरुन, सर्व दैवते नाथपंथी ॥२९॥
अपुली भक्ती, गुरुची शक्ती, मिळेल त्यात समाधान वृत्ती, एका वृक्षी जलसिंचन प्राप्ती. सर्व फले वामन कृपे ॥३०॥
इति श्री नवनाथसार, गोरक्षमुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेदचार, अष्टमोध्याय गोड हा ॥३०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥