श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय सहावा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री श्रीसद्गुरवे नम: । श्री सरस्वत्त्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
श्री स्वामी समर्थाय, सर्वोत्तम भद्राय । सर्वदा सर्व साक्षिणे । भक्तगृह रक्षणाय, दत्तात्रेयाय नमतोस्मि ॥२॥
आपुले भक्त रक्षणास । सदा स्वामी घेती वेध । परब्रह्म जगद्‍व्यापक । जाहले साकार ॥३॥
श्रीरामाचे मंदिरात । उत्सव होती विविध । प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत । उत्सव चैत्रमासी ॥४॥
कीर्तनांत मयुरानंद । रामायण कथा गात । आणि तेथे अकस्मात । आली टोळी वानरांची ॥५॥
दिधला नाही कोणा त्रास । सर्व बसले प्रांगणांत । कीर्तन होता पूर्त । प्रसाद घेऊनी गेले निघून ॥६॥
त्या समयी अक्कलकोटांत । घडतसे अतर्क्य । कोडँक कंपनीचा मालक । आला स्वामी छबी घेण्यासी ॥७॥
छबी घेऊनी धुता काच । दिसे वानर बलाढ्‍य । तेच स्वामीनचे हनुमंतरुप । पाहिले भक्तांनी ॥८॥
एकदा रामनवमी उत्सवांत । दंगले मयुरानंद । सुश्राव्य रामलीला वर्णिता । श्रोते भान हरपले ॥१०॥
कोणी नसे गृहात । कार्या वेळ शांत । घरांतील ऐवज । घेतला वस्त्री बांधुनी ॥११॥
घराबाहेर जाऊ पहात । कोठेही दिसेना दार । मध्यरात्री पर्यंत । भ्रमिष्ठ घरात फिरती ॥१२॥
कीर्तन करुनी पूर्त आले मयुरानंद गृहास । दारे उघडी सताड । पाहतां भय पावले ॥१३॥
अंगी घोंगडी लपेटून । फिरती घरात काळकभिन्न । ही भूते की सैतान । करिती स्मरण स्वामींचे ॥१४॥
तव ते इसम येऊन । धरिती मयुरानंदांचे चरण । म्हणती आम्ही कृतघ्न । करिती क्षमा याचना ॥१५॥
आपण व्हावे कृपार्थ । आजहला पश्चात्ताप । आणि सांगती वृत्तांत । घडला जो असे ॥१६॥
उत्सव संधी पाहून । करु आलो चौर्य कर्म । चिजवस्त्र घेतली बांधून । फिरलो परत जाण्यासी ॥१७॥
समोर दिसती दोन तरुण । करिती शर संधान । हलता जागे वरुन । पुढे सामोरे ठाकती ॥१८॥
म्हणती घरचा धनी । रंगला ईश कीर्तनी । चौरकर्मा साधुनी । जाऊ पाहता बाहेर ॥१९॥
तयांचे आम्ही गृहरक्षक । सांभाळतो चिजवस्तु । येथेच थांबा स्वस्थ । नाहीतर उडेल शीर ॥२०॥
आपण येतां घरांत । क्षणी झाले अदृश्य । समोर ठेऊनी ऐवज । लोळती मयुरानंद चरणी ॥२१॥
बोधिती तया मयुरानंद । सोडा चोरीचा छंद । सेविजे आनंदकंद । सीताया पतये नम: ॥२२॥
सोडूनी हीन व्यवहार । भक्त जाहले चोर । जय जय रघुपती रघुवीर । तामरंगी रंगले ॥२३॥
आनंद दु:ख उद्वेग । जाहला मयुरानंदास । नयनी न ठर्र जलपात । हर्ष वा दु:खाचा ॥२४॥
स्वयं राम लक्ष्मण । करिती घर रक्षण । अतीव दु:ख महान । जाहले तयांस ॥२५॥
साक्षात्‍ श्रीरामाचे पद फिरले घरांत । की भूमी अहिल्या उध्दार । केला तयांनी ॥२६॥
हाच अतीव आनंद । रंगी रंगले मयुरानंद । त्रैलोक्याचा ब्रह्मानंद । जाहला तयांसी ॥२७॥
सर्वानंद परिपूर्त । सुखासही असे छिद्र । तळपत्या सूर्यातही बिंब । अल्प काजळी असे ॥२८॥
मयुरानंदांची सहचरी । गेली रामपदी । त्वरित चतुर्थाश्रम स्वीकारती । मयुरानंद सरस्वती नाम ॥२९॥
तेव्हापासून राममंदिरात । चिंतनी मग्न मयुरानंद । बाहेरील धर्मकार्य । पुत्र गोविंदबुवा पाहती ॥३०॥
वसंत ऋतु चैत्रमास । श्रीराम नवरात्र आरंभ । कोकिळा पंचमात । गातसे रामनाम ॥३१॥
मयुरानंद आज्ञापित । गोविंदा पुत्रास । आज कीर्तनास । करणे तुज ॥३२॥
अष्टमीच्या रात्रीस । गोविंदा उभा किर्तनास । प्रत्यक्ष जणु नारद । कीर्तन करितो नारदीय ॥३३॥
कीर्तना ना चढे रंग । कंठी तरारे सूर । चुके तबल्याचा ताल । काल आरुढ सीमेवर ॥३४॥
कीर्तनात बेरंग । थबकले मयुरानंद । सूचना देईल रघुनाथ । म्हणून पाहती रामाकडे ॥३५॥
पाहता झाले चिंत्राक्रांत । श्रीराम झाले अदृश्य । लक्ष्मण सीता फक्त । दिसती गर्भागारी ॥३६॥
गोरा कुंभार आख्यान । सांगती मयुरानंदन । आटोपते घ्यावे कीर्तन । पुत्रा संकेतती ॥३७॥
श्रोतृवर्ग स्तंभित । कीर्तन का सरे अल्पकालात । घेऊनी प्रसाद । समस्त जाती घरोघरी ॥३८॥
मयुरानंद अवलोकीत । राम दिसे गाभार्‍यात । दंग रामस्मरणांत । निद्रा घेती मंदिरी ॥३९॥
ऊसाचे मळ्याचा राखणदार । मंदिरी आला धावत । सांगे मयुरानंदांस । अनाकलनीय जे घडले ॥४०॥
काल प्रहर रात्रीस । मळ्यास लागली आग । उसळले अग्नीडोंब । अग्नीप्रलय जाहला ॥४१॥
देखला एक तरुण । पाहतसे उत्तुंग अग्न । क्षणी शांत होऊन । मळा जैसा तैसाची ॥४२॥
कोणी कैसे येऊन । केले अग्नीशमन । तसुभर ना नुकसान । जाहले पिकाचे ॥४३॥
मयुरानंद शांत चित्त । नेत्र करिती अश्रुपात । अग्नी शमवीसी रघुनाथ । म्हणून अदृश्य राम गाभारी ॥४४॥
जय जय श्री रघुनाथा । अनाथ भक्त रक्षका । अग्नी शमवीसी अग्नीबीजा । विश्वपालका तुज नमो ॥४५॥
करुणाकर दयाघन । रामो राजमणी सीता रमण । सदा विजयते रघुनंदन । भजतो राम रमेशासी ॥४६॥
नसे परतर रामाहून । आवडे रामाचे दास्यपण । मम चित्तालयीं बसून । उद्धरी मज रामचंद्रा ॥४७॥
इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत । तस्कर शासनं, तथा हुताशन शमनं नामो,
षष्ठमोध्याय: । श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ शुभम भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP