मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री दत्तगिरी महाराज

श्री दत्तगिरी महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: चैत्र शुद्ध द्वादशी १८५०.
वडील: गोरखे प्रभू.  
गुरु: अक्कलकोट स्वामी.
विशेष: अकोला येथे दत्तमंदिर उभारले.

कुडाळ तालुक्यात जिवती (हल्लीचे नाव हरिचरणागिरी) येथील गिरी मठाचे दत्तगिरी हे आठवे व शेवटचे मठाधीश. हा मठ प्रभू खानोलकर घराण्यापैकी हरिचरणगिरी यांनी ८०० वर्षापूर्वी स्थापला. सातवे मठाधिपती भगवानगिरी यांचे वय झाले तरी त्या घराण्यापैकी वारस म्हणून, उत्तराधिकारी म्हणून आपला मुलगा देईनात तेव्हा त्यांनी चिदानंदस्वामींचे मठाचे पाचवे उत्तराधिकारी यांचे सल्ल्याने सर्व प्रभू खानोलकरांची बैठक घेऊन प्रश्न उपस्थित केला. तेव्हा तेथे बैठकीस उपस्थित असलेले ६० वर्षेहून जास्त वयाचे गोरखेप्रभू म्हणाले की मला जर या वयात मुलगा झाला तरी मी तो मठास अर्पण करील. त्यांना ३ मुलगे व नातवंडेही होती. आश्चर्य म्हणजे त्यांचे पत्नीस शके १७७१च्या श्रावणात डोहाळे लागून दत्तक्षेत्री जाऊन श्रीसेवेचा ध्यास लागला. त्याप्रमाणे श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे गेले. पुढे सन १८५० (शके १७७२) चैत्र शुद्ध द्वादशीस त्यांना मुलगा झाला. त्याचे दत्तात्रये नाव ठेवले व नंतर मुलासह ते जिवतीस परतले.

हा मुलगा असामान्य होता. शिक्षण सुरू केले तरी त्यात गती दिसेना. वयाचे ८ वर्षी सातवे मठाधिपती भगवानगिरी यांनी हा दिक्षा देण्यास अपात्र आहे. याने योग्यता मिळविली तर त्यास शिक्षा द्या असे सांगून सन १८५८ला देह ठेवला. सन १८६०मध्ये यांचे वडिलांनी दत्तात्रय प्रभूंनी त्यास गिरीदिक्षा दिली व दत्तगिरी नावाने मठाधीश केले. त्याचे आचरण अतिसामान्य असेच होते. सकोबानाना त्यांनी त्यास दिक्षा दिली. पुढे एकदा काही कारणास्तव दत्तगिरीचे मन अतिविव्हळ झाले. त्यांनी लगेच मठात जाऊन मठाचा दरवाजा बंद करून घेतला व मठातील समाधीसमोर माझे अस्तित्त्व पटवा म्हणून हट्ट धरून बसले. मी कोण? माझा मार्ग मला कोण दाखविणार? या प्रश्नाची उत्तरे मिळेपर्यंत मी येथून हलणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. असे काही दिवस गेले व एक दिवशी समाधीपुरुषाने त्यास तू अक्कलकोटास जा स्वामी समर्थाकडे अशी स्पष्ट सूचना रात्री दिली. त्याप्रमाणे ते रात्रीच पायी निघाले. स्वामी समर्थ कोण? कोठे अक्कलकोट आहे हे माहित नव्हते तरी नेमके ते त्याच गावचे दिशेनेच निघाले होते.

दत्तगिरी अक्कलकोटला पोहोचले तेव्हा स्वामी समर्थ सेवेकऱ्यासोबत एका वाड्यात बसले होते. समोर दर्शनेच्छुकांची गर्दी होतीच अचानक स्वामी समर्थ उठले व दरवाज्याकडे गेले आणि नेमक्या याचक्षणी दत्तगिरी स्वामींना शोधत शोधत दरवाज्यापर्यंत पोहोचले होते. स्वामी समर्थांनी तत्काळ त्यांचे मस्तकावर हात ठेवला व त्यांना पावन केले. त्यांना आपल्याबरोबर राहण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे दत्तगिरी हे स्वामी समर्थ अवतारसमाधीपर्यंत १२ वर्षे अक्कलकोटास राहिले.

स्वामी समर्थांनी त्यास आत्मलिंग पादुका दिल्या होत्या. त्या घेऊन ते पायीच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीचे काठाकाठाने कोकणाकडे निघाले होते. जाताना पिशाच्चवाडीतील श्री. गोविंद नारायण सामंत यांनी त्यांचे दिव्यरूप पाहून साष्टांग नमस्कार केला व अनन्यभावे शरण गेले. त्या पिशाच्चवाडी परिसरात दोनच सामंतांचीच घरे होती. महाराज या ठिकाणी राहण्याचे ठरवून राहिले. या गावी पिशा नावाचे धार्मिक स्थळ होते. त्याचेच पुढे वाडी म्हणजे पिशाच्चवाडभ व अपभ्रंशाने पिशाच्चवाडी असे नाव झाले. या भागात एक मांगर होता. घराव्यतिरिक्त अधिक सामान ठेवण्याची खोली असे त्या मांगराचे स्वरूप होते. समर्थांनी दिलेल्या आत्मलिंग पादुका स्थापन केल्या. लगेच तो मांगर मंदिर झाला. दत्तगिरी महाराज तेथे राहत. ना कोणाकडे जात वा राहात. पुढे पिशाच्चवाडीची श्रीपादवाडी झाली. पिशाच्चवाडी ही नोंद बदलून श्रीपादवाडी असे सरकारी कागदपत्रात दत्तगिरी महाराजांनी करून घेतले व कायदेशीर मान्यता मिळवून दिली श्रीपादवाडीस.

बराच काळ वास्तव्यानंतर ते मूळगाव जिवतीकडे निघाले. अंबोली घाटातून सावंतवाडीस आले व तेथून सालगावला व तेथल्या खेरवाडीतील एक मांगराचे मंदिर बनवून तेही दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध केले.

स्वामीसमर्थ कृपेने त्यांना गमन कलाही अवगत झाली होती. क्षणात ते इच्छितस्थळी जात. एकाच वेळी अनेक ठिकाणीही हजर असत. ते दत्तस्वरूप झाले होते. अनेक पाखंडी ढोंगी भक्तांची त्यांनी भंबेरी उडवली. त्यांच्या सिद्धींचे चमत्कार लोकांना प्रत्यायास येऊ लागले व स्वामी समर्थांचे प्रामाणिक भक्त ही खात्री पटली.

जिवतीत ते अनेक वर्षे राहिले. संचारी योगी पुरूष होते. मुलांना शिकवित. व्यायामाचा आग्रह धरीत. शरीरयष्टीसाठी अंगमेहनत करा असा आग्रह धरीत. त्यावेळी त्यांनी प्रौढ शिक्षणाचा नियम केला. सर्वत्र वृक्षारोपणाची चळवळ उभारली. उत्तम प्रवचन करीत. उत्स्फूर्त काव्यरचना कवने करीत. भजनाआधी सुरुवातीस मातापिता स्मरण करीत हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्ये होते. हल्याळ, गोकर्णमहाबळेश्र्वर येथेही जात. अंकोला येथे त्यांनी दत्तमंदिर उभारले.

ते जेव्हा मठात अडगळीचे खोलीत ध्यानस्थ बसत तेव्हा मोठा भुजंग खोलीचे दरवाज्यात डोलत असे अनेक भक्तांनी हे पाहिले आहे.

प्रचंड प्रसिद्धी अल्पावधीतच झाली व त्यांनी देह विसर्जनाचा निर्णय घेतला व जेथे आपण जन्मलो तेथेच देहत्याग करावा म्हणून ते नरसोबावाडीस आले व वयाचे जेमतेम चाळिशीत आलेले दत्तागिरी महाराज भाद्रपद शुक्ल पक्षात ज्या बाबाजी पुजाऱ्याचे घरी त्यांचा जन्म झाला त्यांचे घरचे माडीवर सात दिवस ध्यानस्थ बसले. अनंत चतुर्दशीस त्यांचा समाधीचा सातवा दिवस होता.

नंतर सरदार कुरुंदवाडकर पटवर्धन यांनी इतर ब्राह्मणांसमवेत महाराजांना पाटावरून नेऊन श्रीदत्तपादुकांसमोर कृष्णेत समाधी दिली. भाविकांनी त्यांच्या देहाचा अपरंपार शोध घेतला पण तो कधीच कोठेही कोणासही सापडला नाही. ते अंतर्धान पावले. त्यांच्या पादुका व छोटे मंदिर नरसोबावाडीतच बाबाजी पुजाऱ्यांचे "श्रीदत्तगिरी सदन’ येथे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP