श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य)
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
जन्म: झाशीजवळ जालवण येथे देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात
वडिल: तात्या पुराणिक
कार्यकाळ: १८०७ - १८६७
संप्रदाय: साहसागर
गुरु: गोवर्धनबाबा मधुरा हटयोगी (वय वर्षे ३५०)
विशेष: सन्यासानंतरचे नांव त्रिविक्रमाचार्य
शिष्य:
नारायण बाबा रत्नागिरी
सखाराम बाबा कल्याण
राधाकृष्ण तोरणे - मुंबई
लक्ष्मण बाबा - इंदूर
जन्म व पार्श्वभुमी
झांशीजवळ जालवण गावी श्री तात्या पुराणिक नावाचे सदाचरणी देशस्थ ब्राह्मण राहात होते. त्यांच्या पत्नी सुद्धा अतिशय सुशील होत्या. जालवणच्या राजाकडून तात्यांना पुराणे वाचनाचे ८००रु. चे उत्पन्न मिळत असे. तेही वार्षिक; पण संसार सुखाने चालू होता. मात्र त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. एकदा त्यांच्या पत्नी सूर्यनारायणाची पूजा करीत होत्या. त्यावेळी एक योगी आले होते आणि त्यांना विचारू लागले, की “बाई तू हे काय करीत आहेस?” त्या म्हणाल्या, “मी सूर्यनारायणाची पूजा करीत आहे.” तेव्हा योगीराज म्हणतात. तुझ्या घरी पुत्ररूपाने नारायणच येईल. त्यावेळी तात्यांनी श्रीमद्भागवताची १०० पारायणे केली होती. इकडे त्यांच्या पत्नीने ही गोष्ट त्यांना सांगितली. पुढे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव “नारायण” असे ठेवले. नारायण एक वर्षाचा असतांना आईचे निधन झाले. पुढे आजीनेच त्यांचा सांभाळ केला. थाटात मुंज झाली. पुढे लग्नाची इच्छा नसतानाही लग्न करावे लागले. नारायण महाराजांना आपला मागचा जन्म आठवत होता. त्यावेळी ते स्वामी हिरण्यगर्भाचार्य ह्या नावाने प्रसिद्ध होते. एकदा ते भिक्षेला निघाले असताना त्यांचे तेज पाहून एका स्त्रीने विवाहाचा आग्रह धरला. तेव्हा ते म्हणाले होते पुढच्या जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन म्हणून त्यांनी लग्नाला हो म्हटले, पण प्रपंचात उदासीन राहू लागले.
jalwankar Maharaj श्री नारायण महाराज जालवणकर
गुरुच्या शोधार्थ
शेवटी सद्गुरुच्या शोधार्थ घर सोडले. प्रथम मथुरेला गेले. तेथे गोवर्धन बाबा वय ३५० वर्षाचे हटयोगी त्यांचे शिष्य झाले. त्यांचे जवळ ४ वर्ष होते. इकडे मुलाच्या शोधार्थ सगळीकडे माणसं पाठवली. शेवटी एका जालवणच्या माणसाने त्यांना बघितले. त्या गृहस्थाने श्री गोवर्धन बाबांना सर्व हकीगत सांगितली, तेव्हा ते बाबांच्या सांगण्यावरून घरी जाण्यास तयार झाले. निघताना नारायणास दत्ताची उपासना करण्याचा आदेश दिला. घरी जाण्यास तयार झाले. घरी आल्यावर दोन वर्षांच्या अवधीत मुलगा पण झाला आणि काय आश्चर्य मुलगा आणि आई दोघांचेही निधन झाले. त्यांचे और्ध्वदेहिक कर्म उरकून लगेच घर सोडले.
सद्गुरुंचा अनुग्रह
श्री नारायण महाराज जालवणकर “गिरनार” पर्वतावर आले आणि तपश्चर्येला सुरुवात केली. शेवटी तपश्चर्या फळास आली. श्री दत्ताने सिद्धेश्वर रूपांत दर्शन दिले आणि ब्रह्मविद्येचा बोध केला. पुढे निरंजन स्वामींच्या स्वाधीन केले. चार वर्षात श्री स्वामींनी त्यांना श्रवण न राजयोगाभ्यास शिकवला आणि आता ‘जगाच्या कल्याणाकरिता तुम्ही बाहेर पडावे’ अशी आज्ञा केली आणि “समोरच्या झाडाखाली जागा खणून काढ. तिथे तुला माझी प्रतिमा मिळेल.” त्याप्रमाणे आतून गंडिकेची एक मुख, सहा भुजा व चरणाजवळ कामधेनू आणि श्वान असलेली श्री दत्तमूर्ति निघाली. ती मूर्ति बरोबर घेऊन नारायणमहाराज तीर्थयात्रा करीत निघाले, प्रथम द्वारका, मुंबई, रामेश्वर, काशी, जगन्नाथ करीत जालवणला आले. आपल्या वडिलांना व आजीलाही बरोबर घेऊन ब्रह्मवर्तास पोचले. तिथे प्रवचनाच्या वेळी खूप गर्दी होत असे. तेथील एक गृहस्थ महादेव आपटे महाराजांची खूप निंदा करीत असत. तेव्हा ते म्हणाले, “कुणाचीही निंदा करणे चांगले नाही” आणि काय आश्चर्य त्यांची वाचा बंद झाली. खाणेपिणे सुटले. शेवटी महाराज म्हणाले, “गंगेवर अंघोळ कर आणि पाच घरी माधुकरी माग. पाचव्या घरी वाचा परत येईल” आणि तसेच झाले. पुढे आपटे हे अनन्यभक्त झाले. लष्कर ग्वाल्हेरच्या बाळाबाई आरस ह्यासुद्धा त्यांच्या अनन्य शिष्या होत्या. महाराजांनी दिलेल्या पादुकांची पूजा आजही होत आहे.
Jalwankar Maharaj Paduka .
महाराजांचे कार्य
त्यांना मिळालेल्या दत्तमूर्तीला ते रोज ताट भरून नैवेद्य करीत असत आणि ती मूर्ती रोज प्रसाद ग्रहण करीत असे. प्रसाद म्हणून थोडा पानात ठेवत असे. हा चमत्कार ब्रह्मवर्तासही झालेला खूप लोकांनी बघितला. एकदा एका प्रमुख नामांकित व्यक्तीने लोकांच्या सांगण्यावरून दारू आणि अभक्षण पाठविले पण त्यांच्यावर दत्तकृपा असल्याने त्याचे दूध आणि गुलाबाची फुलं झाली. ती प्रसाद म्हणून त्यांनी परत पाठविली. शेवटी ती नामांकित व्यक्तीही त्यांच्या भक्त झाल्या. काशीतल्या एका मुलाची पिशाच्च बाधेपासून मुक्तता केली. एका मुलाला गंगेतून मोहनभोगने भरलेले रुप्याचे ताट काढून दिले. पण पोट भरल्याबरोबर ते गंगेला परत देण्यास सांगितले. एकदा थोरले देवासचे महाराज शिकारीला गेले असताना त्यांचे पण रक्षण केले. महाराजांचे शिष्य श्री आपटे रत्नागिरीत नारायण पेठेत राहणारे देवरुखे ब्राह्मण नारायण बाबांच्या बरोबर फिरत असताना एका गुहा त्यांना दिसली. फटीतून हाक मारली. तेव्हा आतून एका मनुष्याने शिला बाजूला करून येण्यास सांगितले. त्या मनुष्याचा विशाल देह पाहून हा कोणीतरी हटयोगी असावा असे वाटले. तो कर्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगत होता. तेव्हा महाराज म्हणाले, “द्वापार सरून कलियुग सुरु झाले आहे. तेव्हा असे कळले की त्याने मरणाच्या भीतीने प्रत्येक वेळी आपल्या देहाचे रक्षण केले होते. त्याने एक कंद, महाराज आणि त्यांच्या शिष्यास खावयास दिला. तेव्हा त्यांना सहा महिने भूक लागली नाही.
महाराजांनी त्यांना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. पुढे प्राणांताच्या वेळी सगळे सोडून चांगदेवाप्रमाणे आत्मस्वरूपांत विलीन झाला. महाराज धौम्यारणात असताना त्यांचा खर्च देवासचे थोरले महाराज चालवित असत. धौम्यारणात नदीचे काठी एक महादेवाचे देऊळ आहे. तिथे महाराज १२ वर्ष होते. या देवालयाच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांवर रामनामाची अक्षरे उमटलेली आहेत. हा लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. धारला रघुनाथ पुऱ्यात श्री दत्तमंदिर आहे. तिथे त्यांचा मुक्काम होता. एकदा प्रवचनात अध्यात्म रामायण चालू होते. काही कुत्सित लोक चमत्कार बघण्याच्या दृष्टीने आले होते. तेव्हा बोलता बोलता महाराज म्हणाले, “ईश्वराने निर्माण केलेल्या जगात अनेक चमत्कार आहेत. पंचमहाभूतांचे एकमेकांशी वैर असूनसुद्धा एकत्र आहेत. भगवंत सर्वांना ममतेने वागवतात. चौऱ्यांशी लक्ष योनी निर्माण केली हा चमत्कारच आहे. त्याच्यापुढे आम्ही काय चमत्कार करणार. पण तुमची इच्छाच आहे तर बघा!” असे म्हणून त्यांनी गळ्यात असलेल्या पिवळ्या कोल्हाटीचा हार काढून फेकला. त्याबरोबर त्यांच्या मोहरा बनल्या आणि मग त्यांच्याच मदतीने भंडारा केला आणि तो पुरून उरला. पुढे ते कुत्सित लोक महाराजांचे शिष्य झाले. धारचे दिवाण श्री. रामचंद्र दिघे ह्यांची महाराजांवर श्रद्धा नव्हती. एकदा ते ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी बाहेरून कुलूप घातले. तेव्हा नवरात्राचे दिवस होते. धारच्या कालिकामंदिराच्या पायथ्याशी वाघ बसलेला दिसला व पाहता पाहता नारायण महाराज दिसू लागले. अशी त्यांना प्रचीती आली. शके १७७७ मध्ये काशीला पूर्णानंदांच्या आश्रमात हनुमान घाटावर आले आणि चतुर्थाश्रम घेऊन त्रिविक्रमाचार्य हे नाव धारण केले. संन्यास घेतला. शके १७९० आषाढ वद्य पंचमी ह्यादिवशी दत्तस्मरण करीत गंगेला देह अर्पण केला. श्री महाराजाचे शिष्यमणी श्री जयराम आपटे ह्यांनी देवासला दत्तमंदिर बांधले व त्यात श्री महाराजांनी दिलेली गंडिकेची मूर्ती स्थापन केली. महाराजांचे शिष्य लक्ष्मणबुवा ह्यांनी इंदूरला आडव्या बाजारात श्रीराधाकृष्णाचे मंदिर बांधले व तिथे महाराजांच्या पादुका आणि रुद्राक्षाची माळ ठेवली आहे.
श्री सदगुरु समर्थ दत्तात्रय गुरुज्ञान मंदीर
डी ७, दर्शन सोसायटी, ब्लॉक २, गोराई
बोरीवली प. मुंबई ४०००९२
N/A
References : N/A
Last Updated : June 20, 2024
TOP