मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री स्वामीसुत महाराज

श्री स्वामीसुत महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


मूळनाव: हरिभाऊ तावडे.
गुरु: स्वामी समर्थ.
विशेष: स्वामी आज्ञे नुसार संसार संपत्ती सर्व वाटून टाकून स्वामी चरणी सेवेस सादर, स्वामींनी दिलेल्या चरणपादुका  चेंबूर मठात आहेत.

श्रावण कृष्ण प्रतिपदा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, स्वामींचे मानस पुत्रच अशा श्रीसंत स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी! श्रीस्वामी महाराजांची पूर्णकृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्व होते.

श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले.

श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, "तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो !"

झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, "तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर !" अशी आज्ञा केली.
स्वामीसुत श्री श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी  १४ दिवस  वापरलेल्या याच त्या "आत्मलिंग पादुका", चेंबूर मठ

त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली.

श्रीस्वामीसुतांनी श्रीस्वामी आज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार, घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्याकाळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्यांचे होते. अंगावर मणी मंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरु केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपु-यात होता, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरीत झाला. श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या. तेथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावे. स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती.

श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्रीस्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना "चंदुलाल" म्हणत असत.

श्रीस्वामींनी आपल्या पश्चात् स्वामीसुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले, पण श्रीगुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामीसुतांना घेऊन येण्यासाठी. पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वत: श्रीस्वामी महाराजांनी स्वामीसुतांच्या मातु:श्री काकूबाईंचे हरप्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते.

श्रीस्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्रीस्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा 'श्रीस्वामीपाठ' अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे, खूप भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे.
श्री स्वामीसुत श्री पादुका
श्री स्वामीसुत महाराज विरचित अभंग

दुर्बुद्धि वासना कधीं उपजों नेदी।
सांभाळावें आधीं तयेवेळीं ॥
सर्व अंगीकार दीनाचा करावा।
मज नाचवावा अपुल्या गुणी ॥
ऐशापरी सोय करुनी, दयाळा।
तुझें स्वरूप डोळां दाखवावें ॥
स्वामीसुत म्हणे संकल्प त्वां केला।
जीवन्मुक्त झाला बाळ तुझा ॥

राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामींच्या या महान पुत्राच्या, श्रीस्वामीसुत महाराजांच्या श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम!

स्वामी हो समर्था ऐसे आता करी ॥ तुझ्या चरणावरी चित्त राहो ॥१॥
तुझे हे स्वरूप दिसो दृष्टी पुढे ॥ नाचवावे कुडे प्रेमरंगे ॥२॥
प्रेमरंगे अंगी असो निरंतर ॥ आणिक तो भर भावभक्ती ॥३॥
स्वामीसुत म्हणे तुझ्या चरणांवरी ॥ माथा ऐसे करी कृपावंत ॥४॥
- श्री स्वामीसुत महाराज
श्री स्वामी समर्थ - बाळकृष्ण महाराज! स्वामी कथा अनंत, स्वामी लीला अगाध!

मुंबईला दादर आणि सुरत येथे भक्तवस्तल श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करून स्वामी भक्तीचा ध्वज ज्यांनी फडकविला. असे एकनिष्ठ स्वामीभक्त बाळकृष्ण महाराज बालपणी सकाळी घराच्या छपरावर बसून पाठ भाजेतो पर्यंत स्वामींचा नामजप करीत असत. मात्र ते विद्यार्थी वयात असताना त्यांचे धार्मिक मन बदलून ते रोजचे स्तवन, पूजा संध्या सोडून नास्तिक बनले. तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांचा नास्तिकपणा नाहीसा करून त्यांना अनुग्रह दिला.

एकदा बाळकृष्ण महाराज यांचे रामभक्त हनुमान यांच्या विषयी वाचन सुरू असताना हनुमंताच्या रोमारोमांतून श्रीराम श्रीराम श्रीराम असा आवाज येत होता असे त्यांच्या वाचनात आले. या वाक्यावर बाळकृष्ण महाराजांना शंका आली की हे कसे शक्य आहे म्हणून बाळकृष्ण महाराजांनी तात महाराज यांना वरील शंका विचारली त्यावेळी तात महाराज यांनी त्यांच्या जवळ असलेली उशी बाळकृष्ण महाराजांच्या अंगावर फेकून म्हणाले ही उशी कानाला लाव. बाळकृष्ण महाराजांनी ती फेकलेली उशी उचलून कानाला लावली त्यावेळी त्या निर्जीव उशीतून स्वामी स्वामी स्वामी असा आवाज आला. तेव्हा तात महाराज बाळकृष्ण महाराजांना म्हणाले, "थोड्याशा तपाने आणि समर्थांच्या कृपेने माझ्या सारख्या सामान्य माणसाची निर्जीव उशी स्वामी स्वामी असा ध्वनी काढू शकते तर चराचरात श्रीराम पाहणाऱ्या हनुमंताच्या रोमरोमांतून श्रीराम असा ध्वनी का निघणार नाही?"
श्री स्वामी समर्थ! काकड आरती, स्वामीसुत!              

उठा उठा सकळ जन ! पाहूचला स्वामी चरण ॥
तुटोनि जाईल भवबंधन ! भावेचरण पाहतांची ॥धृ॥
त्यांचे होतांचि दर्शन ! तृप्त होतीन नयन ॥
भावे घालोनि लोटांगण ! चरण तुम्ही वंदाते ॥१॥
कोटि तीर्थ चरणापाशी ! त्या चरणी सदभावेसी ॥
विनदुनि तुम्ही अहर्निशीं ! जन्म मरण चुकवा कीं ॥२॥
रुप पाहाताचि लोचनी ! सुख होईल साजण ॥
अज्ञान जाऊनि तत्क्षणीं ! ज्ञानज्योती प्रगटेल ॥३॥
जपा नाम निर्धारी ! पावन ते पंचदशाक्षरी ॥
तेणे चुकूनि तुमची फेरी ! मोक्षपद मिळेल कीं ॥४॥
परब्रम्ह हे अवतरले ! म्हणुनी नाम ते पावलें ॥
आता जपा तोंचि वाहिले ! तुम्हा सुख व्हावया ॥५॥
स्वामी नाम हाचि वन्ही ! महापापें ती तत्क्षणीं ॥
तृणवत टाकील जाळुनी ! प्रातःकाळी स्मरतांची ॥
धर्मलोप बहु झाला ! तेणे भूभार वाढला ॥
म्हणुनी समर्थ अवतरला ! जड मूढा ताराया ॥७॥
प्रातःकाळी दर्शन घेता ! मुक्ती मिळेल सायुज्यता ॥
तेणे चुकेल जन्म व्यथा ! भावे दर्शन घेताचि ॥८॥
रुप सुंदर सुकुमार ! दिसे आति मनोहर ॥
पाहुनि तेंचि सत्वर ! कृतार्थ तुम्ही व्हाल कीं ॥९॥
कोटी सुर्याची ही प्रभा ! चला दर्शन घ्यावया ॥१०॥
सत्य सांगे स्वामीसुत ! स्वामी पहा हो प्रेमयुक्त ॥
तेणे व्हाल जन्ममुक्त ! संदेह काही असेना ॥११॥
स्वामी माऊली चे मानस पुत्र स्वामी सुत ऊर्फ हरीभाऊ स्वामी माऊली चे मानस पुत्र स्वामी सुत ऊर्फ हरीभाऊ
श्री स्वामी समर्थ, अभिवचन

जे काम आपल्याला करावयाचे आहे,ते भक्तीयुक्त अंतःकरणाने आणि स्वामी आपल्या हृदयात स्थित आहे,या भावनेने करावे.त्यामुळे स्वामी कृपा आपल्या हृदयाचे शीड भरुन आपल्याला पुढे ढकलील आणि आपल्या कार्यासाठी लागणारी साधने आणि आत्मबळ आपल्याला पुरवील.प्रत्येक काम हे स्वामींचे काम,ही भावनाच यश मिळवून देईल.
श्री स्वामीसुतांचे आशीर्वचन

श्रद्धा, सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठायी आहे तो वर सर्व बाजूंनी भरभराटच होइल हे निश्चित.
 "अशक्य ही शक्य करतील स्वामी".
गुरुपरंपरा

श्री स्वामी समर्थ
    ।
श्री स्वामीसुत
    ।
श्री गोपालबुआ केळकर

॥ गळां वासुकीभूषणे रुंडमाळा ॥
॥ टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ॥
॥ जयाची प्रभा कोटिसूर्यासी हारी ॥
॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥४॥
॥ श्री दत्तस्तुती ॥
श्री स्वामी पादुकांचे समुद्रस्नान एक अद्भुत प्रासादिक सोहळा

इ. स. १८७० साली श्रीस्वामीसुतानी सर्वप्रथम श्रींची जयंती (प्रगट दिन) साजरी केली. त्याअगोदर बरोबर एक महिना श्रीस्वामी जयंती उत्सवाची श्रीसुतानी नांदी केली.

फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच 'श्रीस्वामी महापर्वणी' होय. यादिवशी भल्या पहाटे श्रीस्वामीसुत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडपचार पूजन करून समुद्रस्नानाकरिता गिरगांव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत. पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्रीस्वामी महाराजांना साजेसा असत. मिरवणूकीची वाट सेवेकरी कुंचल्याने झाडत. इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत. पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात. फुलांचा सडा, अत्तरांचा फवारे आणि श्रीस्वामी नामाचा जल्लोष. वातावरण कसे अगदी स्वामीमय होत.

या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी गुढी व श्रीस्वामी महाराजांचे भव्य निशाण मिरवले जात. यामागे तेजरूपी अश्व (पांढरा शुभ्र घोडा), पाच नद्यांच्या पाण्याचे जलकुंभ डोक्यावर घेऊन महिला, आरत्या घेऊन महिला मंडळ आणि श्रींचा सुबक सजवलेला छबिना. हा थाट, जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे. मिरवणुकीत श्रीस्वामीसुत महाराज अभंग गाण्यात मग्न असत. अशा थाटात हा लवाजमा चौपाटीवर सागरतीर्थाकडे जात.येथे स्वतः श्रीस्वामीसुत महाराज समस्त श्रीभक्तजनांसह छबिण्यातील पादुका घेऊन श्रीस्वामी नामाच्या जयघोषात सागरतीर्थात प्रवेश करीत. शास्त्रोक्त समुद्रस्नान सोहळा संपन्न होत. नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत. गोड पोह्यांचा नैवेद्य अर्पण होत. मग आरती आणि पुन्हा श्रीस्वामीसुतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष. छबिण्याभोवती श्रीस्वामी नामाचा फेर धरला जात. श्रीस्वामीसुत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत.

अशाच प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखीचा लवाजमा त्याच थाटात मठाकडे येण्यास माघारी फिरत. या सोहळ्याकडे पाहण्याऱ्यांचे डोळे दिपून जात. एवढेच नाही तर रस्त्यावरील कुत्री, गायी व गुरे श्रींच्या मिरवणुकीत सामिल होत असा जुना उल्लेख आढळतो.

मग काय, श्रीस्वामीसुत महाराज श्रीना नैवेद्य अर्पण करीत. भक्तजनांना स्वतः मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढीत. संध्याकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओंजळी प्रसादाने भरीत. या श्रीस्वामी महापर्वणी पासून श्रीस्वामी जयंतीच्या सोहळ्यास प्रारंभ होत. चैत्र शुद्ध द्वितीयेपर्यंत पूर्ण एक महिना कांदेवाडीच्या श्रीस्वामी मठात श्रीस्वामीसुत महाराज धुमधडाक्यात श्रींचा उत्सव साजरा करीत. या उत्सवास मुंबापुरीतील सर्व जाती धर्माचे लोग अगत्याने हजर राहत. आज आपल्याला श्रीस्वामी जयंती माहित आहे. परंतु श्रीस्वामीसुतानी श्रींच्या या जयंती सोहळ्याची नांदी, श्रीस्वामी महापर्वणी उत्सव फारसा प्रचलित नाही.

आज हा सोहळा कांदेवाडी मठात साजरा होत नसला तरी मुंबापुरीतील गिरगावात आपण श्रीस्वामीभक्त मंडळी त्याच थाटात, त्याच दिमाखात, त्याच जल्लोषात साजरा करतो. आज सुद्धा रस्ता झाडला जातो, पायघड्या घातल्या जातात, दोन्ही बाजूला सुबक रांगोळ्या काढल्या जातात, गुढी व निशाण नाचवली जाते.

आज देखील श्रीस्वामी नामाच्या जयघोषात हा सोहळा अगदी त्याच थाटात साजरा होतो. आज देखील भल्या पहाटे श्रींची पालखी मिरवणूक मोठ्या थाटात सागरतीर्थाकडे प्रस्थान होते. सागरतीर्थात श्रींच्या पादुकांचा समुद्रस्नान सोहळा त्याच शास्त्रोक्त पद्धतीने होतो. श्रीस्वामीसुतानी सुमारे दिडशे वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला हा सोहळा आज देखील त्याच थाटात साजरा होणे, ही मायमाउली श्रीस्वामी महाराजांचीच कृपा म्हणावी लागेल. फाल्गुन शुद्ध द्वितीयेस साजरी होणारी श्रीस्वामी महापर्वणी होते. या उत्सवास पहाटे साडे चार वाजता प्रारंभ होतो. श्रीस्वामी महाराजांचे षोडपोचार पूजन व नंतर पालखी मिरवणुकीचे सागरतीर्थाकडे प्रस्थान. भक्तगण आदल्या रात्रीपासूनच मुक्कामास येतात. आदल्या रात्री महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली असते. महिला सेवेकऱ्यांकरिता सुद्धा स्वतंत्र सोय केली जाते. श्रीस्वामी महापर्वणीस प्रत्यक्ष श्रीस्वामीसुतानीच आपल्याला निमंत्रण दिले आहे. ते म्हणतात,

याहो सर्व तुम्ही, होऊनि सावचित्त। नाचू आनंदात, एकमेळी ॥
स्वामीसुत म्हणे उत्साहासि यावे। सर्व तुम्ही भावे, समर्थांच्या।

उत्सव स्थळ: श्री ठाकूरदास बुवा स्थापित श्रीस्वामी समर्थ मठ, ठाकूरद्वार नाका, गिरगांव, मुंबई
संपर्क: ९८६९१५४८२० / ९९६९१२२१३३
श्री स्वामी सुत ! स्वामींचा एकनिष्ठ भक्त व मानसपुत्र !

अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आध्यात्मिक जगतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरावा अशी अलौकिक घटना ‘अक्कलकोट’च्या पुण्यभूमीवर घडली. त्यास कारण ठरले ते येथे झालेले श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आगमन. सन १८५७ मध्ये श्रीस्वामी महाराजांनी अक्कलकोटची थोरली वेस ओलांडली आणि पुढे २१ वर्षांच्या येथील वास्तव्यात त्यांनी केलेल्या अनेकविध लीलाप्रसंगांमुळे अवघा महाराष्ट्रदेश ढवळून निघाला. त्याच सुमारास राजापूर तालुक्यातील विलीये गावाहून आलेले आणि मुंबईस कर्मभूमी समजून कामाठीपुरा परिसरात वास्तव्य करून राहणारे हरीभाऊ दाजिबा तावडे हे सद्गृहस्थ, पत्नी व एकुलत्या एक मुलीसह आपल्या प्रपंचाचा गाडा ढकलीत होते. म्युनिसिपालटीची नोकरी आणि संसार या पारंपरिक चौकटीत रमलेल्या हरीभाऊ तावडे यांना ‘परमार्था’ची खरी जाणीव आणि ओळख झाली ती श्रीस्वामी महाराजांमुळे. नित्य प्रपंचात रमलेला हा सरळमार्गी गृहस्थ अक्कलकोटास गेला अन् श्रीस्वामींच्या सहवासात आपले देहभान विसरून बसला.

श्रीस्वामीरायांनी हरीभाऊंना प्रथमदर्शनी आपलेसे केले इतकेच नाही तर त्यांच्याकडून आग्रहाने चांदीच्या पादुका तयार करवून घेतल्या आणि सतत 14 दिवस त्या पादुकांस स्वचरणी वागवून, त्यांस सर्वांगाचा स्पर्श करून हरीभाऊंना प्रसादरूपाने परतही दिल्या. मात्र त्याच वेळी श्रीस्वामी समर्थांनी पादुकास्वरूप ‘आत्मलिंग’ प्रसादरूपाने देत हरीभाऊंना प्रेमभराने जवळ घेतले आणि त्यांना सांगितले ‘हे माझे ‘आत्मलिंग’ आहे. आता यापुढे तू माझा ‘सुत’ (मुलगा) आहेस. आता तुझा सर्व धंदा-रोजगार सोडून तू बंदर किनाऱयावर आमची ध्वजा उभार.’ श्रीस्वामी महाराजांनी तेथे उपस्थित असलेल्या भक्तमंडळींसमक्ष ‘पुत्र’ म्हणून उल्लेख केल्यामुळे हरिभाऊ पुढे ‘स्वामीसुत’ या नावानेच आजतागायत ओळखले जातात.

श्रीस्वामीसुत महाराजांनी त्यांच्या सच्चिदानंद ब्रह्मांडनायक पित्याच्या आज्ञेनुसार आपला ‘प्रपंच’ अक्षरशः लुटवला, संसारसुखाचा त्याग केला आणि मुंबईनगरीत स्वामीरायांचा झेंडा फडकवला. सन १८७० मध्ये त्यांनी मुंबईनगरीत श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या जन्मोत्सवाचे पहिले आख्यान मांडले तसेच श्रीस्वामींचा पहिला मठ स्थापन करून अनेक शिष्य, अनुयायी आणि भक्तमंडळीच्या सहयोगाने स्वामीकार्याची मुहूर्तमेढ रोवली. हजारो भाविकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. स्वामीसुतांचे राहाते घर भक्तांच्या दाटीने अपुरेपण अनुभवू लागले हे पाहून चिमाबाई बेलावली यांनी गिरगावमधील तिची जागा स्वामीसुतांना देऊ केली.

श्रीस्वामीसुतांच्या रूपाने मुंबईनगरी प्रति अक्कलकोट ठरावी असे हे वातावरण होते. स्वामीसुतांच्या रूपाने मुंबईकर भक्तमंडळींस जणू ‘स्वामीमंत्र’च गवसला होता. स्वामीसुत अनेकदा अक्कलकोट येथे स्वामीदर्शनार्थ जात असत आणि स्वामीरायांसमोर कीर्तनाचा थाट मांडत असत. ‘स्वामीप्राप्ती’ हा स्वामीसुतांच्या आयुष्याचा ‘ध्यास’ होता आणि ‘स्वामीचिंतन’ हा त्यांचा ‘श्वास’ होता. श्रीस्वामीसमर्थांच्या जन्मरहस्याची उकल करणे ही श्रीस्वामीसुतांच्या अवतारकार्याची अतिशय महत्त्वपूर्ण ‘ओळख’ आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांचा ‘जयंती’उत्सव पहिल्या प्रथम साजरा करण्याचा मान स्वामीसुतांकडे जातो. सन १८७० ते १८७४ या अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये स्वामीसुतांनी स्वामीनामाचा डंका अवघ्या अध्यात्मविश्वात गाजविला आणि ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा दिव्य मंत्र सर्वत्र पोहोचविण्याचे महान कार्य केले.

श्रीस्वामी समर्थांचे रूप, स्वरूप, त्यांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि त्याची महती या साऱयांचा उलगडा आपल्या अभंग रचनांमधून करणाऱया स्वामीसुतांचे समग्र आयुष्य स्वामीरायांच्या चरणांशी एकनिष्ठ राहिले. स्वामीवियोगाचे दुःख आपल्या नशिबी येऊ नये म्हणून श्रीस्वामीसुतांनी ऐन उमेदीतच देहत्याग केला. त्यांच्या देहविसर्जनाचे वृत्त समजताच साक्षात ब्रह्मांडनायक स्वामीरायांनी धाय मोकलून आकांत मांडावा असे भाग्य केवळ श्रीस्वामीसुतांना लाभले. त्यांनी जाताजाता सर्व भक्तांना स्वामीप्रेमाची ‘अमिरी’ बहाल केली.

स्वामीसुतांनी मुंबईमध्ये श्रीस्वामींची गादीपरंपरा सुरू केली. स्वामीसुतांच्या अकाली जाण्यानंतर पुढे ही परंपरा स्वामीसुतांचे धाकटे बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार आणि त्यांच्या नंतर स्वामीसुतांची कन्या सीता अर्थात सिद्धाबाई नलावडे यांनी अतिशय भक्तीभावपूर्ण श्रद्धेने चालवली. सिद्धाबाईंच्या पश्चात त्यांचे नातू हरीभाऊ आणि नातसून शारदामाई यांनी चेंबूर मठाचे वैभव दिसामासाने वृद्धिंगत केले. सध्या कांदेवाडी मठ अस्तित्वात असला तरीही श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका आणि अन्य वस्तू स्वामीसुतांच्या वंशजांकडे अर्थात चेंबूर येथील श्रीस्वामी समर्थ मठात आहेत. या मठामध्ये आत्मलिंग पादुकांचे पूजन, गुरुपौर्णिमा, श्रीस्वामीसुत पुण्यतिथी आणि श्रीदत्तजयंती हे वार्षिक कार्यक्रम संपन्न होतात. त्या शिवाय श्रीस्वामीसमर्थांच्या जयंतीचा उत्सव श्रीस्वामीसुतांनी आखून दिलेल्या नियमांनुसार, प्रथेनुसार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो.

सन १९१७ मध्ये स्वामीसुतांची लेक सीता जिचे तिच्या बालपणी साक्षात श्रीस्वामी महाराजांनी ‘सिद्धा’ या नावाने कौतुक केले, लाड केले आणि तिच्यावर अपार माया केली त्याच सिद्धाबाईंनी पुढे स्थापन केलेल्या या चेंबूर मठाने गतवर्षी शतकाची वेस ओलांडली. श्रीस्वामी समर्थांचे ‘सिद्ध’स्थान म्हणून ओळखला जाणारा श्रीस्वामीसुतांचा चेंबूर मठ आजही श्रीस्वामींप्रती तितकीच एकनिष्ठता जपत आहे आणि श्रीस्वामीनामाचा कीर्तीध्वज अभिमानाने आणि डौलाने फडकविताना दिसत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP