मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री हरिभाऊ निठुरकर महाराज

श्री हरिभाऊ निठुरकर महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: १५जून १९५४ निठुर येथे लातूर जिल्हा, महाराष्ट्र  
आई/वडील: अवंतिकाबाई/विनायक देव  
गुरु: गुंडा नारायण महाराज/दत्त महाराज कविश्वर
कार्यकाळ: १९५४- आजपर्यंत
विशेष: श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत भाषांतर
हरिभाऊ निठूरकर श्री हरिभाऊ निठुरकर महाराज

श्री भाऊ महाराजांचा जन्म एक अत्यंत संस्कारक्षम वैदिक कुटुंबात निठूर या गावी १५, जून १९५४ ला झाला. भाऊ महाराज लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान होते.

त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख असल्याने शिकवलेले ताबडतोब ग्रहण करीत व आत्मसात हि करीत. या तल्लख बुद्धीमतेचे फलस्वरूपच त्यांनी अत्यंत लहान वयातच संस्कृत शिक्षणास प्रारंभ केला व ती देववाणी आत्मसात केली. त्यांनी अनेक हिंदू प्राचीन ग्रंथ वाचले व अभ्यासले. याच वयात त्यांनी वेदविद्याही शिकण्यास प्रारंभ केला. वेद ऋचांच्यामध्ये त्यांची गती अत्यंत लक्षणीय होती. कारण एकाच त्यांची विलक्षण चाणाक्ष बुद्धिमत्ता! म्हणून अगदी लहान वयातच त्यांनी काही अभ्यासक्रम पूर्ण केला. जे शिक्षण मौन्जी बंधानानंतर सुरु करायचे ते त्यांनी आधीच सुरु केले. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांची मुंज झाली. या मौजींबंधन प्रसंगी या असामान्य बालकाला आशीर्वाद देण्यासाठी  प्रत्यक्ष श्री पांडुरंग उपस्थित होते असे सांगितले जाते. इ. स. १९८४ मध्ये त्यांना दीक्षा गुरु गुंडा नारायण महाराज यांचे कडून मिळाली. तर सिद्धमहायोगाची दीक्षा त्यांना प. प. दत्तमहाराज कविश्वर यांचे सिद्धहस्ते मिळाली. दत्तमहाराजांनी त्यांना श्रीमद भागवत सांगण्यास सांगितले. या ग्रंथराजा द्वारे समाज प्रबोधन व समाजाची जडण घडण बदलून समाज विकासाचे कार्य त्यांनी समर्थपणे पेलले. भगवान गोपाळकृष्णाचा वाङग्मयिन मूर्ती द्वारे व भगवंताच्या आयुष्यातील प्रसंगद्वारे समाजास अध्यात्मिक मार्गदर्शन केले, समाज प्रबोधन केले. त्यांनी ८० पेक्षा अधिक भागवत सप्ताह केले. भारत भ्रमण केले. अनेक तिर्थ यात्रा केल्या आपल्या भक्तांना आपल्या बरोबर नेऊन त्यानाही शास्त्रोक्त तीर्थयात्रा घडविल्या. त्यांनी अनेक ठिकाणी प्रवचने केली. त्यांच्या प्रवचनातून अनेक भक्तांना मानसिक समाधान मिळाले व त्यांच्या मनातील अध्यात्मिक शंकांचे परिमार्जन झाले व त्यायोगे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले. त्यांच्या भक्तांचे जीवन अधिक आनंदी  व संकटमुक्त झाले असा त्यांच्या भक्तांचा दृढ विश्वास आहे. याच कारणाने महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेश या राज्यात त्यांचे भक्तगण मोठया प्रमाणात विखुरलेले आहेत. अनेक भक्त परदेशातूनही त्यांचे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. ते अत्यंत सकारात्मक विचारांचे धार्मिक परंतु तितकेच साध्या वागणुकीने भक्तगणात आदराचे स्थान निर्माण करून आहेत. त्यांनी शंकर भट्ट यांनी लिहिलेले श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत हा तेलगू ग्रंथ श्रीपादांचे आज्ञेने घेतला अभ्यासला व त्याच भाषेत प्रथम त्याचे शुद्धीकरण केले. सदर ग्रंथ श्रीक्षेत्र पिठापूर येथे श्रीचरणी अर्पण केला. तेव्हा श्रीपादश्रीवल्लभांचे आज्ञेनेच त्या प्रासादिक ग्रंथाचे मराठीत भाषांतर आरंभिले व ते पूर्णही केले. हा श्रीपादांचा चरित्र ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. दत्तभक्तांसाठी हे महान कार्य त्यांनी केले. यासाठी प्रत्येक दत्तभक्त आयुष्यभर ऋ णी राहतील. हा ग्रंथ मार्गदीप म्हणून अनेक दत्तभक्तांचे आयुष्य उजळून टाकीत आहे. हे महान कार्य केवळ श्रीपादांची प्रेरणा, आशीर्वाद व गुरुकृपेनेच शक्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात. दत्तसंप्रदयाचा वेदस्वरूप ग्रंथ श्री गुरुचरित्र या ग्रंथातअध्याय ५-१० पर्यंत श्री नृसिंहसरस्वतीचे पुर्वावतार श्रीपादश्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्र आलेले आहे. पण या श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत ग्रंथात हे चरित्र खूप विस्ताराने आलेले आहे. या चारित्रग्रंथात श्रींचे बाललीला अत्यंत बारकाईने वर्णन केलेल्या आहेत. त्यावरून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, विचार, त्याकाळातील सामाजिक परिस्थिती आध्यत्मिक वातावरण यावर प्रकाश पडतो. याच ग्रंथात पुढील काळात घडणाऱ्या घटनांबाबत अचूक भविष्यवाणी केलेली आढळते. आजही हे चारितामृत अनेक भक्तगणांना मार्गदर्शक ठरत आहे.

भाऊ महाराजांचे जीवन म्हणजे एक आदर्श जीवनपाठ आहे. अत्यंत साधी राहणी, प्रखर बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व, उत्तम मांडणी, सखोल अध्यात्मिक ज्ञान, भक्तांसाठी आत्मीयता यामुळे ते गुरुपदी पोहोचले आहेत. वैयक्तिक जीवनात डी. आर. डी. ओ. सारख्या केंद्र सरकारचे महत्वाचे खात्यात एक सक्षम अधिकारी म्हणून ते प्रसिद्धी पावलेले आहेत. तरीपण ते अत्यंत सामान्य माणसांप्रमाणेच वागतात. त्याची साधी राहणी, अवघड अध्यात्मिक विषय समजून सांगण्याची हातोटी, अध्यात्मिक ज्ञान वत्याद्वारे भक्तांना त्यांच्या वयक्तिक व आध्यात्मिक मार्गदर्शन यामुळे भक्त वर्गात आदराचे स्थान निर्माण करू शकलेले आहेत. त्यांच्या  वैदिक ज्ञानासाठी भारताचे राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते त्यांना दोनदा गौरावांवीत करण्यात आलेले आहे. तसेच करवीर पीठ शंकराचार्य व कांचीकामकोटी पीठ शंकराचार्य  यांच्याकडूनही त्यांचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. गेली ५-१० वर्षे पासून भक्त गणांसमवेत त्यांनी अनेकांना यात्रेत नेले आहे. तेथेत्यांनी तिर्थ क्षेत्राची माहिती, महत्व व पावित्र्य वर्णिलेले आहे. त्यांनी त्यांचे शिष्यबरोबर कर्दळी वन यात्राही केलेली आहे.

ते एक उच्यकोटीचे साधक, एक समर्पित दिक्षाधिकारी आहेत. त्यांनी या भारत वर्षांत अनेक प्रांतात प्रवचन मालिका, भागवत सप्ताह व धार्मिक क्षेत्री अनेक अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून सफल केलेले आहेत. त्यांचेकडे उच्य नीच भाव नाही जाती पातींची बंधने नाहींत केवळ निखळ अध्यात्म व समर्पित साधना. त्यांचे मार्गदर्शनाने अनेकांची जीवने उजळून निघाली आहेत. धान्य ते सद्गुरू व धन्य ते भक्त!  अशा या महान पुण्यत्म्याचे चरणी आदरपूर्वक  प्रणिपात.

॥ सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू ॥ ॥ कटिं मौंज कौपीन ते काय वानूं ॥ ॥ गळां माळिका ब्रह्मसूत्रासि धारी ॥ ॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३॥
॥ श्री दत्तस्तुती ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 17, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP