दशक पहिला - स्तवनांचा

दशक पहिला - स्तवनांचा

॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥ नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥ ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥ नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥ नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥ शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥ भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता । गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥ इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥ भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥ पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥ आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥ मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥ नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥ योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥ भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥ आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥ बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष । अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥ नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥ नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥ ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥


समास दुसरा : गणेशस्तवन ॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥ माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥ तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥ येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं । होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥ म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर । आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥ वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥ सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥ सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत । हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥ भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड । विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥ नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें । तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥ मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें । लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥ चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी । लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥ रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ । कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥ दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट । तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥ लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद । क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥ चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर । फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥ डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी । उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥ नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां । रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥ शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ । येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥ नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥ स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण । साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥ रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें । घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥ ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा । साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥ ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु । त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥ ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥ जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥ जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण । तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥ ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ । सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥ ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति । वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २॥


समास तिसरा : शारदास्तवन ॥ श्रीराम ॥ आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता । शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥ जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥ जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥ जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या । जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥ जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥ जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी । आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥ जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे । जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥ जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा । जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥ जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा । जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥ जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा । हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥ जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती । जे कळीकाळाची नियंती । सद्गुरुकृपा ॥ ११॥ जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार । भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥ ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली । सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥ तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें । म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥ जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी । सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥ जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ । निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥ जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं । जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥ जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण । जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥ शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती । नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥ जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा । जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥ नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी । जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥ जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी । जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥ जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी । जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥ जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें । जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥ स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव । या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥ म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर । तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥


समास चवथा : सद्गुरुस्तवन ॥ श्रीराम ॥ आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना । तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥ न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥ मज न कळे हा विचारु । दुऱ्हूनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥ होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा । आतां असाल तैसे असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥ नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥ ६॥ आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं । तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७॥ जय जया जि सद्गुरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥ तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥ आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥ तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥ सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं । तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥ कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥ परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥ परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना । उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गुरूचा ॥ १५॥ शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये । म्हणौनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ॥ १६॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥ उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु । तैसा नव्हे कीं सद्गुरु । कोमळ दिनाचा ॥ १८॥ उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण । या कारणें दृष्टांत हीण । सद्गुरूस गगनाचा ॥ १९॥ धीरपणे । म् उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं । म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥ आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती । शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुरु अमर्याद ॥ २१॥ म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥ आतां उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥ सद्गुरूसी उपमावे । म् अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ । सद्गुरुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥ सद्गुरूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु । कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥ चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥ सद्गुरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥ स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती । सद्गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥ हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश येक । सद्गुरुपद ॥ २९॥ तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी । पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥ म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्गुरुस्तवननाम समास चवथा ॥ ४॥


समास पांचवा : संतस्तवन ॥ श्रीराम ॥ आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान । जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥ जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ । तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥ वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥ जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले । पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥ हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥ सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥ जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥ चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी । वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥ वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥ तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥ विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची । मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥ वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें । या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥ संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥ संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र । नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥ संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार । नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥ संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो । संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥ मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥ जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥ माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥ जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन । तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥ जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे । तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥ ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥


समास सहावा : श्रोतेजनस्तवन ॥ श्रीराम् ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥ येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर । येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥ जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते । नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥ किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥ हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥ जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥ जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥ जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें । तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥ परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥ सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें । तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥ आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥ तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥ वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥ ऐसा माझा वाग्‌विळास । म्हणौन बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥ तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती । बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥ समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं । तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥ व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥ तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत । तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥ आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे । परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥ हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन । तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥ माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥


समास सातवा : कवेश्वरस्तवन ॥ श्रीराम् ॥

आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर । नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥ कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व । नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥ कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥ अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी । नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥ कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु । नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥ कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु । नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥ कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥ कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥ कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥ कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो । कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥ कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण । नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥ कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति । कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥ नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ । नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥ आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस । कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥ कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता । कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥ कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद । कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥ कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥ कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण । नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥ कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते । नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥ नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार । म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥ नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥ मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक । तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥ पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली । तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥ ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार । आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥ नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती । वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥ परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥ सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥ कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले । नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥ कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें । नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥ कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें । लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥ कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं । विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥ कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती । नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥ कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड । ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥ आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर । तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥


समास आठवा : सभास्तवन ॥ श्रीराम् ॥

अतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥ श्लोक ॥ नाह । म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं । माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥ याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥ प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥ नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥ भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥ कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ । सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥ योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस । विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥ दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी । येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥ पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी । माहायोगी आणी जनस्वी । जनासारिखे ॥ ११॥ सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक । येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२॥ संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३॥ योगी वित्पन्न ऋषेश्वर । धूर्त तार्किक कवेश्वर । मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥ १४॥ ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी । योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५॥ पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥ माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री । वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७॥ भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८॥ शांति क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ । अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥ ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥ जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये । तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१॥ उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी । नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२॥ विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें । भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३॥ प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी । गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४॥ वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ । अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामीं ॥ २५॥ ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन । जयांचेनि समाधान । अकस्मात बाणें ॥ २६॥ ऐंसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार । जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७॥ जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८॥ कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ । कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥



समास नववा : परमार्थस्तवन ॥ श्रीराम् ॥


आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ । नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥ आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥ नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे । उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥ आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥ साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार । नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥ तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये । अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥ परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना । काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥ अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना । नांतरी पाहातां दिसेना । गुरुअंजनेविण ॥ १०॥ मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ । यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥ जेंही शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला । येरां असोनी अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२॥ अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची । आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभें ॥ १३॥ माया विवेकें मावळे । सारासारविचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४॥ ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड । पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । शुद्ध आत्मा विवेका- । अंतरीं आला ॥ १६॥ ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं । दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७॥ ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ । आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८॥ या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता । योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥ परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां । सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरूनी ॥ २०॥ परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक । परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥ परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार । परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२॥ परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी । या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥ अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४॥ जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला । येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥ असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण । त्या मूर्खाचें मुखावलोकन । करूंच नये ॥ २६॥ भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें । पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे परमार्थस्तवननाम समास नववा ॥ ९॥



समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण

॥ श्रीराम् ॥

धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥ या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें । येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥ येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें । येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥ येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले । येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥ येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला । येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥ येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात । येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥ येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले । येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥ येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती । येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥ येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती । येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥ येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती । येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥ ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी । ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥ ११॥ येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध । ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२॥ येक नवविधाभक्तिराजपंथें । गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें । येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३॥ येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले । येक कैळासीं बैसले । शिवरूप होऊनी ॥ १४॥ येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले । येक ते उडगणी बैसले । येक ते क्षीरसागरी ॥ १५॥ सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता । या चत्वार मुक्ती तत्वतां । इच्छा सेऊनि राहिले ॥ १६॥ ऐसे सिद्ध साधू संत । स्वहिता प्रवर्तले अनंत । ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौन वर्णावा ॥ १७॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८॥ या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ १९॥ नरदेहीं येऊन सकळ । उधरागती पावले केवळ । येथें संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २०॥ पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती । म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१॥ संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधू समाधानी । भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी । शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३॥ म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ । जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४॥ नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन । परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥ अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६॥ तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा रहो । परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥ २७॥ नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता । अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥ २८॥ नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला । अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥ नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका । अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३०॥ नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपर्या समंधाचें दुःख । तरी तो जाणावा निरार्थक । निश्चयेंसीं ॥ ३१॥ इतकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग । तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२॥ सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले । तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥ मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें । परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥ मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें । मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥ कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें । मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥ विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर । झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥ भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर । आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥ मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर । मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥ पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर । पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥ ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर । घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥ पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥ बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार । समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥ पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥ पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर । ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥ तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर । आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥ समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥ अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥ ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥ देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें । प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥ रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती । पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥ कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी । कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥ गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥ भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती । विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥ जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें । कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥ मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती । रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥ उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती । वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥ तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥ ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥ असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख । त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक पहिला समाप्त ॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP