॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक पंधरावा : आत्मदशक समास पहिला : चातुर्य लक्षण
॥ श्रीराम ॥ अस्तिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें । नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ येंकीं मागमागों घेणें । येकां न मागतांच देणें । प्रचीतीनें सुलक्षणें । ओळखावीं ॥ ३ ॥ जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ॥ ४ ॥ जानवें हेंवडकारें जालें । ढिलेपणें हेवड आलें । नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ तैसेंचि हे मनास मन । विवेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥ अनुमानें अनुमान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो । याकारणें प्रत्यये तो । आधीं पाहावा ॥ ७ ॥ दुसर्याचें जीवीचें कळेना । परांतर तें जाणवेना । वश्य होती लोक नाना । कोण्या प्रकारें ॥ ८ ॥ आकल सांडून परती । लोक वश्यकर्ण करिती । अपूर्णपाणें हळु पडती । ठाईं ठाईं ॥ ९ ॥ जगदीश आहे जगदांतरीं । चेटकें करावीं कोणावरी । जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ ॥ १० ॥ श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥ राजे जाती राजपंथें । चोर जाती चोरपंथें । वेडें ठके अल्पस्वार्थें । मूर्खपणें ॥ १२ ॥ मूर्खास वाटे मी शहाणा । परी तो वेडा दैन्यवाणा । नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जो जगदांतरे मिळाला । तो जगदांतरचि जाला । अरत्रीं परत्रीं तयाला । काय उणें ॥ १४ ॥ बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धिविण माणुस काचें । राज्य सांडून फुकाचे । भीक मागे ॥ १५ ॥ जें जें जेंथें निर्माण जालं । तें तें तयास मानलें । अभिमान देऊन गोविलें । ठाईं ठाईं ॥ १६ ॥ अवघेच म्हणती आम्ही थोर । अवघेचि म्हणती आम्ही सुंदर । अवघेचि म्हणती आम्ही चतुर । भूमंडळीं ॥ १७ ॥ ऐसा विचार आणितां मना । कोणीच लाहान म्हणविना । जाणते आणिती अनुमाना । सकळ कांहीं ॥ १८ ॥ आपुलाल्या साभिमानें । लोक चालिले अनुमानें । परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥ १९ ॥ लटिक्याचा साभिमान घेणें । सत्य अवघेंच सोडणें । मूर्खपणाचीं लक्षणें । ते हे ऐसीं ॥ २० ॥ सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निराभिमान । न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ २१ ॥ न्याये म्हणिजे तो शाश्वत । अन्याये म्हणिजे तो अशाश्वत । बाष्कळ आणि नेमस्त । येक कैसा ॥ २२ ॥ येक उघड भाग्य भोगिती । येक तश्कर पळोन जाती । येकांची प्रगट महंती । येकांची कानकोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो सीण । धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आळिले । धूर्तांपासीं कांहीं न चले । बाजार्यांचें ॥ २५ ॥ याकारणें मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥ धूर्तासि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तींच पवाडे । उगेंचि हिंडती वेडे । कार्येंविण ॥ २७ ॥ धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मनास मनपण मिळालें । परी हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्वे ॥ २८ ॥ समर्थाचें राखतां मन । तेथे येती उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥ वोळखीनें वोळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । नीतिन्यायें वाट रोधावी । पाषांडाची ॥ ३० ॥ वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । प्रगट जाणतां सज्जन । दुल्लभ जगीं ॥ ३२ ॥ नाना जिनसपाठांतरें निवती सकळांचीं अंतरें । चंचळपणें तदनंतरें । सकळां ठाईं ॥ ३३ ॥ येके ठाईं बैसोन राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावधपणें ज्याला त्याला । भेटि द्यावी ॥ ३४ ॥ भेटभेटों जरी राखणें । हे चातुर्याचीं लक्षणें । मनुष्यमात्र उत्तम गुणें । समाधान पावे ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोचे गुरुशिष्यसंवादे चातुर्यलक्षणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : निःस्पृह व्याप
॥ श्रीराम ॥ पृथ्वीमधें मानवी शरीरें । उदंड दाटलीं लाहान थोरें । पालटती मनोविकारें । क्षणाक्षणा ॥ १ ॥ जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती । सारिख्या नस्ती आदिअंतीं ॥ नेमचि नाहीं पाहावें किती । काये म्हणोनी ॥ २ ॥ कित्येक म्लेंच होऊन गेले । कित्येक फिरंगणांत आटले । देशभाषानें रुधिले । कीतीयेक ॥ ३ ॥ मऱ्हाष्टदेश थोडा उरला । राजकारनें लोक रुधिला । अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ॥ ४ ॥ कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले । रात्रंदिवस करूं लागले । युद्धचर्चा ॥ ५ ॥ उदिम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा जाला । अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥ ६ ॥ शडदर्शनें नाना मतें । पाषांडें वाढली बहुतें । पृथिवीमधें जेथ तेथें । उपदेसिती ॥ ७ ॥ स्मार्थीं आणि वैष्णवी । उरलीं सुरलीं नेलीं आघवी । ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८ ॥ कित्येक कामनेचे भक्त । ठाइं ठाइं जालें आसक्त । युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९ ॥ या गल्बल्यामधें गल्बला । कोणीं कोणीं वाढविला । त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥ १० ॥ त्याहिमधें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥ या कारणें ज्ञान दुल्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ । विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥ विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये । उपाय योजितां अपाये । आडवे येती ॥ १३ ॥ त्याहिमधें तो तिक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण । धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥ नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला घडघडाट । अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें । जाणें सकळांची अंतरें । निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मतें मतांतरें सगट । प्रत्यये बोलोन करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें । उदास वृत्तिच्या गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥ प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला । नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥ परी तो कोठें आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना । वेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २० ॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकार्यासारिखा स्वरूपें । तेथें येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठाइं ठाइं भजन लावी । आपण तेथून चुकावी । मछरमतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥ खनाळामधें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥ अवघड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक । सृष्टीमधें सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथें कोणाचें चालेना । अनुमात्र अनुमानेना । कट्ट घालीन राजकारणा । लोक लावी ॥ २५ ॥ लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले । भूमंडळीं सत्त चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥ ठाइं ठाइं उदंड ताबे । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळूं थोर थोर । प्रत्ययानें प्राणीमात्र । सोडविले ॥ २८ ॥ ऐसे कैवाडे उदंड जाणे । तेणें लोक होती शाहाणे । जेथें जेथें प्रत्यये बाणे । प्राणीमात्रासी ॥ २९ ॥ ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे निस्पृहव्यापनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : श्रेष्ठ अंतरात्मा
॥ श्रीराम ॥ मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकर्ण पसारा । त्यांत साक्षत्वाचा दोरा । तोहि तत्त्वरूप ॥ १ ॥ दुरस्त्या दाटल्या फौजा । उंच सिंहासनीं राजा । याचा विचार समजा । अंतर्यामी ॥ २ ॥ देहमात्र अस्तिमांशांचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें । मूळापासून सृष्टीचें । तत्वरूप ॥ ३ ॥ रायाचे सत्तेनें चालतें । परन्तु अवघीं पंचभूतें । मुळीं आधिक जाणिवेचे तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥ विवेके बहुत पैसावले । म्हणौन अवतारी बोलिले । मनु चक्रवती जाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥ जेथें उदंड जाणीव । तेचि तितुके सदेव । थोडे जाणिवेने नर्देव । होती लोक ॥ ६ ॥ व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी सदेव होती । देखतदेखतां ॥ ७ ॥ ऐसें हें आतां वर्ततें । मुर्ख लोकांस कळेना तें । विवेकीं मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥ थोर लाहान बुद्धीपासी । सगट कळेना लोकांसी । आधीं उपजलें तयासी । थोर म्हणती ॥ ९ ॥ वयें धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती । विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ॥ १० ॥ सामान्य लोकांचे ज्ञान । तो अवघाच अनुमान । दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥ ११ ॥ नव्हें कोणास म्हणावें । सामान्यास काये ठावें । कोणकोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥ १२ ॥ धाकुटा भाग्यास चढला । तरी तुछ्य करिती तयाला । याकारणें सलगीच्या लोकांला । दूरी धरावें ॥ १३ ॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण । उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४ ॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानिना । आधी उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥ वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्यां धाकुटपण नाहीं । ऐसे बोलती त्यांस नाहीं । शाहाणपण ॥ १६ ॥ गुणेविण वडिलपण । हें तों आवघेंच अप्रमाण । त्याची प्रतीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥ तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें । नेणतां पुढें कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥ तस्मात वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा । हें तों प्रगटचि आहे आम्हा । शब्द नाहीं ॥ १९ ॥ याकारणें कोणी येकें । शाहाणपण सिकावें विवेकें । विवेक न सिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥ तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मा येऊन काये केलें । बळेंचि सांदीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥ सगट बायेका सिव्या देती । सांदीस पडिला ऐसें म्हणती । मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥ ऐसें कोणीयेकें न करावें । सर्व सार्थकचि करावें । कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ शाहाण्यास कोणीतरी बाहाती । मुर्खास लोक दवडून देती । जीवास आवडे संपत्ति । तरी शाहाणें व्हावें ॥ २४ ॥ आहो या शाहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें । परंतु शाहाणपण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५ ॥ जों बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला । जनीं शाहाण्या मनुष्याला । काये उणें ॥ २६ ॥ आपलें हित न करी लोकिकीं । तो जाणावा आत्मघातकी । या मुर्खायेवढा पातकी । आणिक नाहीं ॥ २७ ॥ आपण संसारीं कष्टतो । लोकांकरवी रागेजोन घेतो । जनामध्यें शाहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥ साधकां सिकविलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें । मानेना तरी सांडावें । येकिकडे ॥ २९ ॥ तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्षास लावितां लक्ष । हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसा ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे श्रेष्ठ अंतरात्मानिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : शाश्वतब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥ पृथ्वीपासून जालीं झाडें । झाडापासून होती लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होये ॥ १ ॥ पृथ्वीपासून वेल होती । नाना जिनस फापावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होये ॥ २ ॥ नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें करिती भोजनें । नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होये ॥ ३ ॥ नाना पक्षादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंचि जालें । वाळोन भस्म होऊन गेलें । पुन्हा पृथ्वी ॥ ४ ॥ मनुष्यें मरतांच ऐका । क्रिमि भस्म कां मृत्तिका । ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥ नाना तृण पदार्थ कुजती । पुढें त्याची होये माती । नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥ पदर्थ दाटले अपार । किति सांगावा विस्तार । पृथ्वीवांचून थार । कोणास आहे ॥ ७ ॥ झाड पाले आणि तृण । पशु भक्षितां होतें सेण । खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥ उत्पत्तिस्थितिसंव्हारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें । जितुकें होतें आणि जातें । पुन्हा पृथ्वी ॥ ९ ॥ नाना बीजांचिया रासी । विरढोने लागती गगनासी । पुढें सेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥ १० ॥ लोक नाना धातु पुरिती । बहुतां दिवसां होये माती । सुवर्णपाषाणाची गती । तैसीच आहे ॥ ११ ॥ मातीचें होते सुवर्ण । आणी मृत्तिकेचे होती पाषाण । माहा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होये ॥ १२ ॥ सुवर्णाचें जर होतें । जर सेवटीं कुजोन जातें । रस होऊन वितुळतें । पुन्हा पृथ्वी ॥ १३ ॥ पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें रस होती । तया रसाची होये जगती । कठीणरूपें ॥ १४ ॥ नाना जळासी गंधी सुटे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे । देवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥ पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती । ते जीव मरतां जगती । नेमस्त होये ॥ १६ ॥ जितुका कांहीं जाला आकार । तितुक्यास पृथ्वीचा आधार । होती जाती प्राणीमात्र । सेवट पृथ्वी ॥ १७ ॥ हें किती म्हणौन सांगावें । विवेकें अवघेचि जाणावें । खांजणीभाजणीचें समजावें । मूळ तैसे ॥ १८ ॥ आप आळोन पृथ्वी जालू । पुन्हां आपींच विराली । अग्नियोगें भस्म जाली । म्हणोनियां ॥ १९ ॥ आप जालें तेजापासुनी । पुढें तेजें घेतलें सोखुनी । तें तेज जालें वायोचेनी । पुढें वायो झडपी ॥ २० ॥ वायो गगनीं निर्माण जाला । पुढें गगनींच विराला । ऐसें खांजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जें जेथें निर्माण होतें । तें तें तेथें लया जातें । येणें रितीं पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण जालें । पुन्हां मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें परब्रह्म जों कळेना । तो जन्ममृत्यु चुकेना । चत्वार खाणी जीव ना । होणें घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें । विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ॥ २७ ॥ ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करितो गल्बला । मायेंमधें ॥ २८ ॥ माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥ लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानेंच बुडाला । याकारणें प्रत्ययाला । पाहिलेंच पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे शाश्वतब्रह्मनिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : चंचळ लक्षण
॥ श्रीराम ॥ दोघां ऐसीं तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती । अधोर्ध सांडून वर्तती । इंद्रफणी ऐसीं ॥ १ ॥ पणतोंडें भक्षितो पणजा । मूल बापास मारी वोजा । चुकार्या गेला राजा । चौघां जणांचा ॥ २ ॥ देव देवाळयामधें लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला । सृष्टिमधें ज्याला त्याला । ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोनी नामें येकास पडिलीं । लोकीं नेमस्त कल्पिलीं । विवेकें प्रत्ययें पाहिलीं । तों येकचि नाम ॥ ४ ॥ नाहीं पुरुष ना वनिता । लोकीं कल्पिलें तत्त्वता । त्याचा बरा शोध घेतां । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ स्त्री नदी पुरुष खळाळ । ऐसें बोलती सकळ । विचार पाहातां निवळ । देह नाहीं ॥ ६ ॥ आपण आपणास कळेना । पाहों जातां आकळेना । काशास कांहींच मिळेना । उदंडपणें ॥ ७ ॥ येकलाचि उदंड जाला । उदंडचि येकला पडिला । आपणासी आपला । गल्बला सोसवेना ॥ ८ ॥ येक असोन फुटी पडिली । फुटी असोन स्थिति येकली । विचित्र कळा पैसावली । प्राणीमात्रीं ॥ ९ ॥ वल्लिमधें जल संचरे । कोरडेपणें हें वावरे । वोलेवांचून न थिरे । कांहीं केल्यां ॥ १० ॥ झाडांमधें केलीं आळीं । झाडें धांवती निराळीं । कित्येक झाडें अंतराळीं । उडोन जाती ॥ ११ ॥ भूमीपासून वेगळीं जालीं । परी तें नाहींत वाळलीं । निराळींच बळावलीं । जेथतेथें ॥ १२ ॥ देवाकरितां चालती झाडें । देव नस्तां होती लाकडें । नीटचि आहे कुवाडें । सर्वथा नव्हे ॥ १३ ॥ झाडापासून झाडें होती । तेहि अंतरीक्ष जाती । मुळानें भेदिली जगती । कदापि नाहीं ॥ १४ ॥ झाडास झाडें खातपाणी । घालून पाळिलीं प्रतिदिनीं । बोलकीं झाडें शब्दमथनीं । विचार घेती ॥ १५ ॥ होणार तितुकें आधींच जालें । मग कल्पकल्पून बोलिलें । जाणतयासी समजलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥ समजलें तरी उमजेना । उमजलें तरी समजेना । प्रत्ययेंविण अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥ सर्वत्रांचा वडिल कोण । हेचि पाहावी वोळखण । भेटे आपणास आपण । जगदांतरें ॥ १८ ॥ अंतरनिष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्र्याची संगती खोटी । मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ॥ १९ ॥ अंतरें राखतां राजी । भलत्यास भलताच नवाजी । अंतरें न राखतां भाजी । मिळणार नाहीं ॥ २० ॥ ऐसें वर्ततें प्रत्यक्ष । अलक्षीं लावावें लक्ष । दक्षास भेटतां दक्ष । समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहोन येती निरंजन । चंचळचक्र उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ येकदा जाऊन पाहोन आले । मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षी लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना शरीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठाईं ॥ २४ ॥ चंचळ धांवे येकीकडे । वोस पडे दुसरेकडे । चंचळ पुरे सर्वांकडे । हें तो घडेना ॥ २५ ॥ चंचळ चंचळास पुरेना । आवघें चंचळ विवरेना । निश्चळ अपार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥ गगनीं चालिली हवावी । कैसी पावेल पार पदवी । जातां मधेंचि विझावी । हा स्वभावचि तिचा ॥ २७ ॥ मनोधर्म येकदेशी । कैसा आकळिल वस्तुसी । निर्गुण सांडून अपेसी । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥ नाहीं सारासार विचार । तेथें अवघा अंधकार । खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥ ब्रह्मांडाचें माहाकारण । तेथून हें पंचीकर्ण । माहावाक्याचें विवर्ण । वेगळें असे ॥ ३० ॥ महत्तत्त्व महद्भूत । तोचि जाणावा भगवंत । उपासना हे समाप्त । येथून जाली ॥ ३१ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड वेद हें प्रमाण । ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मी ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळलक्षणनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास सहावा : चातुर्य विवरण
॥ श्रीराम ॥ पीतापासून कृष्ण जालें । भूमंडळीं विस्तारलें । तेणेंविण उअमजलें । हें तों घडेना ॥ १ ॥ आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण । अद्धम आणी उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥ महीसुत सरसाविला । सरसाऊन द्विधा केला । उभयेता मिळोन चालिला । कार्येभाग ॥ ३ ॥ स्वेतास्वेतास गांठीं पडतां । मधें कृष्ण मिश्रित होतां । इहलिकसार्थकता । होत आहे ॥ ४ ॥ विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होये चतुर । सद्यप्रचित साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ सकळांस जे मान्य । तेंचि होतसे सामान्य । सामान्यास अनन्य । होईजेत नाहीं ॥ ६ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टीची गुप्त रेखा । चत्वार अनुभव रारिखा । होत नाहीं ॥ ७ ॥ चौदा पिड्यांचे पवाडे । सांगती ते शाहाणे कीं वेडे । ऐकत्यानें घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥ रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें । डोळेझांकणी करावी तें । कायेनिमित्य ॥ ९ ॥ बहुतांचे बोलीं लागलें । तें प्राणी अनुमानीं बुडालें । मुख्य निश्चये चुकलें । प्रत्ययाचा ॥ १० ॥ उदंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावे । खरेंखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥ कोणासी नव्हे म्हणों नये । समजावे अपाये उपाये । प्रत्यये घ्यावा बहुत काये । बोलोनियां ॥ १२ ॥ माणुस हेंकाड आणी कच्चें । मान्य करावें तयाचें । येणेंप्रकारें बहुतांचें । अंतर राखावें ॥ १३ ॥ अंतरीं पीळ पेच वळसा । तोचि वाढवी बहुवसा । तरी मग शाहाणा कैसा । निवऊं नेणें ॥ १४ ॥ वेडें करावें शाहाणें । तरीच जिणें श्लाघ्यवाणें । उगेंच वादांग वाढविणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥ मिळोन जाऊन मेळवावें । पडी घेऊन उलथावें । कांहींच कळों नेदावें । विवेकबळें ॥ १६ ॥ दुसर्याचे चालणें चालावें । दुसर्याचे बोलणीं बोलावें । दुसर्याचे मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥ जो दुसर्याच्या हितावरी । तो विपट कहिंच न करी । मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥ आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळुहळु उकलावें । नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥ हेंकाडास हेंकाड मिळाला । तेथें गल्बलाचि जाला । कळहो उठतां च्यातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥ उगीच करिती बडबड । परी करून दाखविणें हें अवघड । परस्थळ साधणें जड । कठिण आहे ॥ २१ ॥ धके चपेटे सोसावे । नीच शब्द साहात जावे । प्रस्तावोन परावे । आपले होती ॥ २२ ॥ प्रसंग जाणोनि बोलावें । जाणपण कांहींच न घावें । लीनता धरून जावें । जेथतेथें ॥ २३ ॥ कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें । भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षून सोडावीं ॥ २४ ॥ बहुतीं कांहींतरी सांपडे । विचक्षण लोकीं मित्री घडे । उगेच बैसतां कांहींच न घडे । फिर्णें विवरणें ॥ २५ ॥ सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें । जाऊं ये तिकडे जावें । विवेकें सहित ॥ २६ ॥ नाना जिनसपाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें । लेहोन देतां परोपकारें । सीमा सांडावी ॥ २७ ॥ जैसें जयास पाहिजे । तैसें तयास दीजे । तरी मग श्रेष्ठचि होइजे । सकळां मान्ये ॥ २८ ॥ भूमंडळीं सकळांस मान्य । तो म्हणों नये सामान्य । कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥ ऐसीं चातुर्याचीं लक्षणें । चातुर्यें दिग्विजये करणें । मग तयास काये उणें । जेथतेथें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्यविवरणनाम समास सहावा ॥
समास सातवा : अधोर्धनिरूपण ॥ श्रीराम ॥ नाना विकाराचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । अचंचळीं जे चंचळ । सूक्ष्मरूपें ॥ १ ॥ मूळामाया जाणीवेची । मुळींच्या मुळ संकल्पाची । वोळखी शडगुणैश्वराची । येणेंचि न्यावें ॥ २ ॥ प्रकृतिपुरुष शिवशक्ति । आर्धनारीनटेश्वर म्हणती । परी ते आवघी जगज्जोती । मूळ त्यासी ॥ ३ ॥ संकल्पाचें जें चळण । तेंचि वायोचें लक्षण । वायो आणी त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ ४ ॥ पाहातां कोणीयेक वेल । त्याच्या मुळ्या असती खोल । पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासी ॥ ५ ॥ याहिवेगळे नाना रंग । आकार विकार तरंग । नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥ तेंचि मूळ फोडून पाहातां । कांहींच नाहीं वाटे आतां । पुढें वाढतां वाढतां । दिसों लागे ॥ ७ ॥ कड्यावरी वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला । फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥ तैसीं मुळमाया जाण । पंचभूतें आणी त्रिगुण । मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥ अखंड वेल पुढें वाढला । नाना विकारीं शोभला । विकारांचा विकार जाला । असंभाव्य ॥ १० ॥ नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडें वाढली । अनंत अग्रें चालिलीं । सृष्टीमधें ॥ ११ ॥ कित्येक फळें तीं पडती । सवेंचि आणीक निघती ॥ ऐसीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥ येक वेलचि वाळले । पुन्हां तेथेंचि फुटले । ऐसे आले आणि गेले । कितीयेक ॥ १३ ॥ पानें झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रितीं । मध्यें जीव हे जगती । असंभाव्य ॥ १४ ॥ अवघा वेलचि कर्पतो । मुळापासून पुन्हा होतो । ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥ मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययेज्ञानें निर्मूळ केलें । तरी मग वाढणेंचि राहिलें । सकळ कांहीं । १६ ॥ मुळीं बीज सेवटीं बीज । मध्यें जळरूप बीज । ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ॥ १७ ॥ मुळामधील ज्या गोष्टी । सांगताहे बीजसृष्टी । जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥ जातो येतो पुन्हा जातो । ऐसा प्रत्यावृत्ति करितो । परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥ न घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहींतरी लागे जाणावें । अंतरींच परी ठावें । सकळांस कैचें ॥ २० ॥ तेणेंसींच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती । दिसेना ते काये करिती । बापुडे लोक ॥ २१ ॥ विषयेभोग तेणेंचि घडे । तेणेंविण कांहींच न घडे । स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥ जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदांतर । शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥ आंगोळीची आंगोळीस वेधना । येकीची येकीस कळेना । हात पाये अवेव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥ अवेवाचें अवेव नेणे । मा तो परांचें काये जाणे । परांतर याकारणें । जाणवेना ॥ २५ ॥ येकाचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रेंभेद दिसती । खुडिलीं तितुकींच सुकती । येर ते टवटवीत ॥ २६ ॥ येणेंचि न्यायें भेद जाला । कळेना येकाचें येकाला । जाणपणें आत्मयाला । भेद नाहीं ॥ २७ ॥ आत्मत्वीं भेद दिसे । देहप्रकृतिकरितां भासे । तरी जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥ देखोन ऐकोन जाणती । शाहाणे अंतर परीक्षिती । धूर्त ते अवघेंच समजती । गुप्तरूपें ॥ २९ ॥ जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी । धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥ आधी मनोगत पाहतीं । मग विश्वास धरिती । प्राणीमात्र येणें रितीं । वर्तताहे ॥ ३१ ॥ स्मरणामगें विस्मरण । रोकडी प्रचित प्रमाण । आपलें ठेवणें आपण । दुकताहे ॥ ३२ ॥ आपलेंच आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना । उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥ ऐसें हें चंचळ चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र । जाला रंक अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥ स्मरण म्हणिजे देव । विस्मरण म्हणिजे दानव । स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥ म्हणोनि चेवी आणि दानवी । संपत्ति द्विधा जाणावी । प्रचित मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥ विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा वोळखावा । नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥ स्थूळें स्थूळ खाजवावें । सुक्ष्में सुक्ष्म समजावें । खुणेनें खुणेसी बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥ विचारें जाणाव विचार । अंतरें जाणावे अंतर । अंतरें जाणावे परांतर ॥ हौनियां ॥ ३९ ॥ स्मरणामाजीं विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण । येकदेसी । परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥ पुढें सिके मागें विसरे । पुढें उजेडे मागें अंधारें । पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥ तुर्या जाणावी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण । उभयेता शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अधोर्धनिरूपणनाम समास सातवा ॥
समास आठवा : सूक्ष्मजीवनिरूपण ॥ श्रीराम ॥ रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपटचि थोडें । युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥ ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती । अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंचि आहे ॥ २ ॥ त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान । सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥ त्यास मुंगी माहा थोर । नेणोंचालिला कुंजर । मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥ तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें । समस्तांमध्यें जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥ ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार । अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥ नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढे । आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥ पक्षायेवढें लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं । सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडे ॥ ८ ॥ मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें । त्यांची निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥ नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग । येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥ येकें सुकुमारें येकें कठोरें। निर्माण केलीं जगदेश्वरें । सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥
शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें । अंतरीं वसिजे अभेदें । येकरूपें ॥ १२ ॥ येक त्रासकें येकमारकें। पाहो जातां नाना कौतुकें । कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥ ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । आपल्यापरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥ नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा । ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥ त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती । त्या विशाळ जीवांची स्थिती । कोणजाणे ॥ १६ ॥ जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव । पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे । ॥ १७ ॥ पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें । नाना जिनस लाहानथोरें । कोण जाणें ॥ १८ ॥ येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती । वरीच्यावरी उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥ नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें । चौर्यासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥ उष्ण तेज वेगळे करुनी । जेथें तेथें जीवयोनी । कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥ येक नाना सामर्थ्यें केले । येक इच्छेपासून जाले । येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥ येक देह बाजीगिरीचे । येक देह वोडंबरीचे। येक देह देवतांचे । नानाप्रकारें॥ २३॥ येक क्रोधापासून जाले । येक तपा पासून जन्मले । येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥ ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें । विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥ नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली । विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वें ॥ २६ ॥ थोडें बहुत समजलें। पोटापुरती विद्या सिकलें । प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७॥ ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा । त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८॥ सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड । त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥ आपल्य देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचें कळे । लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥ अनुरेणाऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष । आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥ त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक । जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥ धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं । उगीच अहंता पापिणी । वेढा लावी ॥ ३३ ॥ अहंता सांडून विवरणें । कित्येक देवांचे करणें । पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥ थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया । शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५॥ कुश्चीळ ठाईं जन्मलें । आणि कुश्चीळ रसेंचि वाढलें। यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥३६॥ कुश्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर । लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥ कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी ची ची । झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८॥ झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे । जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥ उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें । विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : पिंडोत्पत्तिनिरूपण ॥ श्रीराम ॥ चौंखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती । ऐसे होतीआणी जाती । असंख्यात ॥ १ ॥ तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें । त्यांचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥ शरत्काळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें । उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥ अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस । रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४ ॥ वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें। पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५॥ संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे । अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥ कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मूळापासून अवघें घडे । अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥ पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर । सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥ फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें । ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥ बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती । येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥ दोहिंमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज । वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥ इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती । मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥ मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धावतीं अंतराळीं । नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥ फळावडिल सुमनें । सुमनांवडिल पानें । पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आघवीं ॥ १४ ॥ काष्ठांवडिल मुळ्या बारिक। मुळ्यां वडिल तें उदक । उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥ याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळां वडिल जगती । जगतीवडिल मूर्ती। आपोनारायायेणाची ॥१६ ॥ तयावडिल अग्निदेव । अग्निवडिल वायेदेव । वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥ सकळांवडिल अंतरात्मा। त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥ जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें । उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥ म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥ करी आपुला व्यासंग। कदापि नव्हे ध्यानभंग । बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥ जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें । काये काये वडिलीं केलें । कीती पाहावें ॥ २२ ॥ तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाल । अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥ तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं । मग ते लक्ष्मी तयापासूनी । जाईल कोठें ॥ २४ ॥ नारायेण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी । याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥ उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपाळिती जाली । न कळे लीळा परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६ ॥ देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण । पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥ उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं । याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें॥ २८ ॥ ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना । नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥ देवाकरितां कर्में चालती । देवाकरितां उपासक होती । देवाकरितां ज्ञानी असती । कितियेक ॥ ३० ॥ नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें । नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥ देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें । अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥ आवाहन विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान । पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥ वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त । पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थपाहावा ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्तिनिरूपणणनाम समास नववा ॥
समास दहावा : सिद्धांतनिरूपण ॥ श्रीराम ॥ गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें । निश्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥ अंधार दाटला बळें। वाटे गगन जालें काळें । रविकिर्णें तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥ उदंड हिंव जेव्हां पडिले । गमे गगन थंड जालें। उष्ण झळेनें वाळलें। ऐसें वाटे ॥ ३ ॥ ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें । आकाशासारिखें तगलें । हें तों घडेना ॥ ४ ॥ उत्तम जाणिवेचा जिनस । समजोन पाहे सावकास । निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥ उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे । तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥ चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें । विवरणेंचि निवळतें । प्राणिमात्रासी ॥ ७ ॥ विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी । जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन । तत्वनिर्शनीं अनन्य। विवेकें होतें ॥ ९ ॥ वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ जालें । देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥ ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळीं नाहीं । जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥ अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति मावळली । वृत्तिशून्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥ मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा । निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥ चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे । चंचळ निश्चळ घनवटे । हें तों घडेना ॥ १४ ॥ माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु। दैवीकृपेची जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥ संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी । आपली करणी आपणासी । निश्चयेंसीं ॥ १६ ॥ जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी । आतां असो हें विचारी। विचर जाणती ॥ १७ ॥ जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले । देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥ लक्षीं बैसले अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष । हेतुरूपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥ आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ । काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥ तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे। उपाधिनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥ शब्दपर कल्पनेपर । मन बुद्धि अगोचर । विचारें पाहावा विचार। अंतर्यामीं ॥ २२ ॥ पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें । अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥ वाक्यार्थवाच्यांश शोधिला। अलक्षीं लक्ष्यांश बुडाला । पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥ शाश्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला । विकार सांडून मिळाला । निर्विकारीं ॥ २५ ॥ दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें । पुन्हां जरी आठवलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥ प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे । विचार अंतरीं बैसे । चळेना ऐसा ॥ २७ ॥ बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें । ज्ञात्यास तैसे जालें । वासनाबीज ॥ २८ ॥ विचारें निश्चळ जाली बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि । पाहातां वडिलांची बुद्धि । निश्चळीं गेलीं ॥ २९ ॥ निश्चळास ध्यातो तो निश्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ । भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥ जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी । अंतरिनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥ मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें । अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥ उपासनेचें उत्तिर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें । अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांतनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक पंधरावा समाप्त ॥