गोष्ट दहावी
स्वजनांना त्यागून जो परक्याकडे जाई, तो दोन्हीकडून मार खाई
एका वनात राहणारा 'चंडरव' नावाचा कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ भटकता भटकता भर रात्री एका नजिकच्या गावात शिरला आणि एका रंगार्याच्या घराच्या परसदारी गेला व निळ्या रंगाने भरलेल्या एका मोठ्या भांड्यात पडला. बरीच धडपड केल्यावर निळ्या रंगाने चिंब झालेला तो कोल्हा त्या भांड्यातून बाहेर पडला व कुत्र्यांची नजर चुकवीत पुन्हा रानात गेला.
दुसर्या दिवशी उजाडताच जेव्हा तो निळा कोल्हा त्या वनातील वाघ, सिंह, लांडगे आदि प्राण्यांच्या दृष्टीस पडला, तेव्हा भीतीने पळून जाता जाता ते आपापसांत म्हणू लागले, 'कोण बरं असावा हा प्राणी ? आपल्याशी तुलना करता हा जरी आकाराने लहान असला तरी याचं सामर्थ्य जर मोठं असलं, तर हा आपल्याला मारल्याशिवाय कसा राहील? तेव्हा याच्यापासून दूर गेललंच बरं. म्हटलंच आहे ना?-
न यस्य चेष्टितं विद्यात् न कुलं न पराक्रमम् ।
न तस्य विश्वसेत् प्राज्ञो यदीच्छेत् श्रियमात्मनः ॥
(आपण सुरक्षित राहावे असे ज्या सूज्ञाला वाटत असेल, त्याने ज्याची वागण्याची रीत, कूळ किंवा पराक्रम माहीत नाहीत, अशावर कधीही विश्वास ठेवू नये.)
याप्रमाणे बोलून ते वन्य प्राणी पळून जाऊ लागल्याचे पाहून, त्या निळ्या कोल्ह्याने त्यांच्या या गैरसमजुतीचा फायदा उठविण्याचे ठरविले. तो त्यांना हाका मारून म्हणाला, 'बाबांनो, असे पळून न जाता मी काय सांगतो ते ऐका. या वनातील प्राण्यांना योग्य असा राजा नसल्याने, ब्रह्मदेवाने कालच मला निर्माण केले. 'ककुद्रम' असे माझे नाव ठेवले आणि स्वर्गलोकीच मला राज्याभिषेक करून, आज पहाटे मला पृथ्वीवरील या वनाचा राजा म्हणून पाठवून दिले.' त्याच्या या सांगण्यावर सिंहादि मोठमोठ्या बलवान पशूंचाही विश्वास बसला व जो तो त्याच्या सेवेला लागला.
प्रधान या नात्याने सिंहाने दररोज शिकार करून ककुद्रमाला दोन वेळा चांगले मांस खायला आणून द्यावे, शरीररक्षक म्हणून वाघाने त्याचे रक्षण करून भोजनोत्तर त्याला विडे आणून द्यावे, द्वाररक्षक म्हणून लांडग्याने राजाला भेटायला येणार्या-जाणार्यांवर नियंत्रण ठेवावे, असा दिनक्रम सुरू झाला.
पण वाघ, सिंह, लांडगे अशांसारखे शक्तिशाली प्राणी सेवेला लागताच ककुद्रम शेफारून गेला व आपल्या जातभाईंना तुच्छ मानू लागला. वास्तविक त्यांनी त्याला ओळखले होते. पण 'आपलाच एक जातभाई वनाचा राजा म्हणून मिरवतो आहे ना?' अशा विचाराने ते गप्प बसले होते. परंतु जेव्हा तो स्वकीयांना तुच्छ मानून परक्यांना जवळ करू लागला तेव्हा त्यांनी त्याचे बिंग फोडण्याचा बेत केला. त्यानुसार ते कोल्हे एके दिवशी त्या ककुद्रमापासून काही अंतरावर एकत्र जमले व 'कुई कुई' ओरडू लागले. त्याबरोबर वाघ, सिंह आदि बड्या पण परक्या प्राण्यांत राजा म्हणून रुबाबात बसलेल्या ककुद्रमाच्या कानी ती कोल्हेकुई गेली आणि स्वभावधर्मानुसार उभे राहून व तोंड वर करून 'कुईकुई' असे ओरडायला सुरुवात केली.
त्याच्या त्या कोल्हेकुईमुळे त्याचे खरे स्वरूप उघडे होताच, ते त्याची सेवा करणारे बडे पशू एकमेकांना म्हणाले, 'अरे, हा तर एक फालतू कोल्हा आहे ! याने मारलेल्या थापा खर्या मानून आपण फसलो व याच्या सेवेत गुंतून गेलो.' याप्रमाणे बोलून क्षणार्धात त्या पशूंनी त्या ककुद्रमालाच ठार केले.
ही गोष्ट पिंगलकाला सांगून दमनक त्याला म्हणाला, 'महाराज, म्हणून तुम्ही त्या ढोंगी व परक्या संजीवकाला जवळ करू नका. मी तर म्हणतो, तुम्ही त्या कपटी गवतखाऊला लवकरात लवकर यमलोकी रवाना करा व निश्चिंत व्हा.'
'पण दमनका, संजीवक हा खरोखरच माझ्या वाईटावर आहे याला पुरावा काय?'
असा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक म्हणाला, 'तो माझ्याशी जे बोलतो ते तर मी आपल्याला सांगितलेच. शिवाय त्याचा आपल्याला आजच मारण्याचा विचार दिसतोय. तो चरून जेव्हा आपल्याकडे येईल, तेव्हा आपण त्याच्याकडे बारकाईने पाहा. त्याची चर्या उग्र दिसेल, त्याच्या डोळ्यात लाली व क्रूरता आढळेल आणि त्याच्या नाकपुड्या क्रोधाने थरथरत असल्याचे दिसून येईल. आता एवढे पुरावे मिळाल्यावरही जर आपण त्याला ठार मारले नाही, तर आपण व आपले दैव. मी तरी आपल्याला आणखी किती सावध करणार?'
अशा तर्हेने पिंगलकाचे मन संजीवकाविरुद्ध पार कलुषित करून दमनक निघाला. तो बर्याच अंतरावर चरत असलेल्या संजीवकाकडे चिंताग्रस्त चेहेर्याने गेला. त्याला पाहताच त्याचे सुहास्य मुद्रेने स्वागत करून संजीवक म्हणाला, 'वा ! दमनका, आज माझ्याकडे येऊन तू मला धन्य केलेस. म्हटलंच आहे ना?-
ते धन्यास्ते विवेकज्ञास्ते सभ्या इह भूतले ।
आगच्छन्ति गृहे येषां कार्यार्थं सुह्रदो जनाः ॥
(आपले हेतु सफल करून घेण्याच्या उद्देशाने ज्यांच्या घरी मित्रमंडळी येत राहतात, तेच लोक या जगात धन्य, विवेकी व सभ्य होत.)
याप्रमाणे स्वागत करून संजीवकाने दमनकाला त्याचे क्षेम विचारले असता, दमनक मुद्दाम खिन्नपणे म्हणाला, 'अरे मित्रा, ज्याचे भविष्य सर्वस्वी धन्याच्या मर्जीवर अवलंबून असते, असा सेवक कधी सुखी असतो का? वास्तविक सेवक हा जरी जिवंत असला तरी तो मेल्यातच जमा असतो. म्हटलंच आहे ना ?-
जीवन्तोऽपि मृताः पञ्च श्रूयन्ते किल भारते ।
दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः ॥
(दरिद्री, रोगजर्जर, मूर्ख, प्रवासी व नेहमी सेवेत गुंतलेला, हे पाचजण जिवंत असूनही मेल्यात जमा असल्याचे जे महाभारतात म्हटले गेले आहे ते खरे आहे.)
'शिवाय-
सेवा श्ववृत्तिराख्याता यैस्तैर्मिथ्या प्रजल्पितम् ।
स्वच्छन्दं चरति श्वात्र सेवकः परशासनात् ॥
(सेवावृत्तीला म्हणजे दुसर्याच्या नोकरीला जे 'श्वानवृत्ती असं म्हटलं जातं, ते चुकीन म्हटलं जातं. कारण कुत्रा हा निदान स्वतःच्या इच्छेनुसार इकडे तिकडे संचार तरी करू शकतो. पण सेवकाला मात्र दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागावे लागेल.)
संजीवकाने प्रश्न केला, 'अरे, पण तू काय साधासुधा सेवक आहेस ? तू राजसेवक व त्यातून मंत्री आहेस. तेव्हा तुला दुःखी असण्याचं काय कारण ?'
खिन्न स्वरात दमनक म्हणाला, 'बाबा रे, राजसेवक आहे म्हणूनच अधिक दुःखी आहे. राजसेवकाचं दैव राजाच्या लहरीबरोबर उलटंसुलटं होत असतं. तुझीच गोष्ट घे ना ! कालपर्यंत तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे महाराज, तुझा काही एक अपराध नसता, आज तुला जिवे मारायला तयार व्हावे, हा काय न्याय झाला ?'
दमनकाच्या या विधानामुळे पार हादरून जाऊन संजीवकाने विचारले, 'काय म्हणतोस काय दमनका? महाराज मला जिवे मारणार आहेत ? आणि ते का ?'
दमनक म्हणाला, 'अरे, राजाने व पावसाने झोडपले तर कारण विचारायचे असते का ? त्यांची लहर हेच त्याचे कारण. 'आपण संजीवकाला मारून, आपल्या सर्व परिवाराला मेजवानी देणार आहोत, 'असं ते नुकतेच मला म्हणाले, म्हणून तुला सांगावयास आलो. वास्तविक राजाने विश्वासात घेऊन सांगितलेली गोष्ट मंत्र्याने बाहेर फोडणे हे पाप आहे. धर्मशास्त्रच मुळी असं सांगत की-
यो मन्त्रं स्वामिनो भिन्द्यात्साचिव्ये सन्नियोजितः ।
स हत्वा नृपकार्यं तत् स्वयं च नरकं व्रजेत् ॥
(जो मंत्री धन्याचे म्हणजे राजाचे रहस्य बाहेर फोडतो, तो त्या राजाच्या कार्याची तर हानी करतोच, पण त्यायोगे स्वतःही नरकात जातो.)
'तेव्हा मित्रा संजीवका, वास्तविक हे गुपित मी तुला सांगायलाच नको होतं पण केवळ माझ्यावर विश्वास ठेवून तू पिंगलकमहाराजांकडे गेलास व त्यांचा मित्र बनलास म्हणून तुझ्यावर आलेल्या प्राणसंकटाची तुला कल्पना देणे हे मी माझे अधिक श्रेष्ठ कर्तव्य मानले व ते गुपित तुझ्यापाशी उघड केले.'
'पण पिंगलकमहाराजांच्या डोक्यात आलेला हा घातक विचार त्यांनी काढून टाकावा यासाठी तू त्यांना काही सांगून पाहिले नाहीस का?' असा प्रश्न संजीवकाने केला असता कपटी दमनक त्याला साळसूदपणे म्हणाला, 'मी सर्व तर्हेने प्रयत्न केले, पण ते मला म्हणू लागले, 'अरे दमनका, तो संजीवक हा काही झाले तरी गवतखाऊ आणि आपण मांसाहारी. तेव्हा त्याच्याशी मैत्री ठेवण्याऐवजी त्याला शत्रु मानणे, हेच शहाणपणाचे नाही का? आणि शत्रु म्हटला म्हणजे, त्याला जरी स्वतःची मुलगी दिलेली असली तरी त्याचा निःपात करणे हे माझ्यासारख्या क्षत्रियाचे कर्तव्य आहे.' पिंगलकमहाराज असे बोलल्यावर माझे काय चालणार?'
संजीवक म्हणाला, 'एका अर्थी पिंगलकाचं म्हणण खरं आहे. त्याच्याशी मी मैत्री केली ही माझीच चूक झाली. म्हटलेच आहे ना?
ययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम् ।
तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्ट्योः ॥
(ज्यांची आर्थिक परिस्थिती सारखी असते व ज्यांचे कुल तोलामोलाचे असते त्यांच्यातच मैत्री व विवाह जुळून येतात, विषमांत जुळून येत नाहीत.)
यावर संभावितपणाचा आव आणून दमनकाने विचारले, 'संजीवका, तूच एकदा तुझ्या प्रभावी वाणीने महाराजांचा तुझ्याबद्दलचा राग घालवून टाकण्याचा प्रयत्न का करीत नाहीस ?'
हताशपणे संजीवक म्हणाला 'दमनका, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण-
निमित्तमुद्दिश्य हि यः प्रकुप्यति ।
ध्रुवं स तस्यापगमे प्रशाम्यति ।
अकारणद्वेषपरो हि यो भवेत् ।
कथं नरस्तं परितोषयिष्यति ॥
(जो काही कारणास्तव रागावतो, तो ते कारण दूर केले की लगेच शांत होतो. पण जो काहीएक कारण नसताना द्वेष करतो वा रागावतो-अशा पुरुषाचे समाधान कसे करायचे ?)
'तेव्हा दमनका, एकतर मी त्या पिंगलकाचे मन वळविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते वळणार नाही आणि दुसरे म्हणजे समजा, त्याचे मन यदाकदाचित वळले, तरी ज्याप्रमाणे त्या क्रथनक नावाच्या सज्जन उंटाचा त्या कपटी कावळा, कोल्हा आदि त्याच्याच सहकार्यांनी बळी घेतला, त्याचप्रमाणे पिंगलकाचे कान फुंकणारे 'पापग्रह' आज ना उद्या माझाही बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.'
'बळी घेतल्या गेलेल्या त्या क्रथनक उंटाची गोष्ट काय आहे ?' अशी पृच्छा दमनकाने केली असता संजीवक म्हणाला, 'ऐक-