गोष्ट अकरावी
'दुष्टांचे बोलणे असे गोडे, पण त्यावर भाळणारा फशी पडे.'
एका वनात 'मदोत्कट' नावाचा एक सिंह राहात होता. त्याच्या अनुयायांमध्ये चित्ता, कोल्हा व एक कावळा हे तिघे प्रमुख होते.
एकदा आपल्या अनुयायांसह तो मदोत्कट सिंह वनात फिरत असता, त्याला एक उंट दिसला. तो उंट मूळ तांड्यापासून अलग पडून, भटकत भटकत, चुकून त्या वनात आला होता. मदोत्कटाने त्यापूर्वी कधीही उंट पाहिलेला नसल्याने त्याने विचारले, 'हा प्राणी कोण आहे आणि हा वनातच राहातो, की लोकांच्या आधाराने गावात राहतो?'
कावळा म्हणाला, 'महाराज, याला उंट असे म्हणतात. हा माणसांत राहातो व त्यांची ओझी वाहण्याची कामे करतो. याचे मांस फार रुचकर असते. आपण याला मारलेत, तर तीन-चार दिवस आपली सर्वांचीच चंगळ उडेल.'
मदोत्कट म्हणाला, 'कावळोबा, तुम्हाला खाण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही का ? वास्तविक, तो त्याचे भाईबंद सोडून आपल्याकडे आलेला आहे, तेव्हा त्याला अभय देणे, हे आपले पवित्र कर्तव्य आहे. म्हटलंच आहे ना?-
न गोप्रदानं न महीप्रदानं न चान्नदानं हि तथा प्रधानम् ।
यथा वदन्तीह बुधाः प्रधानं सर्वप्रदानेष्वभयप्रदानम् ॥
(गाईचे दान नव्हे, भूमीचे दान नव्हे, किंवा अन्नदानही तेवढे महत्त्वाचे नव्हे, एवढे अभयदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे, असे सूज्ञ म्हणतात.)
खुद्द मदोत्कटच असे म्हणाल्यामुळे कावळा, कोल्हा व चित्ता हे तिघेही गप्प बसले आणि मदोत्कटाच्या आज्ञेवरून ते त्या उंटाला घेऊन त्याच्याकडे आहे. मदोत्कटाने त्या उंटाची आस्थेने चौकशी करून त्याला अभय दिले व आपल्या परिवारात सामील करून घेतले. मग तो क्रथनक नावाचा उंट त्या रानात उगवलेल्या पाचूसारख्या गवतावर आपला उदरनिर्वाह मोठ्या सुखात करू लागला. पण, या उंटाला मारून त्याच्या रुचकर मांसाचा आस्वाद घेण्याऐवजी, आपल्या वनराजाने त्याला अभय दिले, ही गोष्ट कावळा, कोल्हा व चित्ता यांच्या मनात सलत राहिली.
एके दिवशी त्या मदोत्कट सिंहाची, त्याच वनातील एका उन्मत्त हत्तीशी झुंज झाली, आणि तीत त्या हत्तीचा सुळा लागून, मदोत्कटाला जबर जखम झाली. त्यामुळे आजारी पडून, त्याच्यावर गुहेत पडून राहाण्याची पाळी आली.
मदोत्कटाचे शिकारीसाठी बाहेर जाणे बंद झाल्यामुळे, त्याच्याबरोबरच त्याच्या परिवारातील चित्ता, कोल्हा व कावळा आदि पशुपक्ष्यांची उपासमार होऊ लागली. अशा स्थितीत एकदा मदोत्कट त्यांना म्हणाला, 'बाबांनो, सध्या मला काही शिकारीसाठी बाहेर पडता येत नाही. तेव्हा तुम्ही जर एखाद्या प्राण्याला फसवून माझ्या गुहेत आणलेत, तर इथल्या इथे मी त्याची शिकार करीन आणि माझ्या भुकेबरोबरच तुमचीही भूक भागवीन.'
मदोत्कटाने याप्रमाणे सांगताच, चित्ता, कोल्हा व कावळा हे तिघेही तिथून निघून वनात गेले व श्वापदाचा शोध घेऊ लागले. बराच प्रयत्न करूनदेखील 'शिकार' दृष्टिपथात न आल्याने कोल्हा आपल्या दोघा साथीदारांना म्हणाला, 'उंटासारखा चवदार प्राणी हाताशी असताना, महाराज त्यालाच का मारीत नाहीत ? त्याला मारले असते, तर चार-दोन दिवस त्याचे मांस आपल्याला पोटीपोटभर झाले असते.'
कावळा म्हणाला, 'मलाही तसेच वाटते. पण महाराज पडले धार्मिक. तेव्हा अभय दिलेल्या त्याला ते कसे मारतील ?'
कोल्हा बोलू लागला, 'हे पहा, जे स्वतःला 'धार्मिक' म्हणवून घेतात ना, ते स्वतःच्या सोयीचे असे धर्मग्रंथातले आधार घेऊन, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांप्रमाणेच मनःपूत वागत असतात. तेव्हा मी एकटाच महाराजांकडे जातो आणि धर्मातले आधार देऊनच त्या उंटाला मारण्याबाबत त्यांची संमती मिळवतो.'
चित्ता व कावळा यांना असे आश्वासन देऊन व त्यांना ते होते त्याच ठिकाणी थांबायला सांगून, तो कपटी कोल्हा मदोत्कटाकडे मंदगतीने गेला व त्याला म्हणाला, 'महाराज, आम्ही तिघांनी शोध घेऊनही आम्हाला शिकार मिळाली नाही आणि भुकेने शक्तिहीन झाल्यामुळे शिकारीच्या शोधार्थ आणखी भटकण्याएवढे आता आमच्या अंगात त्राणही राहिले नाही. अशा स्थितीत आपण त्या निरुपयोगी क्रथनक उंटालाच मारून खाल्ले तर?'
मदोत्कट म्हणाला, 'अरे नीचा, काय बोलतोस तू हे ? ज्याला मी अभय दिले आहे, त्यालाच मी मारून खाऊ ? धर्माच्या विरुद्ध अशी ही गोष्ट मी कदापीही करणार नाही.'
कोल्हा बोलू लागला, 'महाराज, आपल्यासारख्या धर्मवीराला मी अधार्मिक कृत्य करायला कसा सांगेन ? पण समजा, महाराजांचे भुकेमुळे जाऊ पाहणारे प्राण वाचविण्यासाठी जर त्या स्वामीभक्त क्रथनकानेच प्राणार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याची इच्छा जर चित्त्याने व मी पूर्ण करण्यात मदत केली, तर आपण त्या क्रथनकाचे मांस खाल ना ? कारण त्यामुळे क्रथनकासारख्या निष्ठावंत सेवकाची पवित्र इच्छा पूर्ण केल्याचे धर्मकृत्य आपल्या हातून घडेल आणि धन्याचे प्राण वाचविण्यासाठी प्राणार्पण करण्याचे धर्मकृत्य त्या क्रथनकाकडून घडल्यामुळे, त्यालाही मरणोत्तर स्वर्ग मिळेल.'
भुकेल्या मदोत्कटाने उत्तर दिले, 'हा तुमचा मार्ग धर्माला धरून असल्याने, मी त्याचे मांस आनंदाने खाईन. कुणीकडून तरी क्रथनकाला मरणोत्तर स्वर्ग मिळावा अशीच माझी इच्छा आहे.'
मदोत्कटाने तशी तयारी दाखविताच, त्या पाताळयंत्री कोल्ह्याच्या पायात जोर आला. तो वेगाने आपले सहकारी कावळा व चित्ता यांच्याकडे गेला व त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला. मग ते तिघेही दूरवरच्या एका कुरणात चरत असलेल्या क्रथनकाकडे गेले.
तिथे जाताच कोल्हा त्या उंटाला म्हणाला, 'मित्रा, भुकेने व्याकुळ झालेले मदोत्कटमहाराज अखेरच्या घटका मोजत आहेत. अशा वेळी आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना, 'तुम्ही आम्हाला मारून खा, पण तुमचे प्राण वाचवा,' असे सांगितले पाहिजे. मदोत्कटमहाराज आपल्याला मारून खाणे शक्य नाही. तेव्हा त्यांना नुसते तसे सांगायला काय हरकत आहे ? म्हणून आपण चौघेही त्यांच्याकडे आताच जाऊ या.' तो कोल्हा याप्रमाणे बोलल्यावर तो स्वतः, कावळा व उंट असे चौघेही मदोत्कटाकडे गेले व त्याला नमस्कार करून उभे राहिले.
मग तो कावळ मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, गेल्या तीन-चार दिवसांत पोटात मांसाचा कणही न गेल्याने, आपले प्राण जाण्याची पाळी आली आहे. अशा स्थितीत आपण मागेपुढे न पाहता निःशंकपणे मला मारून खावे व स्वतःचे प्राण वाचवावे. त्यात माझेही हित आहे. कारण-
स्वाम्यर्थे यस्त्यजेत् प्राणान् भृत्यो भक्तिसमन्वितः ।
परं स पदमाप्नोति जरामरणवर्जितम् ॥
(भक्तियुक्त मनाने जो सेवक स्वामीसाठी आपले प्राण देतो, त्याला वृद्धत्व व मृत्यु यांच्यापासून मुक्त अशा अढळपदाचा लाभ होतो.)
त्या कावळ्याचे हे बोलणे पूर्ण होते न होते, तोच त्याला बाजूला सारून कोल्हा त्या सिंहाला म्हणाला, 'महाराज, या कावळ्याला खाऊन आपले पोट कसे काय भरणार ? तेव्हा आपण मलाच मारून खावे व माझे जीवन धन्य करावे.'
मग त्या कोल्ह्याशी मागे ढकलून चित्ता पुढे व मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, या कावळ्याला खाऊन आपल्या पोटात कोकलत असलेले भुकेचे कावळे काही तृप्त होणार नाहीत आणि आपल्याप्रमाणेच नख्यांनी शिकार करणारा हा कोल्हा आपल्याच संस्कृतीचा असल्याने, याला आपण मारून खाणेही योग्य नाही. तेव्हा आपण मलाच मारून खावे आणि योग्यांनाही मरणोत्तर जी गती मिळत नाही, ती गती मिळण्याची संधी देऊन मला धन्य करावे.'
कावळा, कोल्हा व चित्ता यांनी प्राणार्पण करण्याची तयारी दर्शविली असतानाही मदोत्कटाने त्यांना मारून खाल्ले नाही; मग मला तर अभय दिले असल्याने, तो मारणे शक्य नाही, अशी समजूत होऊन क्रथनक उंटही पुढे सरसावला व मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, चित्ता हासुद्धा आपल्याप्रमाणेच नख्यांनी शिकार करणारा असल्याने, तो आपल्याच संस्कृतीतला आहे. तेव्हा त्याला न मारता, आपण मलाच मारून खावे व मला मरणोत्तर उत्तम गतीचा धनी करावे.' क्रथनक याप्रमाणे बोलताच, कोल्हा व चित्ता यांनी त्याच्यावर झडप घेऊन त्याला ठार मारले आणि मग मदोत्कटासह त्या सर्वांनी त्याचे मांस अगदी चवीने खाल्ले...''
ही गोष्ट सांगून संजीवक दमनकाला मारले, 'तेव्हा मित्रा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी मी त्या पिंगलकाची समजूत घालून, त्याच्या मनात माझ्याविषयी निर्माण झालेला गैरसमज दूर केला, तरी त्याच्याभोवती वावरणारे दुष्ट सल्लागार त्याचे मन पुन्हा कोणत्याही रीतीने कलुषित करतील व माझा घात करतील. त्यामुळे पिंगलकाशी पुन्हा स्नेहसंबंधी जोडण्यात अर्थ नाही. कारण म्हटलंच आहे. -
गृध्राकारोऽपि सेव्यः स्यात् हंसाकारैः सभासदैः
हंसाकारोपि सन्त्याज्यो गृध्राकारैः स तैर्नृपः ॥
(भोवतालच्या परिवारातील लोक हे जर हंसांप्रमाणे असतील, तर गिधाडाप्रमाणे असलेल्या राजाच्या सेवेत रहावे, पण भोवतालच्या परिवारातील लोक हे जर गिधाडांप्रमाणे असतील, तर हंसाप्रमाणे असलेल्या राजाच्याही सेवेत राहू नये.)
'शिवाय हे दमनका, दुष्टाबद्दल बोलायचं झालं तर तो एक महाभयंकर सर्पच आहे. म्हटलंच आहे ना?-
अहो खलभुजङ्गस्य विपरीतो वधक्रमः ।
कर्णे लगति चैकस्य प्राणैरन्यो वियुज्यते ॥
(अहो, खलरूपी सर्पाची दुसर्यांना मारण्याची रीत मोठी अजब असते. तो एकाच्या कानाला दंश करतो. तर दुसर्याचा प्राण घेतो.)
ह्या संजीवकाची व पिंगलकाची झुंज सुरू झाली आणि त्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असता, त्यांच्यापैकी एखाद्याने, मी त्याला दुसर्याविरुद्ध उठवल्याची गोष्ट उघड केली, तर पिंगलक आपल्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही, त्यापेक्षा या संजीवकाला दूरच्या रानात जायला सांगणे अधिक बरे ! असा विचार करून दमनक त्याला म्हणाला, 'संजीवका, मला वाटते तू पिंगलकमहाराजांपासून तुझे रक्षण करण्यासाठी दुसर्या एखाद्या वनात निघून जावेस.'
संजीवक म्हणाला, 'नाही दमनका, मी या वनातून दुसर्या वनात गेलो, तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. कारण -
महतां योऽपराध्येत दूरस्थोंऽस्मीति नाश्वसेत् ।
दीर्घो बुद्धिमतो बाहू ताभ्यां हिंसति हिंसकम् ॥
(थोरामोठ्यांचा ज्याने अपराध केला, त्याने 'आपण दूर आहोत म्हणजे सुरक्षित आहोत, अशा विश्वासावर राहू नये, कारण बुद्धिवंताचे बाहू फार दूरवरपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या सहाय्याने तो अपराध्याला मारू शकतो.)
'तेव्हा दमनका, समजा पिंगलकाशी लढता लढता मला मरण आले, तरी मी ते पत्करीन, पण पळून दुसर्या रानात जाणार नाही.'
संजीवकाने पिंगलकाशी लढण्याचा केलेला निर्धार त्याने बदलावा म्हणून दमनक त्याला म्हणाला, 'मित्रा, निर्णय घेण्यात तू अशी उताविळी करू नकोस. ज्याच्याशी आपल्याला लढायचे आहे, त्या शत्रूशी अगोदर ताकद ओळखून, मगच त्याच्याशी लढायचे की नाही, याबद्दलचा निर्णय घ्यावा. नाहीतर त्या टिटव्याकडून पराभूत होण्याचा प्रसंग जसा समुद्रावर आला, तसा प्रसंग तुझ्यावर यायचा.'
'तो कसा काय?' असा प्रश्न संजीवकाने विचारला असता, दमनक सांगू लागला-