गोष्ट वीसावी
अविचाराने करता उपाय, कालांतराने ठेर अपाय
एका वनातील वडाच्या झाडावर बरेच बगळे घरटी करून राहात होते. त्याच झाडाच्या ढोलीत एक भलामोठा काळाकुट्ट सर्प राहात असे व ते बगळे भक्ष्याच्या शोधार्थ दूरवर गेले की, त्यांच्या घरट्यातील पिले खाऊन टाकत असे.
एकदा अशीच त्या सर्पाने एका बगळाबगळीची पिले खाऊन टाकल्यामुळे तो बगळा जवळच्याच एका सरोवराकाठी जाऊन रडत बसला. एका खेकड्याने त्याला रडण्याचे कारण विचारता, त्याने ते त्याला सांगितले व 'त्या दुष्ट सर्पाला मारण्याचा एखादा उपाय सांगतोस का?' असे त्याला विचारले.
त्याचे ते म्हणणे ऐकून खेकडा मनात म्हणाला, 'जसा तो साप या बगळ्यांच्या पिल्लांचा शत्रू, तसेच झाडून सारे बगळेही आम्हा खेकड्यांचे व माशांचे शत्रूच आहेत. मग आलेली संधी साधून, आपण जर गोड बोलून या बगळ्यांचा परस्पर कुणाकडून तरी नाश करविला, तर त्यात वावगे ते काय ? म्हटलेच आहे ना ?
नवनीतसमां वाणीं कृत्वा चित्तं तु निर्दयम् ।
तथा प्रबोध्यते शत्रुः सान्वयो म्रियते यथा ॥
(वाचा लोण्याप्रमाणे मृदु, पण ह्रदय मात्र कठोर ठेवून शत्रूला असा सल्ला द्यावा, की ज्यायोगे त्याचा गणगोतासह नाश होईल.)
मनात आलेला हा विचार पक्का करून तो खेकडा म्हणाला, 'बगळेमामा, यावर एक नामी उपाय तुम्हाला म्हणून मी सांगतो. त्या समोरच्या झाडाखाली असलेल्या बिळात मुंगूस राहतो ना ? त्याच्या बिळापासून ते थेट तुमच्या वटवृक्षातील ढोलीपर्यंत थोडथोड्या अंतरावर मांसखंड टाका; म्हणजे तो मुंगूस त्याच्या बिळापासून एकेक मांसखंड खात खात अखेर त्या ढोलीपर्यंत जाईल व त्या सर्पाला मारून खाईल.'
खेकड्याने सुचविलेला हा उपाय एकदम पटल्यामुळे त्या बगळ्याने त्याप्रमाणे केले. पण हा उपाय जरी परिणामकारक ठरला, तरी त्या मुंगुसाने ते मांसखंड खात खात जाऊन जसा त्या सर्पाचा फडशा उडविला, तसाच त्यानंतर त्याची दृष्टी त्या वृक्षावर गेल्यामुळे, त्याने त्या वृक्षावरील सर्व बगळ्यांचाही क्रमाक्रमाने फडशा उडविला.'
ही गोष्ट सांगून तो न्यायाधीश म्हणाला, 'हे धर्मबुद्धी ! म्हणून मी म्हणतो की, ज्याप्रमाणे पूर्ण विचार न केल्यामुळे त्या बगळ्याने योजलेला उपाय हा अपाय ठरला, त्याचप्रमाणे पापबुद्धीनेही तुझे धन गडप करण्यासाठी उपाय योजताना, त्यापासून होणार्या अपायाचा विचार न केल्यामुळे, तो स्वतः तर प्राणास मुकलाच, पण त्याचा पिताही आंधळा झाला.'
या गोष्टी सांगून करटक दमनकाला म्हणाला, 'बाबा रे, स्वार्थापुढे तुला न्यायनीतीची चाड उरली नसल्याने, तू पिंगलकमहाराजांचे प्राण व राज्य धोक्यात आणले आहेस. आज त्यांना दगा देऊ पहाणारा तू, उद्या मलाही दगा द्यायला कमी करणार नाहीस. अशा स्थितीत तुझी संगत सोडून देणेच योग्य होईल. ज्याने न्याय व नीती गुंडाळून ठेवली आहे, अशा तुला आज जरी यश मिळत असल्यासारखे वाटत असले, तरी ते यापुढेही असेच मिळत राहील, या भ्रमात तू राहू नकोस. ज्या गावात शेकडो शेर वजनाचा लोखंडी तराजू खाणारा उंदीर असतो, त्या गावात - त्या उंदरास तोडीस तोड असा - चोचीने मुलगा उचलून उडून जाऊ शकणारा बहिरीससाणाही असतो, ही गोष्ट तुला ठाऊक आहे ना?'
'ती गोष्ट मला ठाऊक नाही, 'असे दमनक म्हणताच करटकाने त्याला ती गोष्ट सांगायला सुरुवात केली -