गोष्ट चौतिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट चौतिसावी

भलत्यावर जो विश्वास ठेवी, तो आत्मघात करून घेई.

एका झाडाच्या ढोलीत राहणारा कपिंजल नावाचा चिमणा अन्नाच्या शोधार्थ एकदा आपल्या मित्रांसह दूरवर गेला असता, त्याला तयार होत आलेल्या भाताच्या लोंब्यांनी भरलेले एक शेत दिसले. मग त्या धान्यावर भरपूर ताव मारता यावा, म्हणून त्या चिमण्याने त्या शेताजवळच्या एका वृक्षावर मुक्काम ठोकला व दररोज त्या शेतात जाऊन व त्या धान्यावर ताव मारून तो धष्टपुष्ट बनू लागला. पण थोड्याच दिवसांत त्याला आपल्या मूळ घराची आठवण येऊ लागली. म्हटलंच आहे ना ?-

न तादृग् जायते सौख्यमपि स्वर्गे शरीरिणाम् ।

दारिद्र्येऽपि हि यादृक्‌ स्यात् स्वदेशे स्वपुरे गृहे ॥

(दारिद्र्यात जरी राहावे लागले तरी प्राण्यांना स्वदेशात, स्वतःच्या गावात किंवा घरी राहण्यात जेवढे सुख वाटते, तेवढे ते प्रत्यक्ष स्वर्गातही वाटत नाही.)

आणि म्हणून थोडे दिवस लोटताच तो चिमणा जेव्हा स्वतःच्या घराकडे गेला, तेव्हा त्याला आपण वर्षानुवर्षे ज्या झाडाच्या कोटरीत राहात होतो त्या कोटरीत शीघ्रग नावाच्या एका सशाने बिर्‍हाड थाटले असल्याचे आढळून आले.

'वर्षानुवर्षे या जागेत मी राहात आलो असल्याने, ही जागा माझी आहे. तेव्हा तू इथून ताबडतोब निघून जा,' असे तो चिमणा त्या सशाला सांगू लागताच तो ससा त्याला म्हणाला, 'ही जागा तुझी कशी काय ? याबाबत कायदा असा आहे -

वापीकूपतडागानांन्देवालयकुनन्मनाम् ।

उत्सर्गात्परतः स्वाम्यमपि कर्तुं न शक्यते ॥

(विहिरी, तळी, देवळे आणि वृक्ष अशांसारख्या ठिकाणी राहिल्याने त्यांच्यावर कायमची मालकी प्रस्थापित होत नाही. जोवर एखादा अशा ठिकाणी राहात असतो, तोवरच त्याचा त्यावर हक्क असतो.)

'तेव्हा आता या वुक्षाच्या ढोलीत मी राहात असल्याने ही ढोली माझी आहे.'

कपिंजल चिमणा म्हणाला, 'ससूमामा, कायदा ही अशी एक चमत्कारिक चीज आहे की तिचा आधार परस्परविरुद्ध अशा दोन्ही पक्षांना घेता येतो. तेव्हा एखाद्या कायदेपंडिताकडे जाण्याऐवजी आपण हा आपला तंटा एखाद्या निःपक्षपाती व ज्ञानी अशा व्यक्तीकडे नेऊ आणि ती जो निर्णय देईल, तो मान्य करू. आह कबूल ?'

शीघ्रगाने ते मान्य करताच, ते दोघे अशा व्यक्तीच्या शोधार्थ इकडेतिकडे फिरू लागले. थोड्याच वेळात त्यांना नदीकाठी ध्यानस्थ बसलेला तीक्ष्णदंत नावाचा एक बोका दिसला. त्याला पाहून शीघ्रग ससा त्या चिमण्याला म्हणाला, 'चिमणराव, तो साधू बनलेला बोका पाहिलात ? तो आपला तंटा अगदी निःपक्षपाती वृत्तीनं सोडवील.'

कपिंजल चिमणा म्हणाला, 'ससूमामा, साधूच्या वेषांत वावरणार्‍यांपैकी बहुतेक सर्व आतून स्वार्थसाधूच असतात. त्यातून बोक्याचे व आपले जन्मजात वैर. अशा स्थितीत त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवायचा ?'

डोळे मिटून पण कान उघडे ठेवून बसलेल्या त्या ढोंगी ध्यानधारी बोक्याच्या कानी त्यांचा संवाद पडताच, डोळे उघडून तो त्यांना म्हणाला, 'बाबांनो, तुमच्या काय गप्पा चालल्यात त्याची मला कल्पना नाही. पण तुम्ही बहुधा निरर्थक गप्पा मारीत असणार. बाबांनो, या आयुष्याचा प्रत्येक क्षण अन् क्षण मोलाचा असताना, अशा निरर्थक गप्पा मारण्यात वेळ वाया घालविणे योग्य आहे का ? या बाबतीत धर्मशास्त्र असं सांगतं -

यस्य धर्मविहीनानि दिनान्यायान्ति यान्ति च ।

स लोहकारभस्रेव श्वसन्नपि न जीवति ॥

(ज्याचे दिवस धर्म न आचरता, नुसतेच उगवतात व मावळतात, तो लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वासोच्छ्‌वास चालू असूनही [प्रत्यक्षात] जिवंत नसतो.)

त्या बोकोबाच्या या विद्वत्तापूर्ण बोलण्याने प्रभावित झालेला तो ससा व चिमणा त्याला आपल्या तंट्याचे स्वरूप समजावून देऊ लागले असता, तो कपटी बोका त्यांना म्हणाला, 'बाबांनो, म्हातारपणामुळे मला नीटसे ऐकू येत नसल्याने, तुम्ही जे काय सांगायचे असेल ते माझ्याजवळ येऊन सांगा.' त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून ते दोघे त्याच्याजवळ गेले असता, त्या बोक्याने क्षणार्धात त्या दोघांनाही मारून खाऊन टाकले.'

ही गोष्ट सांगून तो कावळा त्या घुबडाला राज्याभिषेक करू पाहणार्‍या पक्ष्यांना म्हणाला, 'तेव्हा पक्षीबंधूंनो, स्वभावतःच क्रूर, घुम्या व उभा दिवस झोपेत घालविणार्‍या त्या घुबडाला राजा बनवून, तुम्हाला त्या अविचारी ससा व चिमणासारखा स्वतःचा नाश करून घ्यायचा आहे का?' कावळ्याचे हे म्हणणे पटल्यामुळे ते पक्षी आपला बेत रद्द करून तिथून चूपचाप निघून गेले.

बराच वेळ झाला तरी राज्याभिषेकाचे प्रत्यक्ष विधी सुरू होत नाहीसे पाहून त्या घुबडाने त्याला दिवसा इच्छित ठिकाणी सांभाळून नेणार्‍या 'होला' नावाच्या पक्ष्याला विचारले, 'काय रे होल्या, मला राज्याभिषेक करायला निघालेले पक्षी आता चूपचाप का बसले आहेत?'

होला म्हणाला, 'घुबडराव, एका कावळ्याने तुमची निंदानालस्ती केल्यामुळे सर्व पक्षी तुम्हाला राज्याभिषेक करायचा बेत रद्द करून इथून चूपचाप निघून गेले आहेत. तो विघ्नसंतोषी कावळा तेवढा, पुढे काय होते ते पाहण्यासाठी जवळच्याच झाडाच्या फांदीवर बसून राहिला आहे.'

हे ऐकून रागाने काळेबुंद झालेले ते घुबड त्या कावळ्याला उद्देशून म्हणाले, 'अरे मूर्खा, माझ्या राज्याभिषेकात विघ्न आणून तू केवळ माझेच नव्हे, तर तुझे व तुझ्या कावळे जातीचेही कायमचे नुकसान करून घेतले आहेस. अरे, शस्त्रांनी केलेल्या जखमा जशा कालांतराने भरून निघत असल्या, तरी अपमानकारक शब्दांनी दुसर्‍यांच्या ह्रदयांना केलेल्या जखमा कधी भरून निघत नसतात. तू माझा अपमान केला असल्याने, यापुढे आम्हा घुबड जातीचे तुम्हा कावळेजातीशी कायमचे हाडवैर राहील.'

ते ऐकून कावळा स्वतःशीच म्हणाला, 'माझेच चुकले. म्हटलेच आहे ना ?-

बलोपपन्नोऽपि हि बुद्धिमान्नरः

परं नयेन्न स्वयमेव वैरिताम् ।

भिषङ्‌ममास्तीत विचिन्त्य भक्षयेत्

अकारणात् को हि विचक्षणो विषम् ॥

(कितीही सामर्थ्यसंपन्न जरी असला, तरी बुद्धिमंताने कारण नसता दुसर्‍याचे शत्रुत्व ओढवून घेऊ नये. आपल्याला बरे करायला जवळपास वैद्य आहे, असा विचार करून कुणा सूज्ञाने विषप्राशन करणे योग्य ठरेल का ?)

ही गोष्ट सांगून राजा मेघवर्णाचा वृद्ध सचीव स्थिरजीवी त्याला म्हणाला, 'महाराज, अशा तर्‍हेने कावळे व घुबड यांच्यात कायमचे वैर निर्माण झाले. ते असो. मुद्यावर येऊन बोलायचे तर घुबडांचा राजा अरिमर्दन याला आपण कसे तोंड द्यावे, त्याबाबत आपल्या इतर मंत्र्यानी आपल्याला वेगवेगळा सल्ला दिला असला, तरी माझ्या मते आपण शत्रूशी मैत्रीचे नाटक करून त्याला गाफील ठेवावे व एके दिवशी संधी साधून त्याला निपटून काढावे. शत्रू कितीही जरी बुद्धिमान् असला तरी तोही फसू शकतो. धूर्त अशा तीन लफंग्यांनी एका ब्राह्मणाला फसवून त्याचा बोकड कसा लांबविला ती गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना?'

'ती गोष्ट काय आहे?' असे राजा मेघवर्णाने विचारता स्थिरजीवी म्हणाला, 'तर मग ऐका महाराज-

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP