गोष्ट पंचेचाळिसावी
स्वविचाराने वागे तो शिखर चढे, परविचाराने वागे तो खड्ड्यात पडे !
भक्ष्याच्या शोधार्थ सकाळपासून वनात फिरणार्या 'खरनरवर' नावाच्या सिंहाला दिवसभरात शिकार न मिळाल्याने, तो एका पर्वतातल्या गुहेपाशी जाऊन स्वतःशीच म्हणाला, 'आता संध्याकाळ दाटू लागल्याने, या गुहेत नेहमी राहणारा प्राणी लवकरच रात्रीच्या निवार्यासाठी इथे येईल व त्याला मारून आपल्याला आपली भूक भागवता येईल.' मनात असे म्हणून तो सिंह त्या गुहेत दडून बसला.
थोड्याच वेळात, त्या गुहेत राहणारा दधिपुच्छ नावाचा एक कोल्हा त्या गुहेच्या तोडापाशी आला. आत प्रवेश करण्यापूर्वी तो इकडेतिकडे बघतो, तर त्याला केवळ गुहेच्याच दिशेने धुळीत उमटलेली सिंहाची पावले दिसली. आत सिंह आहे की काय, या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी, तो मुद्दामच त्या गुहेला उद्देशून म्हणाला, 'बये गुहे, आज रात्री मी तुझ्या पोटात आसरा घेऊ का? अगं, दररोज संध्याकाळी जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारतो तेव्हा तू मोठ्या आपुलकीने 'ये, बाबा ये' असे म्हणतेस. मग आजच तू अशी गप्प का ? तू जर नेहमीप्रमाणे मला 'ये, बाबा ये,' असे म्हणाली नाहीस तर, मी इथून निघून जाईन.'
गुहेबाहेरच्या कोल्ह्याचे ते शब्द ऐकून सिंहाला वाटले, 'कोल्ह्याच्या त्या प्रश्नाला ही गुहा 'ये, बाबा ये,' असे उत्तर देत असणार, पण आज माझे भय वाटत असल्याने ही चुपचाप असावी. मग आता त्याला नेहमीचे उत्तर नाही मिळाले तर तो निघून जाईल व मजवर भुके राहण्याची पाळी येईल. तेव्हा या गुहेऐवजी मीच त्याला उत्तर देतो.' त्या सिंहाच्या मनात याप्रमाणे विचार चालला असता, त्या कोल्ह्याने पुन्हा विचारले, 'काय गं गुहे, आज रात्री मी तुझ्या पोटात आसरा घेऊ का?' त्याबरोबर सिंहाने उत्तर दिले, 'ये बाबा ये.'
गुहेतून हे शब्द बाहेर पडताच त्या सिंहाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात, तो कोल्हा म्हणाला, 'अरेच्चा ! या गुहेत राहता राहता माझ्या काळ्यांचे पांढरे झाले, पण ही गुहा काही कधी बोलली नाही. पण ज्या अर्थी आज तिला वाचा फुटली आहे, त्या अर्थी तिच्यात जाणे धोक्याचे आहे.' एवढे बोलून तो कोल्हा तिथून निघून गेला आणि तो सिंह स्वतःच्या मूर्खपणाबद्दल स्वतःलाच शिव्या देऊ लागला.
ही गोष्ट सांगून व या किल्ल्यात इतःपर राहणे कसे धोक्याचे आहे, हे आपल्या आप्तमित्रांना स्पष्ट करून रक्ताक्ष हा त्यांच्यासह तो किल्ला सोडून अन्यत्र कुठेतरी निघून गेला.
राजा अरिमर्दनाचा मंत्री रक्ताक्ष, त्याच्या बंधुबांधवांसह निघून गेल्याचे पाहून, स्थिरजीवी स्वतःशी म्हणाला, 'या घुबडाच्या राज्यात एकटा रक्ताक्ष हाच काय तो खरा दूरदर्शी व राज्याचा हितचिंतक होता. पण त्याच्यावर स्वभूमी सोडून जाण्याचा प्रसंग आला. मात्र त्यामुळे या घुबडांचा निःपात करण्यात मला वाटणारा अडथळा दूर झाला. म्हटलंच आहे ना ?-
न दीर्घदर्शिनो यस्य मंत्रिणः स्युर्महीपतेः ।
क्रमायता ध्रुवं तस्य न चिरात् स्यात् परिक्षयः ॥
(त्या राजाचे मंत्री दूरदर्शी नसतात, त्याचा नाश क्रमाक्रमाने पण लवकरच होतो, हे ठरलेले असते. )
त्यानंतर दररोज सूर्योदय झाला व किल्ल्यातल्या घुबडांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला की, स्थिरजीवी हा त्या किल्ल्यातून बाहेर पडून सुक्या काटक्या शोधून आणी व किल्ल्याच्या प्रवेशदरवाजाजवळच, पण आडोशाला त्यांचा साठा करी. थोड्याच दिवसांत काटक्यांचा पुरेसा साठा होताच, तो एका भर दुपारी राजा मेघवर्णाकडे गेला व त्याच्या कानात काहीतरी सांगून परतीच्या प्रवासाला निघाला.
लगेच राजा मेघवर्ण व त्याचे अनुयायी पेटते पलिते घेऊन स्थिरजीवीमागोमाग, भर उन्हातून, पण जराही गाजावाजा न करता त्या घुबडांच्या गडाकडे आले. तिथे येताच स्थिरजीवीने अगोदरच साठवून ठेवलेल्या सुक्या काटक्या, त्या कावळ्यांनी त्या गडाच्या प्रवेशद्वारात खच्चून भरल्या व त्यांच्यात ते पेटते पलिते घुसविले. त्याबरोबर आगडोंब उसळून त्या बंदिस्त भुयारवजा गडात धूरच धूर झाला आणि त्यात त्यांचा शत्रू अरिमर्दन व त्याचे मंत्री व प्रजाजन यांचा अंत झाला.
मग परत आपल्या मूळ वटवृक्षाकडे गेल्यावर स्थिरजीवीचा गौरव करून राजा मेघवर्णाने त्याला विचारले, 'काका, हा विजय तुम्ही कसा मिळविला?' यावर स्थिरजीवीने आपल्या कारस्थानाचा सविस्तर तपशील सांगून शेवटी तो म्हणाला, 'महाराज, या विजयात मी वठविलेल्या फितुरीच्य व लाचारीच्या सोंगाचा हात असला, तरी या विजयाला प्रामुख्याने त्या घुबडांच्या मूर्खपणानेच जास्त हातभार लावला. त्या कृष्णसर्पाने स्वतः कमीपणा पत्करून त्या बेडकांना जे पाठीवर फिरवले ते काय उगा फिरवले ?'
'ती गोष्ट काय आहे ?' असा प्रश्न मेघवर्णाने केला असता, स्थिरजीवी म्हणाला, 'ऐका महाराज-